रविवार, ७ एप्रिल, २०२४

हवा

 ती पश्चिमेकडून येणारी हवा,

ताटकाळलेली दरवाजात किती तास!

दरवाजा उघडला तेव्हा, घाईने आली आत,

म्हणाली, किती रे देतोस त्रास?


दूर दूर डोंगरांपलीकडून रोरावत मी येते,

दऱ्या-खोऱ्यांत शीळ घालत, तुझेच गाणे गाते!

लांबसडक काळेभोर केस, नदीभर माझी सावली,

अनामिका मी महाकाया, कोणाच्या फुफ्फुसांत मावू मी?


एखादं चावट, उगाच पिंगा घालतं वावटळ, 

चाचपडते माझं अंग, उन्हाची एखादी झळ!

त्याच्या अंगभर जेव्हा होतात, समुद्राच्या मनातल्या लाटा,

क्षणात आणि होती वेगळ्या, त्याच्या-माझ्या वाटा! 


रोज संध्याकाळी, मी येते इतकी उत्कट

भेटायला तुला, तुझ्या प्रदुषीत शहरात!

अंगावरती जखमा होतात, 

घुसमटते मी, तुझ्या शहराच्या जंजाळात


ती इतकी खोलवर, ती इतकी वरवर

ती कुणाची असो-नसो; पण माझी घरभर!

ती घेते मला लपेटून, दरवाजा उघडतो तेव्हा;

ती पश्चिमा इथे माझी, आठवण काढतो जेव्हा!!!


- पंकज । ०८ ऎप्रिल २०२४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: