बुधवार, २८ जुलै, २०१०

बाप्पा

सकाळी साडेअकरा वाजता बाजारात जाऊन काही रंग विकत आणले. एक निमूळत्या टोकाचा नि दुसरा पसरट तोंडाचा असे दोन ब्रशही आणले. जेवण वगैरे करून म्हटलं एक हात मारावा नि मस्त झोपावं; बाहेर पाऊसही छान कोसळतोय; अशावेळी माझ्यासारख्या जीवाला झोपेशिवाय दुसरं काय सुचू शकतं म्हणा!

मग तसा एक हात मारून घेतला. नि मग पुढे वेळेचं भानच उरलं नाही...चित्र साकारत राहिलो. अधून-मधून कित्तीतरी विचार डोक्यात येत राहिले; एखादी रेष चुकतीय असं वाटलं तरी त्या चुकीचे कित्तीतरी अर्थही निघू शकतात ना?! रंग...रंगांचंही तसंच वाटलं मला. चित्र म्हणजे नक्की काय याचा गंधही नसलेला मी प्राणी! डोळ्याला जे जे चांगलं वाटेल ते ते चांगलं हा किती संकुचित विचारंय; याचाही मस्त चटका बसला मनाला! दुपार झाली; थांबू वाटलं नाही...
मग पुन्हा कित्तीतरी वेळ तिथेच गुंतून पडलो. हे असलं काहीतरी करायला हवं यार! तहान-भूक विसरून. किती वेळा हे मनासारखं घडलंच नाही. कथा लिहीताना होतं ते तेवढंच! त्यावेळी तहान भूकच काय; वेळ, वय नि स्वत:चाही विसर पडतो. इतका साधा बाप्पा; त्याचं ते किती साधंसं रूप. कुणीही, अगदीच शिकाऊ माणसालाही जमेल असं ते चित्र! कुणी बनवलं असेल गणपतीला? त्या चित्राला? हे दैवत इतकं गोड आहे की प्रतिभेचं दैवत असं म्हणताना त्याच्या स्वत:च्याच आकारात कितीतरी आकार आपोआपच प्रगट होताना दिसतात. छान! तसं मला लिहायचं आहे याबद्दल पण मला आता काहीच लिहू वाटत नाहीये! मला माहितीय की मला चित्र काढताना काय वाटत होतं नि ते मी किती enjoy केलं ते!

गुरुवार, २२ जुलै, २०१०

मेणबत्ती

मेणबत्तीच्या आयुष्यातला जळण्याचा क्षण किती अप्रूपाचा असावा? वारा येईल तसं लवलव करायची! आयुष्य असं जळत असतानाही असह्य वेदनांचा टाहो मेणबत्ती किती मूकपणे प्रगट करत जळतीय! मौन धरून बसलीय…सांगायचं नाहीच कुणालाच! कुठे भाजून निघालेलं अंग चरचर करतंय जळतंय. तो मेणबत्तीचा आवाज नाही; तो घटनेचा आवाज! घटनांना आवाज असतो. हिरव्यागार रस्त्यावर मध्यभागी नारळासारखी दोन रक्तमय डोकी नि मूकपणे उताराला लागलेलं रक्त…या घटनेला माझ्या मनात सुरूंगासारखा आवाज झाला होता खरा. पण तेवढ्याच मूकपणे मी माघारीही फिरलो होतो. मेणबत्ती असेच स्वत:चे कान बंद करून घेत असेल एखांदवेळेस. आवाज नाही; तर भिती नाही. ते एकलकोंडं जगणं जरी डोळ्यांनी दिसत असलं तरी तिचा हातात हात धरून असलेला प्रत्येक अणू-रेणू कितपत जीवात जीव अडकून जगला असेल या प्रश्नाला तरी उत्तर काय? वर लागलेली आग खालीपर्यंत पोहोचणारच; या भितीपायी कुठे कुठे कुणी कुणी मिठ्या मारल्या असतील नि कुणी कुणी आत्महत्येचे विचार केले असतील हे सांगणही किती कठीण! मेणबत्ती जळत राहते; तसंच तिचं जगही. अणू-रेणूंना आग स्वत:पर्यंत पोहोचत तोपर्यंत हे जाणवतही नसेल की ते एका जळणाऱ्या मेणबत्तीचे भाग आहेत! म्हणून तर कुठेच टाहो नाही; सर्वच मौनाचा कारभार; चटका लागतोय म्हणून लिहीतोय मी ही…आग आलीय अंगावर!
२१.०७.१०
पंकज

बुधवार, २१ जुलै, २०१०

सांच्याला लई पाय दुखत व्हते. का कुणास ठावं? मरेस्तोवर चाललो व्हतो; तेवढंच. ते बी रोजच घडतंय की. आजच का दुखू राहिले कळंना. तालुक्याला खेटं आमचं रोजवार चालूयंत. हे ना ते; ते नाही तर हे! जीवाला भ्रांत अशी नाहीच. पेरलेलं उगावलंच नाही; आता परत पेरायला पैका नको? पैका आणायला तालुक्याला; बसवारीच पाण्यासारखा पैका जातुया! पेट्रोलबी महागलंय; तिकीटं बी वाढलीयंत! देवाला साकडं घालायला त्यो बी पुर्वीसारखा राहलाय कुटं? इथं जीवाला जीव राहिला नाई; देवळात देव कसा म्हंतो मी? मंडळीला बोललो म्या परवाच जगण्यात काय नाई; जीव देऊ एकजात! “अवं असं का वंगाळ बोलताय?” असं बोलली माजी बायको. आता या बाईलीला सांगणार तर काय? पोरगं नकळतंय; रडारड असतीय नुस्ती घरी; त्याला कसा समजिवनार? सगळाच गोपाळा झालाय! बाईली काल परत म्हटली की, “दोघांपुरतंच उंदराचं औषाध हाये शिल्लक” नि मुसमुसून रडली…

ठिय्या केला मी बी मनाचा. तालुका गाठला; मंगळसूत्र ठेवलं गहाण नि परतलो की पेरणीला; म्हटलं गड्या, आसं हारायचं नाई; कुणाच्या बापाला भ्यायाचं नाई! पावसाची खबरबात मिळतीय रेडूवरनं; पण आपल्या प्रदेशात नाई पडनार असंच लक्षान! झालं बरंच दिस झालं त्यालाबी; बाईलीनं कुठलं व्रत बी केलं; अन्न-पाणी सोडून; आता खायलाच काई नाई म्हटल्यावर उपासमारच व्रतं म्हणून म्हणायची!
आज माझी बायको गेली आबाळात…

रातभर पोरगं रडतंय; म्हणतंय “बा, पाऊस कोसळायलाय; म्हणतुया, इठ़ठल, इठ़ठल! त्याला सांग ना गपायला!”