रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

सुमात्री गेंडा नामशेष का झाला?

प्रश्न वरवर सोप्पा वाटतो, पण याची उत्तरं स्थळ-काळानुसार बदलत गेलीहेत. या एका प्रश्नाभोवती, मला वाटतं, अख्खं जग रूंजी घालत असणार आहे…होतं…आणि असेल. प्रश्न फक्त सुमात्री गेंड्याचा नाहीये, एका प्राण्याचा नाहीये, उत्क्रांतीतून लाखो वर्षे पृथ्वीतलावर जगलेल्या घटनेचा नाहीये…प्रश्न श्वर-नश्वराचा आहे. काय उरतं नि कसं उरतं याचा आहे. ज्यांच्याकडे जगाला समणारी भाषा नाही, त्या प्राण्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती नि त्यांचं जग या साऱ्यांना माणसाने लावलेला अर्थ ते-ते प्राणी गेल्यावर उरणार. या सुमात्री गेंड्याला फार पुर्वीपासूनच स्वत:चा आवाज नव्हता. या जातीने कधी इतरांकडे मान वर करून पाहिलं नाही. सकाळ ते संध्याकाळ ते चरत राहिले, चिखलाळलेल्या प्रदेशांत लोळत राहिले. ती त्यांच्यासाठी घाण कधीच नव्हती. ते त्यांचं आयुष्य होतं. या त्यांच्या आयुष्यात कित्येक शतकं फरक कधी पडलेला नव्हता. ते अगदीच शांत मनाने चरत-जगत होते. ते चालायचे नि फिरायचे. जिथे चारा नि चिखल तिथे ते जायचे. त्यांनी समुद्र पार केले नाहीत, त्यांना त्याची कधी आवश्यकता भासली नाही. त्यांना कधी कुणाचं भय नव्हतं, कारण त्यांना वाटायचं की सारे आपल्यासारखेच असतील. शांत-समजूतदार. साऱ्यांनाच चारा आवडत असणार, कोण कशाला त्याला आग लावेल? साऱ्यांनाच चिखल आवडत असणार, कोण कशाला त्यावर ईमारती उभारायला येणार? त्यांना वाटत होतं की आपली कातडी, आपली शिंगं…कोणाला कशाला हवी असणार? पण सुमात्री गेंडे अगदीच मुर्खासारखे अनभिञ राहिले नि सरतेशेवटी जातीपुरतेही नाही उरले.

सुमात्री गेंडे काय किंवा भारतीय चित्ता काय किंवा Laughing Owl (हसरी घुबडं!) काय किंवा तो दुर्बल-असहाय डोडो काय किंवा PassengerPigeon (प्रवासी कबूतर!) काय किंवा अंदमानातल्या, अमेरिकेतल्या, ऒस्ट्रेलियातल्या नामशेष जमाती काय…सारे एकाच माळेचे मणी. आले नि गेले, कुणाला काय पत्ता. हे सारे लोक, इतर बलाढ्य ‘संस्कृतीं’समोर टिकाव धरू शकले नाहीत. इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही सुमात्री गेंडा स्वत:च्या अंगावर बुलेट प्रुफ् कवच धारण करू शकला नाही की चारा-चिखलाचा नाद सोडू शकला नाही. तो बिचारा मरणारच होता, नामशेष होणारच होता. कुणाला कधी त्याची गरज भासली नाही किंवा त्याने कधी असे दाखवलेही नाही की जगाला त्याची गरज भासू शकते. आजूबाजूला आता स्वकीय उरलेले नाहीत हे पाहून तो बिचारा दु:खात डुंबलेला असेल. आपली भाषा समजणारं आजूबाजूला कुणी नाही हे पाहून त्या गेंड्याला जगण्यात स्वारस्य उरलेलं नसेल. तो त्याचं घर सोडून कायमचा निघून जाणार म्हटल्यावर, नैसर्गिक परिसंस्थेमधे किती मोठी पोकळी निर्माण होईल याचाही त्याला किंवा इतरांना अंदाज आला नसावा. त्याला तसं पण या साऱ्या गोष्टींमधे कधीच रस नव्हता म्हणा. चिखल नि चाऱ्यापुढे त्याला काहीच गोड नाही लागलं.


सुमात्री गेंडा हातातून जातोय म्हटल्यावर संशोधकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी जंगली गेंड्यांना प्राणी-संग्रहालयात हलवले. तिथे त्यांना ‘better life’ दिली. योग्य ते अन्न, पाणी, हवा तसा निवडक चिखल नि छानछौकं तापमान नि आर्द्रता. काही गेंड्यांना अमेरिकेत हलवलं, काहींना ब्रिटनमधे. या गेंडयांनी त्यांच्या आयुष्यात असा प्रवास कधी केलाही नसेल. गेंड्यांनी या ‘better life’ मधेही प्रजनन नाकारलं. त्यांची संख्या वाढली नाही. हे सारेच गेंडे (दु:खी) मनाने अनंतात विलीन झाले. त्यावेळी कुणी साधू हजारो गाढवांच्यासमोर प्रवचन देत राहिला, “जे येणार ते जाणार. जे जाणार ते परत येणार. त्यांची स्वरूपं बदलेली असतील, पण कण तेच राहणार. भावना तीच राहणार”. मग हे सगळं होणारंच आहे, तर जगण्याचा खटाटोप का? सुमात्री गेंडा फक्त जगण्यासाठी जगला असेल का? येणार ते जाणार म्हणून वाट बघत थांबला असेल का? येणार ते जाणार यामधे कित्येक वर्षांचं अंतर आहे. ही वर्षं सुमात्री गेंड्याला आनंददायी नसतील का वाटली? प्राणी-संग्रहालयात एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसली असेल उरलेली त्यांची प्रजा नि त्यांच्या भाषेत म्हणत असतील, उत्कांतीचं हे पर्व संपलं. असं वाटतंय की सुमात्रात आपणच शेवटचे उरलेलो आणि ते ही आत्ता कळतंय. ते सारे पुढच्या काही वर्षांतच गेले. संशोधक हळहळले, त्यांना वाटलं आपण अपयशी ठरलो. आपण त्यांना वाचवू शकलो नाही. संशोधक म्हणाले, ते गेले कारण आपण त्यांना त्यांचा योग्य अधिवास देऊ शकलो नाही. In short, आपण त्यांना त्यांची स्वत:ची दुनिया देऊ शकलो नाही. त्यांना `better life’ नको होती, त्यांना त्यांची स्वत:ची दुनिया हवी होती. त्यांना वाटलंही असेल की आपली मुलं या प्राणी-संग्रहालयात वाढवण्यापेक्षा आपण नामशेष झालेलोच बरे! ते जे काही असेल, सुमात्री गेंडा, जगण्याच्या स्पर्धेत टिकला नाही नि स्वत:चा आवाज इतरांपेक्षा वाढवू शकलेला नाही. त्याची जागा बदलली, त्याचं घर तोडलं, त्याची भाषा खुंटली नि चिखल-चारा हरवला. चिखलात बुडालेल्या सुमात्री गेंड्याला चिखलातच सोडलं असतं तर बरं झालं असतं बहुधा…     
पंकज

९ नोव्हेंबर २०१५
More about sumatran rhinos - http://news.nationalgeographic.com/2015/09/150930-sumatran-rhino-extinction-indonesia-animals-conservation/

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

दगडाळलेला काळ, त्या काळातला गाळ

प्रत्येक कलाकार हा त्याच्या विश्वात जगत असतो. तिथे त्याचं राज्य असतं. त्याची लोकं, त्याची माती, त्याचे प्राणी नि त्याच्या कल्पनांची घरं वसलेली असतात. त्याच्या भूतकाळाचा गाळ त्या राज्याचा मातीखाली अधून-मधून पसरत असतो. मातीवरची घरं मजबूत असतात नि घरांमधली पात्रं खरी असतात, पण त्या सर्वांना वेदनांचा एक शांत आधार असतो. वेदना या दु:खदच असतील असं कुणी ठरवलंय का? मी तरी नाही. वेदना या शब्दातच यातना, त्रास भरलेला आहे असं लोक म्हणतात, ती एक ठसठसणारी जखम असल्यासारखी भासते काहींना…पण काही वेदना या उलट आनंददायी असतात. आठवतं का कधी काळी सुजलेल्या बोटावर टिचकी मारली की उठणारी कळ किंवा फुटलेल्या ओठांना दातांनी दाबताच जागणारी नाजूक कळ नकोनकोशी पण फार हवीहवीशी वाटलेली? आठवतच असणार. वेदनाच ती. ती जिथून उमटली तिथंच मिटली, तर कशी काय त्रासदायक? ती उमटताना क्षणभंगुर का होईना, आनंद देऊन गेली, की का होईल त्रासदायक?

