गुरुवार, २० मे, २०१०

विचार

      Fine focusची एक रेघ पुढं सरकवली आणि microscope खाली slide प्रगट झाली. स्लाईडवरचा जीव जिवंत chick embryo. नुकताच अंड्यातून काढलेला. अंड्यातून direct स्लाईडवर. धडधडणारं हृद़्य. केविलवाणे, मोठाले डोळे. स्लाईडवर तो आडवा. मायक्रोस्कोपमधून माझा आडदांड डोळा त्याच्या शरीरावरून फिरणारा.
      काय नशीब असावं ना? आत्ता-आत्ता जन्म आणि आत्ता आत्ता…एका फेऱ्यातून वाचला बाबा! आई कोणंय माहिती नाही! कुणाचाच स्पर्श झाला नाही. झोपेतून उठलेलं बाळ. अनभिज्ञ, अजाण, कोवळं… अंड्यातून direct स्लाईडवर. कोणत्याची biological systemला असं destroy करण्याचा अधिकारच नाहीये मुळात माणसाला! किती अवघड असतं हे…
      मायक्रोस्कोप स्टेजवर ते अजाण पिल्लू आणि binocular मधे माझे डोळे खुपसलेले…कुणीतरी धक्का दिला. गणेश होता. Classmate. Routine practicals. प्रत्येकाच्याच स्लाईडवर मरणारी पिल्लं, प्रत्येकाचेच डोळे मायक्रोस्कोपमधून त्यांच्यावर.
      “बघू तुझी स्लाईड?” तो.

      मी बाजूला झालो. Fine focusचा नॉब फिरवत तो म्हणाला, “हॅ! कुठं काय? Artefactय!” माझी स्लाईड बाजूला काढून त्यानं त्याची स्लाईड माऊंट केली. Focus केलं आणि तो त्या जीवाला पाहत राहिला.
      माझ्या स्लाईडवरचं पिल्लू मेलं होतं. हृद़्य बंद पडलं होतं. मेलं बिचारं. क्षणिक आयुष्य. मरणारच होतं.     ‘Artefact कुठून दिसली याला!’, मी विचार करू लागलो. ‘असेल बाबा!’ म्हणून त्याला तिथंच सोडलं!
      पाच-दहा मिनिटं गेली. तो बाजूला झाला. मी त्याचीच स्लाईड मायक्रोस्कोपमधे डोळा खुपसून पाहत राहिलो – कुठं काय?
      एवढा वेळ हा पोरगा Artefacts का पाहत बसला होता,याचंच कोडं सुटलं नाही. ढीगभर artefacts होत्या, त्याच्या स्लाईडवर.

०८.०९.०७

मंगळवार, ११ मे, २०१०

My my


   कित्तीतरी दिवसांपासून विचारांना खाद्य मिळालं नव्हतं. याला कारणं बरीच आहेत तशी, पण एक कारण जरा जास्तच ढोबळ वाटलं; ते म्हणजे आसपास विचारी माणसांची कमतरता! ती कशी निर्माण झाली, यालाही कारण बरीच आहेत; let’s not discuss it right now; पण जर गरज होतीच तर स्वत:च विचारी लोकांबरोबर का वेळ घालवला नाही? असा प्रश्न विचारू इच्छिणाऱ्या कित्तीतरी लोकांनी भुवया अगोदरच उंचावल्या असतील! असो.   माझे तीन ब्लॉग्ज आहेत. माझ्या profileवर गेल्यावर ते लगेच दिसतात. मी सकाळी-सकाळी माझ्या PC (Personal computer) वर माझ्या google accountमधे जाऊन log in केल्यावर माझे picasa वरचे albums बघू शकतो; orkut किंवा facebook वरचं माझं account बघतो. Google buzz वर स्वत:ची मतं, लेखन, विचार मांडतो. आपण किती personalize करत जातो ना सर्व गोष्टी! माझं वेबपेज, माझा ब्लॉग, माझं account, माझा अल्बम, माझं कलेक्शन, माझा चष्मा, माझे कपडे, माझा deo, माझी hairgel, माझा ब्रॅण्ड, माझे प्रियजण, माझे आई-बाबा, माझा मोगरा, माझी जाई-जुई, माझा बगिचा, माझा बेंचमेट, माझे क्लासमेट, माझे टिचर्स; मी पाहिलेला वाघ, माझ्या स्वप्नातला गाव, आमची स्कूटर, माझं पुणं, माझा महाराष्ट्र, माझा भारत! माझं जग, माझ्या जगाभोवती गुंडाळलेला मी! मला उत्सुकता, माझ्या जगात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची आवक वाढवण्याची; त्यामुळे हा सारा खटाटोप?! ते मुळात माझ्यात आहेच; काय? हेच की, स्वत:च्या गोष्टींवर हक्क सांगणं; पण या अशा हक्क सांगण्याला या आभासी जगात मी निर्माण केलेल्या जगामुळे नि जागांमुळे प्रोत्साहन तर मिळत नाहीये ना?! अशी एक वेळ येण्याची शक्यता आहे की, personalize हा शब्दही personalize करू वाटेल, आपल्याला…(सध्यातरी वेबसाईटस़् personalize झालेल्या आहेतच!)

   गोष्टींवर स्वत:चा हक्क सांगण्याचा मुद्दा पटत नाही, असे नाही, ते साहजिकच आहे! वाघही त्याच्या प्रदेशासाठी, खाद्यासाठी लढतोच की! पण त्याच्यासाठी प्रश्न जगण्या-मरण्याचा असतो; आपल्यासाठी तो तितका गांभीर्याने घेता येण्यासारखा नक्कीच नसला पाहिजे; या प्रश्नाचे implications मात्र कितपत गहिरे होतील; हे ज्याच्या-त्याच्या prioritiesनुसार बदलत असले पाहिजे! लहानपणी हीच स्वत:ची गोष्ट, “माझी स्वत:चीssय!!” असं नविन आणलेलं खेळणं, बाहुली कवटाळत बसलेले तुम्ही, असं चित्र येतं का डोळ्यांसमोर? Well…मी बाहुली काही खेळायचो नाही (त्यावेळी ते वय नव्हतं!!:-०), मात्र G.I.Joe ची माणसं मात्र खेळायचो! मग आम्हा दोन मित्रांकडे एकच Quick-kick (G.I.Joe मधले एक पात्र) असला तरी माझा Quick-kick तुझ्यापेक्षा किती वेगळा आहे, हे दाखवण्याची चढाओढ असायचीच असायची! निर्जीव वस्तूंसाठी एकवेळ हे मान्य करता येईल; पण सजीव वस्तूंसाठीतरी (यात देश-प्रदेश पण आला; कारण ती फक्त जमीन नसते!!) ही चढाओढ नको! विषय जरा भरकटला…पण हरकत नाही; हे सारं बोलायला तर मिळालं मला!

  खरं तर discussion सुरू झालं ते ‘मेळघाटला वाघांचे फोटोज मिळाले नाहीत’ या विषयावरून…नि ते वळलं, ते photography करताना मी मुकलेल्या क्षणांवर. मी कॅमेऱ्याच्या view finder मधे डोळा घालून कितीतरीदा समोर जिवंत दिसणारी गोष्ट digitally का पाहतो? हे असे मौल्यवान क्षण का वाया घालवतो? हे समोर आलेले काही प्रश्न. यांचं मूळ कुठंय तर, जोपर्यंत मी फोटोज दाखवणार नाही, तोपर्यंत लोकांना पटणार नाही की, मी वाघ पाहिला हे! याचाच अर्थ स्वत:चं photos collection वाढवण्यासाठी हा खटाटोप! Well…इतकं साधं-सोप्पं नसेल…पण मग wildlife photography ही photography as an art राहण्यापेक्षा ती timing आणि distance या दोन गोष्टी विचारात घेऊन skillfully वापरलेली technique राहते फक्त! आणि असेही नाही की, मी वाघाचा फोटो काढून अख्ख्या जगाला जगबुडीपासून वाचवलं!! एकंदरीत काय, मी मेळघाटात वाघ बघितला नि फार खटाटोप करून का होईना, त्याचा फोटो मिळवला! व्वा, काय शौर्य!! याचा अर्थ photography करण्यात काही अर्थच नाही, असा नाही होत…याचा अर्थ असा होतो की, स्वत:च्या मेळघाटच्या tripच्या photos चा स्वत:चा album करण्यापेक्षा, आणि तो इतरांना दाखवून ही माझी मेळघाटची trip असं सांगण्यापेक्षा, अनुभव share करा! अनुभव हा काही capture करता येत नसतो! आणि तो मनात साठवताना, कोणत्या प्राण्याला किंवा वस्तूला इजा पोहोचत नाही आणि स्वत:ची व्यवस्थित जाहिरातही होते!

( हे असलं लिखान exclusively पंकज कोपर्डेच्या म्हणजे फक्त माझ्याच ब्लॉगवर सापडेल!)

11.05.2010             

गुरुवार, ६ मे, २०१०

शून्य

ठरवलेलं असं काही आयुष्याच्या सुरूवातीला, किती खितपत तो चाललाय प्रवास
ज्याच्यासाठी घडलो नाही, त्याच्यासाठी जीव टाकत-धडपडत तो चाललाय प्रवास
ध्येयं नावाचे पतंग हवेत भिरकावयाचे असतात का? ते काटले जातात का?
एका शून्याकडून दुसऱ्या शून्याकडे, किती अभिमानाने तो चाललाय प्रवास!

०६.०५.२०१०

रविवार, २ मे, २०१०

गडगडाट

   दुपारीच गडगडू लागलं. झोपेतून उठलो; तसं आभाळ सोनेरी झालं होतं. गार वारा वाहत होता; झाडं त्यावर डोलत होती. मी खिडकीत उभा राहून एकटक तो सोहळा पाहत राहिलो…कुठेतरी पाऊस झाला होता नक्की. कुठे? इथेही झाला असेल. ओलेपणाचा एक विलक्षण गंध सर्वत्र भरून उरला होता. सुटसुटीत वाऱ्यावर डुलणारं पिवळं गवत; कुठेतरी काड्या-काड्या एकत्र बांधल्यासारखं वाटत होतं. डुलत होतं. मी डोळे चोळले. खिडकीतच अडकवलेल्या आरशात डोळे खोलवर पाहून घेतले. नुकताच एका असंबध्द स्वप्नातून उठलो होतो. खराच जागा झालोय ना; हे तपासून घेतलं. वातावरण छानच जमलं होतं. अशा वातावरणात ऐकलेली गाणी किंवा केलेली कुठलीही गोष्ट मनात आतवर कुठेतरी उमटत जाते…वातावरणच इतकं गडद असतं. हलकं, सहज वाऱ्यावर उडून जाईल असं काहीसं उरत नाही; सर्व काही बरसलेल्या थेंबांमुळे जडावलेलं नि विसावलेलं…
   मी खिडकी पुर्ण उघडून टेबल-खुर्चीवर बसलो. समोर लॅपटॉप. त्याला जवळ खेचून, स्क्रीन पुरेशी वाकवून मी माझं पुर्वीचं एक ललित त्यात टाईप करू लागलो…ते पुर्वीचं ललित आतमधे भिनू लागलं अक्षरश:! वाक्या-वाक्याचा अर्थ भिडू लागला हृद्याला! अशा गोष्टी सहसा होत नाहीत. एकदा लिखान झालं की, कागदावर साकारलेली कल्पना लेखकासाठी नवी रहात नाही. ती तशी जुनीही होत नाही; कारण एक कल्पना मांडताना तिचे इतर अब्जावधी भाऊ-बंध आपसूकच डोकावू लागलेले असतात. मग हे सगळं असं असताना, ते माझं पुर्वीचं लिखान माझं मलाच आतवर भिडू लागलं; याचं नवल वाटतं मला! त्यात मी भरही टाकली; याचंही आश्चर्य वाटलं. एकदा लिहीलं की संपलं; अशी माझी सवय; मग ते परिच्छेदापुरतं असू देत, नाहीतर मग लांबलचक वीसेक पानी कथा असू देत. ते जेवढं सुचलं – जसं सुचलं – तसं ते तितकंच – तेवढंच. जास्त नाही – कमी नाही. आता माझी ही सवय कितपत चूक – बरोबर हा वादाचाच मुद्दा आहे तसा; पण एक मात्र नक्की, एकदा का मी पानांवर शाई फरफटली की नंतर घडणाऱ्या चित्रात विचार करूनही मला मोठा असा काही बदल घडवता येत नाही. उगीच बारीक-सारीक वाक्यं, संवाद टाकू शकतो तेवढेच! पण या ललित लेखनात मी टाकलेली भर अगदी आपसूक, अल्लदपणे, कुठेही ताळतंत्र न सोडता हळूवार पडली. कुठेच आवाज झाला नाही. रूईच्या बिया जशा शांतपणे उडत उडत वारा थांबेल तिथे उतरतात ना; तशी!
हे बरंच झालं. संध्याकाळचे पाच वाजलेले. पावसाचा काही पत्ता नाही. वाटलं, कॅफेटेरियात जाऊन वाट बघत बसू; कधी येतोय त्याची. तसा कॅफेटेरियात गेलो. ललित लेखांची वही घेऊनच गेलो बरोबर. कॉफीच्या घोटागणिक एकेक लेख मी स्वत:शीच वाचत् राहिलो. लिखानाला एक अनोखा गंध असतो, चव असते, आवाज असतो. कित्तीतरी वर्णनं आजूबाजूच्या परिसराची असतात; पण हे गुपित केवळ लेखकालाच माहिती असतं. वाचणारे सगळेच, स्वत:च्याच कल्पनाशक्तीने त्या-त्या वर्णनांची स्थळे निर्माण करतात! या माझ्या लेखांमधे आयुष्यात डोकावणाऱ्या कित्येक व्यक्तींच्या गड्डद आठवणी आहेत; मी खरंच हे पुर्वी इतक्या बारकाईनं पुन:पुन्हा वाचलं नव्हतं!
   कॉफी संपली. सव्वासहा वाजून गेले. पाऊस आला नाही. मग म्हटलं, आता पुन्हा लॅपटॉपसमोर ठाण मांडावी नि उरलेलं टाईपिंग करत बसावं. रूमवर परतून ते काम तेवढं सुरू केलं…मी टाईपिंगमधे एवढा गुंग झालो की अंधार कधी झाला कळलंच नाही…लख़लख प्रकाश आणि मग प्रचंड गडगडाट, असाच सगळा खेळ सुरू झाला. हे सगळं भयावह नव्हतं वाटतं, ते सगळं हवंहवंसं वाटू लागलं होतं मला. माझ्या कामाला या वातावरणामुळे गती मिळाली; म्हणून असेल कदाचित. पावसात थोडाफार भिजत रात्रीचं जेवणही करून आलो नि पुन्हा लिहीत बसलो.
   कसलं हे पावसाचं वेड? रात्रीचे दोन वाजताहेत…मी खिडकीपाशी उभाय. हा अंधार नि ते वातावरण फिक्कट होऊ नये, असंच वाटतंय…डोळ्यांसमोरून झुडूपांत शिरलेला वाघ जोपर्यंत पुर्णत: नजरेआड होत नाही; तोपर्यंत त्याला अप्रूपाने पाहत रहावं…असं वाटतंय. पाऊस थांबलाय. अंधारात दूरवर एकट्याच उभ्या असलेल्या स्ट्रीट-लॅम्पच्या प्रकाशात पावसाची काहीच हालचाल दिसत नाहीये…गार वारा वाहतोय…पावसाने कित्तीतरी आवाजांना जन्म दिलाय, आजूबाजूला ‘हे सगळं वातावरण साठवून ठेवता आलं पाहिजे; म्हणजे हवं तेव्हा वापरता येईल’ असा एक स्वार्थी विचार जन्माला आलाय आणि प्रबळ होत चाललाय…
२.०५.२०१०