मंगळवार, २० एप्रिल, २०२१

नकटा रावळा

दूर कोण्या देशी, रहायचा एक राक्षस. ओबडधोबड अंगाचा, कळकट्ट भक्षक. त्याला भूक लागली की तो जे दिसेल ते खायचा. हवा, पाणी, जीव-जंतू, माती; कुण्णी-कुण्णी नाही वाचायचं त्याच्यापासून. जे जे येईल समोर, ते ते जाई त्याच्या पोटात. तो गुहेत रहायचा. गुहा पण अशी मस्त हवेशीर नाही; तर दमट, वासट, अंधारलेली. त्याचा जन्म कधीचा, त्याचे आई-बाप कोण, कोण त्याचे नातेवाईक; कुणाचा कुणालाच संदर्भ नव्हता. त्याला समजू लागलं तेव्हापासून तो होता एकटाच.

या राक्षसाची जन्मकहाणी थोडी वेगळी होती. गुहेच्या अगदी तोंडाजवळच या राक्षसाचा जन्म झाला. जन्म होताच त्यानं ज्यावेळी डोळे उघडले तेव्हा त्यानं सर्वत्र प्रकाश पाहिला पण काही कळायच्या आतच एक अनामिक ताकद त्याच्या हाताला धरून त्याला गुहेबाहेर ओढू लागली. बाळ राक्षसानं प्रतिकार केला, झटापट केली; पण ती अनामिक ताकद होती राक्षसाला वरचढ. बाळ राक्षसाला वाटलं की जन्म होताच जीव गेला तर आयुष्याचं सार्थक होणार कसं? म्हणून त्यानं अंगातला राहिला साहिला जोर लावला आणि गुहेच्या तोंडाजवळचीच एक जून पण दणकट वेल गच्च पकडली. ती अनामिक ताकद बाळ राक्षसाला बाहेर ओढत होती, तर राक्षस त्या वेलीला नव्हता सोडत. अचानकच जोरात किंकाळण्याचा आवाज आला आणि त्या अनामिक ताकदीने अचानकच झटक्याने राक्षसाला सोडून दिले. त्या जोराच्या झटक्याने राक्षस वेल सोडून गुहेत अगदी आतवर जाउन पडला. तो पडताना त्याला इतका जबरदस्त मार लागला की त्याचे पाय तुटले, उरलं सुरलं शरीर एक म्हणायला म्हणून राहिलं तेव्हढं.

जन्मानंतर काही क्षणातच त्या राक्षसाने सगळी शक्ती गमावली आणि तो झाला स्थानबद्ध. चालता येत नाही, काही बोलता येत नाही, गाणं म्हणू म्हटलं तर ऐकायला कुणी नाही आणि हो…म्हणतापण येत नाही! त्या राक्षसाच्या अस्तित्वाला विशेष काही अर्थ नव्हता, पण त्याच्या भितीमुळे त्या गुहेतही शिरायला कुणाची हिंमत नाही झाली. ती गुहा रावळ्याची झाली. लोकांनी ठेवलंलं नाव. कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत असेल, पण या मायावी गोष्टी असतातच मुळात अशा.

रावळा आहे कसा? त्याची जन्मकथा? त्याचं खाद्य, त्याचं राहणीमान, त्याचं love life, अशा कित्येक गोष्टींचा शोध कित्येक संशोधक घेत राहिले, अजूनही घेताहेत. एकदा एक अमेरिकन संशोधकांची टीम पण येऊन गेली. त्यांनी एक डॉक्युमेंटरी बनवली, जी पाहून आपले काही लोकही रावळ्याला बघण्यासाठी गुहेपाशी गर्दी करू लागले. रावळ्याला या बदलेल्या जगाची काहीच कल्पना नव्हती. तो गुहेच्या तळाशी, अंधारात स्वत:च्याच विचारांत समृद्ध होत होता. शेवटी नव्याचे नऊ दिवस आणि ती गर्दीही ओसरली. कित्येक वर्षं होऊन गेली आणि जग रावळ्याला विसरून गेलं. गुहेच्या तोंडाजवळ रात्री नऊनंतर दारूड्यांचा अडडा जमू लागला. दारूच्या त्या वेडावणाऱ्या वासामुळे रावळ्या विरघळून जाऊ लागला. त्याच्या शरीरात बदल घडू लागले. त्याला पाय फुटताहेत की काय, असं वाटू लागले. त्या नुस्त्या वासाने त्याला गुहेच्या तोंडाकडे जाण्याची ओढ अनावर होऊ लागली.

आता राक्षसांच्या अंत:प्रेरणा माणसांना काय समजणार म्हणा? एके दिवशी अतीच झालं आणि रात्रीच्या त्या दारूच्या वासानं रावळ्याची ताकद उफाळून आली. तो उठला, मनातच, आता थांबत नाही म्हटला आणि अंगाला झटके देत, गुहेच्या भिंतींना फोडत, वेलींच्या जंजाळांना लिलया तोडत गुहेच्या तॊंडाकडे धावत सुटला. जसा त्याला गुहेचा प्रकाशाने उजळलेला किनारा दिसला तसा तो बोंबलत, छाती बडवत झेपावला. दारूचा वास अचानकच गायब झाला आणि जोरदार भुकंप होत रावळा अक्षरश: हवेत उडत दाण्ण़कन जमिनीवर आपटला. जमिन नव्हतीच ती, अनामिक शक्ती होती ती. रावळ्याच्या जन्मावेळी जिनं तिचा घात केलेला, तोच हात होता तो. रावळ्याने डोळे उघडले आणि स्वत:च्या क्षुद्रत्वाची जाणीव झाली त्याला. सगळंच अवाढव्य, सुबक, सजवलेलं जग होतं गुहेबाहेरच. रावळ्याला दोन बोटांच्या चिमटीत पकडून अगदी चोळामोळा करून त्याचा एक लाडवासारखा गोळा केला त्या अनामिक शक्तीच्या मालकाने आणि बेसीनमधे टाकून दिला त्याला.

रावळ्याला एका मेकूडाचं आयुष्य लाभलं! तो आकारानं भलामोठा असता तर नक्कीच म्हसोबा म्हणून खपला असता आणि आयुष्याचं सार्थक झालं असतं. पण एक मेकूड म्हणूनही त्यानं गाजवलेलं राज्य नक्कीच वाखाणण्यासारखं आहे. रावळा गेला पण आजही रावळ्याचा दरारा घरभर आहे. रावळ्याच्या पाठीमागे त्याची बायको (आवळा), दोन पोरं (काळा, कावळा) आणि दोन पोरी (निळा, पिवळा) गुहेमध्येच राहतात असं ऐकण्यात आलंय. आता खरं-खोटं बोटालाच माहिती!

पंकज

२० एप्रिल २०२१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: