मंगळवार, २७ एप्रिल, २०१०

अंधार

अंधाराचं चित्र कुणी काढलंय का कधी? मला पहायचंय ते. अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने? भविष्यातला अंधार, अंधारातलं भविष्य की भूतकाळ अंधाराचा अमर्याद गोळा बनून भविष्याकडे झेपावणारा! ओसाड अंधार, नि:शब्द अंधार, कोरडा अंधार, रखरखीत अंधार, क्रूर अंधार, निर्दय अंधार…कुजका अंधार. आयुष्य हरवलेली लोकं ल्यालेला अंधार!
अजून कसं असू शकतं हे चित्र? विज्ञान या प्रश्नाची लाखो उत्तरे शोधेल खरे…पण दृष्टीला बरे दिसेल ते चित्र खरे म्हणणारे सामान्य-जन आम्ही! आम्ही ते अंधाराचे चित्र पाहू; खरेच जाणकार असू तर म्हणू Brightness थोडा वाढवायला हवा…काहीच स्पष्ट दिसत नाहीये…ना काळ, ना चित्र, ना त्यातली लोकं, जनावरं, वस्तू आणि इतर जे काही रेखाटलंय ते!! यावरून आम्ही असे conclusion काढू की, कलाकाराला अंधार ही कल्पनाच मुळात स्पष्ट नसेल बहुधा…जर तसे नसते, तर अस्पष्ट असे चित्र त्याने घडवले नसते…किंवा मग सहज कल्पनेची बीजं पेरून कलाकार वेल कधी येईल या अपेक्षेने बसला असेल!!
मग या चित्राला काय गुण द्यावेत? द्यावेत की नाही? ‘अंधार’ नावाचं चित्र…गुण दिले काय किंवा नाही दिले काय, एवढा काय मोठा फरक पडणार आहे? गुणांच्या दृष्टीनेही अंधारच सगळा!
थोडे नीट निरखून पहाल, तर ते चित्र स्प्ष्ट होईल, मित्रांनो! त्या चित्रात अंधार ल्यालेली, अंधार गिळलेली लोकं दिसतील. त्यांचे रडवेले, उदास चेहरे दिसतील…स्पष्ट नाही होणार हे सर्व…मात्र ओठ, नाक, डोळ्यांवरून चेहऱ्यावरची उदासी मैलोऩ्मैल पसरलेली दिसेल! पाणी-पाणी करत आडवी झालेली अजाण बालके दिसतील…पाण्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या त्यांच्या ओठ सुजलेल्या नागड्या आया दिसतील…रडणाऱ्या त्या अंधारात, लंगडणाऱ्या तरसांचं हसू ऐकू येईल! पाण्यानं सुकून मरू लागलेल्या एखाद्या बच्च्याचा पाय गिधाडांच्या गर्दीतून दिसू लागेल. पाण्याच्या थेंबासाठी पोटात चाकू भोसकणारे दोन तरूण रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात दिसतील! अंधारात चाचपडणारी एखादी म्हातारी दिसेल नि तिचं इमानदार कुत्रं तिच्या पाठीमागे शेपूट हलवत उभं दिसेल! ती नेहमीची ओळखीची गल्ली भयाण दिसेल, रक्ताच्या गटारी दुथडी भरून वाहत असलेल्या दिसतील; एखादा संशोधक रक्तातून पाणी वेगळं करून वापरण्याच्या प्रयोगासाठी त्या गटारींतून रक्त भरून नेताना दिसेल…ओंजळभरून रक्त पिणारेही कित्येक लोक दिसतील!
दररोजचा ओळखीचा वाटणारा अंधार इतका भयाण होऊन समोर उभा ठाकेल याचं भविष्यही वर्तू न शकलेला तो कलाकारही, हा काळोख पाहून, त्या विचारांनीच दडपून चित्राच्या शेवटी शांत मेलेला दिसेल…अगदी शांत, अजिबात गोंधळ न करता, हातातला कॅनवास, हाताशी प्रामाणिकपणे पकडून…चित्रावर त्याची कुठेच सही दिसणार नाही…स्वत:च शव चित्रावर झोपवलं, यापेक्षा काय अधिक काय हवं, चित्राचे अधिकार बाळगायला…म्हणूनच मी विचारतोय, अंधाराचं चित्र कुणी काढलंय का या चित्रकाराव्यतिरिक्त? मला पहायचंय ते, अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने??                            २६.०४.१०            

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

फांदीवरचे निवांत पक्षी उठले ,
आकाशात काळे ठिपके.
ढगाळ गर्दीत धक्काबुक्क्की
हरवले काळे ठिपके...

‘ती’ ही सखी गेली,
रात्री, तू ही निघ बिगीबिगी...
तोडत रहा दोघी मनसोक्त
उरले-सुरले माझे लचके!

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

चिंगीच्या पुढ्यात...

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! हलत नाही, चालत नाही…शीss बाई, काहीच करत नाही! तळ्याकाठी बसलाय एक हत्तोबा, कोठारभर जेवण करून झालाय त्याचा पोटोबा! हलत नाही, चालत नाही…शीss बंबच आहे मुळी! तळ्यात पोहताहेत बदकांची पिल्लं, कुणी काळं-कुणी गोरं, गोल गोल चकरा मारतात, एकमेकांना येऊन धडकतात…तोच-तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात, त्याशिवाय काही नाही..शीss बाई, कसली मॅड आहेत, झालं! तळ्याचं पाणी निळंशार, त्यातली बेडकं हिरवीगार, चिंगीकडे पाहून करतात डराव-डराव, पण याव्यतिरिक्त त्यांच्याकडे शब्दच नाहीत! चिंगी बघते ती निळी फुले, आकाशाचे तुकडे कापून झाडावर लावलेले, नि असा येतो गार वारा…शीss बाई पुढे काही होत नाही…
चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा वाघोबा, गुहेत असतो झोपलेला, घोरतो फार, खुर्रर्र, खुर्रर्र, गुरगुरतो मात्र कुठला?? चिंगी असते बिचकून त्याला, आईने सांगितलंय उठवू नको त्याला, उठला की तो डरकाळी फोडेल नि क्षणात तुला गट्टम करेल! चिंगी असते बिचकून त्याला, पण जायचंय एकदा भेटायला त्याला…त्याचा काय तो रंग, काय ती शेपूट, कसले डोळेsss, कसले काssन, कसले दाssत…नि कसले पाssय!! चिंगीच्या स्वप्नात वाघोबाला मन! मनातून वाघोबा चिंगीचा आजोबा! “ये ना, ये ना” म्हणतो नि दाढी खाजवत बसतो, कुणी त्याच्याकडे जात नाही; लडदू हत्ती बोलत नाही, नि ढिम्म मुंगी हलत नाही…निळी फुलं वाऱ्यावर डोलतात, तळ्याचं पाणी थरथरतं, तळ्यातलं आभाळ वर-खाली होतं, बदकाची पिल्लं नुसत्या चकरा मारत राहतात…

चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा गाव, गावतल्या माळात हरणांची जोडी, जोडीच्यामधे हरिणीचं पिल्लू, आईला बिलगतं, गवत खातं, नाक फेंदारतं…बस्स! इतकंच करतं!! शीss, बाकी काहीच नाही…गवताची पाती हिरवीगार, भरल्या उन्हात चमकतात फार…उनही पडतं ते सोनसळी, भाजत नाही, चटका नाही, असलं कसलं बाई हे!! शीss, काही मज्जाच नाही…

चिंगीच्या घरात कित्ती आक्रोड खातात लोकं, इतके चविष्ट नि मोठ्ठे की एक खातानाच भरतं पोट तिचं…शीss बाई, मग काही मजाच नाही! चिंगीच्या आयुष्यात एक वडाचं झाड, वडाच्या ढोलीत तिच्या घराचा थाट, झोपायला कॉट नि जेवायला ताट!!

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! चावी दिली की कुई कुई करते, चावी बंद् की मग हलत नाही, चालत नाही…शीss बाई, माझ्याशी कुणी खेळतच नाही!!

शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

सुरूवात

उध्दवस्त घर. मोजकेच श्वास उरलेले. पहिल्या पावसाने मात्र धुळीत काही अंकुर फुललेले. पाचही भिंती ढासळल्या; चारही दिशांनी घर नागडे. उत्तरेकडली एक भिंत तेवढी अर्धी-मुर्धी उभी. गुलाबीसर रंग फिकटसा; त्यावर पहिल्या पावसाचा फवारा. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूधारा गुलाबी गालांवरून अंकुरांकडे चाललेल्या. त्या भिंतीचं नाव “सखी”…कारण आजूबाजूस कुणीच नसताना ती एकटीच माझ्यासाठी उरलेली! सखीच्या मनावर एक गडद केशरी हाताचा तळवा. माझं नि प्रियेचं लग्न झालं; त्यादिवशीचा उमटलेला…पहिल्या पावसाने अजूनही त्याचा रंग नाही ढळलेला.

या गावात आता कुणीच राहत नाही. बोलायला, लिहायला, वाचायला, गायला, जगायला माणसं नाहीत. रात्री लांडगे फिरतात…वाघाची कमजोर डरकाळी येते ऐकू…माझ्या शेकोटीशेजारी मी रग घेतो अंगावर ओढून! जिवंत असूनही मेल्यासारखा झोपतो. आता तर हे सोंग, सोंग उरलंच नाहीये!


इथे आलो तेव्हा होतं तरी काय? जंगल…बाकी काही नाही. मग मी एक वीट आणली…मनात जिद्द होती; अंगात बळ होतं; सोबत “ती”ही होती! घर वसवलं-रंगवलं! घरासारखं घर केलं. माझं पाहून इतरही आले. चला, गावच वसवू म्हटले. “हो” ला “हो” केलं आणि टुमदार गावही वसवलं…त्याचं काही दिवसांपुर्वीच पाणी-पाणी झालं! दुष्काळ पडला…युध्द झालं…नको-नको ते घडलं! असंच मरण येण्यापेक्षा; लोकांनी स्वत:च स्वत:ला संपवलं. मी सांगत राहिलो – “वारा थांबेल वहायचा कधीतरी; जरी आज झोंबतोय अंगाला! वादळ येईल अशी भिती का बाळगताहात; भित्र्यांनो! सूर्यही थंड होईल…जळून नष्ट करेल सगळं, हा विचारच का मुळात! मित्रांनो, बासरी वाजवा ना…गाणं गा…कविता म्हणा…घाबरू नका मात्र!” मात्र कुणीच ऐकलं नाही.

सारेच मेले. “ती” ही गेली. तेवढी एकच भिंत नि तेवढा हात सोडून गेली. उरलेल्या धान्याचे मी अंकूर घडवलेत…त्यातून उगवेल अजून धान्य; मग मोठीमोठी शेतं होतील तयार! घर बांधू लागेन परत…सुरूवात केलीय तशी मी…ही गुलाबी फिकट भिंत नि हा हाताचा ठसा…हे काय! सुरूवात केलीय मी!