गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

दगडाळलेला काळ, त्या काळातला गाळ

प्रत्येक कलाकार हा त्याच्या विश्वात जगत असतो. तिथे त्याचं राज्य असतं. त्याची लोकं, त्याची माती, त्याचे प्राणी नि त्याच्या कल्पनांची घरं वसलेली असतात. त्याच्या भूतकाळाचा गाळ त्या राज्याचा मातीखाली अधून-मधून पसरत असतो. मातीवरची घरं मजबूत असतात नि घरांमधली पात्रं खरी असतात, पण त्या सर्वांना वेदनांचा एक शांत आधार असतो. वेदना या दु:खदच असतील असं कुणी ठरवलंय का? मी तरी नाही. वेदना या शब्दातच यातना, त्रास भरलेला आहे असं लोक म्हणतात, ती एक ठसठसणारी जखम असल्यासारखी भासते काहींना…पण काही वेदना या उलट आनंददायी असतात. आठवतं का कधी काळी सुजलेल्या बोटावर टिचकी मारली की उठणारी कळ किंवा फुटलेल्या ओठांना दातांनी दाबताच जागणारी नाजूक कळ नकोनकोशी पण फार हवीहवीशी वाटलेली? आठवतच असणार. वेदनाच ती. ती जिथून उमटली तिथंच मिटली, तर कशी काय त्रासदायक? ती उमटताना क्षणभंगुर का होईना, आनंद देऊन गेली, की का होईल त्रासदायक?

असाच एक माणूस होता. तो दररोज सकाळी आवरून कामावर जायचा. दिवसभर ईमाने-इतबारे काम करून थकून संध्याकाळी घरी यायचा. त्याचं हे आयुष्य कितीतरी वर्षांपासून चाललेलं. मग एके दिवशी त्याला वाटलं की आजूबाजूचं जग तुटत चाललंय-फुटत चाललंय; पण तो त्याचं काम करत राहिला. त्यानं आजूबाजूला ओरडणारी लोकं पाहिली नि तुटणाऱ्या भिंती पाहिल्या. त्यानं मोडलेली माणसं पाहिली नि रक्ताळलेले रस्ते पाहिले. त्याला भिती वाटली, पण तो काम करत राहिला. त्यानं माणसांमधे राक्षसं पाहिली नि फुटलेले हंडे पाहिले; त्यानं कापलेली जनावरं पाहिली नि चाबकानं फोडलेल्या पाठी पाहिल्या; त्यानं मेलेली फुलपाखरं पाहिली नि जगाचा ऱ्हास होताना पाहिला. तो दररोज कामावरून घरी आला की घाबरा-घुबरा व्हायचा. त्याला घाम सुटायचा. त्याच्या मनाला यातना व्हायच्या नि तो त्यांना दाबून स्वत: जिवंत असल्याची खात्री करून घ्यायचा. तो म्हणायचा, काय रे देवा, हे काय सुरूय? तो म्हणायचा, कधी हे थांबणार? कधी ती सुंदर गावं, लोक, पाणवडे, नद्या नि तलाव, रस्ते होणार? तो रहायचा त्या तळ्याकाठी रान माजलेलं. त्या माजलेल्या रानात होती तेव्हाही जंगली श्वापदं. त्यानं विचार केला की माणसांपेक्षा हे रान बरं. जंगलात एकांतात मनाशी गुजगोष्टी होतील. त्यानं एके दिवशी संध्याकाळी त्या रानात प्रवेश केला. थोडं भित-भितच तो आत शिरला. त्याला वाटलं, जर इथेही असतील माणसं तर परत फिरलेलंच बरं. पण त्याला रानात कुणी भेटलं नाही. डोक्यावरून पोपट उडत गेले नि संध्याकाळ झाली तसे काजवे उडू लागले. तो दोन्ही पाय मुडपून, कमरेत घेऊन, अंधारलेल्या आकाशाकडे बघत राहिला. झाडांच्या पानांच्या पसाऱ्यातून एक-दोन चांदण्या तो पाहत राहिला. अंधार गोठू लागला तशी थंडी वाढली. एक घुबड त्याच्या डोक्यावरच्या फांदीवर येऊन बसलं. ते थोडं घुमलं नि चांदण्यांकडं पाहत राहिलं. माणसाला मोकळं वाटू लागलं.


मग तो पुढच्या दिवशी परत त्याच जंगलात आला, संध्याकाळी. नि असा तो तिथे दररोज येत राहिला. तो वीस वर्षे येत राहिला. ते एकुलतं घुबड दरम्यान वारलं, पण त्याची पिल्लं कौतुकाने माणसाचं काम बघत बसू लागली. तो माणूस पहिल्यांदा माती घेऊन आला, मग दगडं घेऊन, मग भिंतींचे तुकडे घेऊन, बांगड्यांचे तुकडे घेऊन आला. पण तो मातीच्याही अगोदर मनात ठसठसणारी वेदना घेऊन आला. तो त्या जागी आशा घेऊन आला. आशा…तुटलेल्या गोष्टी जोडण्याची. त्यानं सुरूवात केली, मोडलेली माणसं जोडण्याची नि तुटलेली घरं उभारण्याची. त्यानं तळ्याकाठी धबधबा उभारला. त्यानं त्याच्या स्वप्नातलं, पण आता तुटलेलं गाव तिथं वसवलं. त्यानं प्राणी आणले…वन्य आणि पाळीव. त्यानं लोकं उभारली…शीख, हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन. त्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. त्यांना त्याने पाय मुडपून बसायला सांगितलं. आभाळाकडे बघत. त्यानं त्यांना सांगितलं की पृथ्वीच्या थोडं वर जिथे आभाळाकडे नजर जाते, तिथे स्वप्नांचा प्रवास सुरू होतो. ढगांना वेगवेगळे आकार फुटतात नि कल्पनांना धुमारे. तो माणूस त्याचं राज्य बनवून निघून गेला, त्याची प्रजा उरली आता. मी पाहिलंय त्यांना नेकचंदच्या स्वप्नांत बुडालेलं. ती सारीच रात्री चांदण्याकडे पाहत राहतात आणि एक घुबड येऊन बसतं रात्री त्यांना साथ द़्यायला.  
पंकज

५ नोव्हेंबर २०१५

Nek Chand - http://nekchand.com/about-nek-chand-2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: