शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१३

Untitled note#01


हे लिहीण्या-न-लिहीण्याचं प्रकरण कधीतरी अंगलट येणार असं फार पुर्वीपासून वाटायचं मला. ते घडलं नाही म्हणून लिहीत गेलो. आता अचानकच काहीच लिहू वाटत नाही. आता एकेका अंगलट आलेल्या गोष्टीची उशी करून छानसं झोपू वाटतं. तिच्याच कुशीत, स्वप्नांच्या गावांत, शांतपणे. धावपळ झाली, झटाझट झाली, टकराटकरी झाली, नजरेचे बाण छेदून गेले हृद़्यांना, ती अगदी घराचं माप ओलांडूनही आली नि मग गोष्टच संपली. या गोष्टी अशाच संपणार होत्या, हे माहिती असतं तर लिहायलाच घेतल्या नसत्या ना! पण हे सगळं असंच असावं! लिहीताना तरी काय भान असतं म्हणा. कुठे? काय? लिहू वाटेल ते! वाटलं लिहीलं…वाटलं बदललं. जे लिहीलं, ते घडलं. माझी लागली वाट. एक वाट, वाटलेली साधी-सोपी-सरळ, तीच निघाली मुळात नागमोडी नि अस्ताव्यस्त. काय गरज होती? कशाचीच? म्हणजे अगदी लहानपणापासून सांगायचं तर पत्त्याचा बंगला, मग तो मोडला, मग परत बांधला, मग तो मोडला, मग तो परत बांधला (जरा विचारपुर्वक), मग तो मोडला…मग आता मी लिहीतोय. पत्त्याचा बंगला नाही बांधायचा मला, घर बांधायचंय…माझं घर. मजबूत नि गोंडस.
मी हाक मारली, तेव्हा ती फार दूर पोहोचली होती. किंवा मी हाक उशीरा मारली! नुस्ताच वारा वाहत राहिला नि मला रात्रभर स्वप्नं पडत राहिली. सुंदर स्वप्नं. जाग आल्यावर अंगावर आलेला काटा. भिती. ती इतकी दूर पोहोचलेली की, घाबरण्याशिवाय माझ्याजवळ काहीच उरलेलं नव्हतं. माणसांत घडणारी स्थित्यंतरं भयानक असतात. काहीच्या काही. वाईट वाटतं. वाटणारच. कथाकाराच्या हातून कथा निसटत चालली की वाईट वाटणारच…त्रागा होणारच. आणि त्या कुरवाळत बसाव्याशा वाटणाऱ्या आठवणी. किती त्या नाजूक-गोंडस नि romantic. मेंदूतला तो दरवाजा उघडला की श्वास घेणं मुश्कील होऊन जातं. सगळंच मनभर पसरतं. स्वत:चाच विसर पडतो नि घरभर कचरा होतो. झाला होता, आता आवरून ठेवला. आता त्यांना मुस्क्या बांधून कोंडून ठेवलंय आत कुठेतरी, चावी गिळून टाकलीय शेजारच्यांच्या कुत्र्याने. कुत्रं नुकतंच मेलंपण. जलपऱ्या आहेत या आठवणी. गाणं गातात नि भोळसट माझ्या विचारांना काबूत करत जातात. आतल्या आत किती घडामोडी घडताहेत, कुणाला माहिती. कधी-कधी जळजळतं नि त्रास होतो, तेवढाच जाणवलाय आजवर. सध्या तब्येत छान आहे, त्यामुळे असेल लिहू वाटलं. पण ते अंगलट येणार असं वाटलं होतं…ते येऊन गेलं कधी तेच आता आठवेनासं झालंय़. देवा (असलास तर), एकच गोष्ट कर…सगळ्यांना आनंदात ठेव. कथाकारांना दु:खीच ठेव आणि तू स्वत: डळमळू नकोस. तू डळमळलास तर माझ्याकडून काय अपेक्षा ठेवशील?   
- पंकज कोपर्डे
३० नोव्हेंबर २०१३