रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

Vögel-beobachten

मी आणि ऑस्कर पायात आलेल्या एका बेडकाच्या पिल्लाच्या निरीक्षणात गुंतलेलो असतानाच जोरातधाsधाsधाsअसे तीन एकापाठोपाठ आवाज आले. मी चमकून वर पाहिलं. जंगलात त्या आवाजाने फारसा फरक पडलेला दिसला नाही, बदकांचा एक थवा डोक्यावरून जीव मुठीत धरून उडताना तेवढा दिसला. ऑस्करला तो आवाज ऐकू आला की नाही माहिती नाही, पण त्याच्या तोंडावरच्या रेषा किंचीतश्याही हलल्या नाहीत. जर्मन लोकांना सवयच असते का अशी सतत स्थितप्रज्ञ राहण्याची? विचार क्षणभर, मनभर झाला. पण मी त्याला विचारलंच, “Was that a gunshot we just heard?” बहुतेक हा विचार त्याच्या ध्यानीमनीही नसावा. तो म्हटला, “I don’t think so” आणि आम्ही त्या बेडकाच्या पिल्लाला गोंजारत राहिलो. ते बिचारं घाबरून गारठलं होतं. त्याला त्याच्या भयातून मुक्त करून आम्ही दोघेही परत ओलसर गवत तुडवत नकळतश्या दिसणाऱ्या पायवाटेवरून चालू लागलो.


माझ्या गळ्यात दुर्बिण नि ऑस्करच्या हातात एक ‘Birds of Europe’ नावाचं पुस्तक. बर्लिन पासून थोड्या अंतरावर असलेलं पिट्झ. ऑस्करची आजी राहते तिथे. ऑस्कर कोण? Long story, short – माझा बर्लिनमधेच दोन-चार दिवसांत झालेला मित्र. तो युरोपातील जंगली रेड्यांच्या उत्क्रांतीवर आणि ते युरोपात कोणत्या मार्गाने आले, याचा सखोल अभ्यास करतो. माझ्यासारखाच PhD student आणि त्यातही पक्षी-निरीक्षणाची आवड, त्यामुळे आमचं सूत जुळायला वेळ नाही लागला. बर्लिनमधे जायचं खरं निमित्त म्हणजे वन्यजीवांसंदर्भातली एक विज्ञान-परिषद. वन्यजीवांवर अभ्यास करणारी टाळकी (अर्थात हुशार टाळकी) एकत्र येणार नि चर्चा करणार. भारतातून आलेल्या मोजक्या चार व्यक्तींपैकी मी एक. तीन-चार दिवस सतत वन्यजीव विज्ञानावरती मतं मांडली, चर्चा केली आणि त्यातच काही मित्र भेटले. जर्मनीतली एक वाईल्ड-लाईफ आर्टिस्ट क्लॉडिया हान्स मी भारतातून आलोय म्हटल्यावर मला तिची वाघाची निवडक पेंटिंग्ज दाखवू लागली. ती म्हणे की तिचा कुणी मित्र भारतात जातो, कान्हा किंवा जिम कॉर्बेटला. तिथे जाऊन वाघांचे फोटो काढतो. मग त्या फोटोंवरून ही पेंटिंग्ज़ बनवते. आपल्या वाघांची किर्ती जगभर एवढी पसरलीय हे ऐकून छान वाटलं. भारतात वाघांबद्दल भारतीत नेत्यांना किती प्रेम आहे याबद्दल बोललेलंच बरं. मी जगातल्या दुर्मिळातल्या दुर्मिळ घुबडाचा अभ्यास करतो असं ऐकल्यावर तर तिनं स्वत:हून तिचं एक मोठ्ठं घुबडाचं पेंटिंग मला लागलीच गिफ़्ट म्हणून दिलं. पन्नास युरो म्हणजे किती होतात? तेव्ह्ढं! परिषद संपली त्याच्या पुढच्याच दिवशी मी बर्लिनच्या पुरातन नॅचरल हिस्टरी म्युझिअममधे काही अमेरिकन, मादागास्कन नि युरोपिअन घुबडांचा अभ्यास करायला गेलो. बिचारं ते म्युझिअम अजूनही दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणीत जगत आहे. त्याच्या भिंतींवर गोळीबाराचे निशाण अजूनही ताजे आहेत आणि तसेच जर्मन लोकांच्या मनावरही. हसणारी, वेळेवर जगणारी जर्मन लोकं एवढी दिलदार निघतील असं अपेक्षित नव्हतं मला, पण ऑस्कर ने पुढल्याच दिवशी पक्षी-निरीक्षणाला घेऊन जायचा आग्रह धरला नि मी सकाळी आठला पाच मिनिटं कमी असतानाच Tier Parkच्या समोर येऊन उभा राहिलो. ऑस्कर आठला एक मिनीट कमी असताना पोहोचला! Germans are always on time!
“This is the real Peitz” ऑस्कर उद्विग्नतेने म्हणाला.
आम्ही बर्लिनच्या बाहेर पडलो तसा तो मला त्या प्रदेशाचा भूजैविक इतिहास सांगू लागला. माझे कान त्याच्या बोलण्याकडे, डोळे ट्रेनमागे पळणाऱ्या झाडांकडे नि तोंडातून “Ok”, “I see”, “That is so interesting” असे शब्द काही सेकंदांच्या अंतराने पुन:पुन्हा येत राहिले. पिट्झला पोहोचायला आम्हाला तासभर लागला असेल. अगदीच छोटं स्टेशन. तिथे ट्रेन थांबली. ट्रेन-ड्रायव्हर उतरला. त्यांनं त्याच्याजवळच्या चावीने तिथल्या प्लॅटफॉर्मचं छोटंसं फाटक उघडलं नि तो परत त्याच्या कामावर रूजू झाला. आम्ही रस्त्याने चालू लागलो नि आजूबाजूला येणारे आवाज, गंध साठवत त्यातनं काही ओळखीचं दिसतंय का ते बघू लागलो. दोनेक किलोमीटर्सवर थर्मल पॉवर स्टेशनच्या चार-पाच अवाढव्य चिमण्या दिसल्या. ऑस्कर पडलेल्या चेहऱ्याने म्हटला, “That is the real Peitz”. त्याची उद्विग्नता समजण्यासारखी होती, पण जगण्यासाठी वीज लागतेच, मग ती तयार करायला हे सगळं होणारंच. आम्ही एक पायवाट धरली ती तळ्यांकाठावरून उंचच उंच झाडांच्या जंगलात घुसत होती. एक बेडकाचं पिल्लू पायापाशी आलं नि त्याला पकडायला आम्ही दोघे खाली वाकलो तेवढ्यात धाsधाsधाsअसे तीन एकापाठोपाठ आवाज आले! आवाजाचं कारण अज्ञातच राहिलं.  
त्या आवाजांना पाठीशी टाकत आम्ही पुढे निघालो. ती वाट फार सुंदर होती. एक नाजूकशी पायवाट नि तिच्या दोहोबाजूंना लांबपर्यंत पसरलेली तळी. पिट्झमधल्या लोकांच्या उपजीविकेचं साधन म्हणजे मासेमारी, त्यामुळे ती सुंदर तळी. एके ठिकाणी झाडावर पक्ष्यांची बरीच गडबड दिसली. बारकाईनं पाहिल्यावर Great Spotted Woodpecker ची जोडी दिसली. सुतारपक्षी बघण्यात जी मजा आहे ना ती त्यांना पाहिल्याशिवाय समजणार नाही. ते स्वत:मधेच मग्न असतात. ते नि ते ज्या झाडाच्या खोडावर बसलेत ते खोड. फक्त नजरानजर; बाकी त्यांना कुणीच नकोसं असतं. ते खारूताईसारखे खोडावर झटक्यात इकडे-तिकडे वळतात. आपण एखाद्या दुरच्या पाहुण्यांच्या दारावर प्रथम कसं साशंकपणाने टक़-टक़ करतो तसं ते प्रत्येक वेळी करतात, मग खोडाखाली खाद्य आहे हे कळलं की मग त्यांचा खोड कातरण्याचा कारखाना सुरू होतो. ही जर्मन जोडीही अशीच खोडावर नजर टेकवून राहिली नि परतधाsधाsधाsधाsअसे चार एकापाठोपाठ आवाज आले, त्या धांदलीत नाहीशी झाली.

जंगल एकदमच मेल्यासारखं शांत झालं. एक भलामोठा White-tailed Eagle उंच आकाशात घिरट्या घालताना दिसला. काहीतरी चुकत होतं. जर्मनी परत युद्धावर तर नाही चाललेलं ना? अशी एक शंकेची पाल चुकचुकली. ऑस्करपण गोंधळला होता. त्याला म्हटलं, इथं हंटर्स किंवा पोचर्स असतील तर आपण इथून आताच काढता पाय घेऊ. एवढं लांब येऊन एखाद्याची गोळी खाऊन मरण्यात काय अर्थय? ऑस्करला मात्र माझं म्हणणं काही केल्या पटत नव्हतं. त्याला मी हेही सांगितलं की मी यापुर्वीही भारतात जंगलात बंदुकीतून बार टाकण्याचे आवाज ऐकलेत. ते आवाज माझ्या परिचयाचे आहेत. आम्ही तळ्याकाठी बसून विचार करू लागलो तेवढ्यात एक बोट लांबून आमच्याच दिशेने येताना दिसली. मी दुर्बिणीतून पाहिलं तर चार लोकंतिघांकडे लांबड्या (बहुधा डबल बार) बंदुका नि अंगावर सैनिकांसारखा कॅमोफ्लॉजिक गणवेश. १००% शिकारी नाहीतर मग रशियन आर्मी! सांगायचं राहून गेलंपिट्झ ईस्टर्नमोस्ट जर्मनीमधे आहे, पोलंडला लागून. आम्ही त्यांची वाट पाहत थांबून राहिलो. ते जवळ पोहोचताच जर्मन भाषेत जोरजोरात ओरडू लागले. मला काहीच कळत नव्हतं, फक्त समजत होतं की आम्ही फार अडचणीत सापडलोय. ऑस्करला काही सुचना देऊन ती बोट तळ्याच्या मध्याकडे परतू लागली. ऑस्कर माझ्याकडे वळून म्हणाला, “We are in the middle of a hunting ground. They have asked us to leave immediately.” म्हणजे गोळ्या दोन्ही तळ्यांतून चालत होत्या पक्ष्यांवर नि आम्ही दुर्बिणीतून पक्षी बघत, बेडकांना गोंजारत, चाललो होतो गोळीबाराच्या बरोबर मध्यभागातून! जर्मन रियुनिअन डे ( ऑक्टोबर) च्या निमित्ताने पिट्झमधे दरवर्षी `बिग हंटिंग डे असतो. त्यादिवशी सगळेचजण पाणथळी पक्ष्यांना बंदुकीने टिपतात नि मग रात्री सगळं गाव त्या पक्ष्यांना शिजवून वेगवेगळे पदार्थ बनवून एकमेकांना वाटतं.

पछाडलेल्या जंगलातली रम्य पायवाट!
 मी नि ऑस्करने एकमेकांकडे बघितलं. Future wildlife conservationists in the middle of a hunting ground, enjoying bird-watching; that surely sounds absurd! आम्ही त्या पछाडलेल्या जंगलातून बाहेर पडलो. कोपऱ्यावर चार-पाच हंटर्स नि एक पिक-अप ट्रक दिसला. ट्रकमधे तेरा Mallard, दोन Greylag Goose, काही पाण-कोंबड्या दिसल्या. मन हळहळलं. ऑस्करच्या मनातून हंटर्सबद्दल राग तर होताच, पण त्याला त्याहून वाईट याचंच वाटत होतं की तो मला काय दाखवायला घेऊन आला नि आम्हाला काय बघायला मिळालं. तेवढ्यात Mute Swan चा एक थवा त्यांच्या अवाढव्य नि बलाढ्य पंखांचा थाड..थाड आवाज करत आमच्या डोक्यावरून एका तळ्यातून दुसऱ्या तळ्याकडे झेपावला. आता यातला एखादातरी पक्षी धारातिर्थी पडणार अशी अपेक्षा करत मी गप्पा मारत, खांद्यावर बंदुक घेऊन उभ्या असलेल्या हंटर्सकडे पाहिलं. थवा बंदुकीच्या निशाण्यापल्याड गेला तरी कुणी काही केलं नाही. मी ऑस्करकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिलं तसं तो म्हणाला, “Killing a Mute Swan is illegal in Germany”. मी मोकळा श्वास घेतला, त्या सुंदर थव्याकडे पाहत राहिलो. हंटर्ससाठी दिवस संपला होता. सगळेजण कोणी किती पक्षी मारले याची गणती करत, हास्य-विनोदात रममाण झाले होते. सुर्याची किरणे तळ्यावरती पडली होती, तळी चमकदार दिसत होती नि त्या पछाडलेल्या जंगलात दूरवर परत सुतारपक्ष्यांची नाजूक पण साशंक टक-टक ऐकू येऊ लागली होती.
पंकज कोपर्डे (२८ डिसेंबर २०१६)
First appeared in Snehadeep January 2017