बुधवार, १२ मे, २०२१

ओम कॅफे

एका कुंद खोलीत, थंडी शिरायचा प्रयत्न करत असते आणि बर्फाळलेल्या पर्वतांमध्ये वसलेलं छोटंसं गाव स्वत:चं अस्तित्व टिकवायच्या प्रयत्नात असतं. पावसानं झोडपलेली घरं आणि आयुष्यानं झपाटलेली लोकं त्या कुंद खोलीत शिरण्यासाठी उत्सुक असतात. वेळ आल्याशिवाय कुणी जात नाही अशा खोल्यांमध्ये! मी तिथे सताड बसलेलो. माझ्या समोर बॉब मार्लेची तीन पेंटिंग्ज, त्यातलं एक अर्धवट सोडलेलं; कंटाळा आला असेल किंवा काही अनुभूती झाली असेल! माझ्यासमोर मंडालाची चक्रं. दोन-चार किंवा तुम्ही मोजू शकाल तेव्हढी! एकात एक गुंतलेल्या विश्वांची झालेली vision असेल किंवा हात वळला असेल तसे चित्र रंगले असेल. समोरच्या भिंतीवर दोन-चार फ्रेम्स फॅब्रिक पेंटिंग्जच्या. एका कापडावर मंडाला, दुसऱ्यावर शंकराचे मानवी आकारातले चित्र. त्यात तो डोळे मिटून बसलेला, दोन्ही हातांनी आशिर्वाद वाटत. या शंकराला औरा नाही, त्या चित्रात काळा background. काळा रंग अंधाराचा, भयाचा, शक्यता-अशक्यतांचा, आणि काहीच नसण्याचा! भिंतीवरती एका मोठ्या वर्तुळात पर्वत-नदी-जहाज-झाडं रंगवलेली. ती जहाज पर्वतांच्या पायथ्याला विसावलेली आणि नदी कुठे रूसत-फुगत वाहत चाललेली. भिंतींना पिवळा रंग सुर्याचा. काही टेबल खुर्च्या, काही भारतीय बैठकीची arrangement.

त्या कुंद खोलीत, सुंदरसा मंद प्रकाश. थोडासा पिवळसर, थोडा निळा. त्या कुंद खोलीच्या विशाल खिडक्यांतून आजूबाजूचे दिसणारे देवदार ल्यालेले डोंगर आणि त्यात लपलेली रंगीबेरंगी घरं आणि जीवजंतू, त्यांचे आवाज, त्यांचं एक अनोखं जग! त्या काचेकडे दोनेक क्षण बघितलं की त्या कुंद खोलीतलेच दिवे दिसतात. नजर थोडी स्थिरावली की त्या बाहेरचं जग जवळ येतंय असं वाटतं. त्या खोलीत एक अनामिक ऊब. संध्याकाळ जवळ येते, तशी त्या कुंद खोलीत लोकांची वर्दळ वाढू लागते. थंडीपासून आणि जगापासून आसरा शोधायला आलेली लोकं, सगळी एकसारखीच दिसतात. काही अलिप्त राहतात, काही गर्दीत मिसळूनच आलेली असतात.

समोरच्या गादीवर एक गिटारिस्ट येऊन बसतो. हसून तो म्हणतो मी music explore करतोय. तो त्याची बैठक बसवायच्या प्रयत्नात. चार-पाच वेळेस मांडी घालून पुन्हा सोडवतो. त्याला त्याची ती बैठक बसतीय व्यवस्थित असं वाटत नाही. काहीतरी missing आहे. मग तो ती गिटार बाजूला ठेवून निवांत सिगारेट्मधली थोडी टोबॅको बाजूला काढून त्यावर हवी ती process करून मस्तपैकी joint बनवतो. तो शिलगावतो, डोळे बंद करतो आणि music explore करायचा प्रयत्न करू लागतो. काही वेळातच त्याला काहीएक अनुभूती होते. मग तो ती गिटार आपुलकीनं जवळ घेतो. तिला जरा कुरवाळतो, तीन-चार तारांवरून हात फिरवतो. मग त्याला काहीतरी जाणवतं आणि तो अचानकच मोठ्याने गायला लागतो. पाचेक सेकंद आणि पुन्हा थांबतो. मग तो पुढे ठेवलेल्या लॅपटॉपवर एक सुंदरसं गाणं वाजवतो आणि मनातल्या मनात ते गाणं कसं वाजवायचं ते विचार करत राहतो.

एकीकडे लोकं येत राहतात; कुंद खोलीबाहेरचा प्रकाश कमी होत राहतो, आतली ऊब वाढू लागते. दिवसभर काम करून थकलेली लोकं त्या कुंद खोलीत आनंद, entertainment, आणि प्रेमाच्या शोधात जमा होऊ लागतात. मग काहीजण त्या गिटारिस्ट्जवळ बैठक बसवतात. काही joint साठी बसतात, काही निव्वळ गाणं ऐकण्यासाठी. मग तो गिटारिस्ट त्याच्या लॅपटॉपवरती एक गाणं वाजवत त्यावर स्वत:चं गाणं वाजवू लागतो. दु:खाचं गाणं असतं पण melodious असतं खरं. त्या गाण्यामधल्या गिटारिस्टची प्रेयसी त्याला सोडून दूरवर गेलेली असते. त्या दोघांचं एक सुंदरसं घर असतं, जग असतं. पहिल्या कडव्यात तो स्वत:चं दु: प्रगट करतो आणि एवढंच कळतं की या दु:खाला एक आनंदाची किनार आहे नाहीतर गाणं काय एवढं सुंदर वाटलं नसतं. त्या कडव्याभरात मी ही पायाने ठेका धरतो आणि त्या मंडालाच्या चक्रांमध्ये शिरू लागतो.

कुंद खोलीमध्ये धूर घुमू लागतो. ऊब अजूनच वाढू लागते. आता खोलीतलं वातावरण वेगळाच मूड धारण करतं. Joints ची थोटूकं टेबला-टेबलावर पडू लागतात. हसण्या-खिदळण्याचा tempo वाढू लागतो. कुणी मध्येच उठून फोन आला म्हणून खोलीबाहेर थंडीत जाऊन थांबू लागतो, काही पोकळ बसलेले असतात, मंडालांमध्ये गुंतलेले असतात. प्रत्येकाचाच प्रवास सुरू झालेला असतो, काही लोक हवेत उडत असतात, काही खड्ड्यांत रूतत असतात. कुणी रडू लागतं, कुणी हसत राहतं, कुणी (मी) मुर्खासारखं लॅपटॉपवर लिहीत राहतं. लोकांची जगं, त्यांची मतं, आणि त्यांची अस्तित्वं एकमेकांना घासून जातात; कधी अगदीच एकमेकांवर लोळतात.

गिटारिस्ट दु:खाचं गाणं आळवत राहतो. त्यावर काही लोक ठेका धरून नाचू लागतात. दुसऱ्या कडव्यामध्ये गाण्यातला गायक म्हणतो की त्याची प्रेयसी एक आर्टिस्ट होती आणि ती सुंदर पेंटिंग्ज काढायची. तिच्या हातात जादू होती, त्या जादूच्या प्रेमात तो गायक होता. तिच्या विचारांची मंडलं आणि त्यांची आवर्तनं यांत तो इतका गुंतला की त्याचं आयुष्य एक खेळणं होऊन राहिलं. त्याची प्रेयसी दुसऱ्या विश्वातून आलेली, आणि ती वेळोवेळी ट्रिपवर जाऊन त्याला निराळ्याच जगात भेटायची. एके दिवशी ती वेगळ्याच विश्वात गेली आणि ती तशीच त्याला सोडून गेली! त्या कडव्या अखेरीस तो कुंद खोलीतला गिटारिस्ट अचानक थांबतो. तो डोळे उघडून सर्वत्र बघतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. त्याच्या कुठल्या विश्वाच्या कुठल्या दरवाज्यातून लोकं निघून गेली याचं भान त्याला राहत नाही. ते गाणं त्याचंच असावं, पण आपल्याला काय माहिती, काय पर्वा?

तो तिकडे गिटार वाजवत होता एवढा वेळ, मी इकडे माझ्या keypad वर शब्दांनी चित्र रेखाटत राहतो. आपण आपापल्या मंडालांमध्ये अडकलेली लोकं! कुणाला कीक-स्टार्ट लागते, कुणी फक्त डोळे मिटून जगांच्या प्रवासांना जाऊन येतो. त्या कुंद खोलीत आता एक रसायन तरंगताना दिसतं! शंकर शांत डोळे मिटून पाहत राहतो सगळं, रसायन होऊन भिनत जातो लोकांमध्ये, माझ्यामध्ये! कुंद खोली काळसर होत जाते, कुंद खोलाचा मालक काउंटरवर बसून पैसे मोजत राहतो.

पंकज

१२ मे २०२१


मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

मिटींगा

मिटींगा असतात. सगळ्यांनाच असतात. काहींना लागतात, तर काही जण लावतात. प्रत्येक मिटींगला स्वत:चा आकार, प्रकार, रंग-रूप, ढंग असतो. काही लाजऱ्या-बुजऱ्या, नवख्या, तर काही रटाळ, बोरिंग, खमक्या असतात. काही मिटींग्ज मनाला हुरहुर लावून जातात, तर काही पिच्छा सोडता सोडत नाहीत. काही गोड, मधाळ, स्वीट; तर असतात काही आंबट, कडवट, तिखट. मिटींगा या मिटींगा असतात, त्यांच्याविषयी वाद घालायला नसतो स्कोप तसा.

मिटींगांची उत्क्रांती कशी झाली असेल? अशीच चार टाळकी बसली असतील काहीतरी गप्पा-टप्पा मारत शेकोटीभोवती आणि सरतेशेवटी आग विझवून गेली असतील घरी. गप्पांच्या किंवा हुक्क्याच्या नादात त्यांची लागली असेल तंद्री आणि घरी परत आल्यावर लागली असेल हुरहुर परत त्या टाळक्यांना भेटण्याची! म्हटले असतील चला भेटू पुन्हा आणि कालच्यासारखंच बसूयात! त्यांना वाटलं असेल की एवढा वेळ बोलूनही वेळ वाया गेला असं वाटत नाही, उलट काहीतरी महत्त्वाचं मोठ्ठं केल्यासारखं वाटतं. डोपामाईन पळलं असेल शरीरभर आणि मनातून एक आनंदाची लहर गेली असेल; मग म्हटले असतील हे जे काही होतंय त्याला नाव देऊ एक आणि दररोज करत बसू हा खेळ.

बरं ही एक असू शकते गोष्ट किंवा मग काय झालं असेल की एखाद्य़ा व्यक्तीला इतरांकडून करून घ्यायची असतील कामं आणि चारचौघांत बोललं की मनाच्या नाही पण जनाच्या शरमेने तरी ती व्यक्ती काम करेल म्हणून बसवली असेल ती मिटींग. निर्लज्जांना तसा काही फरक पडत नाही, आणि त्यांची प्रजाही बहुधा या मिटींग्जमुळे वाढीस लागली असेल. आपण काय घरी बसून नुस्ता तर्क लावू शकतो. मिटींग्जचं evolution साधं सोप्पं नाही. कधी कधी मिटींग्जमध्ये पंधरा-तीस-पन्नास लोक मिळून आपापले दिवसाचे सहा तास (म्हणजे सगळ्यांचे ३०० तास) निवांत वाया घालवतात आणि त्या सहा तासांत किडूक-मिडूक ञान मिळवतात. कुणाच्या पोटातून गर्रर्र असा आवाज येत राहतो, कुणी आळसवटून झोपायला येतो, काही लोकं मनातल्या आणि पोटातल्या युद्धांना दाबून ठेवतात, तर कैक ठिकाणी होतो विस्फोट! काही मिटींगा चालत राहतात; त्यांना काळ-वेळ, तहान-भूक, जगाची पर्वा असलं काही नसतं. ‘येस सर’, ‘सॉरी सर’, ‘येस मॅडम’, ‘ओक, ऑन ईट’ असल्या keywords ची density या मिटींगांमध्ये भरभरून असते. मिटींगांमुळे जगात वेगवेगळ्या आणि विचित्र स्वभावाची लोकं भरीस आली आहेत हे मात्र नक्की. काही लोकं लहानपणापासूनच, तिसरी-चौथीपासूनच, लाळ घोटायला शिकतात. घरच्या मिटींग्जमध्ये ती पोरं भाव खाऊन जातात. काही लोकं डेटावर फोकस करतात आणि कुणी काही बोललं की त्या निर्जीव आकड्यांचा आधार घेतात, P value बद्दल बोलतात, आलेख दाखवतात आणि error bars कडे सगळ्यांचं लक्ष वेधतात. या लोकांना आपसूकच मिटींगांमध्ये वाळीत टाकलं जातं, कारण आकडे बऱ्याचजणांना समजत नाहीत आणि आकडे खरं बोलतात. काही मंडळी presentation वर भर देतात, लागलंच तर बाहेरून पैसे देऊन पीपीट्या बनवून आणतात. भारदस्त शब्द वापरतात आणि सगळीकडून नन्नाचा पाढा काढून टाकतात. मुर्ख म्हणायचं असेल तर unintelligent म्हणतात. तो शब्द म्हणताना पतंगाच्या अळीसारखी लालचुटूक ओठांची वळवळ करतात.

मागच्या काही वर्षांत स्वत:च्याच laptop screen कडे बघत तोंड हसरं ठेवत मिटींगा चालत राहतात. उघड्यावर शेकोटीभोवती ते स्वत:च्या घरात AC मधे बसून असा हा मिटींगांचा प्रवास फारच उल्लेखनीय आहे. पुर्वीही लोकं चड्ड्यांवरती बसायची मिटींगांमध्ये आताही बसतात, अंगावरती कोट अडकवून. कोटातली माणसं तोंडाला पावडर लावून खुर्ची गरम करत तासनतास बसून राहतात. AC असला म्हणून काय झालं? पायाला डास चावतात, कधी एखादी मुंगी अनामिक पण अतिगरजेच्या ठिकाणी जाते चावून आणि नकळत त्या वेदनेची चाहूल लागते बावरलेल्या मनाला, तोंडावरचं हसू मात्र ढळत नाही आणि मनातले आसू काही केल्या जात नाही. कॅमेऱ्यापुढून डोकं हललं की लॅपटॉप बोंबलतो, ‘चोर, चोर! मिटींग टाळून पळतोय हा, पकडा त्याला!’ अशावेळी ढगाळलेलं ब्लॅडर आणि भरून आलेलं लिव्हर, दोघांचा लेव्हर, मित्रा तू सावर!

मिटींग कोण बोलवतं आणि कोण त्यात बोलतं यावर तिचं कॅरॅक्टर ठरतं. काहीं चारित्र्यहीन असतात, त्यांचात शिव्याशब्दांचा असतो गदारोळ, बाचाबाची, आणि हाणामारी. काही मिटींगांमध्ये बोलणारं एकच तोंड असतं, ते सुरू होतं आणि मग तासाभराचं रेताळ वाळवंट आणि मग ते बंद होतं. जांभया देत केस विस्कटलेलं सुटाबुटातले लोकं motivate होऊन मुतारीकडे गर्दी करताना दिसतात. मग पुढच्या सेशनमध्ये तेच. तोंड चालू, अथांग समुद्र आणि तुमचं विमान त्या समुद्राला समांतर उडत चाललंय तासभर, मग तोंड बंद. सुरकुतलेल्या तोंडांची आणि सुटलेल्या पोटांची सुटाबुटातली लोकं स्मोकिंग झोनकडे गर्दी करतात. या मिटींगांना ऋतू नसतात, त्यांना फुलं म्हणजे काय नसतात माहिती, त्यांना लाली नसते, सगळं असतं टाईट, कपडे, वातावरण, फिगरी, भाषा, पीपीट्या!  

मिटींगा सगळ्याच आपला विश्वासघात नाही करत. काही दोघांपुरत्याच मर्यादित असतात त्यामध्ये वेळ स्तब्ध होते आणि हळूवार गाणी घुमतात कानांत. तिचे हळूवार भुरभुरणारे केस आणि ती बोललेले सारे गंधाळलेले शब्द यांचं एक अलग मिश्रण तयार होऊन हवेत पसरत जातं. ती दहा मिनीटांतच निघून जाते, पण ती मिटींग आपल्या मनात दिवस-रात्र लूपमधे चालू राहते. डोपामाईन सुटतं सुसाट आणि नदी होते शरीराची बेफ़ाम! अशा काही मिटींगा असाव्यात आपल्या आयुष्यांत, वाटतं ज्या थेंब थेंब स्वत:लाच आयुष्यभर पुरवाव्यात! अशा काही मिटींगा घडाव्यात आयुष्यांत की वाटावं मी न उरलो माझ्यात!

पंकज | २७ एप्रिल २०२१