शनिवार, १५ नोव्हेंबर, २०१४

यमास

प्रिय यम-देवा,

तसं प्रिय म्हणण्याएवढा आपला-माझा संबंध नाही. कधी भेटही नाही झाली नि झाली तरी कळणार नाही असं वाटतं. पत्रास कारण की, मनात दडवून ठेवलेली भिती सतत आज-काल स्वप्नांतून खरीखुरी समोर येत राहते. आपण आसपासच कुठेतरी फिरत आहात असा भास होतो. कितीही निर्जीव असले आमचे दगडाचे देव, तरी अंधारात डोळे आंधळे झाले असताना मनाच्या अंदाजानेच प्रवास करावा लागतो. असा प्रवास करत असताना, दररोज मी आपल्याच सहवासात डोळे बंद करून स्वप्नं पाहत राहतो असंच वाटत राहतं. प्रयोजन काय आहे नक्की? माझ्या जवळच्यांचे नि माझे धागे तोडायचे आहेत की आयुष्याची किंमत पटवायची आहे मला?

नश्वर जगात सध्यातरी अमर काहीच नाही. मला हे ही माहितीय की मृत्युची भिती सगळ्यांनाच असते, काठावर उभं राहून नदीपल्याड जळणारी चिता पाहून मन विचारांत गुंगणं हे ही विशेष नाही. स्वत: चिता होऊन जळू शकत नाही, ती जाणीव जिवंत राहू शकत नाही. रोज रात्री स्वप्नात मी जिवंतपणे ती एकाकीपणाची जाणीव जगत चाललोय. प्रयोजन काय आहे? माझ्या मनाची तयारी करायची आहे का तुम्हाला? कुणी म्हणतं उशीखाली सुरी घेऊन झोप; कुणी म्हणतं हनुमान-चालीसा म्हण. म्हटली असती, सुरी ठेवली असती आणि स्वप्नं पण बंद झाली असती कदाचित. मग जो अंधारात डोळे आंधळे झाले असताना तुमचा कानोसा लागायचा तो ही बंद झाला असता. देवाच्या कानोशावर माझी श्रद्धा आहे, ती जिथे सिद़्ध होते, ती माझी स्वप्नेपण मी कसा काय हिरावून जाऊ देऊ? मी चितेच्या ज्वाळांत माझ्या आवडीच्या देवांना यापुर्वीही बरेच प्रश्न विचारलेत. मी निर्जीव देहांवर बरसणाऱ्या अश्रूंबद्दल कित्येक देवांना मृत्युबद्दल उलट-सुलट प्रश्न विचारलेत. समुद्रावर एकट्याने प्रवास करताना आणि पर्वतांवर घोर जंगलात रात्र सारताना महादेवाला माझ्या जगण्याबद्दल जबाबदार धरलंय. मी मनाच्या आकुंचन-प्रसरणाबद्दल हनुमानाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलंय. मी आभाळात बघून अल्लाला असण्या-नसण्याचे प्रश्न विचारलेत. माझी श्रद़्धा तात्पुरती आहे, पण आहे. मी देवळांत जाऊन देव पाहिले नाहीत, पण गाभाऱ्यांना स्पर्श केला आहे. मी कीर्तनांतून देवाची कौतुकं ऐकली फार, पण विश्वास मनाच्या कर्ते-नाकर्तेपणावरच ठेवला आहे. माझ्या विचारांवर सध्या जे तुम्ही गारूड घातलंय, जे प्रश्न निर्माण केलेत, ज्या जाणीवांतून तुम्ही माझ्या डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहवत आहात, त्या साऱ्याच गोष्टींचा जाब मी स्वप्नांत नाही विचारू शकत. तुम्ही त्या स्वप्नांत असता, पण समोर चालू असणाऱ्या घटनांच्या मी इतका जिवंतपणे स्वाधीन झालेलो असतो की तेव्हा तुमचा विचारही डोक्यात येत नाही. ज्यावेळी डोळे उघडून पाणी पितो नि घामेजलेल्या अंगाने बिछान्यावर जाऊन बसतो, तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते. बाल्कनीत जाऊन उभा राहतो, वारा थंड वाहत असतो. दूरवर घरात अजूनही दिवे सुरू असतात. स्वप्नांना घाबरणारी माणसं, झोपेला टाळत असतात. मी म्हणतो, स्वप्न होतं. स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या नसतात. जुने संदर्भ नि नवे रस्ते तयार झालेले असतात. कुणी कधी काळी भेटलेली लोकं, अचानक डोळ्यासमोर तरळून जातात. मनातल्या जखमांच्या खपल्या अधून-मधून निघत राहतात. काय करायचंय, स्वप्नात जगून?

स्वप्नात जे दिसतं ते सत्य मानलं, तर मग मला तुमचा सहवास प्रिय आहे. मला तुमच्या मनातला त्रयस्थपणा आदरणीय वाटतो. कोण माणूस जगापासून अलिप्त राहून असली कामं करेल. यम देवा, तुमचेही प्रिय-अप्रिय सारेच कधी ना कधी अनंतात विलीन होणारेत. झालेही असतील. तुमच्याही डोळ्यांतून अश्रूंचे पाट वाहिले असतील. तुमचा तसंच काही प्रयोजन असेल, तर धन्यवाद. तुम्ही जर मला माझ्या स्वप्नांतून सत्य दाखवत असाल, तर मी आपला आभारी आहे. आभारी या करिता कारण मृत्यु या वरवर फुटकळ वाटणाऱ्या विषयाची जाणीव जोपर्यंत तो स्वत:वर ओढवत नाही तोपर्यंत मला होणार नाही; आणि ती तुम्ही स्वप्नांमार्फ़्त करता आहात. आणि हे सर्व जर असत्य असेल, तर माझ्यात नि नदीपलीकडची चिता बघून मृत्युचा विचार करणा़ऱ्या एकट्या जीवात काहीच फरक घडणार नाही. मी उशीखाली सुरी ठेवून तुमचा अपमान करणार नाही, आता कितीही वेळा स्वप्नांत अश्रूंचे पाट वाहिले तरी. मनाच्या गाभाऱ्यातून माझ्या डोळ्यांसमोर जर तुम्ही माझेच विचार मांडता आहात, तर बघू बरं अजून कोणकोणत्या जाणीवा बाकी आहेत. काल मी पंधरा वर्षे वेळेच्या पुढे निघून गेलो होतो आणि त्याच्याही पुर्वी काही दिवसांकरिता. बघू बरं, वेळेच्या किती पुढे मनाची मजल जाऊ शकते. बघू बरं कितपत हे मन जोर धरू शकतं. बघू बरं, अजून मनाचे किती दरवाजे उघडायचे बाकी आहेत.
पत्रास उत्तर आज रात्री स्वप्नात देणे.

कळावे,
एकटा

image from - http://www.reddit.com/r/Smite/comments/1yw0yv/god_concept_yamraj_god_of_death_summoner_tank/

बुधवार, ५ नोव्हेंबर, २०१४

चंद्रकोर

अमावस्येच्या संध्याकाळची गोष्ट आहे. गोष्ट आहे, पण खरी आहे. गोष्टीच्या खरेपणाला अमावस्येच्या संध्याकाळची साक्ष आहे. तेव्हा बागेत गुलाब फुलले होते, होते ते लालजर्द होते नि नव्हते ते कळ्यांत फुलण्याची स्वप्नं घेऊन जगले होते. वारा मंद होता नि खिडकीत अडकवलेल्या विण्ड-चाईम्सना तासभर तरी छेडत राहिलेला. खिडकीशेजारच्या पलंगावर प्रियकराच्या कुशीत प्रेयसी झोपलेली नि तिच्या मनात खोलवर प्रियकराची असंख्य मनं गुंतून राहिलेली. दोघांच्याही अंगावर शहारे ताजे होते, जे होते ते सारेच प्रेमाचे नजारे होते. तिच्या केसांच्या घनदाट सुवासात प्रियकर हरवलेला नि त्याच्या हनुवटीच्या कड्यावर प्रेयसीचा माथा विसावलेला. किर पोपट थव्याने घरट्याकडे परतत होते, सुभगाच्या शिळा मंदावत चाललेल्या आणि. संध्याकाळ निळसर जांभळी केशरी होऊ पाहणारी, सुर्याच्या असंख्य मनात प्रेमाचे अविष्कार आणि. टेकड्या-टेकड्यांवरती फुलपाखरं झोपेला आलेली, चतुरांची अजूनही पाण्यावरती मुक्त क्रिडा चाललेली. गवता-गवतातून टाचण्या निजलेल्या, संध्याकाळ रानावरती पांघरूण ओढत चाललेली, लेकरांना निजवायला.

