सोमवार, २० जुलै, २०१५

धरपकड

रानात आता काहीच झाड्ं उरलीहेत, हे माहिती होतं रामूला. पाऊस पण लांबणीवर पडत चालला होता कातरपाड्यात. मागच्या दोन महिन्यात दोनेक दिवस दोनेक थेंब गळल्यासारखे झालेले, की ती ही अफवा होती हे त्या दोनशे वस्तीच्या जुळ्या गावांना माहितीही नव्हते! कातरपाड्यात नि पातरपाड्यात एक छानसं भरगच्च जंगल तेवढं जिवंत राहिलेलं मागच्या दोनशेक वर्षांपासून. दोन पहाडांनी बोटांनी चिमट करून वाहणारी नाजूक नदी गांडूळ पकडावी तसं या दोन पाड्यांनी चिमटलेलं ते सदाहरित जंगल. चिमट घट्ट होईल तसं ते आंधळं गांडूळ फुटणार किंवा पिचकणार. रानाचा पट्टा रूंदीला कमी पण लांबीला अजून शाबूत राहिलेला. जांभळाची नि वडाची उंचच उंच झाडं जंगलाची उंची त्याच्या रूंदीच्या दुप्पट ठेवण्याचा कसा-बसा प्रयत्न करत राहिलेली.

रामू कातरपाड्याचा राहणारा नि लामू पातरपाड्याचा. रामू लाकूडतोड्या नि लामू होता सुतार. रामू नि लामू मिळून काम करायचे, रामूच्या लाकडाचं मोल लामू करायचा. हा त्यांचा धंदा मागल्या दहा वर्षांत चांगलाच भरभराटीला आलेला. जंगल बारीक होत चाललेलं नि रामू-लामूचं कुटूंब रोज त्याच्या जिवावर जगत होतं. खात होतं-पित होतं-वाढत होतं. जांभळाच्या त्या एका उंच झाडावर जंगलातलं शेवटचं एक शेकऱ्याचं कुटूंब तग धरून राहिलेलं. शेकऱ्यानं अजून सहा वृक्षांवर घरटी बांधून ठेवलेली नि पिल्लं अधनं-मधनं वेगवेगळी घरटी फिरत रहायची. शेकऱ्याचं कुटूंब आजू-बाजूच्या झाडांची पानं खात-जांभळं खात-जगत होतं-वाढत होतं. पावसाची त्याला काही कल्पना नव्हती आणि जंगलात अफवा पसरवायला कुणी हुशार प्राणी शिल्लक नव्हतेच.

पाऊस नसल्यामुळे शेतीतूनही काहीच उत्पन्न नव्हतं दोन्ही पाड्यांत. लोक निराश चेहरा करून आभाळाकडे पाहत राहिलेले. लामूच्या दुकानावर गिऱ्हाईक नव्हतं. अगोदरच बनवलेल्या लाकडी वस्तू कुणी घेतल्या म्हणजे मग नविन बनवणार ना. लामूच्या मनात होतं की पाड्यांत कुणाचं लग्न लागलं तर बरं…रामूला सांगून जांभळाचं लाकूड बेडसाठी वापरता येईल. पण सध्यातरी थोड्याफार भरभराटीशिवाय लग्नकार्यही कुणी लवकर उरकणार नाही, असं एकंदरीत चित्र झालेलं. मरणाची रटाळ धरपकड चाललेली दोन्ही पाड्यांत आणि त्या अर्धमेल्या जंगलात.
पंकज

२०.०७.२०१५