असाच एक माणूस होता. तो दररोज सकाळी आवरून कामावर जायचा. दिवसभर ईमाने-इतबारे काम करून थकून संध्याकाळी घरी यायचा. त्याचं हे आयुष्य कितीतरी वर्षांपासून चाललेलं. मग एके दिवशी त्याला वाटलं की आजूबाजूचं जग तुटत चाललंय-फुटत चाललंय; पण तो त्याचं काम करत राहिला. त्यानं आजूबाजूला ओरडणारी लोकं पाहिली नि तुटणाऱ्या भिंती पाहिल्या. त्यानं मोडलेली माणसं पाहिली नि रक्ताळलेले रस्ते पाहिले. त्याला भिती वाटली, पण तो काम करत राहिला. त्यानं माणसांमधे राक्षसं पाहिली नि फुटलेले हंडे पाहिले; त्यानं कापलेली जनावरं पाहिली नि चाबकानं फोडलेल्या पाठी पाहिल्या; त्यानं मेलेली फुलपाखरं पाहिली नि जगाचा ऱ्हास होताना पाहिला. तो दररोज कामावरून घरी आला की घाबरा-घुबरा व्हायचा. त्याला घाम सुटायचा. त्याच्या मनाला यातना व्हायच्या नि तो त्यांना दाबून स्वत: जिवंत असल्याची खात्री करून घ्यायचा. तो म्हणायचा, काय रे देवा, हे काय सुरूय? तो म्हणायचा, कधी हे थांबणार? कधी ती सुंदर गावं, लोक, पाणवडे, नद्या नि तलाव, रस्ते होणार? तो रहायचा त्या तळ्याकाठी रान माजलेलं. त्या माजलेल्या रानात होती तेव्हाही जंगली श्वापदं. त्यानं विचार केला की माणसांपेक्षा हे रान बरं. जंगलात एकांतात मनाशी गुजगोष्टी होतील. त्यानं एके दिवशी संध्याकाळी त्या रानात प्रवेश केला. थोडं भित-भितच तो आत शिरला. त्याला वाटलं, जर इथेही असतील माणसं तर परत फिरलेलंच बरं. पण त्याला रानात कुणी भेटलं नाही. डोक्यावरून पोपट उडत गेले नि संध्याकाळ झाली तसे काजवे उडू लागले. तो दोन्ही पाय मुडपून, कमरेत घेऊन, अंधारलेल्या आकाशाकडे बघत राहिला. झाडांच्या पानांच्या पसाऱ्यातून एक-दोन चांदण्या तो पाहत राहिला. अंधार गोठू लागला तशी थंडी वाढली. एक घुबड त्याच्या डोक्यावरच्या फांदीवर येऊन बसलं. ते थोडं घुमलं नि चांदण्यांकडं पाहत राहिलं. माणसाला मोकळं वाटू लागलं.


मग तो पुढच्या दिवशी परत त्याच जंगलात आला, संध्याकाळी. नि असा तो तिथे दररोज येत राहिला. तो वीस वर्षे येत राहिला. ते एकुलतं घुबड दरम्यान वारलं, पण त्याची पिल्लं कौतुकाने माणसाचं काम बघत बसू लागली. तो माणूस पहिल्यांदा माती घेऊन आला, मग दगडं घेऊन, मग भिंतींचे तुकडे घेऊन, बांगड्यांचे तुकडे घेऊन आला. पण तो मातीच्याही अगोदर मनात ठसठसणारी वेदना घेऊन आला. तो त्या जागी आशा घेऊन आला. आशा…तुटलेल्या गोष्टी जोडण्याची. त्यानं सुरूवात केली, मोडलेली माणसं जोडण्याची नि तुटलेली घरं उभारण्याची. त्यानं तळ्याकाठी धबधबा उभारला. त्यानं त्याच्या स्वप्नातलं, पण आता तुटलेलं गाव तिथं वसवलं. त्यानं प्राणी आणले…वन्य आणि पाळीव. त्यानं लोकं उभारली…शीख, हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन. त्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. त्यांना त्याने पाय मुडपून बसायला सांगितलं. आभाळाकडे बघत. त्यानं त्यांना सांगितलं की पृथ्वीच्या थोडं वर जिथे आभाळाकडे नजर जाते, तिथे स्वप्नांचा प्रवास सुरू होतो. ढगांना वेगवेगळे आकार फुटतात नि कल्पनांना धुमारे. तो माणूस त्याचं राज्य बनवून निघून गेला, त्याची प्रजा उरली आता. मी पाहिलंय त्यांना नेकचंदच्या स्वप्नांत बुडालेलं. ती सारीच रात्री चांदण्याकडे पाहत राहतात आणि एक घुबड येऊन बसतं रात्री त्यांना साथ द़्यायला.  
पंकज

५ नोव्हेंबर २०१५

Nek Chand - http://nekchand.com/about-nek-chand-2

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

Self Realization


ब्रुजेल्स हे फक्त त्या छोट्या लघवी करणाऱ्या माणसाबद्दल (Manneken Pis) वेडं आहे. बघाल तिकडे त्याचाच फोटो. आणि मुर्ती लहान, किर्ती महान असं वर्णन अगदीच जुळतं याला. लोकं वेड्यासारखी गर्दी करून याला एवढ्या लांबवर पहायला येतात. त्याच्या लघवीतूनच बीअर आणि वाईन पितात. सेल्फ़ी काढतात आणि सेल्फ़ीमधे स्वत:ही तशीच पोज देतात. भारतातून एवढ्या लांबवर मी हा वेड्यांचा बाजार बघायला नव्हतोच आलो मुळी, पण एक गोष्ट लक्षात आली की, असा वेड्याचा बाजार आपल्याकडे नाक्या-नाक्यावर आणि दररोजच पहायला मिळतो. बेल्जिअन लोकांसाठी हा निव्वळ एक टाईम-पास असावा कदाचित.
माझा आजवरचा प्रवास काही उल्लेखणीय नाहीये, पण आत्मचिंतन करायला लावण्याएवढा तरी नक्कीच झालाय. मी फार ऐकलं होतं की युरोपिअन लोकं फार डिसीप्लिन्ड असतात, पाहिलंही ते. त्यांची शहरं, त्यांची रचना, रस्ते, वाहतूक, जेवण, संस्कृती, भाषा, वेष. आपल्यात आणि यांच्यात प्रचंड फरक आहे. एवढा मी नव्हता विचार केला खरंच. भारतातही राज्या-राज्यांमधे बराच फरक आहे, तो वेगळाच. पण भारत आणि बेल्जिअम किंवा इतर कोणताही युरोपिअन देश…यांत स्पष्टपणे जाणवावं इतकं अंतर आहे. मला पुण्याहून बंगलोरला कामासाठी आलेली, नि बंगलोर मानवलं नाही, म्हणून परत पुण्याला गेलेली लोकं माहिती आहेत! हा tolerance कित्येक गोष्टींवरती अवलंबून असावा, पण तो दिसतो. एक गोष्ट खरी आहे, की आता जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, भारतीय लोकं दिसतील. ते पण इतरांना शोधत असतील एखांदवेळेस…
मी भारतातून निघालो तो देशाभिमानाचा मोठा फुगा घेऊन. तो फुगा थोडा अहंभावात रुपांतरित झालेला. पण जसा इथे आलो आणि इकडचं जग पाहिलं; त्या फुग्यातली हवा हळू-हळू सुटत गेली. मग नंतर आपल्या देशाची लाजही वाटू लागली. आपल्या एवढ्या मोठ्या आणि जुन्या देशात आपण काय मुर्खपणा चालवलाय असं वाटू लागलं. हे realization होणं माझ्यासाठी फार गरजेचं होतं. कारण, जोपर्यंत मी स्वत:हून जग बघणार नाही, तोवर मला ते कळणार नाही. स्वत:च्या देशाबद्दल अभिमान असणं साहजिक आहे, पण तो आंधळा नसावा. माझ्यासाठी आजवर तो आंधळा अभिमान होता आणि जरी मी बऱ्याच ठिकाणी फिरलो नसलो तरी, तरी मला आता कळतंय की आपण जगाच्या शंभर वर्षे मागं जगतोय. आपण आपल्या अंधश्रद्धांना देवत्व बहाल करून, देशाला खड़्ड्यात ढकललंय. दीडशे वर्षं इंग्रजांचे गुलाम होतो, ते चांगलं होतं. अन्यथा, या राजांनी फक्त भोग-विलासात आयुष्य घालवून भारताला जगाच्या पाठीवरूनच नष्ट केलं असतं. फार अभिमान वाटावा असा आपला इतिहास नाहीये. या राजाच्या तावडीतून त्या राजाच्या पायाखाली असाच आपला देश चिरडला गेलाय आजवर. आपला देश हा कित्येक हालापेष्टांतून वर आलाय, येतोय…पण इथेही एवढा काही फरक नाहीये. जर्मनीतर दुसऱ्या महायुद़्धात नेस्तानाबूत झालेली, तरी आज मान वर करून उभीय. आणि हे सगळं घडलंय मागच्या पन्नास वर्षांत. इथल्या सोयी-सुविधा भारतात येण्यासाठी निदान पन्नास वर्षांचा कालावधी जाईल…तोपर्यंत जग प्रगतीच्या वेगळ्याच मार्गावर असेल. अर्ध्या ज्ञानात माणूस सुखी असतो म्हणतात, ते काही खोटं नाही! आपण डोळे झाकले म्हणजे जगाला आपलं नागडेपण दिसत नाही, असं भारताला वाटतंय का? काय हे…किती दशकं अजून आपण मागास राहणार आहोत? मागसलेपणा पुरे झाला आता…कामाला लागा. आपला देशाभिमान फुकाचा आहे. आपल्या संस्कृतीबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. आपल्या भाषांची मर्यादा आपणास माहिती नाही. आपण काय केलं पाहिजे, हे आपण मनातल्या मनातच ठरवतो आणि आपल्या कृतींना आपण ऐतिहासिक किंवा पुराणातला काही पुरावा देऊन मान्यता देतो. कोण आहे हिंदू? काय आहे मुस्लिम? काय कळतंय काय आपल्याला या सर्व गोष्टींतून? मंदिरं बांधून घंटा वाजवणारा हिंदू का? एवढ्या समृद़्ध आणि माणसाला माणूस म्हणून जगायचं स्वातंत्र्य देणाऱ्या संस्कृतीचे बारा वाजवलेत आपण कर्म-कांडांना आणि साधू बाबांना महत्त्व देऊन. आंतर-राष्ट्रीय स्तरावर भारत काय आहे तर ‘नमस्ते’ आणि ‘योगा’! बाजार मांडलाय आपल्या दळभद्रीपणाचा. डोळे उघडा आता, देशासाठी काही करा. काय करतात आपले नेते, हे परदेश दौरे करून? काय शिकतात ते? की नुस्तीच गोरी कातडी बघण्यासाठी जनतेचा पैसा बुडवून येतात हे? हे सगळं ज्यावेळी जाणवतं, त्यावेळी खरंच frustrating वाटतं. मला इथे अजून पंधरा दिवसही नाही झालेले, आणि हे वाटतंय. मग विचार करा की जी लोकं वर्षानुवर्षे भारताबाहेर आहेत, त्यांची काय अवस्था असेल? ‘स्वदेस’ मुव्हीसारख्या घटना फार क्वचितच घडत असतील!
पुर्वी मी थोडा हा प्रयत्नही केला की चला अगदीच यांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या नाहीत. प्रगतीचे दुष्परिणामही पाहिले पाहिजेत. पण दुर्दैवाने यात फायदे-तोटे असं वर्गीकरण करणं अवघड आहे. ते शक्य नाही. इथल्या लोकांना शिस्त आहे. कुठून चालावं, कसं चालावं, कशी गाडी चालवावी, रस्त्याचा उपयोग कसा करावा…सर्वच गोष्टी systematic आहेत. बऱ्याच automated आहेत. आजूबाजूला क्वचितच कुणी पोलिस दिसतात...तिकीट चेकर्स दिसतात. जर सर्वांनीच नियम पाळले तर त्यांचीही गरज नाही भासणार. मशिन्सच जास्त काम करत असल्यामुळे लोकांची गरज नाही. जे लोक काम करतात त्यांचं salary structure ठराविक आहे. जास्त पैसे कमवणाऱ्या लोकांवर जास्त tax आहे. गरीब-श्रीमंतांमधली दरी खोल नाही. सर्वच लोक थोड्या-फार फरकाने सारखीच लाईफ-स्टाईल जगताहेत. मी दररोज बर्लिन मधे दोन तास travel करतोय…Institute ला ये-जा. पण या प्रवासात थकवा जाणवत नाही. मी दररोज जाताना दोन ट्रेन्स आणि एक बस बदलून प्रवास करतो. पण हे सर्व transitions फार सोयीस्कर आणि बिनात्रासाचे आहेत. एकच तिकीट सर्व माध्यमांसाठी (बस, ट्रेन, ट्राम) चालतं. तेच जर तुम्ही भारतात कोणत्याही शहरात प्रवास करत असाल, तर प्रवासाशेवटी थकवा जाणवतो. गर्दी असते, बस किंवा लोकल ट्रेनसाठी इकडून तिकडे पळावं लागतं. वेगवेगळ्या माध्यमांमधे ताळमेळ नाही.
लोक आपापल्या कामात बुडालेले असतात. कुणी कुणाचा वाली नाही. ट्रेनमधे प्रवास करताना गर्दीतही फार एकटेपण जाणवतं. लोक फोनमधे बघत असतात किंवा पुस्तक वाचत असतात. कुणी कुणाशी बोलत नाही. कुणी हसतही नाही. त्यांचे चेहरे सप्पक भासतात. कळत नाही की यांना झालंय काय? एखांदवेळेस स्वत:मधेच बुडालेले असतील, उद्याची काळजी असेल किंवा शून्यात गुंतले असतील. कामाचा ताणही असेल कदाचित. यांच्या कामाच्या वेळा फार defined असतात. सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच. त्याआधी किंवा त्यानंतर एक मिनीटही काम नाही करणार. आणि आपण? एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे यांचं social structure. सगळेच स्वावलंबी लोकं…अति-स्वावलंबी. बरीच लोकं एकएकटी राहतात. कुटूंबसंस्था थोडी कालबाह्य झाल्यासारखी. बरीच एकएकटी म्हातारी लोक आजूबाजूला दिसतात. जर बस किंवा ट्रेनमधे त्यांना मुद्दामून स्वत:च्या जागेवरून उठून बसायला जागा दिली, तर त्यांना तो अपमान वाटतो…ते म्हणतात – ‘I am good.’ प्रत्येकाला आपापलं काम स्वत: करायची सवय आहे. बर्लिनमधे तरी जनसंख्या रोडावत चाललीय. शासन मुलं असणाऱ्या कुटूंबांना काही सवलती देतं. अवघडंय. आणि अगदी याच वेळेस लांबवर म्युनिकमधे ऑक्टोबर फ़ेस्ट सुरूय…या सिजनची शेवटच्या बिअरचा आनंद घेण्यासाठी लोक तिकडे गर्दी करताहेत. मी अगदीच योग्य वेळी आलोय बर्लिनमधे. सध्या हे त्यांचं २५ वर्षं आहे जर्मनी reunion चं. इतिहास दाहक आहे, पण त्यांनी केलेली प्रगती त्यांच्या सहनशीलतेचं प्रतिक आहे.  
पंकज 
२ ऑक्टोबर २०१५
Tierpark, Berlin


सोमवार, २० जुलै, २०१५

धरपकड

रानात आता काहीच झाड्ं उरलीहेत, हे माहिती होतं रामूला. पाऊस पण लांबणीवर पडत चालला होता कातरपाड्यात. मागच्या दोन महिन्यात दोनेक दिवस दोनेक थेंब गळल्यासारखे झालेले, की ती ही अफवा होती हे त्या दोनशे वस्तीच्या जुळ्या गावांना माहितीही नव्हते! कातरपाड्यात नि पातरपाड्यात एक छानसं भरगच्च जंगल तेवढं जिवंत राहिलेलं मागच्या दोनशेक वर्षांपासून. दोन पहाडांनी बोटांनी चिमट करून वाहणारी नाजूक नदी गांडूळ पकडावी तसं या दोन पाड्यांनी चिमटलेलं ते सदाहरित जंगल. चिमट घट्ट होईल तसं ते आंधळं गांडूळ फुटणार किंवा पिचकणार. रानाचा पट्टा रूंदीला कमी पण लांबीला अजून शाबूत राहिलेला. जांभळाची नि वडाची उंचच उंच झाडं जंगलाची उंची त्याच्या रूंदीच्या दुप्पट ठेवण्याचा कसा-बसा प्रयत्न करत राहिलेली.

रामू कातरपाड्याचा राहणारा नि लामू पातरपाड्याचा. रामू लाकूडतोड्या नि लामू होता सुतार. रामू नि लामू मिळून काम करायचे, रामूच्या लाकडाचं मोल लामू करायचा. हा त्यांचा धंदा मागल्या दहा वर्षांत चांगलाच भरभराटीला आलेला. जंगल बारीक होत चाललेलं नि रामू-लामूचं कुटूंब रोज त्याच्या जिवावर जगत होतं. खात होतं-पित होतं-वाढत होतं. जांभळाच्या त्या एका उंच झाडावर जंगलातलं शेवटचं एक शेकऱ्याचं कुटूंब तग धरून राहिलेलं. शेकऱ्यानं अजून सहा वृक्षांवर घरटी बांधून ठेवलेली नि पिल्लं अधनं-मधनं वेगवेगळी घरटी फिरत रहायची. शेकऱ्याचं कुटूंब आजू-बाजूच्या झाडांची पानं खात-जांभळं खात-जगत होतं-वाढत होतं. पावसाची त्याला काही कल्पना नव्हती आणि जंगलात अफवा पसरवायला कुणी हुशार प्राणी शिल्लक नव्हतेच.

पाऊस नसल्यामुळे शेतीतूनही काहीच उत्पन्न नव्हतं दोन्ही पाड्यांत. लोक निराश चेहरा करून आभाळाकडे पाहत राहिलेले. लामूच्या दुकानावर गिऱ्हाईक नव्हतं. अगोदरच बनवलेल्या लाकडी वस्तू कुणी घेतल्या म्हणजे मग नविन बनवणार ना. लामूच्या मनात होतं की पाड्यांत कुणाचं लग्न लागलं तर बरं…रामूला सांगून जांभळाचं लाकूड बेडसाठी वापरता येईल. पण सध्यातरी थोड्याफार भरभराटीशिवाय लग्नकार्यही कुणी लवकर उरकणार नाही, असं एकंदरीत चित्र झालेलं. मरणाची रटाळ धरपकड चाललेली दोन्ही पाड्यांत आणि त्या अर्धमेल्या जंगलात.
पंकज

२०.०७.२०१५   

रविवार, १४ जून, २०१५

अजगर

…वाट सोनेरी होती. जंगल गुणगुणत होतं. जंगलाची वर्दळीची वाट. मधेच एक अजगर आडवा. पोट ट्म्म. सुस्त शरीर. अधून-मधून तोंडातून बाहेर पडणारी लवलवणारी जीभ. दोन दिवस होऊन गेले, तसाच तो तिथे. हलू वाटत नाही, चालू वाटत नाही. एक-दोनदा रात्रीच्या वेळी अस्वलानं डिवचलं, तसा त्याच्या अंगावर चालून गेला. मुंगसानं दुपारी फार त्रास दिला…
      पोटातलं चिंकाऱ्याचं पिल्लू जळत होतं आत हळू-हळू. एखाद दिवस आणखीन आणि ते पचून गेलं असतं सगळं…वन्यजीव छायाचित्रकारांची एक जीप अंगावरून गेली; डोकं वेगळं, शेपूट वेगळं; मधलं टम्म पोट चिकाऱ्याला विरघळवत एकटंच उरलं.
      मेला अजगर तरी त्याचे फोटो प्रदर्शनभर कौतुकास्पद ठरले; “A sad roadkill” या नावानं छायाचित्रकार टम्म फुगले.

      मेला अजगर.
Pankaj
24.05.2010

शनिवार, २५ एप्रिल, २०१५

लाल-शेपट्याच्या गोष्टी

टाचण्यांच्यामागे फिरायला नक्की कधी सुरू केलं ते आठवत नाही मला आता ठीकसं. कधीतरी २००९-२०१० मधे. त्यापुर्वीही चतूर पहायचो, टाचण्या पाहिल्या होत्या, पण त्या ओळखता यायच्या नाहीत. तिथेच गाडं अडायचं. एखादया सजीवाचं नाव माहीत नसेल, तर आपण नक्की काय पाहिलं-ते काय करत होतं-ते किती सुंदर होतं, हे सगळं सांगणार कसं? पक्ष्यांची नावं तर लहानपणापासून, छोट्या-मोठ्या मराठी पुस्तकांपासून ते मोठ-मोठ्या ईंग्लिश ग्रंथांतून चाळून काढली होती. पण चतूरांपासून मी आवड असूनही बराच अनभिञ राहिलो. कारण ओळखणार कशा त्यांच्या नानाविध प्रजाती? २००९ मधे सुब्रमनिअन सरांचं एक छान पुस्तक हातात पडलं. आणि मग हे-दणादण चतूर आणि टाचण्या पहायला-अगदी जवळून पहायला मी सुरूवात केली. सुरूवात केली खरी, पण कीटकांनाही मी पक्ष्यांना बघतो, तसंच बघू लागलो. त्यांची बैठक बघावी, ते कसे उडतात ते बघावं, त्यांचे रंग बघावेत, त्यांचे आकार बघावेत आणि या सगळ्यांतून त्या एकमेव पुस्तकात जो फोटो जवळचा वाटतो, तो फोटो म्हणजे ती प्रजात. असं माझं सुरू झालं. त्यात बऱ्याच चुका केल्या. दोन मजेशीर गोष्टी आठवतात. सिंधुदुर्गातल्या आंबोलीत एक नाजूक पारदर्शी, पण चांगलीच मोठी टाचणी पाहिली. टाचणी कसली? सुईच ती! २०११ मधे. ती नुकतीच पाण्यातल्या किड्यापासून पंख ल्यालेली टाचणी बनली होती. मी तिला पाहिलं, फोटो काढले. पुस्तकात पाहिलं आणि म्हटलं की ही आहे Great Emerald Spreadwing. खरं तर ही प्रजात सापडते उत्तर भारतात, मग ती आंबोलीत कशी? दुसरी मजेशीर गोष्ट म्हणजे पुण्याजवळच्या कवडीच्या अतिप्रदुषित पाण्यात पाहिलेली Malabar Torrent Dart. ही प्रजात पश्चिम घाटात, स्वच्छ ओढयांच्या प्रवाहात सापडणारी. मग ती पुण्याजवळ कशी? या दोन्ही मजेशीर गोष्टी म्हणजे चुकीचं identification. Great Emerald Spreadwing खरं तर Clear-winged Forest-Glory होती आणि Malabar Torrent Dart खरं तर Black-winged Bambootail होती! मग हळूहळू कळू लागलं, की चतूर आणि टाचण्या हे पक्ष्यांपासून भिन्न आहेत. त्यांना बऱ्याचदा पकडावं लागतं आणि सुक्ष्मदर्शीखाली न्याहाळावं लागतं. बऱ्याच लोकांनी सांगितलं की फ्रेझरची पुस्तके वाचा. मग हळू-हळू त्या पुस्तकांचा अभ्यास करून काय योग्य-काय अयोग्य ते सुद्धा कळू लागलं.

कवडीच्या अतिप्रदुषित नदीच्या काठाने बरीच बाभळीची झाडं-झुडपं आहेत. तिथे पहिल्यांदा Coral-tailed Cloud-Wing (नभपंख?) पाहिला. फार सुंदर चतूर. दोन्ही पंखांवर त्यानं सुंदरसे दोन निळे ढग पेललेले. शांत बसलेला. सरळ अगदीच काठीसारखा. आणि मग थोडं अजून पुढे गेल्यावर Asiatic Blood-tail (लाल-शेपट्या?). या लाल-शेपट्याची समाधी अवस्था मला फार प्रिय आहे. शांत, एके ठिकाणी बसून राहणार आणि अचानकच झपाट्यात किडे पकडून पुन्हा त्याच काठीवर. उत्तर अंदमानात, चालीस एक मधे मी २०११ मधे काम करायचो. तिथे दररोज संध्याकाळी आमच्या कॅम्पच्या थोड्या वरच्या अंगाला थोडी मोकळी जागा होती. आजूबाजूला गुहाच गुहा. त्या मोकळ्या जागेत सुर्य मावळू लागला की मी येऊन बसायचो. दिवस संपत आलेला असायचा. मी बाजा हातात धरून ठेवायचो आणि वारा वाहू लागला की वाजवायचो. घर दूर होतं. तिथे एक लाल-शेपट्या यायचा, दर संध्याकाळी. त्याच जागी, दररोज. त्याची बसण्याची जागा ठरलेली. छानशी लाल शेपूट होती त्याची. एकटाच नर होता. यायचा-बसायचा-उडायचा-जेवढं शक्य असेल तेवढं खाऊन घ्यायचा. अंधार पसरू लागला की अचानक गायब व्हायचा. हे सलग पंचवीस दिवस चाललं. मधे एक-दोन दिवस फार पाऊस झाला, त्यावेळी डोक्यावरचं छत सोडून जायची इच्छा नव्हती. पंचवीस दिवसांनंतर मी दुसऱ्या कॅम्पवरती गेलो. आठवड्याभरानंतर परत आलो, तेव्हा तो कॅम्पच्या अगदीच जवळ दिसला. त्याच्या बरंच जवळ जाऊन फोटो काढले. एवढ्या साऱ्या दिवसांत मी त्याला एकट्याला सोडलं तर इतर कुठलाच लाल-शेपट्या नाही पाहिला त्या बेटावर कधी!

या चतूर-टाचण्यांचं वेड हळूहळू लागलं मला. बरेच मजेशीर अनुभव आहेत. २०११ मधे उत्तर अंदमानातल्या इंटरविव्ह बेटावरती पाहिलेल्या सुंदर टाचण्या. तिथे वाहणारा एक गोड्या पाण्याचा ओढा, समुद्राला अगदीच लागून. त्या ओढ्याच्या आजूबाजूला हत्तींचे ठसे, अगदीच ताजे. माझे डोळे कॅमेऱ्यात, पाय निदान गुडघ्या-एवढ्यातरी चिखलात रूतलेले. जस्टिन- माझा field assistant ओरडून-ओरडून थकलेला, “सर, चलो. हाथी आयेगा!”. कसेबसे तिथून बाहेर पडलो आणि नावेत बसलो, तर बहाद्दर सांगतो मला की त्यानं हत्ती अगदीच तीसेक फुटांवरती पाहिला. झुडूपामागून पाहत होता तो मला नि जस्टिनला. २०१३ मधे पारपोलीला एका छानशा ओढ्याच्या मध्यभागातून चालत होतो. आजूबाजूला Malabar Torrent Darts उडत होत्या. ओढ्याला चांगलाच प्रवाह होता आणि गळ्यात दुर्बिण नि मोठाला कॅमेरा घेऊन चालणं कठीण झालं होतं. सॅण्डल्स किनाऱ्यावरतीच सोडल्या होत्या. चालता-चालता पाय सटकला आणि पाण्यातल्या दगडावर आपटलो. दुर्बिण भिजली, पण कॅमेरा वाचला! २०१३ मधेच कोयनेच्या काठी वसलेल्या अरव गावात सर्व्हे करत होतो. कोयनेच्या धरणाच्या पाण्याच्या काठाकाठाने फिरत होतो. एक अगदीच वेगळी टाचणी दिसली. वाटलं, हे काहीतरी खास आहे. दुर्बिण नि कॅमेरा घेऊन हळूहळू तिच्याकडे सरकू लागलो. अगदीच उतार होता आणि बराच चिखल होता. अचानकच पाय घसरला आणि मी अख्खाच्या अख्खा धरणाच्या पाण्यात. पाणी गार होतं आणि चांगलंच खोल होतं (20 फुट?). सुदैवाने घसरताना मी दुर्बिण काठावर ठेवू शकलो, पण कॅमेरा माझ्यासकट पाण्यात गेला. बाहेर लगेच येता आलं नाही. काठावर कुठे धरायला काही दगड-धोंडे नव्हतेच. फक्त चिखल होता आणि जिथे जिथे पकडायचा प्रयत्न करायचो तिथे-तिथे सटकायचो. कसा-बसा कॅमेरा काठावरच्या एका झाडाला लटकवला आणि चिखलातून सरपटत काठावर आलो नि मग तसाच सरपटत तो सगळा चढ पार केला. एक लांब काठी आणली आणि झाडावरचा कॅमेरा मिळवला. ती गूढ टाचणी काही मिळाली नाही, कॅमेरा मात्र त्यादिवशी उन्हात वाळवत टाकावा लागला!