शनिवार, २५ एप्रिल, २०१५

लाल-शेपट्याच्या गोष्टी

टाचण्यांच्यामागे फिरायला नक्की कधी सुरू केलं ते आठवत नाही मला आता ठीकसं. कधीतरी २००९-२०१० मधे. त्यापुर्वीही चतूर पहायचो, टाचण्या पाहिल्या होत्या, पण त्या ओळखता यायच्या नाहीत. तिथेच गाडं अडायचं. एखादया सजीवाचं नाव माहीत नसेल, तर आपण नक्की काय पाहिलं-ते काय करत होतं-ते किती सुंदर होतं, हे सगळं सांगणार कसं? पक्ष्यांची नावं तर लहानपणापासून, छोट्या-मोठ्या मराठी पुस्तकांपासून ते मोठ-मोठ्या ईंग्लिश ग्रंथांतून चाळून काढली होती. पण चतूरांपासून मी आवड असूनही बराच अनभिञ राहिलो. कारण ओळखणार कशा त्यांच्या नानाविध प्रजाती? २००९ मधे सुब्रमनिअन सरांचं एक छान पुस्तक हातात पडलं. आणि मग हे-दणादण चतूर आणि टाचण्या पहायला-अगदी जवळून पहायला मी सुरूवात केली. सुरूवात केली खरी, पण कीटकांनाही मी पक्ष्यांना बघतो, तसंच बघू लागलो. त्यांची बैठक बघावी, ते कसे उडतात ते बघावं, त्यांचे रंग बघावेत, त्यांचे आकार बघावेत आणि या सगळ्यांतून त्या एकमेव पुस्तकात जो फोटो जवळचा वाटतो, तो फोटो म्हणजे ती प्रजात. असं माझं सुरू झालं. त्यात बऱ्याच चुका केल्या. दोन मजेशीर गोष्टी आठवतात. सिंधुदुर्गातल्या आंबोलीत एक नाजूक पारदर्शी, पण चांगलीच मोठी टाचणी पाहिली. टाचणी कसली? सुईच ती! २०११ मधे. ती नुकतीच पाण्यातल्या किड्यापासून पंख ल्यालेली टाचणी बनली होती. मी तिला पाहिलं, फोटो काढले. पुस्तकात पाहिलं आणि म्हटलं की ही आहे Great Emerald Spreadwing. खरं तर ही प्रजात सापडते उत्तर भारतात, मग ती आंबोलीत कशी? दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे पुण्याजवळच्या कवडीच्या अतिप्रदुषित पाण्यात पाहिलेली Malabar Torrent Dart. ही प्रजात पश्चिम घाटात, स्वच्छ ओढयांच्या प्रवाहात सापडणारी. मग ती पुण्याजवळ कशी? या दोन्ही मजेशीर गोष्टी म्हणजे चुकीचं identification. Great Emerald Spreadwing खरं तर Clear-winged Forest-Glory होती आणि Malabar Torrent Dart खरं तर Black-winged Bambootail होती! मग हळूहळू कळू लागलं, की चतूर आणि टाचण्या हे पक्ष्यांपासून भिन्न आहेत. त्यांना बऱ्याचदा पकडावं लागतं आणि सुक्ष्मदर्शीखाली न्याहाळावं लागतं. बऱ्याच लोकांनी सांगितलं की फ्रेझरची पुस्तके वाचा. मग हळू-हळू त्या पुस्तकांचा अभ्यास करून काय योग्य-काय अयोग्य ते सुद्धा कळू लागलं.

कवडीच्या अतिप्रदुषित नदीच्या काठाने बरीच बाभळीची झाडं-झुडपं आहेत. तिथे पहिल्यांदा Coral-tailed Cloud-Wing (नभपंख?) पाहिला. फार सुंदर चतूर. दोन्ही पंखांवर त्यानं सुंदरसे दोन निळे ढग पेललेले. शांत बसलेला. सरळ अगदीच काठीसारखा. आणि मग थोडं अजून पुढे गेल्यावर Asiatic Blood-tail (लाल-शेपट्या?). या लाल-शेपट्याची समाधी अवस्था मला फार प्रिय आहे. शांत, एके ठिकाणी बसून राहणार आणि अचानकच झपाट्यात किडे पकडून पुन्हा त्याच काठीवर. उत्तर अंदमानात, चालीस एक मधे मी २०११ मधे काम करायचो. तिथे दररोज संध्याकाळी आमच्या कॅम्पच्या थोड्या वरच्या अंगाला थोडी मोकळी जागा होती. आजूबाजूला गुहाच गुहा. त्या मोकळ्या जागेत सुर्य मावळू लागला की मी येऊन बसायचो. दिवस संपत आलेला असायचा. मी बाजा हातात धरून ठेवायचो आणि वारा वाहू लागला की वाजवायचो. घर दूर होतं. तिथे एक लाल-शेपट्या यायचा, दर संध्याकाळी. त्याच जागी, दररोज. त्याची बसण्याची जागा ठरलेली. छानशी लाल शेपूट होती त्याची. एकटाच नर होता. यायचा-बसायचा-उडायचा-जेवढं शक्य असेल तेवढं खाऊन घ्यायचा. अंधार पसरू लागला की अचानक गायब व्हायचा. हे सलग पंचवीस दिवस चाललं. मधे एक-दोन दिवस फार पाऊस झाला, त्यावेळी डोक्यावरचं छत सोडून जायची इच्छा नव्हती. पंचवीस दिवसांनंतर मी दुसऱ्या कॅम्पवरती गेलो. आठवड्याभरानंतर परत आलो, तेव्हा तो कॅम्पच्या अगदीच जवळ दिसला. त्याच्या बरंच जवळ जाऊन फोटो काढले. एवढ्या साऱ्या दिवसांत मी त्याला एकट्याला सोडलं तर इतर कुठलाच लाल-शेपट्या नाही पाहिला त्या बेटावर कधी!

