रविवार, १५ मे, २०१६

मॅडोना

पुन्नामा नि मरदाचलम यांच्याकडे कुत्र्याची दोन पिल्लं आहेत. या चौघांचा परिवार दक्षिण भारतातल्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या एका छोट्याशा आलमरमेडू नावाच्या गावात राहतो. हे गाव तमिळनाडू-केरळ यांच्या सीमारेषेवर वसलेलं आहे. त्यामुळे या गावातली लोकं तमिळ नि मल्याळमही बोलतात. गाव अगदी छोटं. कोईंबतूरवरून येणारी नि अनैकट़्टीकडे जाणारी बस या गावात जिथे थांबते, तिथेच गावाचा मध्य आहे. दोन किराण्याची दुकानं, एक चहाचं दुकान, एक घरगुती हॉटेल आणि एक मोबाईल शॉप एवढा गावाचा पसारा. किराण्याच्या दुकानापुढे येणारी बस थांबते नि जाणारी थांबते त्याच्या बरोबर विरुद़्ध दिशेला. या गावात बस-स्टॅण्ड बांधण्याची आवश्यकता मागच्या पंधरा-वीस वर्षांततरी कुणाला वाटली नाहीये. गावाच्या आजूबाजूला छान डोंगररांगा आहेत. छोटी-छोटी शेतं आहेत नि एक वीटभट़्टी आहे. मॅडोनाचा जन्म तिथलाच.

मॅडोनाची आई सरस्वती तिच्या लहानपणापासूनच अंगानं सडपातळ नि उपद़्व्यापी. ती जेव्हा वयात आली तेव्हा ती वयात आलीय याचीही जाण तिला नव्हती. आपल्या जातीबांधवांबरोबर कुठं ससा पकड, कुठे मांजरीला त्रास दे तर कुठे गाईंवर जरब दाखव असलेच उपद्व्याप ती करत राहिली. आतून तिला वाटत होतं की काहीतरी वेगळं होतंय, न समजणाऱ्या कोमल पण सुखद वेदना होताहेत. शंकर नि कुमार सतत आपल्या बाजूला घुटमळताहेत. शंकर अगदीच चिडखोर झालाय नि त्यांच्या मित्रांवर चिडून हल्ले करतोय. शंकर थोडा जाडसर मातकट रंगाचा उमदा जवान कुत्रा होता. त्याच्या साऱ्या जातीबांधवांत तोच एकटा उठून दिसायचा. त्याला माहिती होतं, आता जास्त वेळ उरलेला नाहीये. सरस्वती त्याचीच आहे, पण त्याला याचीही चिंता होती की त्याचे सारेच मित्र त्याच्यावर उलटले तर त्याला पळता भुई थोडी होईल. त्याला वाटत होतं की एखाद्य़ा क्षणी जेव्हा आजूबाजूला कुणी नसेल तेव्हा सरस्वतीला घ्यावं. तो तोच क्षण शोधत होता, पण कुमारही अगदी मनापासून सरस्वतीच्यामागे मागे फिरत होता. त्याच्याही डोक्यात तेच असेल. सरस्वती अल्लड होती. चारचौघांत असताना ती शेपूट घालून लांब-लांब पळत होती नि फक्त शंकर नि कुमार असताना दोघांनाही आपल्या गंधाने वेडं करून मनातल्या मनात हसत होती. तिला बहुतेक त्यात मजा वाटत होती, पण त्याचबरोबर आतून तिलाही आस लागली होती. शंकर तिच्यासाठी योग्य होता, आता पुढचं सारं त्याच्यावर होतं.

हे सगळं झालं ते एका विझत चाललेल्या संध्याकाळी. वीटभट़्टी जवळ. कामगार घराकडे परतलेले. कुत्र्यांची टोळकी आसूसून ओरडत होती. एका वीटभट़्टी आड संधी साधून शंकर सरस्वती या चाटू लागला. पाचेक सेकंदातच ती विरघळली नि तिनं होकार कळवला. शंकर अधाशीपणे तिच्यावर चढला, तेवढ्यात कुमार चारेक कुत्र्यांचं टोळकं घेऊन शंकरवर चालून आला. शंकरची अवस्था नाजूक होती, त्यानं लागलीच समागम सोडून कुत्र्यांवर हल्ला बोलला. सरस्वती शेपूट घालून कोपऱ्यात जाऊन बसली. चारही कुत्रे चारी दिशांना पळाले, शंकर त्यांच्यामागे. कुमारला हीच संधी हवी होती. त्यानं सरस्वतीला डोक्याने रेटून उठवायला सुरूवात केली. सरस्वतीला गप्प बसवेना. शंकरबरोबर जे होत होतं ते तिला प्रचंड हवं-हवंसं वाटत होतं. तिला कुणीतरी हवं होतं. ही तिची पहिलीच वेळ होती. कुमार तिथे होता. पुढे काही दिवसांनी सरस्वतीला चार पिल्लं झाली, त्यातली दोन पहिल्या पावसात मेली. त्यांची शवं वीटभट़्टीमागे पोत्यावर दोनेक दिवस पडून होती नि नंतर रानडुक्करांनी रानात पळवून नेली. मॅडोना नि मायकेल उरले.

दोघेही बारीक, बुटके, मातकट रंगाचे. दोघांनाही पायांना दोन-दोन नखं जास्त. दोघेही जुळ्यासारखे. मॅडोनाचा जन्म झाला त्यावेळी मी २६ वर्षांचा होतो. पुढे २०१६ मधे मी तिला पाहिलं तेव्हा ती तीन वर्षांची झालेली नि मी २९ चा. या तीन वर्षांत ती माझ्यापेक्षा कित्येक गोष्टी जास्त शिकली. तिचा भाऊ मायकेल मागच्यावर्षी कुठल्याशा आजाराने तडफून-तडफून मेला. बहुधा त्यानं रानातलं कुठलं सडलेलं मांस खाल्लं असणार. त्याचे शेवटचे काही दिवस फार वाईट गेले. बऱ्याचदा असं वाटायचं की त्याला मारून टाकावं. हा निर्णय आम्हा संशोधकांमधे लागलीच झाला नाही. मग जनावरांच्या डॉक्टरला बोलवून योग्य ते करावं लागलं. मायकेलच्या मृत्युनंतर मॅडोना एकटी पडली. तिच्या आईच्या गावापासून ती दोनेक किलोमीटर दूर राहत होती. तिला तिची आई-बाबा, मित्र कुणी नको होते. मायकेल नि ती, दोघेही कळत्या वयाचे झाल्यावर एके दिवशी मरदाचलमच्या गाडीमागे आमच्या संस्थेत दाखल झाले. तेव्हा संस्थेच्या आवारात इतर कुणी कुत्रं नव्हतं. सनी होती, पण ती म्हातारी होऊन दोनेक वर्षाखाली वारली. मायकेल नि मॅडोना दोघेही साऱ्याच संशोधकांचे लाडके झाले. त्यांना खाद़्य अमाप होतं, पण त्यांना बहुतेक ते जायचं नाही. अंगाने दोघेही सडपातळच पण त्यात काही सुधारणा झाली नाही.

मॅडोना एकटी पडल्यावर ती बऱ्याचदा हॉस्टेलजवळ बसून रहायची. अजूनही राहते. तिच्या भावाच्या मृत्युचा फटका तिला सहन झाला नसावा. ती इतर कुत्र्यांसारखी कळपात कधी राहिलीच नाही. ती एकटीच राहिली, तिचा भाऊही तसाच. त्या दोघांचं या बाबतीत मला सतत नवल वाटायचं. बहुधा तिनं स्वत:चं आयुष्य स्वत:च आखलं असावं. मागच्या तीन वर्षांत ती तिचं घर सोडून आली, परिवार सोडून आली, कुत्र्यांच्या सवयी सोडून आली. मला हे शक्य झालं असतं का? मी तिला थोपटतो, तिच्या डोक्याला मालीश करतो, तेवढा वेळ ती बसून राहते नि फटक्यात पळून जाते. तिला प्रेमाची ओढ नसावी किंवा तिला मन रमेल अशी ठिकाणं बनवायला नको असावीत. ती अगदीच संन्याशासारखी. अंगावरली मोह-माया सोडवायला मला किती विचार करावा लागेल बरं? सांगता येत नाही. या विचारांतच आयुष्य संपून जाईल. मॅडोनाने ते लीलया केलंय. तिनं बहुधा जास्त विचार केला नसेल या गोष्टींचा. तिला तिचा भाऊ गेला याचंच दु:ख जास्त खुपत असणार. तिनं तिच्या भावाला स्वत:च्या डोळ्यासमोर मरताना पाहिलं. एखाद़्या व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या शेवटच्या आठवणे एवढ्या क्रूर नसाव्यात, पण तिच्याबाबतीत त्या आहेत. ती वयात आलीय तसा एक शंकरसारखा उमदा कुत्रा आता आमच्या संस्थेच्या आवारात दिसतो बऱ्याचदा. सेबॅशचिअन नाव त्याचं. एक टिंगू नावाचा कुत्राही घुटमळतोय, तो कुमारसारखा असावा.

मॅडोना दूरवर पाहत राहते. तिचं नाक सतत ओलं असतं नि ती सतत काहीतरी हुंगत असते. तिच्या आईपेक्षा ती कितीतरी शांत आहे. मायकेलला जाऊन आता वर्ष उलटत आलंय. तिच्या हुंगण्यात तिला मायकेलचा गंध मिळतोय की काय असं मला वाटत राहतं. मी तिला माझ्याच नजरेतून पाहत राहतो. मनुष्याच्या नजरेतून. ती बहुधा मायकेलला विसरून गेली असेल, विसरून गेली असेल तिचं घर, आई-बाबा, वीटभट़्टी. ती बहुधा जनावरांचा वास घेत असेल. तिला जिंकणं अवघडंय. सेबॅशचिअन किंवा टिंगू, दोघांनाही तिचा गंध इथवर खेचत आलाय. मॅडोनाला जिंकायला किती काळ जाईल काय माहिती!
पंकज कोपर्डे
१५ मे २०१६  

शनिवार, ७ मे, २०१६

देवी

चांदण्यात हरवलेलो असताना,
जमिनीवर वाट पाहत थांबलेली ती;
जमिनीकडे जेव्हा नजर फिरली
तेव्हा चांदण्यात सामावलेली ती!
आठवणींत जेव्हा डोकावतो,
तिच्या बांगड्यांचा घुमतो आवाज;
वाटतं ती आहे आसपास नि
मन फिरून रमतं आठवणींच्या आवाजात.
रस्ते तुडवले कित्येक, रानं जगलो कित्येक,
भुताखेतांच्या गराड्यात, सापळ्यात अडकलो कित्येक,
ती एक आठवण, आशा, निर्धार म्हणून पाठीशी सतत,
तरी मी खुळ्यासारखा देवाला मानत आलो कित्येक!
ती असतेच इथे कुठेतरी; अवतीभवती दरवळते.
तिचं असणं इतकं सवयीचं की ती नकळत कळल्यासारखी.
मी जातो जेव्हा दूरवर, भुतांच्या राज्यात, हाकेच्याही पलीकडे,;
ती झटक्यात प्रगटते मनात, देवीसारखी...नाव आहे तिचं आई.

माझ्या म्हणून साऱ्यांच्याच, आईसाठी!
पंकज कोपर्डे

८ मे २०१६