माझ्या मैत्रिणीच्या गावात बांधावर उगवलेल्या गवतात वाट काढणाऱ्या शेळ्या नि काठी मानेवर टाकून बीटल्सची गाणी गुणगुणत चाललेला मेंढपाळ. लहानपणापासून आकाश वेढायला वेडं झालेलं एक अतिउंच अतिविचित्रसं झाड. त्याचं सारं लक्ष एकट्या आकाशाकडे नि अंगाखाद़्यावर लगडलेली फुलं-फळं-पानं-झोपाळे…साऱ्यांसाठी ते अनभिज्ञ! बांधावर एकटीच बसलेली ती गोगलगाय नावाची संथ गुंडाळी. किती निक्षून बघतीय; तिला रस्ताच माहिती नाही…जायचंय कुठे ते! एक सुंदरसं तळं नि तळ्याशेजारी ते तेजोगोल झाड. त्याचं स्थानही तसंच अढळ. त्यावर सुगरणींची घरटी. वाऱ्यावर निवांत लगडलेली. वादळाची-पावसाची-ऊनाची नि कुणाकुणाचीच भिती नसलेली. तळ्यात मासे, कासवं नि काठावरती कोवळं ऊन, गारगोटीसारखा वारा नि हवाहवासा वाटणारा एकांत! तो मैत्रिण चितारत नाही; हे फक्त आपण समजून घ्यायचं! मैत्रिणीच्या गावात आसमंतभरून गाणी नि हवं ते हव्या त्यावेळेस ऐकता येतं. ज्याला हवं ते! पाऊस नसताना ऐन भरात आलेला मोर पाहिलाय का कधी? मैत्रिणीच्या गावात आहे खरा.
मैत्रिणीच्या घरात कोंबड्यांची पिल्लावळ. चिवचिवाट नि कामं करून घराला डोकं टेकवून निजलेली बैलगाडी. अगदी तिच्या घरामागेच वारल्यांचे डोंगर. डोंगरावर मध्यभागी गणेशाचं देऊळ. नि नुस्ती नाचगाणी, भरल्या दुपारी! मैत्रिणीच्या गावात सुर्य नाही, ढगही नाहीत; नाही पाऊसही…हे फक्त आपण समजून घ्यायचं!
मैत्रिणीच्या गावात चक्रावलेला वावर; कुठं जायचं कळत नाही म्हणून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलाय खरा; पण आता गावाच्याच प्रेमात पडून हलण्याचं भानही उरलं नाहीये!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा