मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०२३

कथा

 नखाने खरवडत आतापर्यंत अर्धा चंद्र तरी झाला असेल टेबलावरती. एक खट्याळ बट अगदी गालापर्यंत आलेली आणि उनाड वाऱ्यावर झुलणारी. ती अगदी विचारांच्या ग्लानीत गेल्यासारखी बसलेली; गुलमोहराच्या झाडासारखी, फुलांच्या ताटव्यांनी भरलेली! तिचा आयुष्याचा प्रवास मागच्या पानांत हुडकत असावी अथवा हातातल्या पुस्तकात वाचत असावी. तशा त्या ईंग्लिश पुस्तकाला विशेष कथा नव्हती, पात्रं नव्हती, आणि जिव्हाळा वाटावा अशी नाती नव्हती. लांबसडक नाकावरचा चष्मा नीटसा करत ती एकटक एखाद्या मातकट पानाकडे पहायची आणि सहा सेकंदाचा द्दीर्घश्वास घेऊन पान उलटायची. कथा नाव होतं तिचं आणि तिच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याएवढं साधं-सोप्पं नव्हतं.

कॅफेच्या काचेच्या दरवाज्यात उभं राहून मणूर तिच्याकडे पाहत राहिला आणि आत जाऊ की नको या विवंचनेत तिथेच घुटमळत राहिला. कथा…अथांग समुद्रासारखी. तिचं आयुष्य म्हणजे एका कुपीत जपून ठेवलेल्या गुपीतासारखं पण मणूरपुढे ती पुर्णपणे मोकळी झालेली. सडपातळ बांधा. उंच, सुरेख, चुणचुणीत तिशीतली मुलगी, सध्या आखीव-रेखीव जीवन जगणारी. अगदी काही महिन्यांपुर्वीच कित्येक दिव्यांतून निसटलेली आणि अजूनही विश्वास बसत नाही की ही कशी जिवंत राहिली. मणूर तसा तिचा लहानपणीचा मित्र. कित्येक वर्ष मित्र म्हणूनच राहिलेला कथाबरोबर. मित्र म्हणूनच जन्मला, वाढला, वेळोवेळी सांभाळला गेला. पण अशा एका वेडसर धुंद रात्री, ज्यावेळी कथाला वाटलं, त्यावेळी मणूर तिचा झाला. ती रात्र उलटूनही होऊन गेलेले दोनेक महिने; पण मणूरच्या मनातल्या शंका शमता न शमलेल्या.

कथा दिसायला सुंदर देखणी. तिचे मनमोहक डोळे आणि नजाकतभरी मान, मणूरने कित्येकदा हरवले होते भान. ती त्याला हवी होती, पण अशी नको. कथाच्या स्वभावाचा थांग काही मणूरला लागला नव्हता, एवढ्या वर्षांनंतरही! मणूर तिच्याजवळ असूनही तिला कधी समजू शकला नव्हता. कथा त्याला अशी नको हवी होती. कथा होती कशी? कथा जशी कुणी लिहीत जाईल तशी प्रगट व्हायची. तिच्या वेळेला काही थांग नव्हता, ना तिच्या विचारांना लगाम. ती हवी तशी, हवे तिथे जायची; बघायची, अनुभवायची आणि बऱ्याचदा अड्चणीत पण यायची. तिच्या अशाच हेकेखोर आणि हट़्टी स्वभावाचा मणूरला तिटकारा यायचा. कथा जगातले सर्वच अनुभव घेण्यासाठी आतुर होती आणि सतत म्हणतही रहायची.

कथाचा फोन वाजला. मणूरने काचेतूनच पाहिले. ती थोडावेळ फोनकडे एकटक पाहत बसली. विचार करत असेल, घेऊ की नको. मणूर आज तिला कॅफेमधे त्याचा निर्णय सांगणार होता. हे असेच चालू राहणार की आपण दोघे काहीतरी एकदाचं ठरवू…एकत्र राहू, किंवा तुटून जाऊ. कथाने तो फोन उचचला. ती बोलली. मणूर दरवाजा ढकलून आत आला. त्याची आणि तिची नजरानजर झाली. तिच्या नाजूक डोळ्यांत पाणी साचलेलं. एक थेंब डाव्या गालावरून कणभर मस्कारा घेऊन सुसाट आदळलाही मातकट पानावर. मणूरने नजरेने नाही म्हटले आणि त्याने तशीच पाठ फिरवली. “कथा, काय झाले? बोलत का नाही? मणूरचेच आहे ना बाळ?” कथाची मैत्रिण शेफ़ाली फोनच्या पलीकडून विचारत राहिली. कथा मुकी झाली. कधी कुणाच्या रेघोट्या अंगावर ओढून घेतल्या आणि अंग नि अंग स्वाधीन दिलं कुणाला हे तिला अजूनही आठवलं नव्हतं. तिला मणूर लांब जाताना तेवढा दिसत राहिला मात्र!

कथा इथेच संपली.

पंकज कोपर्डे । ३ ओक्टोबर २०२३ 
 


   
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: