शनिवार, ३० एप्रिल, २०१६

७:८५

का दिवशीची संध्याकाळ आठवते. तेव्हा मी घड्याळात ७:८५ वाजलेले पाहिले होते. घड्याळातला हा आकडा मला अगदीच सवयीचा झाला होता. ७:८५ वाजणे साहजिक होते. सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ असतानाही हाच आकडा मी घड्याळात पहायचो. मला हा प्रश्नही पडलेला अंधुकसा आठवतो की मी ते घड्याळ हातात घेऊन का फिरतोय? वेळ ७:८५ आहे नि ती बदलणारी नाही हे माहिती असतानाही. त्यावेळेस मी स्वत:ला फार समाधानकारक उत्तर देऊन वेळेच्या काळजीतून बाहेर पडलो होतो. आता उत्तर आठवत नाही, पण ४३ दिवसांपुर्वी incognito window मधे काय काय पाहिलं होतं ते काहीसं आठवतं. अजून डोक्याला ताण दिला तर ७८ व्या दिवसांपुर्वीचं सुदधा आठवेल. कधी कधी बुद्धीचं कौतुक वाटतं माझं मलाच. हे कौतुक मनातल्या मनातच मन मनाला करतं. ती एक सुखद भावना आहे. गवताच्या पात्यावर सकाळच्या दिवशी थांबलेले दवबिंदु मोत्यासारखे दिसतात, तसं ते कौतुक वाटतं. त्या दवबिंदुंना मोत्यांबरोबर तोलणं योग्य नाही. या क्षणभंगुर आनंदांना कोंदण घालण्यातही काही अर्थ वाटत नाही.

मी सकाळी ७:८५ ला उठतो; आवरतो; खातो; कामाला जातो; ७:८५ ची लोकल अजिबातच टाळत नाही. कारण ती टाळली तर पुढची ७:८५ लाच असते. एवढा वेळ कोण थांबणार? कामाची वेळ ७:८५ ते ७:८५. कामाच्या वेळेत घड्याळ बघायचं कामच नाही, कारण वेळ ती शांत उभी असते. तिला मन:शांतीची गरज नाही. ७:८५ ला ऑफिस सुटतं. मी घरी येतो, खातो, आराम करतो, आयुष्य चाखतो नि झोपी जातो ७:८५ ला. वेळेचं माझ्या आयुष्यात खरचं काही महत्त्व नाहीये. कारण येणारा-जाणारा दिवस तसा ठरल्यासारखाच असतो. जशी ती मनगटावरची वेळ ठरलेली आहे. एका क्षणी वाटतं की माझ्या मनगटावर ही वेळ कधी नि कुणी बसवली त्याचा शोध घ्यावा नि त्याला माझ्या आयुष्याचा जाब विचारावा. इतर लोकं म्हणतात तुझ्या आयुष्याचा जाब विचारायला तुझ्या चुका तरी तुला आठवतात का? ४३ दिवसांपुर्वीचं तुला आठवत नाही, मग ७:८५ चं कसं आठवेल?

त्या दिवशी मी पाणीपुरी खात संध्याकाळ घालवत होतो नि घड्याळात पाहिलं. ७:८६ वाजलेले. वाटलं हाच तो क्षण जो पकडून ठेवावा मुठीत. आणि आत्ताच्या आता याचा जाब विचारावा जगाला. मनगटावरचं घड्याळ पकडायला गेलो तर पाणीपुरीची प्लेट अंगावर सांडली, आवरण्याच्या नादात कळलंच नाही किती वेळ गेला. झोपताना घड्याळात ७:८५ ला गजर लावून झोपलो. ते जुनाट आयुष्य सोडण्याचं धैर्य घड्याळालाही झालं नाही.
पंकज

२९ एप्रिल २०१६