गुरुवार, १३ मार्च, २०१४

मोरपंखी


तिच्या-माझ्या आठवणी, कपाट उघडलं की अंगावर पडतात. मी अगदीच त्यांत गुदमरून जातो. मरून जातो. तिच्या कुर्त्या, तिचा वास. नदीकाठी वाळूवर उमटलेली तिची नाजूक पावले आणि जांभळं होत चाललेलं आभाळ…रातव्याचा एकसंध-निर्दोष आवाज नि तिनं माझा धरलेला हात…दूरवर डोंगरावर वणवा पेटलेला नि थंडीचे दिवस त्यात. तिच्या आठवणी वेचून कुणीतरी डोंगरभर पसरून ठेवलेल्या दिसतात. मी झटक्यात कपाट बंद करतो नि दीर्घ श्वास घेतो. जिवंत उरलो आणि जगत राहिलो…या दोन गोष्टींत किती अंतर? किर्रर्र जंगलात थंडगार ओढ्यात पाय सोडून बसलेलो आम्ही…
मी माझ्या खोलीत अस्वलासारखा फिरतो. जागा बदलून झाल्या, मित्र-परिवार वाढवला; पण मनाचा पिंजरा तुटला नाही. महिन्यातून एखाद दिवशी मी आपसूकच टेकडीवर तिच्याबरोबर बसलेला असतो किंवा ती ऐकत असते नि मी तिला गोष्ट सांगत असतो. सांगता सांगता संपून जाते नि ती हळूच तिचं डोकं माझ्या खांद़्यावर टेकवते. मी दूर क्षितीजाकडे पाहत राहतो. प्रेमाची जाणीव होण्यासारखा आनंदी क्षण नसावा जगात. मी ज्या विश्वासाने ओढ्यात पाय सोडलेले, तितक्याच विश्वासाने तिने डोकं टेकवलेलं माझ्या खांद़्यावर. आता जे होईल ते होईल. तू आहेस ना…
त्या कपाटात तिला आणलेली एक मोरपंखी साडी आहे. सुंदर रंगाची. सोन्याच्या तारांनी मढवलेली. त्याही इतक्या नाजूक की कळणारही नाहीत. मी तिला म्हटलेलं की हे सोनं आहे असं समज आणि ती ’हो’ म्हटली होती. मी तिला म्हटलेलं की ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ आणि ती ’हो’ म्हटलेली. कपाट पुन्हा-पुन्हा उघडू वाटतं नि सतत त्या पसाऱ्यात गुदमरून जाऊ वाटतं. मी बहुधा ओढा होऊ शकलो नाही. ओढ्यासारखी निरागसता आणि वडीलधारेपणा एकवटवू शकलो नाही. त्या पसाऱ्यात मला आज अचानक हव्या त्याच गोष्टी सापडतात नि वाटतं जे खरंखुरं होतं ते मी जग मी पाहिलंच नाही की काय? ती मोरपंखी साडी, सोन्याच्या तारांनी मढवलेली, ती नव्हतीच कधी तशी सोन्याची…पण फक्त गोष्टीपुरती. किती माझ्या आवडीच्याच गोष्टी त्या पसाऱ्यात सापडतात मला, कितीदाही तो उपसला ढिगारा! ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि माझी होती ती फक्त. ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि ओठांची झालेली भेठ. ती निळी रात्र, जेव्हा मला घट़्ट धरून ती झोपली होती नि निरखत होतो मी तिला! वाटतं मी उगाचंच तिला ओढत राहिलो नि ती ही माझ्यासोबत चालत राहिली अनवाणी…रस्ताभर उमटलेली लाल पावलं रक्ताची कधी मी, वळूनही पाहिली नाहीत! वाटतं मी माझ्याच बनवल्या संकल्पना, नि एकामागोमाग एक दरवाजे उघडत किती आतवर घेऊन गेलो तिला कुणास ठाऊक! परत येण्याचा रस्ताच ती विसरून गेली. भुलभुलैय्या. स्वत:चंच आभाळ इतकं विणत गेलो की तिला स्वत्वाचा विसर पडला. इतकं प्रेम केलं की तिचा जीव कंटाळला! आता आठवणीसुद्धा आहेत त्या माझ्यापुरत्याच असाव्यात. त्या आठवणी जशा कपाटात आहेत, तशा त्या कुणाच्याच नसतील. त्यांचे संदर्भ कुणालाच नसतील नि मी त्यांना ज्या आपुलकीने पाहतो, तसं कुणी पाहिलंय त्यांना? जीव असलेली माणसं कितेक फिरतात आजकाल आजूबाजूला, पण वाटत नाही कुणाला हाताला धरून घेऊन जावं त्या भुलभुलैयात आणि स्वत:च विसरून जावं स्वत:ला. त्या आठवणींत एक मोरपंखी साडीही आहे सोन्याच्या तारांनी मढवलेली. ती खरंच आहे सोन्याची, पण तिला नाही समजली! एकेक तार त्या साडीतली मी विकतोय आता मदिरेसाठी.
पंकज कोपर्डे
१३ मार्च २०१४

