बुधवार, ९ फेब्रुवारी, २०११

मायाबंदर


सकाळी सकाळीच पोर्ट ब्लेअर सोडलं. भलामोठ्या बोटेत बसून मायाबंदरकडे. नकाशात पाहिलं होतं मी पुर्वी. उत्तरेकडे. North Andaman. अंदमानचे तीन प्रमुख भाग आहेत: उत्तर, मध्य नि दक्षिण/ little अंदमान. मायाबंदरकडूनही काहीच अपेक्षा नव्हत्या माझ्या. खेड्यापेक्षा काय जास्त असू शकतं? याचाच विचार करत राहिलो. तो समुद्र, बेटं सारं एका बाजूलाच राहिलं. बाहेर येऊन उभा राहिलो तर दूर जाणारी जेट़्टी दिसते…मग हळूहळू काहीच दिसत नाही; समुद्राची एक किनार तेवढी उरते. ती पाहून काय काय अर्थ लावत बसायचे मी? तिथे किती आकार रेखाटत रहायचे? उजव्या हाताला झाडांनी भरगच्च काठ दिसतो तो ही दूरवर. तो शेवटपर्यंत साथ सोडत नाही; मी काठ सोडून गेलोय असं वाटत नाही इतकंच. त्या काठावरून बसचा रस्ता आहे मायाबंदरला जाण्यासाठी…
माझ्या उदासीला चीर पाडत जाणारी समुद्र-गरूडांची जोडी किंचाळत जाते. मी आत मधे जाऊन सीटवर डोळे मिटून पडतो. शांतता कधी कधी किती बोलकी असते. नाही?
दुपारी एकच्या सुमारास मी मायाबंदरला पोहोचतो. गाव शांत वाटतं. मनात बसतं. खेडं नसतं ते गाव असतं, बऱ्यापैकी मोठं असतं. मला नक्की काय हवं काय नको तेच कळत नाही कित्येकदा. झोपायला मऊ गादी हवी की कुणाशीतरी बोलायला फोन असावा? अंगावर पांघरूण हवं की गावात पोस्ट-ऑफिस हवं?
मी forest rest house मधे उतरतो नि गावार फेरफटका मारून येतो. माझा PI माझी काही लोकांशी ओळख करून देतो. Rest house शेजारचं पोस्ट-ऑफिस पाहून मी आनंदून जातो. तो माझ्या internet facility ची सोय करून देतो. माझ्या अनिश्चिततेच्या चिंतेला किती तो आराम! फोन आहे; पैसे काढण्याचं मशिन आहे; पोस्ट-ऑफ़िस आहे; इंटरनेट आहे. याहून अजून काय luxury असू शकते?? 
पुढचे कितीतरी दिवस मी जमिनीवरच स्लिपींग बॅग टाकून झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी एक वळवळ दारातून आत-आत बॅगकडे सरकताना माझा PI बघतो. साप. खाड़्कन जाग येते. बाकी काहीच होत नाही; आपसूकच कॅमेरा बाहेर येतो. एक डोळा अजून झोपलेलाच असतो दुसरा कसाबसा उघडलेला असतो. पहिले तीन-चार shots पार आंधळे जातात (camera सुरूच नसतो. मेंदू तरी कुठे सुरू असतो?!) 
मग पार त्या सापाचं व्यवस्थित photo session होतं. Andaman Wolf Snake. सकाळ झालेली असते; ऊनं येऊ घातलेली असतात. समुद्र शांत असतो. Rest house च्या परसात शांत पहुडलेला असतो.
मायाबंदर माझ्या मनात घर करू लागलेलं असतं…

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

hya post mule, vachnaryanchya manat pan mayabunder ghar karatt :)