मंगळवार, २३ जून, २००९

शनिवार, ६ जून, २००९

कात्री


दिवसाच्या भरगच्च चित्राला कात्री लागावी आणि संध्याकाळीचा कपटा तेवढा हरवून जावा...तसं आज काही घडलं!

आयुष्यातला एक हरवलेला पाउस आणि कात्री लागलेली एक सोनेरी संध्याकाळ बाहेरच्या बहकलेल्या वा़ऱ्यात मांजा तुटलेल्या पतंगांसारखे...मी माझ्या फुल्ली एअर-कडिशन्ड, हायली इक्विप्ट लॅबच्या गॉगल ग्लासआडून पाहिले!

असे अजून किती दिवस, मी कात्री लावणारेय मनाला...देवच जाणे!

शुक्रवार, ५ जून, २००९

एक्सा...


ती विचारायची; "बोल कुठं जायचं?"

"Side-walk, coffee house, CCD?" तिच्याकडे पर्याय होते; नव्हतं असं काहीच नाही! आणि निर्णयांना होवुन जायचो...मी ठार बहीरा!

हिरवा सिग्नल लागला की ती म्हणायची, "चल चंद्रावर जाऊ!!"
आकाशात एक चन्द्राची कोर...छोटंसं लॉन, त्यात नाचणारे मोर; दगड-धोंड्यांचाच एक छोटासा धबधबा, चमचमणाऱ्या चांदण्यांचा चमचमणारा दिवा...तिथं फ़क्त मी आणि ती...आणि काही ठरावीक डोकी...तिथं येण्याचा रस्ता फ़क्त तिला माहिती!

"चल चन्द्रावर जाऊ!!"

क्षणिक

क्षणिक

क्षणिक- क्षणिक म्हणून लिहीत जावं आणि ते क्षण संपेपर्यंत किंवा मन संपेपर्यंत उघड्या कापरासारखं चित्रात किंवा गाण्यात किंवा पानात किंवा आतल्या-आत, मनात…उडून जावं-विरून जावं आणि आठवण काढण्यासारखं त्यात होतं तरी काय? असा साधा प्रश्नही न पडता…ते सगळं गेलं तसंच, आठवणीतूनही विरून जावं; हे असलं सगळं, या एवढया मोठ्या जगात…कुठे-ना-कुठे, कुणी-ना-कुणी लिहीत असेल-गात असेल-रेखाटत असेल…

आणि क्षण संपला की, तंगड्या टेबलावर टाकून डोळे झाकून बसत असेल! क्षणाचा आनंद असा पानात गेला की, तो क्षणही नुस्ताच वाया नाही गेला; क्षणाचा आनंद असा गाण्यात गेला की, तो क्षणही गाणं ऐकलेल्या सगळ्यांनी क्षणभर तरी अनुभवला!

लिहीलेले कागद जपून ठेवलेत त्यांनी आणि क्षणांची छायाचित्रे काढावीत, तसलं अजब भारी नुस्तं अक्षरांनी घडवलंय त्यांनी! असं घडतं कसं काय? कुणी शोध लावला याचा? म्हणजे…तुम्ही खिड्कीत बसा - घाईगदबडीत - जीवनाचे प्रश्न सोडवत - आनंदात बायकोबरोबर(?) किंवा इतर कुठल्याही अवस्थेत(!!) आणि डोळे सताड बाहेर ठेवा… वारा सुटेल-पाउस येईल-गालांवर हसू किंवा गाणं येईल! चेहरयावर वारा लागेल; पाण्याचे उडलेले थेंब लागतील…भजी तेलात आनंदाने डुब्या घेतील आणि रेडिओवर लताचं “गिला गिला पानी” लागेल!

“का घडतं हे? कोण घडवतं हे? हे एवढं सगळं करायचं असतं; अशी प्रथाच कुणी पाडली मुळात? आणि एवढ्या सगळ्या घटनांचा शोध तरी कुणी लावला?” असे प्रश्न विचारणं मुळातच किती मुर्खपणाचं आणि अरसिकतेचं द्योतक आहे; असंच वाटणार प्रत्येकाला! यावर उत्तर म्हणून तुम्ही म्हणाल, “आता वाटतं…त्याला काय करणार?”

बघितलं क्षणांचा हा सुरूंग किती भयानक आहे!

तो प्रत्येक नुक्ताच जन्मलेला क्षण आणि प्रत्येकाचं आपलं-आपलं मुठीएवढं मन…दोघं नुस्ती जुळी भावंडं आहेत!

- पंकज

दिल्ली (२४/०५/०९)