मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

अंदमान_१


काय हे किती दिवस काही लिहीलंच नाही…
अंदमानात येऊन महिना उलटून गेलाय. माझं काम सुरू होऊनही कित्येक दिवस झाले. पण मी अजून काहीच लिहीलेलं नाहीये…
अंदमानात आलो ते ३० डिसेंबरच्या दिवशी. रात्रभर चेन्नईच्या विमानतळावर नि सकाळी डोळे उघडतो तर बेटं, धुकाळलेला की ढगाळलेला समुद्र. छोटी छोटी खेडी, पाडे म्हणावेत अशी एकमेकांना बिलगलेली घरं, नारळाची झाडं. वाटलं, संपलं इथच आता अंदमान. इतकंच काय ते दिसणार सगळीकडे. जास्तीत जास्त पोर्ट ब्लेअरवर काही दुकानं वगैरे. पण प्रत्यक्षार तसं काहीच नाहीये. हवं तसं मनासारखं सुंदर वाटावं असं पोर्ट ब्लेअरही नाही, हे ही तितकंच खरं. Airport वर उतरलो रिक्षातून थेट लॉजमधे. मग थोडा बाहेर पडलो कानोसा घेत. छान मोठे रस्ते, चौकाचौकात लेडी ट्राफीक पोलिस. शिस्तीत चालणारा कारभार. Cars, trucks, rikshaw सारं काही आहे. एवढं पेट्रोल/डिझेल कुठून येतं?? दूरवर ते Mainland दिसतंय का? तिथून. Mainland म्हणजे तोच तो…अंदमान सोडून उरलेला भारत, ज्याची आठवण खोलवर रूजलीय आत मनात. दोन दिवसांची ओळख नि पुढचे सारे दिवस…अगदी आजही अंदमान परकंच वाटतंय मला! हा भारताचा तुकडा आहे का? राजकीय दृष्टया असला तरीही…? मला नाही वाटत. फिरत फिरत सेल्युलार जेलकडे आलो. जबरदस्त मोठं धूड आहे ते. समोर समुद्र खळाळतो. हे सारं आता पाहताना आश्चर्य वाटत असेल खरं पण पुर्वीच्या काळी भितीशिवाय कोणती भावना निर्माण केली या प्रदेशानं भारतीयांच्या मनात??
एवढं मोठं ते पोर्ट ब्लेअर. बंगाली, तमिळ, रांची (मुळचे छत्तीसगढ्चे राहणारे) नि करेन्स (थाई नि इंडोनिशयन लोकांचं ब्रीड) या लोकांचा भरणा सगळा! इथले aboriginals कुठे आहेत? Great Andamanese, Jarawas, Sentinels वगैरे लोकं. कुणी म्हणतं ग्रेट अंदमानीज आता फक्त ४० उरलेत त्यातले काही सरकारी नोकरीत आहेत. जरवा लोक बरेच आहेत. आफ्रिकन जमात. कपडे घालत नाही! तिला protection आहे, जसं Schedule I प्राण्यांना असतं ना तसं!! मी अजून तरी पाहिले नाहीत; पण दिसतात बरेच…त्या area त अजून जास्त जाणं नाही झालं माझं. अंदमानच्या south west ला Sentinel island आहे तिथे हे सेंटिनल्स राहतात. तिथे कुणी जात नाही; गेलं तर माघारी येत नाही! Helicopters वरही भाले फेकले जातात. काठाला डुंगी टेकली की पाय जमिनीवर टेकायच्या अगोदरच भाले आरपार झालेले असतात. हे ही सारं इतरांकडून ऐकलेलं…पण reliable sources कडून. प्रत्यक्ष अनुभव नाही!
पोर्ट ब्लेअरला almost सर्वकाही मिळतं. Rate थोडा जास्त असतो पण मिळतं सारं. प्रचंड प्लास्टीक कचरा कुठे जातो? त्याच त्या अथांग समुद्रात…जातो तिथे नि या त्या सुंदर सुंदर islands च्या किनाऱ्यावर लागत राहतो! एका दिवसात पोर्ट ब्लेअरमधेही बरंच काही पाहिलं मी.
दोन मित्र भेटले. मराठी. Scientists. Corals नि Dugong (समुद्र-गाय) वर काम करणारे. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते; इथल्या scientific community मधे जवळपास ७०-८० टक्के मराठी लोकं आहेत. अभिमानाची गोष्ट आहे; नाही का?? ती रात्रही अशीच गेली. हुरहुरीत. किती दूर ते उरलं माझं राज्य…लोकं…भाषा.
जेलपासून जवळच मोठं ठोक्यांचं घड्याळ आहे. त्याच्या एका-एका ठोक्यात त्या तुरूंगाचं एकटेपण मन कातरत राहिलं रात्रभर…      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: