शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

मैत्रिणीचा गाव

माझ्या मैत्रिणीच्या गावात बांधावर उगवलेल्या गवतात वाट काढणाऱ्या शेळ्या नि काठी मानेवर टाकून बीटल्सची गाणी गुणगुणत चाललेला मेंढपाळ. लहानपणापासून आकाश वेढायला वेडं झालेलं एक अतिउंच अतिविचित्रसं झाड. त्याचं सारं लक्ष एकट्या आकाशाकडे नि अंगाखाद़्यावर लगडलेली फुलं-फळं-पानं-झोपाळे…साऱ्यांसाठी ते अनभिज्ञ! बांधावर एकटीच बसलेली ती गोगलगाय नावाची संथ गुंडाळी. किती निक्षून बघतीय; तिला रस्ताच माहिती नाही…जायचंय कुठे ते! एक सुंदरसं तळं नि तळ्याशेजारी ते तेजोगोल झाड. त्याचं स्थानही तसंच अढळ. त्यावर सुगरणींची घरटी. वाऱ्यावर निवांत लगडलेली. वादळाची-पावसाची-ऊनाची नि कुणाकुणाचीच भिती नसलेली. तळ्यात मासे, कासवं नि काठावरती कोवळं ऊन, गारगोटीसारखा वारा नि हवाहवासा वाटणारा एकांत! तो मैत्रिण चितारत नाही; हे फक्त आपण समजून घ्यायचं! मैत्रिणीच्या गावात आसमंतभरून गाणी नि हवं ते हव्या त्यावेळेस ऐकता येतं. ज्याला हवं ते! पाऊस नसताना ऐन भरात आलेला मोर पाहिलाय का कधी? मैत्रिणीच्या गावात आहे खरा.
मैत्रिणीच्या घरात कोंबड्यांची पिल्लावळ. चिवचिवाट नि कामं करून घराला डोकं टेकवून निजलेली बैलगाडी. अगदी तिच्या घरामागेच वारल्यांचे डोंगर. डोंगरावर मध्यभागी गणेशाचं देऊळ. नि नुस्ती नाचगाणी, भरल्या दुपारी! मैत्रिणीच्या गावात सुर्य नाही, ढगही नाहीत; नाही पाऊसही…हे फक्त आपण समजून घ्यायचं!
मैत्रिणीच्या गावात चक्रावलेला वावर; कुठं जायचं कळत नाही म्हणून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलाय खरा; पण आता गावाच्याच प्रेमात पडून हलण्याचं भानही उरलं नाहीये!

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

      मी अरूणाचलमधे दहा दिवस काय केलं याचा अजूनही कित्येक लोकांना संशय आहे!! तसा मलाही थोडा आहेच म्हणा…मी बऱ्याच काही गोष्टी ठरवून गेलो होतो; त्यातल्या काही अंशत: पुर्ण झाल्या, बऱ्याच अपूर्ण राहिल्या नि अजून काही न ठरवलेल्या गोष्टींचीही भर पडली त्यात. मी इथून निघण्यापासून काहीतरी कुठल्यातरी प्रकारे document करायच्या प्रयत्नात होतो; बहुधा त्यामुळेच काही करू शकलो नाही. Document करायचेही किती मार्ग आहेत. फोटोग्राफी, लिखान, डायरी, व्हॉईस लॉग, व्हिडीओ लॉग. यातली प्रत्येक गोष्ट थोडीफार केली, त्यामुळे आता सगळी भेळ झालीय. पण ठीकंय मी सध्यातरी लिखान नि फोटोग्राफ्स publish करून माझ्या एकंदरीत ट्रिपबद्दल माहिती देऊ शकतो…
      अरूणाचलमधे तसं माझं काहीही काम नव्हतं; टाईमपास करणं, जंगलात भटकणं नि पक्षी-निरीक्षण करणं; झालंच तर मॉथिंगच्या कामात थोडी मदत करणं, इतकंच. जंगल समजून घेणं हेच काम होतं मला. ते चांगलंच झालं. आसाम सोडून माणूस एकदा का अरूणाचलमधे शिरला की शक्यता-अशक्यांतांचा नुस्ता प्रवास सुरू होतो. एकतर तिथे सेल्युलार नेटवर्क काम करत नाही. तिथलं लोकल सिम किंवा मग BSNL चं पोस्टपेड सिम तिथं काम करतं. Even आसाममधेही तोच सिन आहे; पण आसाममधे transport आणि इतर सोयीही उपलब्ध आहेत, अरूणाचलमधे तसं नाही. म्हणजे अरूणाचल मधे गेलो तर तिथल्या बऱ्यापैकी शहरांशिवाय STD इतर जास्त कुठे उपलब्ध नाहीत. पण काहीही असो; इतक्या दिवसांनंतर हे सेल्युलर फोनला सरावलेलं मन STD मधे चांगलंच घुटमळत राहिलं; कारणंही तशीच होती!
      अरूणाचल मधे रस्ते खराब आहेत; सगळेच नाही; पण अधे-मधे जर एखादा खराब पॅच लागला तर तो चांगलाच वेळ खातो. असा पॅच भालुकपॉंग ते सेस्सा च्या मधे लागतो; जवळपास दहा किलोमीटर्सचाच हा रस्ता पण तासभर तरी खातो. इथे बऱ्याच ठिकाणी मिल्ट्रीचे कॅम्प्स आहेत. त्यामुळे जरा बरं वाटतं. अरूणाचलवर मिल्ट्रीची चांगलीच पकड आहे, हे जाणवत राहतं. बऱ्याच गोष्टी आहेत, चांगल्या वाईट; पण एकंदरीतच अरूणाचल मधली लोकं प्रामाणिक वाटली.
लामा कॅम्प
      ईगलनेस्टच्या पायथ्याला हा कॅम्प आहे. सुंदर कॅम्प. तिथल्या लामामधे बसा किंवा केवली मधे, समोर दूरवर हिमाच्छादित शंकर पर्वत दिसतो. ‘लामा’, ‘केवली’ नि ‘शंकर’ पर्वत हे सगळे माझे शब्द आहेत; प्रत्यक्षात त्यांची नावं वेगळीच आहेत. ही नावं कुठून आली यामागची गोष्ट तशी काही गूढ नाहीये; ज्या-ज्या गोष्टीला जे-जे समर्पक वाटलं, ते नाव दिलं; बस्स इतकंच. लामाला थांबलो होतो, त्यावेळी थंडी वाढली होती. एके दिवशी पाऊसही झाला. जबरदस्त पाऊस. हत्तींचे चित्कार खालच्या दरीतून ऐकू यायचे नि मी दररोज आज इथून आवाज आला, आता इकडून आला असं म्हणत हरखून जायचो. लामाच्या आसपास बरेच पक्षी पाहिले. मी जे काही पाहत होतो, ते पुर्वी पाहिलेलंच नव्हतं; त्यामुळे माझ्यासाठी excitement नावाचा काही प्रकारच नव्हता उरला! हा प्रकार जरा वेगळाच असतो. ठीकंय. अरूणाचल मकाक पाहिले. हा एक दुर्लक्षिलेला प्राणी. इतके दिवस होता, पण ही मकाकची वेगळी जात आहे, हे कुणाच्या ध्यानात नव्हतं आलं! लामाजवळच बुगून लायोचिचला या नव्याने शोध लागलेल्या पक्ष्याची कोवळी शीळही ऐकली मी. लोकं जगभर फिरून या एका पक्ष्यासाठी इथे येतात, भरघोस पैसे खर्च करतात नि शेवटी हातातल्या बर्डलिस्ट मधे टिक करून निघून जातात; हा प्रकार काय असतो, हेसुद्धा नव्यानंच अनुभवलं.
      लामामधले तीन दिवस भारी गेले. पक्षीच पक्षी पाहिले नि रात्री कित्तीतरी प्रकारचे पतंगही पाहिले. पिकासो मॉथ नावाचा एक सुंदर पतंग पाहिला; त्याच्या पंखांवर झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसलाय अशी नक्षी. हे कुणाला कळतं नि कोण बनवतं? की आपणच आपल्याला मुर्ख बनवत असतो?
बोंपूचा कॅम्प
     लामावरून बोंपूला गेलो एके दिवशी. बोंपू ईगलनेस्टमधे आहे. लामा बाहेर आहे अभयारण्याच्या. बोंपू समुद्रसपाटीपासून ३६०० मीटर उंच तर लामा २६०० मीटर. लामाच्या पायथ्याचं गाव (टेंगा) ९०० मीटर उंच. लामापेक्षा बोंपू भारी वाटलं. लामासारखी छान व्यवस्था जरी नसली तरी बोंपूचा कॅम्प पक्षी पाहण्यासाठी मस्त जागाय. बोंपूच्या कॅम्पवर भेकर (Barking deer) दिसलं, yellow throated martin (मुंगूसासारखा प्राणी), हत्ती, मलायन जायंट स्क्विरल नि फार सुंदर, निरागस असा दिसणारा ‘चिंटू’ (Tesia) पक्षी! हत्ती लांबून पाहताना फार छान वाटतं. निवांत चरत असतात बिचारे. बोंपूचा कॅम्प लामापेक्षा बऱ्यापैकी गरम होता; दोन दिवस छान कोवळी ऊनं पडत होती नि त्यामुळे फुलपाखरं नि पक्षीही दिसत होते बरेच. भुतान ग्लोरी नावाचं एक सुंदर फुलपाखरू पाहिलं तिथं…त्याची तर पुर्ण एक वेगळीच गोष्ट होईल; पण लिहायचा कंटाळा आहे!
सेस्सा
      सेस्सा हे छोटंसं खेडं. Population 110. सुंदर गाव. गावावर वळणावळणाने गेलेला बऱ्यापैकी रहदारीचा रस्ता. एका वळणावर काजूचं हॉटेल. या काजूमधला ‘ज’ हा ‘जहाल’ मधल्या ‘ज’ सारखा. ‘जहाज’ मधल्या ‘ज’ सारखा नाही! तिचं नाव काजल. सोईसाठी काजू. तिच्या त्या हॉटेलात एका कोपऱ्यात जागा बळकावून सकाळी सहाच्या कॉफीबरोबरचा माझा वेडसर माऊथ ऑरगन नि काजूचं लाडकं हॉटेलात घुटमळणारं शेळीचं पिल्लू! सेस्साच्या प्रेमात पडलोय मी. भुरळ पडलीय त्या गावाची. अशी भुरळ पाडणारी गावंच मुळात कमीयंत भारतात. जी क्षणभर छान वाटतात ती काही दिवसांतच नकोशी वाटू लागतात. सेस्साबद्दल मला तसं नाही वाटतंय. सेस्साला ऑर्किड सॅन्क्च्युरी आहे. तिथे मला ऑर्किड्स दिसले नाहीत पण. सेस्सामधे पिवळ्या गळ्याचा सरडा सापडला मात्र नि त्याचे छान फोटोग्राफ्सही मिळाले. सेस्साची आठवणही चांगलीच गडद आहे नि अजून काही दिवस तरी जाणार नाही मनातून.