सोमवार, ३ ऑगस्ट, २००९


आपण आपल्याच आयुष्यात किती अडकून पडलेलो असतो ना…ते खिडकिपल्याडचं निळं आकाश, मागच्या कैक दिवसांपासून पाउस पडतोय म्हणून खास हिरवे झालेले नेहमीचेच उघडे-बोडके डोंगर, कित्येक दिवसांपुर्वी पाहिलेलं वडाचं पिल्लू…आणि त्याच्यावरचं दयाळाचं इवलंसं घरटं…

“काय झालं असेल रे आता त्या पिलाचं? मोठा वड झाला असेल नाही?! इतका मोठा की, आपण मस्त सूर-पारंब्या खेळू शकू!! आणि दयाळाची सगळी पिल्लंही चांगली मोठी होवून, आकाशात भराऱ्या घेत, शिट्ट्या मारत पोरींभोवती पिंगा घालत असतील…ते डोंगर…shit, बावड्या, च्यायला काय गार वारा साला?! असा झोंबला होता संपूर्ण अंगालाच आणि तिथंच अगदी साष्टांग नमस्कारही घातला होता चक्क! त्या डोंगराच्या भव्यतेवर प्रसन्न होवून!! हा हा! आणि ते निळं आकाश…(सुस्कारा)…तिनं आणि मी दोघांनी एकत्रच चित्रं काढली होती, त्या आकाशात! अगदी घराच्या भिंतीवर आपलं मूल रेघोट्या मारतं ना, अगदी तशीच…मग कुठं गेली ती आता?”
ती गेली आता उडून, निळ्याभोर आकाशात, स्वत: काढलेली चित्रं परत सगळी आणायला…
गेली मात्र आणि परत फिरकली नाही…म्हणून तर सध्या तुला ह्रुद्याशी धरून खिडकीत असतो मी बसून…

“पण मग चल ना…बाहेर जावू, पुर्वीसारखंच…ते सगळं तिथल्या-तिथंच आहे की?”

Hmm…
सगळं खरं रे मना…पण सगळं ते तिकडे, खिडकीपल्याड…तू सध्या इकडेहेस, गजांआड!!
तुला काहीच कल्पना नाही, काय-काय घडून गेलंय, तुझ्या पाठीआड!!!