मंगळवार, २७ एप्रिल, २०२१

मिटींगा

मिटींगा असतात. सगळ्यांनाच असतात. काहींना लागतात, तर काही जण लावतात. प्रत्येक मिटींगला स्वत:चा आकार, प्रकार, रंग-रूप, ढंग असतो. काही लाजऱ्या-बुजऱ्या, नवख्या, तर काही रटाळ, बोरिंग, खमक्या असतात. काही मिटींग्ज मनाला हुरहुर लावून जातात, तर काही पिच्छा सोडता सोडत नाहीत. काही गोड, मधाळ, स्वीट; तर असतात काही आंबट, कडवट, तिखट. मिटींगा या मिटींगा असतात, त्यांच्याविषयी वाद घालायला नसतो स्कोप तसा.

मिटींगांची उत्क्रांती कशी झाली असेल? अशीच चार टाळकी बसली असतील काहीतरी गप्पा-टप्पा मारत शेकोटीभोवती आणि सरतेशेवटी आग विझवून गेली असतील घरी. गप्पांच्या किंवा हुक्क्याच्या नादात त्यांची लागली असेल तंद्री आणि घरी परत आल्यावर लागली असेल हुरहुर परत त्या टाळक्यांना भेटण्याची! म्हटले असतील चला भेटू पुन्हा आणि कालच्यासारखंच बसूयात! त्यांना वाटलं असेल की एवढा वेळ बोलूनही वेळ वाया गेला असं वाटत नाही, उलट काहीतरी महत्त्वाचं मोठ्ठं केल्यासारखं वाटतं. डोपामाईन पळलं असेल शरीरभर आणि मनातून एक आनंदाची लहर गेली असेल; मग म्हटले असतील हे जे काही होतंय त्याला नाव देऊ एक आणि दररोज करत बसू हा खेळ.

बरं ही एक असू शकते गोष्ट किंवा मग काय झालं असेल की एखाद्य़ा व्यक्तीला इतरांकडून करून घ्यायची असतील कामं आणि चारचौघांत बोललं की मनाच्या नाही पण जनाच्या शरमेने तरी ती व्यक्ती काम करेल म्हणून बसवली असेल ती मिटींग. निर्लज्जांना तसा काही फरक पडत नाही, आणि त्यांची प्रजाही बहुधा या मिटींग्जमुळे वाढीस लागली असेल. आपण काय घरी बसून नुस्ता तर्क लावू शकतो. मिटींग्जचं evolution साधं सोप्पं नाही. कधी कधी मिटींग्जमध्ये पंधरा-तीस-पन्नास लोक मिळून आपापले दिवसाचे सहा तास (म्हणजे सगळ्यांचे ३०० तास) निवांत वाया घालवतात आणि त्या सहा तासांत किडूक-मिडूक ञान मिळवतात. कुणाच्या पोटातून गर्रर्र असा आवाज येत राहतो, कुणी आळसवटून झोपायला येतो, काही लोकं मनातल्या आणि पोटातल्या युद्धांना दाबून ठेवतात, तर कैक ठिकाणी होतो विस्फोट! काही मिटींगा चालत राहतात; त्यांना काळ-वेळ, तहान-भूक, जगाची पर्वा असलं काही नसतं. ‘येस सर’, ‘सॉरी सर’, ‘येस मॅडम’, ‘ओक, ऑन ईट’ असल्या keywords ची density या मिटींगांमध्ये भरभरून असते. मिटींगांमुळे जगात वेगवेगळ्या आणि विचित्र स्वभावाची लोकं भरीस आली आहेत हे मात्र नक्की. काही लोकं लहानपणापासूनच, तिसरी-चौथीपासूनच, लाळ घोटायला शिकतात. घरच्या मिटींग्जमध्ये ती पोरं भाव खाऊन जातात. काही लोकं डेटावर फोकस करतात आणि कुणी काही बोललं की त्या निर्जीव आकड्यांचा आधार घेतात, P value बद्दल बोलतात, आलेख दाखवतात आणि error bars कडे सगळ्यांचं लक्ष वेधतात. या लोकांना आपसूकच मिटींगांमध्ये वाळीत टाकलं जातं, कारण आकडे बऱ्याचजणांना समजत नाहीत आणि आकडे खरं बोलतात. काही मंडळी presentation वर भर देतात, लागलंच तर बाहेरून पैसे देऊन पीपीट्या बनवून आणतात. भारदस्त शब्द वापरतात आणि सगळीकडून नन्नाचा पाढा काढून टाकतात. मुर्ख म्हणायचं असेल तर unintelligent म्हणतात. तो शब्द म्हणताना पतंगाच्या अळीसारखी लालचुटूक ओठांची वळवळ करतात.

मागच्या काही वर्षांत स्वत:च्याच laptop screen कडे बघत तोंड हसरं ठेवत मिटींगा चालत राहतात. उघड्यावर शेकोटीभोवती ते स्वत:च्या घरात AC मधे बसून असा हा मिटींगांचा प्रवास फारच उल्लेखनीय आहे. पुर्वीही लोकं चड्ड्यांवरती बसायची मिटींगांमध्ये आताही बसतात, अंगावरती कोट अडकवून. कोटातली माणसं तोंडाला पावडर लावून खुर्ची गरम करत तासनतास बसून राहतात. AC असला म्हणून काय झालं? पायाला डास चावतात, कधी एखादी मुंगी अनामिक पण अतिगरजेच्या ठिकाणी जाते चावून आणि नकळत त्या वेदनेची चाहूल लागते बावरलेल्या मनाला, तोंडावरचं हसू मात्र ढळत नाही आणि मनातले आसू काही केल्या जात नाही. कॅमेऱ्यापुढून डोकं हललं की लॅपटॉप बोंबलतो, ‘चोर, चोर! मिटींग टाळून पळतोय हा, पकडा त्याला!’ अशावेळी ढगाळलेलं ब्लॅडर आणि भरून आलेलं लिव्हर, दोघांचा लेव्हर, मित्रा तू सावर!

मिटींग कोण बोलवतं आणि कोण त्यात बोलतं यावर तिचं कॅरॅक्टर ठरतं. काहीं चारित्र्यहीन असतात, त्यांचात शिव्याशब्दांचा असतो गदारोळ, बाचाबाची, आणि हाणामारी. काही मिटींगांमध्ये बोलणारं एकच तोंड असतं, ते सुरू होतं आणि मग तासाभराचं रेताळ वाळवंट आणि मग ते बंद होतं. जांभया देत केस विस्कटलेलं सुटाबुटातले लोकं motivate होऊन मुतारीकडे गर्दी करताना दिसतात. मग पुढच्या सेशनमध्ये तेच. तोंड चालू, अथांग समुद्र आणि तुमचं विमान त्या समुद्राला समांतर उडत चाललंय तासभर, मग तोंड बंद. सुरकुतलेल्या तोंडांची आणि सुटलेल्या पोटांची सुटाबुटातली लोकं स्मोकिंग झोनकडे गर्दी करतात. या मिटींगांना ऋतू नसतात, त्यांना फुलं म्हणजे काय नसतात माहिती, त्यांना लाली नसते, सगळं असतं टाईट, कपडे, वातावरण, फिगरी, भाषा, पीपीट्या!  

मिटींगा सगळ्याच आपला विश्वासघात नाही करत. काही दोघांपुरत्याच मर्यादित असतात त्यामध्ये वेळ स्तब्ध होते आणि हळूवार गाणी घुमतात कानांत. तिचे हळूवार भुरभुरणारे केस आणि ती बोललेले सारे गंधाळलेले शब्द यांचं एक अलग मिश्रण तयार होऊन हवेत पसरत जातं. ती दहा मिनीटांतच निघून जाते, पण ती मिटींग आपल्या मनात दिवस-रात्र लूपमधे चालू राहते. डोपामाईन सुटतं सुसाट आणि नदी होते शरीराची बेफ़ाम! अशा काही मिटींगा असाव्यात आपल्या आयुष्यांत, वाटतं ज्या थेंब थेंब स्वत:लाच आयुष्यभर पुरवाव्यात! अशा काही मिटींगा घडाव्यात आयुष्यांत की वाटावं मी न उरलो माझ्यात!

पंकज | २७ एप्रिल २०२१ 

शनिवार, २४ एप्रिल, २०२१

बंडाना

आपण काय कपडे घालतो यावरून आपली एकंदरीत personality कळते असं म्हणतात. आता या विधानाला कित्येक लोक विरोध करतील आणि “वेश असावा बावळा” बगैरे म्हणतील; तर ते ठीकंय; समजलं. पण पुढे जाऊन तुम्हाला हे कधी लक्षात आलंय का की काही कपडे हे मुळात घालायच्या लायकीचे नसतात. काही कपडे घातले तर तुम्हाला uncomfortable feel होतं तर काहीवेळा इतर लोकांना अस्वस्थ व्ह्यायला होतं. जीर्ण आणि उदार आयुष्य लाभलेल्या कित्येक जिन्सांनी स्वत:ची छाती फाडून मालकाचे गुडघे आणि पोटऱ्या दाखवल्याची उदाहरणं तर कित्तीतरी सापडतात आधुनिक साहित्यात.

काही कपड्यांना स्वत्व असतं, काहींमधे असते नजाकत, काही मायाळूच असतात जन्मत:, तर असतात बंडखोर काही! बंडाना हा बंडखोरीचा उत्तम नमुना आहे. “Ma Life, Ma Rulz” असं म्हणत किंवा मी काहीही करेन, जग गेलं तेल लावत, असे नारे देत तो बंडाना डोक्यावर राजमुकुटासारखा आसनस्थ दिसतो. बंडाना हे हवं तसं सोप्पं कापड नाही. त्याचा वापर आणि उपयोग कुठे, कसा आणि कोण करेल याची यादी जर बनवली तर नक्कीच १०१ excel cells भरतील. त्या वापरांचे मग आपण परत categorization करून त्यांना thematic colors देण्यात वगैरे वेळ वाया घालवत बसू ही generic गोष्ट; पण presentation वरच जग मरतं हे सिद्ध झालंय! बंडाना या stereotypes ना आव्हान देऊन बेशक आपलं स्थान टिकवून आहे.

तुमच्या कंपनीच्या टीम्समधे बघा…assets असतात. त्यातले काही लय भारी काही असेच असतात. लय भारी human resources मधे दोन प्रकार मोडतात: गाढवकाम करणारे प्रामाणिक कुत्रे आणि जे सांगू त्या कामावर लगेच solutions काढणारे retriever टाईपचे कुत्रे. पहिल्या प्रकारातली लोकं अति specialized, sincere, hard-worker आणि दुसऱ्या प्रकारातली लोकं highly motivated, risk taker, problem solver, multi-tasker वगैरे अशा self attested पदव्या त्यांच्या resume च्या tagline मध्ये टाकतात. तर बंडाना हा दुसऱ्या प्रकारात मोडणारा. आणि साडी, कुडता, झब्बा, फॉर्मल शर्ट, ट्राऊझर, वगैरे हे पहिल्या प्रकारातले. दुसऱ्या प्रकारातले लोकं risk taker असल्यामुळे जॉईन झाल्यानंतर दोन-चार दिवसांतच कंपनी सोडूनही जातात आणि कुणाला पत्ताही लागत नाही!

बंडान्याची नाटकं नसतात. या रंगावर हाच बरा, अशीच घडी हवी, तोंडावर मास्क म्हणूनच हवा, डोक्यावर बेल्ट म्हणूनच हवा, खिशात रूमाल म्हणूनच हवा, दुखल्या-खुपल्याला बॅण्डेज म्हणूनच हवा, थंडीत हातमोजा म्हणूनच हवा, किंवा वेळप्रसंगी (दारूच्या बाटल्या, माल, औषधं, केळी, इ.इ.) ठेवायला पिशवी म्हणूनच हवा, असं काही नसत्म त्याचं! जिथे त्याचा वापर शक्य तिथे तो उपयोगात येतो. भटके लोक, field workers, मजूर, आणि मातीत काम करणारे सारेच, bikers ही अशी निवडक मंडळी बंडान्याचे fans! यांच्याकडे एकाहून अधिक बंडाने मिळणारच! एकवेळ basic कपडे नसतील, पण बंडाना असणारच! त्यांचं खरं या एका कपड्याच्या तुकड्यावर जरा जीवच जडलेला असतो. तो कुठे हरवला तर त्यांना जे दु:ख होतं ते लिहीता नाही येणार. बंडाना बंडखोर आहे आणि तो वर्ण-जात-प्रदेशा-भाषावाद जाणत नाही. पोरं-पोरी दोघेही बंडान्याला स्वत:च्या कपाटात स्थान देतात. कधी काळी बंडान्याने लज्जारक्षण केल्याची उदाहरणेही काही लूटमारीचे बळी पडलेले सडाफटिंग बाईकर्स देतात. अशा बिकटप्रसंगी बंडाना हा कापडाचा निव्वळ तुकडा राहत नाही तर त्याला देवत्व प्राप्त होतं. बंडान्याच्या वापराची काही naughty उदाहरणे पण देता येतात, पण तेवढं प्रत्येकानं आपापल्या capacity प्रमाणे imagine करावं.

पहाडांमध्ये फिरायला गेलेले बुद्धीजीवी असोत किंवा आमच्यासारखे दूर जंगलांत पडलेले वन्यजीव संशोधक असोत, बंडाना नाही म्हणजे ती व्यक्ती त्या जगातलीच नाही अशी खात्री बाळगायला हरकत नाही. उगीच ओढणी आणि पल्लू आणि गमज्याची नाटकं न करता हा साधा एक बंडाना माणसाच्या जीवात जीव आणतो. बर्फ़ाळलेल्या पर्वतांकडे बघत आपण हातात गरम कॉफीचा मग घेऊन बसलेलो असतो, तेव्हाही मगचा चटका बसू नये म्हणून तो बंडानाच तेवढा कामी येतो. त्या इवल्याशा कापडाकडे बघून जाणवतं की मित्र किंवा मैत्रीण म्हणून हा आपली किती सोबत देतो. त्याला कुरवाळू वाटतं आणि त्याचा वास घेऊ वाटतो. त्या वासानं हातावर थोडे शहारेही उमटतात. जाणवतं की हा तर आपलाच वास. हा तर आपल्याच अंगाचा एक भाग. तो बंडाना, ते कापड, म्हणजे आपण आपल्याला दिलेली एक प्रेम-भेट!

बंडाना is love!

पंकज

२४ एप्रिल २०२१     
bandana


गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

काहूर

 

उचंबळणाऱ्या भावनांना

झेलणं असतं का सोप्पं?

काहूर माजलेल्या मनाला

करावं कसं गप्प?

 

किणकिण किंवा छणछण

बांगडी किंवा पैंजण

त्या आवाजांच्या अनुभुतीला

भूतकाळाचं कोंदण

 

तळव्यावरच्या रेघा

जुळता-जुळता राहिल्या

ऩ कर्दळीच्या बागा

बनल्या आठवणींच्या जागा

 

वास, चित्र आणि ध्वनि

किंवा तिचे नाव घेता कुणी

शांत झोपवलेल्या आठवणी

लगाबगा जमतात साऱ्याजणी

 

मग ठिणगी पडते मनात

अशी कधी एकटीच मोकाट

कसं सावरावं जीवाला?

रान जळतं मुकाट!

 

पंकज

२२ एप्रिल २०२१

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

पाल

 आमच्या घरात एक किंवा दोन पाली राहतात. पाल असं म्हटलं की ती आपसूकच feminine वाटते, पण बहुतेक या दोन पाली couple असाव्यात अशी शंका आहे मला. त्यातली एक जास्त पांढरट तर दुसरी भुरी-काळ्या रंगाची आहे. त्यांचा आकार मागच्या एका वर्षात बराच वाढलाय. पांढरीची शेपूटही तुटली होती मध्यंतरी आणि तिथे काही दिवसांनी एक गुलाबीसर कोंब आला आणि मग एक संपूर्ण शेपूट. या दोघीही आमच्या घरात कधी आल्या ते सांगता येत नाही, पण त्यांचं दर्शन होत असतं अधून-मधून. आमचं घर पाचव्या मजल्यावर आहे, आजूबाजूला झाडी आहे. गॅलरीतून सकाळी दोनशे मीटर दूरची नदी दिसते आणि पोपटांच्या आवाजानी किंवा दयाळाच्या शीळेने जाग येते. याचा पालींशी काय संबंध? लागेलच आपसूक.

आम्ही दोघेही नवरा-बायको पालीला घाबरतो. स्वत:च्या घरातूनच माझी human-wildlife conflict ची शिकवणी सुरू होते. माझी बायको तशी धीट, पण पालीपुढे तिचेही काही चालत नाही. पहाटेच्या वेळेस किंवा रात्री उशीरा, पाणी पिण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात यावं आणि या दोन पाली कुठेतरी तडमडणार आणि आम्हाला heart attack  येता-येता राहणार. ती पांढरी तर जमिनीवरच असते कुठेतरी – टाईल्सच्या रंगाना मिळता-जुळता रंग आहे तिचा आणि काळी ओट्यावर पडीक असते. त्या दोघींना त्यांच्या च्छदमावरणासाठीचा background चांगला शोधलाय. पण आम्हा दोघांनाही हे माहिती असल्यामुळे आम्ही आधीच सावध होऊन फिरतो असतो आमच्या घरात रात्री-अपरात्री. त्यांचं येण-जाणं आता मला चांगलंच कळलंय, बहुतेक त्यांनापण असंच वाटत असेल. आई म्हणते, एखादी असावी पाल घरात, लक्ष्मी असते ती. पण मला तरी या वाक्यातलं लॉजिक अजून कळलेलं नाही. लक्ष्मी नसेल, दुर्गा म्हणायचं असेल तिला – आमच्यासारख्या असूरांचा नाश करायला आल्यासारखी heart attack देऊन!



मला आता कळू लागलंय की या पालींच्या आयुष्यात वेळापत्रकाचं फार महत्त्व आहे. त्यांचं चालणं, माशा मारणं, कारण नसताना जमिनीवर चप्पकन पडणं, पाय फाकवून पळणं या गोष्टी त्यांच्यासाठी अतिमहत्त्वाच्या आहेत. ती त्यांची कोवळी किळसवाणी कातडी, न बोलता नुसतंच डोळे फाडून एकटक बघणं आणि आपल्याच अंगावर येतेय की काय, अशा रोखात पळणं या गोष्टी मात्र भयावह आहेत. या आमच्या काळ्या-पांढऱ्या पाली काही दिवस दिसल्या नाहीत तर मनात शंकेची पाल चुकचुकते. त्यांची ती विशिष्ट छोट्या शंकरपाळीसारखी काळी शी आणि तिच्यापुढे नजर लागू नये म्हणून लावलेली पांढरी बिंदी दिसली तरी जरा जीवात जीव येतो.

काहीतरी गडबड आहे असं वाटतं. आपला आता यांच्याशी कुठल्यातरी विचित्र अवस्थेत encounter होणार आहे असं जाणवतं. आणि हे असंच घडत. कोण्या एके दिवशी या दोघींपैकी एक अशीच कोंडीत पकडते आम्हा दोघांना आणि आमच्या दोघांचा थयथयाट होतो!

बऱ्याचदा काही दिवस घर बंद असलं आणि जेव्हा येऊन आम्ही पहिल्यांदाच आत पाऊल ठेवतो, त्यावेळी प्रत्येक पाऊल अतिशय सावधानतेने ठेवावं लागतं. नाहीतर पाय वाजवायचे, आवाज करायचा, हालचाल करायची आणि घरातल्या दुर्गांना सांगायचं की आलोय आम्ही, तुम्ही जा तुमच्या बिळांत किंवा बिळात, तुमचं काय relationship status आहे त्याप्रमाणे. पण अशा बिकट प्रसंगी मी generally हिलाच पुढं करतो.

मग एवढा जीव घाबरा होतो तर मग मारूनच टाकायचं ना त्यांना! तसं नाही ना होत. कोण मारणार त्यांना? तेवढं तरी धैर्य हवं ना! एक-दोनदा त्यांना घराबाहेर काढायचा प्रयत्न आम्ही करतो. आणि त्या घराबाहेर गेल्यावर एकदम विजयी मुद्रेने सोफ्यावर बसतो, पुढच्याच दिवशी त्यांची शी कुठल्यातरी unexpected ठिकाणी दिसते आणि लक्षात येतं की ही दुर्गा काय अशी तशी हे घर सोडणार नाही! एकदा शक्कल लढवून पेस्ट कंट्रोलवाल्याशी संगनमत करून त्यांच्या मारण्याची सोय केली. त्या युद्धात कित्येक झुरळं धारातिर्थी पडली पण पालींची शवं काही दिसली नाहीत. पुढच्या तीनेक महिन्यांत पालीच काय कुणीच घरात फिरकलं नाही आणि वाटलं की जिंकलं आपण आपलं घर भाड्याचं. पेस्ट कंट्रोलवाल्याने सहा माहिन्याची गॅरंटी दिलेली पण चौथ्या महिन्यातच पाली आमच्या घरात हजर. त्याच त्या दोघी – काळी, पांढरी. त्यापुढे मग तो अट्टाहास सोडला आणि म्हटलं जाऊ दे, कधीतरी थोडाफार आलेला stress चांगला असतो शरीराला. तामीळमधे दुधाला ‘पाल’ म्हणतात आणि दुधाच्या चहाला ‘पाल चाया’! मुद्दाम सांगितलं. करा imagine!

हे सगळं लिहायला तसं मला कारण लागत नाही, पण मघाशी फरशीवरून घसरून पडलो मी. वाटलं पाणी आहे, कळलं समोर पांढरीची वळवळणारी शेपूट आहे! मग काय किंळसकाळी! Heart attack नाही आला पण heart beats वाढल्या. सोफ्यावर येऊन बसलो आणि विचार करू लागलो, का या दोघी अशा? आमचं घर पाचव्या मजल्यावर, झाडांचे शेंडे गॅलरीला बिलगून, शेजारी नदी, किड्यांची भरमसाठ प्रजा. त्यांना खायला या पाली इथे सदानकदा. जरा बारकाईनं विचार केला तर कळेल की ज्या घरात किडे येतात, त्या घराचा परिसर जैवविविधतेने संपन्न आणि त्याचचं द्योतक म्हणजे ही घराची लक्ष्मी! घरात ही अशी लक्ष्मी नांदत असताना माणसं सोडून गेली तरी त्यांची घरं ही कधीच पोरकी होत नाहीत.

पंकज कोपर्डे

२१ एप्रिल २०२१

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

नकटा रावळा

दूर कोण्या देशी, रहायचा एक राक्षस. ओबडधोबड अंगाचा, कळकट्ट भक्षक. त्याला भूक लागली की तो जे दिसेल ते खायचा. हवा, पाणी, जीव-जंतू, माती; कुण्णी-कुण्णी नाही वाचायचं त्याच्यापासून. जे जे येईल समोर, ते ते जाई त्याच्या पोटात. तो गुहेत रहायचा. गुहा पण अशी मस्त हवेशीर नाही; तर दमट, वासट, अंधारलेली. त्याचा जन्म कधीचा, त्याचे आई-बाप कोण, कोण त्याचे नातेवाईक; कुणाचा कुणालाच संदर्भ नव्हता. त्याला समजू लागलं तेव्हापासून तो होता एकटाच.

या राक्षसाची जन्मकहाणी थोडी वेगळी होती. गुहेच्या अगदी तोंडाजवळच या राक्षसाचा जन्म झाला. जन्म होताच त्यानं ज्यावेळी डोळे उघडले तेव्हा त्यानं सर्वत्र प्रकाश पाहिला पण काही कळायच्या आतच एक अनामिक ताकद त्याच्या हाताला धरून त्याला गुहेबाहेर ओढू लागली. बाळ राक्षसानं प्रतिकार केला, झटापट केली; पण ती अनामिक ताकद होती राक्षसाला वरचढ. बाळ राक्षसाला वाटलं की जन्म होताच जीव गेला तर आयुष्याचं सार्थक होणार कसं? म्हणून त्यानं अंगातला राहिला साहिला जोर लावला आणि गुहेच्या तोंडाजवळचीच एक जून पण दणकट वेल गच्च पकडली. ती अनामिक ताकद बाळ राक्षसाला बाहेर ओढत होती, तर राक्षस त्या वेलीला नव्हता सोडत. अचानकच जोरात किंकाळण्याचा आवाज आला आणि त्या अनामिक ताकदीने अचानकच झटक्याने राक्षसाला सोडून दिले. त्या जोराच्या झटक्याने राक्षस वेल सोडून गुहेत अगदी आतवर जाउन पडला. तो पडताना त्याला इतका जबरदस्त मार लागला की त्याचे पाय तुटले, उरलं सुरलं शरीर एक म्हणायला म्हणून राहिलं तेव्हढं.

जन्मानंतर काही क्षणातच त्या राक्षसाने सगळी शक्ती गमावली आणि तो झाला स्थानबद्ध. चालता येत नाही, काही बोलता येत नाही, गाणं म्हणू म्हटलं तर ऐकायला कुणी नाही आणि हो…म्हणतापण येत नाही! त्या राक्षसाच्या अस्तित्वाला विशेष काही अर्थ नव्हता, पण त्याच्या भितीमुळे त्या गुहेतही शिरायला कुणाची हिंमत नाही झाली. ती गुहा रावळ्याची झाली. लोकांनी ठेवलंलं नाव. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल, पण या मायावी गोष्टी असतातच मुळात अशा.

रावळा आहे कसा? त्याची जन्मकथा? त्याचं खाद्य, त्याचं राहणीमान, त्याचं love life, अशा कित्येक गोष्टींचा शोध कित्येक संशोधक घेत राहिले, अजूनही घेताहेत. एकदा एक अमेरिकन संशोधकांची टीम पण येऊन गेली. त्यांनी एक डॉक्युमेंटरी बनवली, जी पाहून आपले काही लोकही रावळ्याला बघण्यासाठी गुहेपाशी गर्दी करू लागले. रावळ्याला या बदलेल्या जगाची काहीच कल्पना नव्हती. तो गुहेच्या तळाशी, अंधारात स्वत:च्याच विचारांत समृद्ध होत होता. शेवटी नव्याचे नऊ दिवस आणि ती गर्दीही ओसरली. कित्येक वर्षं होऊन गेली आणि जग रावळ्याला विसरून गेलं. गुहेच्या तोंडाजवळ रात्री नऊनंतर दारूड्यांचा अडडा जमू लागला. दारूच्या त्या वेडावणाऱ्या वासामुळे रावळ्या विरघळून जाऊ लागला. त्याच्या शरीरात बदल घडू लागले. त्याला पाय फुटताहेत की काय, असं वाटू लागले. त्या नुस्त्या वासाने त्याला गुहेच्या तोंडाकडे जाण्याची ओढ अनावर होऊ लागली.

आता राक्षसांच्या अंत:प्रेरणा माणसांना काय समजणार म्हणा? एके दिवशी अतीच झालं आणि रात्रीच्या त्या दारूच्या वासानं रावळ्याची ताकद उफाळून आली. तो उठला, मनातच, आता थांबत नाही म्हटला आणि अंगाला झटके देत, गुहेच्या भिंतींना फोडत, वेलींच्या जंजाळांना लिलया तोडत गुहेच्या तॊंडाकडे धावत सुटला. जसा त्याला गुहेचा प्रकाशाने उजळलेला किनारा दिसला तसा तो बोंबलत, छाती बडवत झेपावला. दारूचा वास अचानकच गायब झाला आणि जोरदार भुकंप होत रावळा अक्षरश: हवेत उडत दाण्ण़कन जमिनीवर आपटला. जमिन नव्हतीच ती, अनामिक शक्ती होती ती. रावळ्याच्या जन्मावेळी जिनं तिचा घात केलेला, तोच हात होता तो. रावळ्याने डोळे उघडले आणि स्वत:च्या क्षुद्रत्वाची जाणीव झाली त्याला. सगळंच अवाढव्य, सुबक, सजवलेलं जग होतं गुहेबाहेरच. रावळ्याला दोन बोटांच्या चिमटीत पकडून अगदी चोळामोळा करून त्याचा एक लाडवासारखा गोळा केला त्या अनामिक शक्तीच्या मालकाने आणि बेसीनमधे टाकून दिला त्याला.

रावळ्याला एका मेकूडाचं आयुष्य लाभलं! तो आकारानं भलामोठा असता तर नक्कीच म्हसोबा म्हणून खपला असता आणि आयुष्याचं सार्थक झालं असतं. पण एक मेकूड म्हणूनही त्यानं गाजवलेलं राज्य नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. रावळा गेला पण आजही रावळ्याचा दरारा घरभर आहे. रावळ्याच्या पाठीमागे त्याची बायको (आवळा), दोन पोरं (काळा, कावळा) आणि दोन पोरी (निळा, पिवळा) गुहेमध्येच राहतात असं ऐकण्यात आलंय. आता खरं-खोटं बोटालाच माहिती!

पंकज

२० एप्रिल २०२१

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

चुरगळा

 

…तर हा माणूस दररोज सकाळ-संध्याकाळ एकच अंडं खायचा. त्याच्यावरतीच त्याचा संसार चालायचा. फिक्कट निळा पुर्ण बाह्यांचा शर्ट आणि त्यावरती गर्द निळी पॅण्ट, असा साधारण त्याचा वेश, दररोज ठरलेला असायचा. कधी-मधी पांढरा शर्ट घालायचा, आय़ुष्यात विशेष काही बदलायचं नाही. लांबून बघितलं तर वाटायचं की रंजला-गांजलेला दिसतो बुवा, मनात मोठं दु:ख जगतोय; काहीतरी आतल्या आत खात असेल त्याला, म्हणून असा खंगल्यासारखा दिसतोय, एकाच अंड्यावर जगतोय. तो सरकारी किंवा बॅंक कर्मचारी नव्हता, लेखक किंवा कलाकार नव्हता; तो चतुर्थ श्रेणी कामगार नव्ह्ता की कुठल्या कंपनीचा मालक नव्हता. पण त्याचं एवढसं वर्णन सांगितलं तरी वाटायचं की या चार-पाच ओळखी असाव्यात त्याच्या. त्याच्या कामाशी तसा काही आपल्याला मतलब नाही. त्याचा वर्ण? कसा असावा वाटतं तुम्हाला? काळा, सावळा, गोरा? त्याची अंगकाठी? बारीक, मध्यम, स्थूल. त्याची उंची? ठेंगणा, मध्यम, उंच. त्याचे केस? त्याचे डोळे? त्याचं बोलणं? त्याचं जग?

तोडक्या-मोडक्या माहितीवरून एवढ्या लांबवरचा पल्ला गाठायचा म्हणजे सोप्पे काम नाही. म्हणून मग एखादा चालता-बोलता माणूस पकडायचा आपल्याच जगातला. जिवंत, मृत, किंवा आठवणीतला. आपलं मन, आपला मेंदू किती copy paste करत असेल याचा आपल्याला काहीच थांगपत्ता लागत नाही, generally. तर हा माणूस, जो फक्त एकच अंडं सकाळी आणि संध्याकाळी खायचा, काय असेल त्याची story? कुठे धडपडला असेल, कुठे ठेच लागली असेल, की नेहमीप्रमाणे मागल्या आयुष्यात चुकांचं सारवण घातलं असेल? जे सोयीस्कर, जे वाटतं मनाला छान, ते चिकटवावं आयुष्य आपण आपल्या कागदावरच्या व्यक्तीला.

मग असं सगळं खोटं-नाटं करून कशाला लिहीत बसायचं त्यावर? Timepass म्हणून? की स्वत:ला विचारांत झोकून देण्यासाठी? त्या गर्द गार समुद्रात विचारांच्या, असंख्य अशे अद्भुत आणि अनामिक तळ शोधण्यासाठी. मग हा एकच अंडं खाणारा माणूस का? तुमच्या-माझ्या पायातला surfing board म्हणून अशाच व्यक्ती उपयोगी पडतात. ते unexplored तळ शोधताना स्वत:चा श्वासही घुसमटतो आणि नकळत त्या लिखानाची नशा भिनत जाते शरीरात. मारलेल्या त्या लांबलचक सूरात, भेटतात अजून कित्येक लोक, प्रसंग, भावना, आणि शब्द. त्या दुर्गम भागात अन्नसाखळी असते आणि त्याचा आपणही असतो एक घटक. कधी त्या अन्नसाखळीच्या पिरॅमिडच्या टोकाला, कधी पायथ्याला, कधी सॅण्ड-विच्ड, तर कधी मृतजीवी म्हणून. कुठे का असेना, आपणही असतो एक भाग त्यांच्या जगाचा.

तर तो एकच अंडं खाणारा माणूस. या एका ओळीतून कीव व्यक्त होते का? की रहस्यमय कथा वाटते? असं पण वाटतं की मारलाय टोमणा. लिहीण्याची भाषा आणि व्यक्त होणारी भावना, यांचा ताळमेळ नाही जुळला की होतो तो हशा. आता तळ गाठून मी परतीचा प्रवास केलाय सुरू. त्याच त्या व्यक्तीला पकडून उलट्या दिशेने. त्याच्या भूतकाळात डोकावून पाहताना किती सुंदर गोष्टी दिसतात, पण आपण करायचा कानाडोळा. कारण आपल्या पांढऱ्या कागदावर ती व्यक्ती बनवायचीय नैराश्यमय. आपण त्या ओळींमधे पकडतोय का पात्रांची जगं? एवढ्या कमी अवधीत नसेलही शक्य, पण तो एकच अंडं खाणारा माणूस डोक्यात जसा बनलाय हाडामांसाचा तसाच उतरलाय का कागदावर याचं प्रामाणिक उत्तर सापडणं अशक्यच!

पंकज

१९ एप्रिल २०२१    

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

चित्र

पायरीवर बसलेली ती आकाशाकडे टक लावून बघते. कुणीतरी येणार. कोण असेल? कसे असेल? कधी येणार? शक्यता अगणित आणि तिच्या असंख्य विचारांना फुलपाखरांचे पंख; हात लावला की अद्रुश्य होणारे.

ती अशी बसलेली असताना तिच्या निळा बटांनी तिच्या वक्षस्थळावर जमवलेली वेलांटी आणि तिच्या कानातल्या पाखरांना गोंजारणारी हवा यामधेच आयुष्य जगता येतं का याचा केविलवाणा प्रयत्न करणारा वेळ.

ऊनाचा चटका डोळयाला असहय्य होऊन ती उठते आणि तिचा पाचूच्या रंगाचा पायघोळ झगा हातांनी सावरत दोन पायऱ्या खाली उतरते, जमिनीवर अवतरते.

सुस्कारात्या पायरीचा ज्यावर ती बसली होती. जिथे राणीचे पाय लागले ती पायरी सोन्याची झाली, इथे तर राणी किती वेळ बसून होती माझ्यावर म्हणून ती पायरीही गुलाबीसर झालेलीसोन्यावरती चढलेली लाली.

नोराहच्या इवलाल्या गिरकीत तिच्या बांगड्या किणकिणतात. तीन गिटारींच्या पाच तारा आळवतात, सितारीची एक रेघ उमटते, विजांचा कडकडाट होतो आणि एक अनामिक धून कळत-नकळत लवलवते. 

ती पुन्हा एकदा आकाशाकडे बघते. कसा ओळखावा तिच्या मनातला गुंता? बर्फाळलेले पर्वत समोर, फुलांचे गालिचे तळव्यांखाली आणि तिच्या झग्याभोवती गुंफलेला वेळ. अशा या चित्राला ना सुरूवात ना अंतआकाशातून अवतरणारी कल्पनांची पाखरं डोळ्यांसमोर फक्त!    

- पंकज । ९ एप्रिल २०२१