…तर हा माणूस दररोज सकाळ-संध्याकाळ एकच अंडं खायचा. त्याच्यावरतीच
त्याचा संसार चालायचा. फिक्कट निळा पुर्ण बाह्यांचा शर्ट आणि त्यावरती गर्द निळी पॅण्ट,
असा साधारण त्याचा वेश, दररोज ठरलेला असायचा. कधी-मधी पांढरा शर्ट घालायचा, आय़ुष्यात
विशेष काही बदलायचं नाही. लांबून बघितलं तर वाटायचं की रंजला-गांजलेला दिसतो बुवा,
मनात मोठं दु:ख जगतोय; काहीतरी आतल्या आत खात असेल त्याला, म्हणून असा खंगल्यासारखा
दिसतोय, एकाच अंड्यावर जगतोय. तो सरकारी किंवा बॅंक कर्मचारी नव्हता, लेखक किंवा कलाकार
नव्हता; तो चतुर्थ श्रेणी कामगार नव्ह्ता की कुठल्या कंपनीचा मालक नव्हता. पण त्याचं
एवढसं वर्णन सांगितलं तरी वाटायचं की या चार-पाच ओळखी असाव्यात त्याच्या. त्याच्या
कामाशी तसा काही आपल्याला मतलब नाही. त्याचा वर्ण? कसा असावा वाटतं तुम्हाला? काळा,
सावळा, गोरा? त्याची अंगकाठी? बारीक, मध्यम, स्थूल. त्याची उंची? ठेंगणा, मध्यम, उंच.
त्याचे केस? त्याचे डोळे? त्याचं बोलणं? त्याचं जग?
तोडक्या-मोडक्या माहितीवरून एवढ्या लांबवरचा पल्ला गाठायचा
म्हणजे सोप्पे काम नाही. म्हणून मग एखादा चालता-बोलता माणूस पकडायचा आपल्याच जगातला.
जिवंत, मृत, किंवा आठवणीतला. आपलं मन, आपला मेंदू किती copy paste करत असेल याचा आपल्याला
काहीच थांगपत्ता लागत नाही, generally. तर हा माणूस, जो फक्त एकच अंडं सकाळी आणि संध्याकाळी
खायचा, काय असेल त्याची story? कुठे धडपडला असेल, कुठे ठेच लागली असेल, की नेहमीप्रमाणे
मागल्या आयुष्यात चुकांचं सारवण घातलं असेल? जे सोयीस्कर, जे वाटतं मनाला छान, ते चिकटवावं
आयुष्य आपण आपल्या कागदावरच्या व्यक्तीला.
मग असं सगळं खोटं-नाटं करून कशाला लिहीत बसायचं त्यावर?
Timepass म्हणून? की स्वत:ला विचारांत झोकून देण्यासाठी? त्या गर्द गार समुद्रात विचारांच्या,
असंख्य अशे अद्भुत आणि अनामिक तळ शोधण्यासाठी. मग हा एकच अंडं खाणारा माणूस का? तुमच्या-माझ्या
पायातला surfing board म्हणून अशाच व्यक्ती उपयोगी पडतात. ते unexplored तळ शोधताना
स्वत:चा श्वासही घुसमटतो आणि नकळत त्या लिखानाची नशा भिनत जाते शरीरात. मारलेल्या त्या
लांबलचक सूरात, भेटतात अजून कित्येक लोक, प्रसंग, भावना, आणि शब्द. त्या दुर्गम भागात
अन्नसाखळी असते आणि त्याचा आपणही असतो एक घटक. कधी त्या अन्नसाखळीच्या पिरॅमिडच्या
टोकाला, कधी पायथ्याला, कधी सॅण्ड-विच्ड, तर कधी मृतजीवी म्हणून. कुठे का असेना, आपणही
असतो एक भाग त्यांच्या जगाचा.
तर तो एकच अंडं खाणारा माणूस. या एका ओळीतून कीव व्यक्त होते
का? की रहस्यमय कथा वाटते? असं पण वाटतं की मारलाय टोमणा. लिहीण्याची भाषा आणि व्यक्त
होणारी भावना, यांचा ताळमेळ नाही जुळला की होतो तो हशा. आता तळ गाठून मी परतीचा प्रवास
केलाय सुरू. त्याच त्या व्यक्तीला पकडून उलट्या दिशेने. त्याच्या भूतकाळात डोकावून
पाहताना किती सुंदर गोष्टी दिसतात, पण आपण करायचा कानाडोळा. कारण आपल्या पांढऱ्या कागदावर
ती व्यक्ती बनवायचीय नैराश्यमय. आपण त्या ओळींमधे पकडतोय का पात्रांची जगं? एवढ्या
कमी अवधीत नसेलही शक्य, पण तो एकच अंडं खाणारा माणूस डोक्यात जसा बनलाय हाडामांसाचा
तसाच उतरलाय का कागदावर याचं प्रामाणिक उत्तर सापडणं अशक्यच!
पंकज
१९ एप्रिल २०२१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा