बुधवार, २५ मार्च, २०२६

लुप्त

काळजात कालवलेला पृथ्वीचा गोळा, चोळा-मोळा करून घास भरवलेला तू मला; मग जातेस दूर, का अशी? तुझा धरलेला गच्च हात सोडू नाही शकत, ना तुला ओढून अंगभर अंगात आणि मग विद्रुप अभद्र राक्षसासारखा घोट-घोट घशात मग पोटात कच्चं सरकवू पचवू शकत!

पण तू हवी आहेस. इतकी की तुझ्यात आत चालत जाईन आणि आरपार जाईन. तुला भेदून! तुझ्या-माझ्या, माझ्या-तुझ्यात, नको हवा विरळही! इतकं घट्ट आणि इतकं पक्कं, अगदी भिंतीसारखं. कुणीच फोडू शकणार नाही. कुठे भगदाड नाही की पोपडे नाही उडणारे. आणि मग तू आणि मी अशे एवढे पक्के झाले तरी मी तुला जगायला मोकळं सोडणार की. तुझं आणि माझं जग चालेल समांतर.

मग त्यात तू जाशील शॉपींग करायला एखाद़्या महागड्या, अवघड नावाच्या मॉलमधे. आणि तू कॉफी पीत बसलेली असतेस आणि डाव्या कोपऱ्यातल्या एका टेबलावर मी माझ्या काळ्याकुट्ट गॉगलमधून तुला न्याहाळत असतो. माझ्या काळ्या गॉगलसारखेच माझे तुझ्याविशषयीचे सगळेच विचार काळेकुट्ट असतात. पण तरीसुद्धा तू मला एकदा बघतेस. मग पुन्हा…आणि पुन्हा बघितल्यासारखे करतेस. मी लाल शर्ट घातलेला असतो. “का” विचार? विचार ना, “का?”

कारण मी तुला फाडून खाणार असतो. असं गच्च पकडून त्याच त्या विद्रुप अभद्र राक्षसासारखं. कारण तू फक्त माझीच असते. आणि तू कुणाचीच नसते. या, त्या, तिच्या, त्याच्या, त्यांच्या जन्मात. तू आणि मी. सोप्पं साधं समीकरण आहे. त्यात गुणाकार, भागाकार नसतो. येस…तर, मी लाल शर्ट. मी उठतो, मी तुझ्याकडे यायला निघतो. तुझे डोळे बिथरतात. तुझी मैत्रिण घाबरते, पण गालात हसते. मी गॉगल काढून खिशात ठेवतो. तू जीभ चावतेस. तुझे काळेभोर लांब केस हवेवर उडतात. ते मला हाक मारतात, तू लाजतेस, घाबरतेस; नको हवं तुला हे सगळं. मी जवळ येतो.

तुझ्या समांतर जगातून तू मला बघतेस. काय उरलंय आता? दोन हातांचं अंतर. एक तुझा तू पुढं कर, एक मी माझा. आणि तुला पकडून मग बघ कसा गच्च ओढून् घेतो तुला इकडच्या लेनवर. का पाहिजे तुला तुझं समांतर जग. आहे हे एक आहे. असं इथं चिकटून.

मी आलो श्वासाच्या अंतरावर आणि तू अशी कशी विरघळतेस. तुझ्या ओठांची कातडी आणि तिच्यामधला गुलाबी रस आणि तो ओघळलेला एक थेंब असा झेलावा अशी इच्छा आणि तू समुद्रकिनाऱ्याची वाळू होऊन का अशी माझ्या हातातून निसटत चाललीय गं?

तुझ्या माझ्या धमन्यांतून एकच रक्त वाहतंय ना, मग डुबतेस का कासवांच्या प्रदेशात. किती गुदमरतो जीव माझा, अशी डुबूनही रक्तात भिनत जा की जरा; आणि मी ही मागे-मागे, समुद्राच्या तळाशी का ही आग? गोष्ट माझी आहे, तुझी नाहे. तू वाचायची आणि तोंड वाकडं करायचं फक्त. तेवढ्य़ात तुला गच्च पकडून अंगात ओढून घेईन आणि आकाशी उंच उडी मारून आभाळातून चंद्रावर आणि मग आपल्या त्या मालकीच्या घरातल्या टेरेसवर स्पायडर-मॅन सारखं. आणि मग तू बघशील असं माझ्याकडे. तोच तो वारा, तुझ्या अपुर्वाईच्या भुवया आणि गालावर सखोल खुललेलं प्रेम माझ्यासाठीचं फक्त.

मी जवळ येतो, तू विरघळत जातेस. मी तुझ्या मानेजवळ येतो. तुझा गंध, तुझी सय, तुझं अंग, तुझा स्पर्श, तू तू आणि तुझं तुझं, सगळं गं कसं तुझं जग??? तांबडे डोळे, विस्कटलेलं शरीर; तरल द्रवात तू आणि मी, कसे सांगू सई, मम आत्माच्या व्यथा, तुच कविता आणि तूच माझी कथा!

आता किती खोदू तीच ती शेवटची आठवण आणि लालसर पडलेला सुटत चाललेला तुझा तू निष्प्राण हात, तुझा देह, तुझा गंध…आत-आत समुद्रात जाताना पाहताना. मी कुठवर डुबू आता, तुझ्या नाहीश्या जगात प्रिये? अशी कशी समुद्र झालीस तू आणि मी वाळू.

पंकज । २५ मार्च २०२६



शनिवार, १० जानेवारी, २०२६

विरघळणवूक

 काळ्या कॉफीत तरंगणारे ढग,

वाहणारी नदी, शांत सारंग,

माझ्या दुनियेतला अद़्भुत क्षण,

नि भरकटलेले एक मन.

 

आज, उद्या, किंवा परवा-तेरवा,

दिवसांचा क्रम, थोडा मोडका,

अशातही शरीरांची तहान,

वृद़्ध वृक्षाच्या कण्याचा ऒंडका.

 

तू दोन ढग प्यायलेस का?

पोकळ आभाळ माझ्यासाठी,

वाऱ्यावरती नदीच्या काठी,

सोडवतो विचारांच्या गाठी!

 

ती थंड हवा, तो शहारा,

मला न तुला, ना, मग कुणाला?

अंगावरी येई दवाचा पसारा,

गोठवून ठेवी, शब्द-शब्दाला.

 

हे नातं कसं तरल, मृदु, नाजूक;

तरी कुणी कुणाचे कुणास ठाऊक?

संग पडला की जीव जडला?

ढग विहरतात, आभाळ मूक;

 

तव काळजात मी रसभरून,

नि तव माझ्यात भिनून…

 

-       पंकज कोपर्डे । १० जानेवारी २०२६



बुधवार, ७ जानेवारी, २०२६

द्रव्य

 पावसात तू कविता होऊन

अंगावर बरसताना,

अतिशय घम्माड झालेलं

मन आणि थरकतं अंग!

 

हाताला स्पर्शून जाते तू,

न अंगावरचे शहारे पोरके,

का गं असा करते,

काळजाचा भुगा उगा?

 

सरपटत आलो तुझ्यापाशी

पांगळं घेऊन बेघर मन,

जायबंदी करून स्वत्वाला,

शोधत गंध तुझा!

 

विषारी ही हाव तुझी

हवीहवीशी का वाटते?

भक्ष्याला भूललीस की

भक्ष्यच झालीस तू?

 

हा संग नुस्ता, नाही बंध

मी-तू द्रव्य, आणि रात्र

ती ही विरघळणार नि,

अस्ठी उरणार मात्र!

 

आणि तू-मी वाहत,

झरा-ओढा, मग नदी;

अणू-रेणूही उरून वाहून,

वेळही सोडेल कधी!

 

पंकज कोपर्डे 

०७ जानेवारी २०२६



शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

RHI! राही


तुझं हसणं आणि असणं,

जसं हृदयाचं माझं पातं,

गार भर्राट वाऱ्यावरती,

थेंबार झपाट भरकटणं! 


तुझ्या ओठांच्या हालचाली,

आली लाली ती गाली,

आणि ते केस; नव्हे रात्री! 

पकडे मला कात्रीत! 


ती हुंकार देती पैंजणे,

नि हुलकावण्या कानातली डुले,

वेड पाखरू मन माझं,

तुझ्या गर्द बटांवर झुले!


तू असतानाची वेळ, 

अशी मंत्रमुग्ध अनोखी,

तू नसताना जवळी,

मन बिथरे, मी अनोळखी! 


अशी उबदार, हवीहवीशी,

तुझी कव, तुझा स्पर्श,

मन तुझं माझ्या मनात,

तेव्हा लागे शून्याचाही अर्थ! 


तुला जवळ बोलावून,

माझ्या स्पर्शात सामावून,

माझ्या, माझीयाचा कढ,

तुझ्या, तुझीयात ओढ! 


- पंकज / ०६/११/२०२४

दुबई

 

तू उजाड रान असताना,

मी पाऊस होतो चुकार,

आणि वाळवंटाच्या मनातला

नाजूकसा पानेरी हुंकार


माझ्या भेगाळलेल्या रेतीवर

उंटांच्या पाऊलखुणा,

आणि कैक वर्षांच्या,

भळभळनाऱ्या जखमा! 


का पडावे जगापाठी,

का म्हणवून घ्यावे माती! 

उपसून कोथळा माझा,

रक्ताचंच करेन पाणी!


आज भूत गोठवून माझा,

जगतो वर्तमानासाठी,

ही जमीन मी बाटवली

पळतो भविष्यापाठी,


हाडा-मांसाचे बांधले मनोरे,

सिमेंटाची ओतली पोती,

लोखंडाचा जाळ ओतून,

मिरवली सोनेरी छाती! 


मी पळत राहिलो मृगजळामागे

अथक-अथांग-अविरत, आई!

सोलवटून  खाल्लं तुला

नि बनलो मी दुबाई! 


- पंकज कोपर्ड / २१ Nov २०२४

अजाण

 तुझ्या असण्याच्या चंद्र-चांदण्या,

आकाश निरभ्र असतानाही,

मनात चमकून जातात,

आणि तरीही तू अजाण! 


तुझ्या असण्याच्या आठवणी,

शहारे बनून प्रगटतात,

अंगभर आणि पसरतात,

पण तू निरागस अजाण!


तू नसतानाचा त्रास,

किती अफाट, अशक्य,

तरीही जगतो या कल्लोळात,

आणि तू असतेस अजाण!


तू नसतानाही काही गोष्टीत

असतेस अशीही मुरलेली,

घुसमटतो जीव तसाही,

आणि पाखरा तू अजाण! 


गर्द तपकिरी रंगाची स्मृती 

तुझ्या दाट प्रेमात गुंगली मती! 

जिवाचं काहूर माजलेलं,

तू थोडं तरी जाण! 


पंकज | १२ जानेवारी २०२५

Wonder!

 

I often wonder,

when was the last time,

the time we thought,

the time we wondered,


something interesting,

something out of the world,

something we missed,

is going to happen?


the answer to the quest,

not so difficult!

Guess! Be my guest,

is "always"!


...and when we travel,

with an open mind,

maybe will come across,

our kind!


- Pankaj 

18 January 2025