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०१४

कारण अभ्यास...
भाळाला एक भोक पडलेलं. मगरी आणि सुसरी, पांढऱ्या मानेचे करकोचे, heartbreak झालेले बोके, चिकट गोगलगाया, आत्मा हरवलेल्या काया, कुत्र्यासारख्या पडत होत्या अंगावर! हे एकदा घडलेलं नव्हतं; सतत घडत राहिलेलं. भोकाची त्रिज्या कमी-जास्त आणि पडणारे प्राणी चित्र-विचित्र, इतकाच काय तो फरक. मी चुकीच्या जागी बसलोय किंवा बसवलो गेलोय अशी भिती तोंडावर सतत बाळगलेली. बाळगलेली बरी म्हणजे शंकेला वाव उरत नाही. कपाळावरचा घाम पुसला आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या फळ्यावरती रेघोट्या मारणाऱ्या पाठीकडे पाहिलं. शेजारच्याच स्क्रीनवरती काही आकडेमोड झालेली; ठळक शब्दांत काही सुविचार लिहीलेले; काही आकृत्या अबोल मेलेल्या आणि त्यांच्यामधून बाण इकडून तिकडे. लढाई संपल्यावर मेलेल्या-मारणाऱ्यांचा हिशोब सुरू असतो. किती वेळ गेला असेल मधे? मी एकदा पापण्या मिटून पुन्हा उघडेपर्यंत. दहा ते पन्नास वर्षांपैकी कितीही किंवा शंभरही. ज्ञान आणि वेळेच्या अक्षांवरचा एक बिंदू पकडून मी सुरू केला होता प्रवास पंधरा मिनीटांपुर्वी आणि पापण्या मिटल्या. मी ओढ्यात एक नाग बेडकाला पकडून बसलाय असं बघितलं. कितीतरी वेळ…पंधरा मिनीटांपेक्षा कमी…तो नाग त्या बेडकाला फक्त पकडून होता दातांत. आणि थकला की काय? सोडून दिलं त्यानं बेडकाला नि गेला कुठेतरी खड़्ड्यात! खुर्चीवरती मी जरा पसरलोच होतो; सावरून बसलो. आजूबाजूला पाहिलं आणि स्वत:ला वेळेचं भान आहे का? असं विचारलं. उघड्या जबड्यात माझ्या किती माशांनी interest घेतला असेल, काय माहिती! जेव्हा जबडा बंद केला होता, उठल्या-उठल्या, तेव्हा त्यात एक सोन्यासारखा केस सापडला होता. तो ओकू वाटला होता; पण सोन्यासारखा म्हटल्यावर ओके वाटला होता. सोन्यासारख्या केसांची एकच मुलगी होती वर्गात, आजूबाजूच्या चार बाकांपैकी एकावर बसलेली. म्हटलं, तो केस ठेवून द़्यावा लाकडी पेटीत आणि पेटी ठेवावी खोलीवर. जमलंच-झालंच तर होईल evolution!

समोरची पाठ अजूनही खरडत होती equations आणि दगडासारख्या डोक्यात माझ्या कसलाच नव्हता mention! आजूबाजूलाही काही मेणासारखे पुतळे बसलेले. काही हलणारे-डुलणारे, काही डुगडुगणारे, काही वितळणारे. वावटळ यावं तशी एक जांभई अचानकच स्फुरली. असेल थोडा घाण वास, बिचारी आली तशीच विरली. विरली न विरली तोच बाका-बाकांवर जांभयांची लाट उसळली. ती लाट तशी घाटावर बसून बघायला मजा आली. त्या सोन्यासारख्या केसांच्या मुलीच्या नाजूक ओठांची उघडझाप, घाटावरची पाकोळी झाली! मी lecturer कडे लक्ष देण्यासाठी position घेतली. तो जे जे बोलला, ते ते मी मनातल्या मनात पडताळलं. कारण मोठा होत गेलो तसा विश्वास उडत गेलेला. लोकांवरचा, प्रेमावरचा, विज्ञानावरचा. स्वत:ला मतं पटल्याशिवाय विश्वास ठेवू नको विज्ञानावर, असे मोठे सांगून गेले. या विधानावर कसा ठेवणार विश्वास? पण तेवढा मी विचार नाही केला. आता जे जे बोलतं कुणी, ते ते पडताळावं लागतं आणि पटत असेल तरच खिशात ठेवाव्ं असं. त्या equations च्या घाईगर्दीत मेंदू कुठेतरी टेकला - थकला बिचारा - कलंडला. म्हटला, त्याच्या ध्यानात नाहीत सगळीच मुळाक्षरं…त्यामुळे शब्द वाचता येत नाहीत-उच्चारता येत नाहीत-कळत नाहीत. असा टेकलेला मेंदू, मला थकलेला शेतकरी भासला. बाभळीच्या झाडाला टेकून बिचारा घाम पुसणारा. त्याची कीव आली; तो माझा आहे म्हणून माझीही कीव आली. पंधरा मिनीटांच्या समाधीत काही ज्ञानप्राप्ती नाही झाली. किती वर्षांचं ज्ञान मी हरवून बसलो, त्याची तर गणतीच नाही. कुणी युरोपात १९५० साली असा-असा विचार मांडला. तर १९५९ मधे अमेरिकेमधील शास्त्रज्ञांनी त्याचे विधान खोडून काढले आणि नवी थिअरी मांडली वगैरे वगैरे. माझा मेंदू टेकलेला कुठेतरी १९८० साली आणि उठला तो २०१३ ला. आता मधलं काहीच महिती नाही…तर जोडणार कसा बांध, ठेवणार कसा विश्वास? वाटलं डोळे मिटावेत नि पहावं आभाळाच्या भोकातून पडली तर एखादी सोन्यासारख्या केसांची मुलगी…पण हे तेवढंच शक्य होतं जेवढे त्यातून पडणारे heartbreak झालेले बोके नि मेंदूविरहीत डोके! मला त्या एका lecturer चं कौतुक वाटलं. १९५० पासून २०१४ पर्यंत तो टिकला. असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे. या माणसाने अभ्यास केला खरा, मी हुकलो. मुकलो-भरकटलो-कलंडलो-लवंडलो. एक डुलकी, एक अपघात. झाला अपघात, मग घट़्ट केलं मन आणि बसलो मुर्खासारखं उरलेल्या lecture भर…त्या केसाशी खेळत. घरी जाऊन अभ्यास केला मात्र…
पंकज कोपर्डे. २० फेब्रुअरी २०१४