या चतूर-टाचण्यांचं वेड हळूहळू लागलं मला. बरेच मजेशीर अनुभव आहेत. २०११ मधे उत्तर अंदमानातल्या इंटरविव्ह बेटावरती पाहिलेल्या सुंदर टाचण्या. तिथे वाहणारा एक गोड्या पाण्याचा ओढा, समुद्राला अगदीच लागून. त्या ओढ्याच्या आजूबाजूला हत्तींचे ठसे, अगदीच ताजे. माझे डोळे कॅमेऱ्यात, पाय निदान गुडघ्या-एवढ्यातरी चिखलात रूतलेले. जस्टिन- माझा field assistant ओरडून-ओरडून थकलेला, “सर, चलो. हाथी आयेगा!”. कसेबसे तिथून बाहेर पडलो आणि नावेत बसलो, तर बहाद्दर सांगतो मला की त्यानं हत्ती अगदीच तीसेक फुटांवरती पाहिला. झुडूपामागून पाहत होता तो मला नि जस्टिनला. २०१३ मधे पारपोलीला एका छानशा ओढ्याच्या मध्यभागातून चालत होतो. आजूबाजूला Malabar Torrent Darts उडत होत्या. ओढ्याला चांगलाच प्रवाह होता आणि गळ्यात दुर्बिण नि मोठाला कॅमेरा घेऊन चालणं कठीण झालं होतं. सॅण्डल्स किनाऱ्यावरतीच सोडल्या होत्या. चालता-चालता पाय सटकला आणि पाण्यातल्या दगडावर आपटलो. दुर्बिण भिजली, पण कॅमेरा वाचला! २०१३ मधेच कोयनेच्या काठी वसलेल्या अरव गावात सर्व्हे करत होतो. कोयनेच्या धरणाच्या पाण्याच्या काठाकाठाने फिरत होतो. एक अगदीच वेगळी टाचणी दिसली. वाटलं, हे काहीतरी खास आहे. दुर्बिण नि कॅमेरा घेऊन हळूहळू तिच्याकडे सरकू लागलो. अगदीच उतार होता आणि बराच चिखल होता. अचानकच पाय घसरला आणि मी अख्खाच्या अख्खा धरणाच्या पाण्यात. पाणी गार होतं आणि चांगलंच खोल होतं (20 फुट?). सुदैवाने घसरताना मी दुर्बिण काठावर ठेवू शकलो, पण कॅमेरा माझ्यासकट पाण्यात गेला. बाहेर लगेच येता आलं नाही. काठावर कुठे धरायला काही दगड-धोंडे नव्हतेच. फक्त चिखल होता आणि जिथे जिथे पकडायचा प्रयत्न करायचो तिथे-तिथे सटकायचो. कसा-बसा कॅमेरा काठावरच्या एका झाडाला लटकवला आणि चिखलातून सरपटत काठावर आलो नि मग तसाच सरपटत तो सगळा चढ पार केला. एक लांब काठी आणली आणि झाडावरचा कॅमेरा मिळवला. ती गूढ टाचणी काही मिळाली नाही, कॅमेरा मात्र त्यादिवशी उन्हात वाळवत टाकावा लागला! 

शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

यमास

प्रिय यम-देवा,

तसं प्रिय म्हणण्याएवढा आपला-माझा संबंध नाही. कधी भेटही नाही झाली नि झाली तरी कळणार नाही असं वाटतं. पत्रास कारण की, मनात दडवून ठेवलेली भिती सतत आज-काल स्वप्नांतून खरीखुरी समोर येत राहते. आपण आसपासच कुठेतरी फिरत आहात असा भास होतो. कितीही निर्जीव असले आमचे दगडाचे देव, तरी अंधारात डोळे आंधळे झाले असताना मनाच्या अंदाजानेच प्रवास करावा लागतो. असा प्रवास करत असताना, दररोज मी आपल्याच सहवासात डोळे बंद करून स्वप्नं पाहत राहतो असंच वाटत राहतं. प्रयोजन काय आहे नक्की? माझ्या जवळच्यांचे नि माझे धागे तोडायचे आहेत की आयुष्याची किंमत पटवायची आहे मला?

नश्वर जगात सध्यातरी अमर काहीच नाही. मला हे ही माहितीय की मृत्युची भिती सगळ्यांनाच असते, काठावर उभं राहून नदीपल्याड जळणारी चिता पाहून मन विचारांत गुंगणं हे ही विशेष नाही. स्वत: चिता होऊन जळू शकत नाही, ती जाणीव जिवंत राहू शकत नाही. रोज रात्री स्वप्नात मी जिवंतपणे ती एकाकीपणाची जाणीव जगत चाललोय. प्रयोजन काय आहे? माझ्या मनाची तयारी करायची आहे का तुम्हाला? कुणी म्हणतं उशीखाली सुरी घेऊन झोप; कुणी म्हणतं हनुमान-चालीसा म्हण. म्हटली असती, सुरी ठेवली असती आणि स्वप्नं पण बंद झाली असती कदाचित. मग जो अंधारात डोळे आंधळे झाले असताना तुमचा कानोसा लागायचा तो ही बंद झाला असता. देवाच्या कानोशावर माझी श्रद्धा आहे, ती जिथे सिद़्ध होते, ती माझी स्वप्नेपण मी कसा काय हिरावून जाऊ देऊ? मी चितेच्या ज्वाळांत माझ्या आवडीच्या देवांना यापुर्वीही बरेच प्रश्न विचारलेत. मी निर्जीव देहांवर बरसणाऱ्या अश्रूंबद्दल कित्येक देवांना मृत्युबद्दल उलट-सुलट प्रश्न विचारलेत. समुद्रावर एकट्याने प्रवास करताना आणि पर्वतांवर घोर जंगलात रात्र सारताना महादेवाला माझ्या जगण्याबद्दल जबाबदार धरलंय. मी मनाच्या आकुंचन-प्रसरणाबद्दल हनुमानाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलंय. मी आभाळात बघून अल्लाला असण्या-नसण्याचे प्रश्न विचारलेत. माझी श्रद़्धा तात्पुरती आहे, पण आहे. मी देवळांत जाऊन देव पाहिले नाहीत, पण गाभाऱ्यांना स्पर्श केला आहे. मी कीर्तनांतून देवाची कौतुकं ऐकली फार, पण विश्वास मनाच्या कर्ते-नाकर्तेपणावरच ठेवला आहे. माझ्या विचारांवर सध्या जे तुम्ही गारूड घातलंय, जे प्रश्न निर्माण केलेत, ज्या जाणीवांतून तुम्ही माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहवत आहात, त्या साऱ्याच गोष्टींचा जाब मी स्वप्नांत नाही विचारू शकत. तुम्ही त्या स्वप्नांत असता, पण समोर चालू असणाऱ्या घटनांच्या मी इतका जिवंतपणे स्वाधीन झालेलो असतो की तेव्हा तुमचा विचारही डोक्यात येत नाही. ज्यावेळी डोळे उघडून पाणी पितो नि घामेजलेल्या अंगाने बिछान्यावर जाऊन बसतो, तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते. बाल्कनीत जाऊन उभा राहतो, वारा थंड वाहत असतो. दूरवर घरात अजूनही दिवे सुरू असतात. स्वप्नांना घाबरणारी माणसं, झोपेला टाळत असतात. मी म्हणतो, स्वप्न होतं. स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या नसतात. जुने संदर्भ नि नवे रस्ते तयार झालेले असतात. कुणी कधी काळी भेटलेली लोकं, अचानक डोळ्यासमोर तरळून जातात. मनातल्या जखमांच्या खपल्या अधून-मधून निघत राहतात. काय करायचंय, स्वप्नात जगून?

स्वप्नात जे दिसतं ते सत्य मानलं, तर मग मला तुमचा सहवास प्रिय आहे. मला तुमच्या मनातला त्रयस्थपणा आदरणीय वाटतो. कोण माणूस जगापासून अलिप्त राहून असली कामं करेल. यम देवा, तुमचेही प्रिय-अप्रिय सारेच कधी ना कधी अनंतात विलीन होणारेत. झालेही असतील. तुमच्याही डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहिले असतील. तुमचा तसंच काही प्रयोजन असेल, तर धन्यवाद. तुम्ही जर मला माझ्या स्वप्नांतून सत्य दाखवत असाल, तर मी आपला आभारी आहे. आभारी या करिता कारण मृत्यु या वरवर फुटकळ वाटणाऱ्या विषयाची जाणीव जोपर्यंत तो स्वत:वर ओढवत नाही तोपर्यंत मला होणार नाही; आणि ती तुम्ही स्वप्नांमार्फ़्त करता आहात. आणि हे सर्व जर असत्य असेल, तर माझ्यात नि नदीपलीकडची चिता बघून मृत्युचा विचार करणा़ऱ्या एकट्या जीवात काहीच फरक घडणार नाही. मी उशीखाली सुरी ठेवून तुमचा अपमान करणार नाही, आता कितीही वेळा स्वप्नांत अश्रूंचे पाट वाहिले तरी. मनाच्या गाभाऱ्यातून माझ्या डोळ्यांसमोर जर तुम्ही माझेच विचार मांडता आहात, तर बघू बरं अजून कोणकोणत्या जाणीवा बाकी आहेत. काल मी पंधरा वर्षे वेळेच्या पुढे निघून गेलो होतो आणि त्याच्याही पुर्वी काही दिवसांकरिता. बघू बरं, वेळेच्या किती पुढे मनाची मजल जाऊ शकते. बघू बरं कितपत हे मन जोर धरू शकतं. बघू बरं, अजून मनाचे किती दरवाजे उघडायचे बाकी आहेत.
पत्रास उत्तर आज रात्री स्वप्नात देणे.

कळावे,
एकटा

image from - http://www.reddit.com/r/Smite/comments/1yw0yv/god_concept_yamraj_god_of_death_summoner_tank/

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

चंद्रकोर

अमावस्येच्या संध्याकाळची गोष्ट आहे. गोष्ट आहे, पण खरी आहे. गोष्टीच्या खरेपणाला अमावस्येच्या संध्याकाळची साक्ष आहे. तेव्हा बागेत गुलाब फुलले होते, होते ते लालजर्द होते नि नव्हते ते कळ्यांत फुलण्याची स्वप्नं घेऊन जगले होते. वारा मंद होता नि खिडकीत अडकवलेल्या विण्ड-चाईम्सना तासभर तरी छेडत राहिलेला. खिडकीशेजारच्या पलंगावर प्रियकराच्या कुशीत प्रेयसी झोपलेली नि तिच्या मनात खोलवर प्रियकराची असंख्य मनं गुंतून राहिलेली. दोघांच्याही अंगावर शहारे ताजे होते, जे होते ते सारेच प्रेमाचे नजारे होते. तिच्या केसांच्या घनदाट सुवासात प्रियकर हरवलेला नि त्याच्या हनुवटीच्या कड्यावर प्रेयसीचा माथा विसावलेला. किर पोपट थव्याने घरट्याकडे परतत होते, सुभगाच्या शिळा मंदावत चाललेल्या आणि. संध्याकाळ निळसर जांभळी केशरी होऊ पाहणारी, सुर्याच्या असंख्य मनात प्रेमाचे अविष्कार आणि. टेकड्या-टेकड्यांवरती फुलपाखरं झोपेला आलेली, चतुरांची अजूनही पाण्यावरती मुक्त क्रिडा चाललेली. गवता-गवतातून टाचण्या निजलेल्या, संध्याकाळ रानावरती पांघरूण ओढत चाललेली, लेकरांना निजवायला.

प्रियकराने प्रेयसीच्या गालावर फुंकर मारली, तेव्हा प्रेयसीची झोप चाळवली. तिने डोळे किलकिले करून रंगांचा अंदाज घेतला. मोगऱ्याचा मंद सुगंध नि सतारीचा नाद. तिने प्रियकराला अजूनच घट़्ट मिठी मारली. त्याला घट़्ट मिठी मारली तेव्हा गार वारा सुटला; मोगऱ्याचा सुगंध सैरभैर झाला; पक्षी एक-दोन भरकटले-गेले चित्रातून; खिडकीचे दरवाजे आणि तीन वेळा टाळ्या वाजवून सताड उघडे राहिले; संध्याकाळ गोठत गेली नि तिचे नानाविध रंग जाऊन ती काळ्या रंगाशी एकरूप होत गेली; शहारे मोजकेच उरले-पण उरले ते अंतरंगात उरले-विरले ते अंतरात विरले; पिंगळे बोलू लागले नि पिंपळ-पाने सळसळू लागली; पिंपळाच्या टोकावर एक दयाळ, श्याम होऊन एकटाच, वाजवत राहिला बासरी. डोळ्यात डोळे घालून प्रेयसी म्हणाली, प्रियकराला-“चंद्रकोर किती छान असते रे! तू लिहशील का चंद्रकोरेवर कधी? (माझ्यासाठी?)”

“रात्र गर्द होईल तेव्हा नि चंद्र हरवत जाईल-विसरत जाईल-हळवा होईल-आसुसत जाईल चांदण्यांसाठी तेव्हा तो ओढून घेईल रात्रीला अंगावरती नि तिच्या मिठीआडून पाहत राहील ब्रम्हांडाकडे अलिप्तपणे. त्याला नसेल इच्छा मोठं होण्याची, नसेल इच्छा झळाळून निघण्याची तेव्हा. तो रात्रीच्या मिठीत आक्रंदणार नाही, ती आई आहे, थंड असली तरी चंद्राएवढी शीतल नाही, तिच्या मिठीत मायेची ऊब आहे, पण हरवत चाललेल्या प्रेमाची कसर ती कितपत भरून काढणार? चंद्र तेव्हा एकटाच असेल नि चांदण्याही एकट्याच हरवलेल्या. तो म्हणेल, मी कुणासाठी होऊ मोठा? कितपत नि कसा होऊ मोठा? आपण तेव्हा पृथ्वीवरून चंद्रकोर पाहत राहू नि तिच्या केशरी किनाऱ्यावरती आपलं घर वसवत राहू. चंद्राला एक कळत नाही, ज्या पांघरूणाखाली-ज्या मिठीत तो सामावून गेलाय, त्यातच चांदण्याही हरवल्या आहेत. सगळेच बिलगून नसले, तरी जवळ आहेत. आज तू माझ्या जवळ असलीस-बिलगून असलीस तरी आहेस ब्रह्मांडातच तरूण. चंद्राला माहितीय आणि की, लपून-मनात जपून प्रेम मिळत नाही-वाढत नाही. ते शोधावं लागतं-ते मिळवावं लागतं-ते अनुभवावं लागतं-नि राखावं लागतं. आजची चंद्रकोर, उद़्या इतकी सुंदर नसणार; पण सुंदर नसली तरी चंद्राचं असं व्याकूळ होणं सुंदर आहे. जगात किती किंचीतसं प्रेम उरलंय-पण उरलंय त्यावर जग किती सुंदर सुरूय. चंद्रकोर बघताना तुझ्या डोळ्यांची चंद्रकोर आठवते-मी दूर जाताना, मी पाहिलंय तिला. तिला आजचा विरह नाही सहन होत-पण अजब आहे, ती दिसतेच मुळात सुंदर. ती दिसते तेव्हा तिला माहिती नसावं कदाचित की बोलून-लिहून जितकं प्रगट करता येत नाही तितकं प्रेम ती नुस्त्या एका चंद्रकोरीने उधळते. आणि चंद्रकोर पुढे जाऊन पौर्णिमा निर्माण करते, तेव्हा चंद्र उरतो एकटा नि चांदण्या हरवतात. हे दिसतं सगळं आपल्याला. विरह आहे, म्हणून प्रेम आहे. प्रेम आहे-म्हणून विरह सहन नाही होत. विरह सहन नाही होत, म्हणून चंद्रकोर तयार होते.”

प्रियकर उठला नि दाराकडे निघाला. खोलीभर तेव्हा अंधार गडद झालेला नि चंद्रकोर एक आभाळात नि दोन खोलीत, केशरीसर कडा लेवून अवतरलेल्या…
पंकज कोपर्डे

२ नोव्हेंबर २०१४       

रविवार, २७ जुलै, २०१४

स्वप्नदशा


फडफडणाऱ्या डोळ्यांमागे अनंत विश्वं गोठून राहिलेल्या गोष्टी पावसाळी संध्याकाळी बाहेर येऊ लागल्या. चाहूल लागली की, अस्पष्टशा हाका ऐकू येताहेत आणि स्वत:चं भैतिक अस्तित्व विसरून गेलेल्या शरीराला दचकवणारे स्पर्श होताहेत. वीण घट़्ट होती नि अंतर फार होतं. बाहेर पडायचा रस्ता आत शिरणाऱ्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. शेवटी घट़्ट अंधार दिसला नि मिट़्ट डोळे खाडकन उघडले तेव्हा स्थळ-काळाचा संदर्भ पावसासारखाच तोही विसरून गेला होता. जुनाट टेलीफोनची घंटी वाजत होती. अंग चिंब झालं होतं. तो झोपलेला तिथेच वरती दांडीवर वाळत घातलेली पॅण्ट सटकून त्याच्या पोटावर पडलेली. तो उठून बसला. एकामागोमाग एक असे कितीतरी दरवाजे उघडत आत-आत जायचा प्रयत्न होता. रंग नसलेली स्वप्नं होती, होती ती खरोखर घडलेली. भूतकाळात जवळची असणारी ठिकाणं, वास्तू, रस्ते, प्राणी, लोक. त्यात काही नव्याने बनवलेली आणि मागे कित्येक दिवसात दिसलेली ठिकाणं. झोपलेल्या शरीरात स्वत:ची अशी समांतर चालत असणारी गोष्ट. अगदीच समांतर. त्या स्वप्नांत अगदी आतून वाटणारं सुख आणि दु:ख. त्या घेऱ्यात अडकून राहण्याची त्याला झालेली इच्छा आणि एका क्षणात त्या साऱ्या जगांशी आणि जागांशी तुटलेली नाळ आणि आलेली जाग. हे झालं तेव्हा कुणीतरी आपल्याला धरून बाहेर ओढून काढतंय असं वाटलं त्याला. कुणीतरी प्रचंड शक्तीच्या व्यक्तीने बखोट धरून कुणालातरी विहीरीतून खेचून काढावं तसं. प्रचंड तहान लागलेली, त्यानं पाणी घटाघटा पिलं आणि तो दरवाजा उघडून घराबाहेर आला. पाऊस मुसळधार. संध्याकाळ गडद. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ओहोळ आणि कौलारू घरं पावसात चिंब. त्यानं हात पुढे केला आणि पावसाचं पाणी हातावर. ओंजळ केली नि तो तसाच पावसाचं पाणी पिऊ लागला, मघाची तहान शमल्यासारखी वाटत नव्हती. त्यानं तोंडावरून हात फिरवला. घरात आई आहे का याची चाहूल घेतली त्याने, त्याला बांगड्यांचा आवाज ऐकू आला. मग तो निवांत दाराच्या चौकटीवर रेलून पाऊस बघत उभा राहिला. आई काहीतरी छानसं खायला बनवत होती. भजी? त्या वासानं त्याला फार प्रसन्न वाटलं. स्वयंपाकघरात रेडिओ चालू होता. तो स्वयंपाकघरात शिरला आणि आईजवळ जाऊन उभा राहिला. तिनं वळून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटली, “काय रे तहान लागलीय का?” टेलिफोनची घंटी अजूनही वाजतच होती. त्याचं वीस वर्षांपुर्वीचं आई हयात असतानाचं कोकणातलं घर ठिकठिकाणी गळू लागलं होतं.
पंकज कोपर्डे
२७ जुलै २०१४ 

रविवार, ६ जुलै, २०१४

पाऊस


गुंते सोडवत बसलेल्या मनाला पागोळ्यांत अडकायला होतं. पावसाची चाहूल लागली की धड इकडे ना तिकडे, ते बावरं होऊन धडपडायला लागतं. शरीर मोठं झालं, पण मन नि पाऊस लहानंच उरलेत. लहानपणी संध्याकाळी खेळायला बोलवायला येणाऱ्या मित्रांच्या हाकांकडेच सतत लक्ष असायचं आणि अभ्यासाचं वाचन दिखाव्यापुरतं. ते मित्र संसारात बुडाले. काही तळाला गेले, काही गटांगळ्या खात राहिले. अभ्यासही प्रचंड न संपण्याएवढा, आणि स्वत:च्या उत्कर्षासाठीची कामं, भारताच्या सध्याच्या लोकसंख्ये एवढी. अनंतात विलीन होणारी कमी, जन्मणारी जास्त. संध्याकाळ थोड्या-फार फरकाने बदलली तरी तिच्यावरचा विश्वास ढळला नाही. आजवर ज्या-ज्या ठिकाणी फिरलो, त्या-त्या सर्व ठिकाणी ती स्वत:च असं एक वैश्विक अस्तित्व घेऊन प्रगटली. किर्रर्र जंगलं असो, समुद्र-किनारे असोत, ट्राफिकाळलेले रस्ते असोत, शांत घर असो की कॅफेटेरियातल्या गप्पा असोत. ती सतत तिचं देवीत्व घेऊन पसरली, तास-दीड तास का असेना. मनाला खात राहिली. असण्या-नसण्याचे प्रश्न उपस्थित करत राहिली. लिहायला भाग पाडत राहिली. ती दररोज येत होती, तशी भिती वाटत राहिली की सवयीची तर होऊन जाणार नाही ना? ती दररोज येत राहिली, तरी दररोजच काही प्रश्न, कविता, गाणी, लेख नव्हतो लिहीत मी. काही वेळा वाटलं की सकाळी उठून ब्रश करत बसण्यासारखं आहे हे. फार पुर्वीपासूनच नस्ती सवय लावली, तर आज एक दिवस ब्रश चुकवला तर वाटणारी घाण नस्ती वाटली. लहानपणीही संध्याकाळच्या हाकेला ‘ओ’ नस्ती दिली, तर आज वाटणारी आपुलकी नि प्रेम नस्तं वाटलं कदाचित. पाऊस येतो, तेव्हा पाऊस येतो. एकटाच. संध्याकाळ नुस्ती रंगापुरती मर्यादित राहते किंवा तिच्या नेहमीच्या घडण्याच्या वेळेनुसार इकडे मनात चल-बिचल होत असते, तेवढंच. जेव्हा पाऊस येतो, तेव्हा मनाची समाधी भंग पावते. ते त्याच्या मांडी घालून बसलेल्या वैचारिक मुद्रेतून अगदीच कोलमडून जातं. गारठा जाणवतो, गरम चहा-कॉफीची जाणीव होते. खिडकीत उभं राहून कितीतरी वेळ मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं बघत राहतो. तांत्रिकदृष्ट्या पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं पाणी. पण या पाण्यात सोडवायला मन असंख्य गुंते हुडकून काढतं. त्यात आठवणी असतात, जन-माणसांचे प्रश्न असतात, जगाचे प्रश्न असतात, प्राणी-पक्ष्यांचे प्रश्न असतात, पाण्याचे प्रश्न असतात. एका अखंड चालणाऱ्या चक्राचा माझं आयुष्य म्हणजे एक मोजताही न येण्याइतका छोटा भाग. किती पावसाळे पाहिले असतील या पॄथ्वीने? माझी झेप ती किती? त्या माझ्या आयुष्यातही, अजून कितीक लहान भाग. भूतकाळाचा पट़्टा, अगदी कालपासून किंवा अगदीच या गेलेल्या सेकंदापासून सुरू झालेला; गल्ल्या-गल्ल्यांतून जाणारा. थोडं मागं वळून पाहिलं तरी आता दिसत नाही, इतका काळोखा. त्यातही पाऊस कोसळणारा. त्या पट़्ट्यावर कित्येक ठिकाणी जवळपास वर्षभराच्या अंतरावर उभ्या असलेल्या माझ्या छब्या आणि थोडा-फार तोच पावसाचा निनाद आणि मनात घोळणारे विचार…मोकळे झालेले रस्ते, तुरळक माणसं, शांत होत चाललेलं जंगल, पागोळ्यांचे आवाज, बेडकांचे आवाज, जोर-जोरात किनाऱ्यावर कोसळणाऱ्या लाटा. संध्याकाळ मनाला फार मोकळं करून सोडते, पाऊस त्यावर आरूढ होतो. संध्याकाळ खेळायला बोलवते, पाऊस त्याला स्तब्ध राहून विचार करायला भाग पाडतो. एरव्ही स्वत:चा विस्तार आणि महत्त्व वाढवत चाललेल्या मनाला, पाऊस स्वत:च जखडून टाकतो. तो परिस्थितींना जखडून टाकतो. मग कधी मी जंगलात अडकतो, कधी समुद्रानं भरत आलेल्या बेटावर, कधी स्वत:च्या छानश्या घरात किंवा कधी कॅफेटेरियात नुक्त्याच प्रेमात पडलेल्या मैत्रिणीबरोबर. पाऊस म्हणतो, मला हवं तोपर्यंत तुझी सोडवणूक नाही!
पंकज कोपर्डे
६ जुलै २०१४

मंगळवार, १ जुलै, २०१४

स्थलांतर


हे कित्येकदा घडलंय की मी किंवा ती लांबच्या प्रवासाला निघतो-अमर्यादित काळासाठी आणि निघताना मन आक्रंदून जातं. भिती दाटून येते. आतल्या आत गलबलतं, तोंडावर फारसं येत नाही. अंगातलं पुरूषी स्वत्व सर्वकाही दाबून टाकायचा अतोनात प्रयत्न करत राहतं. एक अशी सुटी-सुटी भावना उरत नाही. सगळा कल्लोळ माजतो. प्रवास पुढचा सगळा एकट्यानं करायचा असतो. यापुर्वीही सतत एकट्यानंच प्रवास होता; पण प्रवासाला निघण्यापुर्वी तिनं मारलेली मिठी क्षणार्धातच मनाला विरघळून टाकणारी. शरीरानं एकटं असणं अनुभवलंय, पचवलंय कित्येकदा; पण मनानं एकटं असण्यासारखी वेदनादायक गोष्ट नसावी. एकलकोंड्या शरीराला मनानच समजूत घातली होती आजवर परिश्रमाची, प्रसंगांची आणि प्राण जपून ठेवण्याची. मन ज्या-ज्यावेळी एकटं पडलं, त्या-त्यावेळी शरीर निश्चल बसण्याव्यतिरिक्त विशेष काही करू शकलं नव्हतं.
मैत्रिणीला रस्त्यावर सोडून ज्या-ज्यावेळी प्रवास सुरू होतो, त्या-त्यावेळी शरीर निश्चल बसून राहतं. तिच्याबरोबर घालवलेल्या वेळात कधी वाटलं नव्हतं-न उलगडणाऱ्या कविता होत्या, तळ्यात-मळ्यातच्या गोष्टी होत्या आणि हट़्टी भांडणांचा पसारा होता. माणूस जवळ असताना किंमत हरवत जाते की काय त्याची? आणि ही मनाला एकटं पाडणारी माणसं, आयुष्यातली खरंच फार-फार महत्त्वाची असतात की काय? असावं-असेल. माझ्या सतत कामांत डुंबलेल्या मनाला एकाकी करून सोडणारी गोष्ट खरंच काहीतरी अतिमहत्त्वाची असावी. प्रवास जरी काही किलोमीटर्सचा असला तरी स्थलांतर फार मोठं होतं. मी माझ्या जगातून खूप-खूप दुरून पुण्यात येतो. ती तिच्या जगातून माझ्याजवळ येते. तुझ्या-माझ्या म्हणत दोघांच्या झालेल्या घरात दोघांच्या बनलेल्या जगात पुढचे कित्येक दिवस जातात. तिथून निघता येत नाही…निसटावं लागतं. त्या प्रेमाच्या वर्तुळात रमलेलं मन मग गटांगळ्या खाऊ लागतं. गाडी सुरू होते, ती हात हलवत राहते, हवा सारवत राहते, तिला डोळे भरून पाहून घेतो. पन्नास किलोमीटर्समधे आणि आठशे किलोमीटर्समधे फारसा काही फरक उरत नाही. पुढच्या भेटी ठरलेल्या नसतात. दोन चिकटलेली आयुष्यं सुटी होऊ लागतात. मन एकटं पडतं. या प्रवासाला सरावलेल्या दगडासारख्या प्रवाशांकडे बघून अजूनच खटटू होतं. अटळ प्रवासाला सुरूवात झालेली असते. निरोप देताना मैत्रिण हात हलवून झटक्यात वळून निघालेली असते. वेडीय ती. डोळ्यातली आसवं दिसू नयेत म्हणून किती काळजी घेते. एकमेकांना समजावणारी मनं दोन दिशांना लांब-लांब जात राहतात. मनाचा गहिवरलेला जड ढग होतो, जांभळसर रंग आभाळभर होतो. हे कित्येकदा घडलंय.
पंकज कोपर्डे
१ जुलै २०१४ 

मंगळवार, २७ मे, २०१४

बेटाळजोराचा वारा आला तसा मी घरात येऊन कोपऱ्यात जाऊन बसलो. खिडक्या धडा-धडा हलू लागल्या नि समोरच्या झोपड-पट़्ट्यांमधले पत्रे फाड-फाड उडू लागले. कागद़्याच्या होड़्या बनवून वाऱ्यावर सोडाव्यात असं वाटलं. वाटलं की खिडकीच्या चौकटीतून त्या एकट्याच रडणाऱ्या कुत्र्यावर नेम धरून दगड फेकावा. समोरचं कारण नसताना उभं असलेलं निलगिरीचं झाडं पाठीत काड़्कन मोडून कुत्र्यासारखं पडावं. चौकात उगाच जगत असलेलं एक तीन पायांचं गाढव या वाऱ्याच्या भरात मरून पडावं. सगळाच घन कचरा वाऱ्याने उचलून दूर कुठेतरी नेऊन टाकावा किंवा गिळंकृत करून टाकावा. पाऊस आला की तुंबणारी गटारं नि रस्त्यांवरून बिनकामाची तोंड वर करून फिरणारी माणसं; एकजात प्रायव्हेट क्लासेसला जाणारी पोरं आणि तासनतास मोबाईलवर अडकून पडलेली शरीरं; भिकाऱ्यासारखं रस्त्यावर खात रस्त्यावरतीच प्लास्टीकचे ढीग टाकणारी मानव-जमात. एकसाथ सगळाच कचरा न्यावा त्यानं नि ओतावा जिथं कमीय तिथे. पाच-सहा वर्षांतून तरी एकदा केला पाहिजे निसर्गाने हा कार्यक्रम. मग वारा अचानकच थांबला नि पाऊस सुरू झाला. जोराचा लागला. पहिल्यांदा मातीचा सुगंध आला नि बाहेर पळत जाऊन रस्त्याकडेचं थोडं ओलं माळ जाऊन चाटण्याची अनिवार इच्छा झाली. उगाच मोठा झालो नाहीतर माती खाता आली असती. रडणारं कुत्रं भिजू लागलं म्हणून आडोश्याला जाऊन गप्प बसलं. निलगिरीचं झाड जिराफ़ाच्या मानेसारखं इकडून-तिकडून हलत राहिलं. रस्ते मोकळे होऊ लागले नि माणसं आडोश्याला जाऊन उभी राहिली. केर एका बाजूला केल्यासारखी. किती तो घन कचरा? शरीरांचा-मनांचा-आत्म्यांचा-आठवणींचा-विचारांचा-लिखानाचा नि त्यावरच्या मीमांसेचा-चित्रांचा-गाण्याचा-शब्दांचा! म्हटलं मरू दे, हे असं चार ओळी लिहून मनासारखं कधी घडत नाही. ते तसं लिहीणं सुरू केल्यापासून संपेपर्यंत आपल्याला काय म्हणायचं होतं, तेही नीटसं कळत नाही. आपल्याला जो अर्थ अभिप्रेत असतो, तो इतरांना कळतोच असं नाही आणि त्यांना जो कळतो, तो बहुधा आपल्या गावीही नसावा! कागदावर, आहेत चोरलेले मार्कर्स जवळ म्हणून, मारत बसलो रेघा नि वाटलं आपण अंदमानातल्या इंटरव्हिव आय-लॅण्डवरती जाऊ. त्याची रूपरेषा काढली, नि हवी नको ती ठिकाणं काढत राहिलो. समुद्राच्या पाण्याने आतवर मुसंडी मारलीय असं दाखवू, दोन छोटी-छानशी तळी दाखवू, एक सुंदरसा ओढा दाखवू, मानवी वस्ती दाखवू नि काय-काय. जेव्हा चित्र संपलं तेव्हा ते अगदीच माझ्यासारखं दिसू लागलं. मी शप्पथ सांगतो, मी असं ठरवून नाही बनवलं. अगदीच कचरा…एखादं रोगट तोंड असाव्ं असं काहीसं. चिडचिड झाली नि वाऱ्याने खिडकीतून आलेला कचरा झाडूने साफ करत राहिलो. बराचसा कचरापेटीत टाकला, थोडा बाजूला सारला. झाडू ठेवला. थोडा वेळ ते चित्र पाहिलं. काय असेल माझ्या मनात हे येण्यापुर्वी नि हे असं येताना? काय असेल त्या रडणाऱ्या कुत्र्याचं दु:ख नि त्या निलगिरीच्या अस्तित्वाचा अर्थ? का ते मोबाईलवर लटकलेले आत्मे अजूनही श्वास घेत आडोश्याला उभेत? का मी सतत बेटाळ होत चाललोय या माणसांच्या गर्दीत? उठलो, बाजूला सारलेल्या कचऱ्यात दोन रबर-बॅण्ड्स, यू-पिना नि एक पेन्सिल पडलेली. ते उचललं-झटकलं नि त्यांनाही त्यांच्या-त्यांच्या परिचयाच्या गर्दीत सोडून दिलं निवांत.
पंकज कोपर्डे
२७ मे २०१४