
…आणि त्याचदिवशी नंतर मग तो रस्त्यावरून चालत होता. एका पावलासारखंच दुसरं पाऊल; एका श्वासासारखाच दुसराही. शांत-संथ. अंगाला-डोळ्यांना त्रास देणारा रात्रीचा झगमगाट; गाड्यांचे हॉर्न्स आणि आनंदात असणाऱ्या लोकांचं हसणं-खिदळणं…सारं-सारं वैतागाचं होतं. त्यानं चालता-चालताच हाताची घडीही घातली आणि धाग्यावर धागा विणत जावं; तसा एकटेपणाचा दोरा; त्याच्या पायातून सगळं जग हळूहळू विणत चालला होता!
बाकडं दिसलं; म्हणून तो थांबला. आकाशातला चंद्र पाहून ओठांची शिवण उसवून तो हसला. डोळे दुखेस्तोवर त्यानं चंद्राकडे पाहिलं. आकाशात एकच चंद्रय; म्हणून त्याचं अप्रूप! तिच्यासाठी त्याने काढलेले चंद्राचे फोटोज़! काळी रात्र…पिवळ्या पवित्र दुधात बुडवलेला चंद्र आणि त्या दुधाचे चंद्राच्या आजू-बाजूला उडालेले शिंतोडे! रात्र-रात्र जागला तो; छान फोटो मिळवण्यासाठी…मनासारखं काहीच मिळालं नाही!
त्यानं आडव्या रस्त्यावर वाहणाऱ्या, तुंबणाऱ्या, चिडणाऱ्या गर्दीकडे पाहिलं…गर्दीतल्या लोकांना दु:खच होत नाही; असं त्याला वाटलं! चालायचं-थांबायचं-चिडायचं-ओरडायचं आणि जास्तच त्रास झाला; तर चेंगरून मरायचं! त्याला गर्दीत तिचा सुटलेला हात आठवला…कावरे-बावरे डोळे; त्याला शोधणारे डोळे…तसा तोही कावरा-बावराच झाला होता आणि मग मागून येऊन तिनंच त्याचा हात पकडलेलाची आठवला त्याला!
प्रत्येक ठिकाणी, ओळखीच्या जागी; आठवणींची भूतं-भुतांची बाळं-बाळांची खेळणी, सगळं-सगळं, नुसतंच! झाडा-झाडावर त्रास उलटा टांगलेला! कॅंटीनमधल्या प्रत्येक टेबलावर आठवणींचा चहा सांडलेला; इथं…या टेबलावर एकदा मी तिच्या नकळतच हात स्पर्शिला तिचा; आणि इथं…इथं बसून आम्ही सौर-उर्जेबद़्द्ल बोललो होतो…तो तिकडं जरा-तो-मळकट-कळकट-पाय चिरलेला टेबलंय ना; तिथे बसून आम्ही arrange-marriage बद़्दलही बोललो होतो! आणि त्याचदिवशी नंतर मग तो; त्याच अंधारलेल्या-मळकट-कळकट-पाय चिरलेल्या टेबलावर बसलेला होता आणि गोडवा उतरलेला चहा त्याचा गरमपणा मरून गेला तरी ओठांना लावत नव्हता!
दररोजचा कॅंटीनवाल्यानं पुस्तकाची पानं उघडावी, तशी एक स्माईल दिली; मोजक्याच शब्दात आणि त्याला ’ती कुठंय?’ असं विचारलं. “ती देवाघरी गेली!” असं काहीसं तो बडबडला; स्वत:चे पैसे भरून कॅंटीनमधून बाहेर पडला; थोडीशी फडफड करून वीजही मरून गेली; डोळ्यांना त्रास देणारा सारा प्रकाश; शांत झाला एकदम. डोक्य़ावरचा चंद्र मग अजूनच ठळक वाटू लागला.
काळंभोर आकाश, सुटलेला संथ गार वारा, फिकट पिवळा चंद्र आणि त्यानंच रंगवलेलं थोडंसं केशरी अंगण…रस्त्यावरती तो एकटा आणि गळ्यात एक अवजड कॅमेरा…चंद्र अगदी तिला हवा तसाच!
…आणि त्याचदिवशी नंतर मग कॅमेऱ्यातल्या चंद्राकडे पाहत तो आभाळभर रडला होता.