प्रियकराने प्रेयसीच्या गालावर फुंकर मारली, तेव्हा प्रेयसीची झोप चाळवली. तिने डोळे किलकिले करून रंगांचा अंदाज घेतला. मोगऱ्याचा मंद सुगंध नि सतारीचा नाद. तिने प्रियकराला अजूनच घट़्ट मिठी मारली. त्याला घट़्ट मिठी मारली तेव्हा गार वारा सुटला; मोगऱ्याचा सुगंध सैरभैर झाला; पक्षी एक-दोन भरकटले-गेले चित्रातून; खिडकीचे दरवाजे आणि तीन वेळा टाळ्या वाजवून सताड उघडे राहिले; संध्याकाळ गोठत गेली नि तिचे नानाविध रंग जाऊन ती काळ्या रंगाशी एकरूप होत गेली; शहारे मोजकेच उरले-पण उरले ते अंतरंगात उरले-विरले ते अंतरात विरले; पिंगळे बोलू लागले नि पिंपळ-पाने सळसळू लागली; पिंपळाच्या टोकावर एक दयाळ, श्याम होऊन एकटाच, वाजवत राहिला बासरी. डोळ्यात डोळे घालून प्रेयसी म्हणाली, प्रियकराला-“चंद्रकोर किती छान असते रे! तू लिहशील का चंद्रकोरेवर कधी? (माझ्यासाठी?)”

“रात्र गर्द होईल तेव्हा नि चंद्र हरवत जाईल-विसरत जाईल-हळवा होईल-आसुसत जाईल चांदण्यांसाठी तेव्हा तो ओढून घेईल रात्रीला अंगावरती नि तिच्या मिठीआडून पाहत राहील ब्रम्हांडाकडे अलिप्तपणे. त्याला नसेल इच्छा मोठं होण्याची, नसेल इच्छा झळाळून निघण्याची तेव्हा. तो रात्रीच्या मिठीत आक्रंदणार नाही, ती आई आहे, थंड असली तरी चंद्राएवढी शीतल नाही, तिच्या मिठीत मायेची ऊब आहे, पण हरवत चाललेल्या प्रेमाची कसर ती कितपत भरून काढणार? चंद्र तेव्हा एकटाच असेल नि चांदण्याही एकट्याच हरवलेल्या. तो म्हणेल, मी कुणासाठी होऊ मोठा? कितपत नि कसा होऊ मोठा? आपण तेव्हा पृथ्वीवरून चंद्रकोर पाहत राहू नि तिच्या केशरी किनाऱ्यावरती आपलं घर वसवत राहू. चंद्राला एक कळत नाही, ज्या पांघरूणाखाली-ज्या मिठीत तो सामावून गेलाय, त्यातच चांदण्याही हरवल्या आहेत. सगळेच बिलगून नसले, तरी जवळ आहेत. आज तू माझ्या जवळ असलीस-बिलगून असलीस तरी आहेस ब्रह्मांडातच तरूण. चंद्राला माहितीय आणि की, लपून-मनात जपून प्रेम मिळत नाही-वाढत नाही. ते शोधावं लागतं-ते मिळवावं लागतं-ते अनुभवावं लागतं-नि राखावं लागतं. आजची चंद्रकोर, उद़्या इतकी सुंदर नसणार; पण सुंदर नसली तरी चंद्राचं असं व्याकूळ होणं सुंदर आहे. जगात किती किंचीतसं प्रेम उरलंय-पण उरलंय त्यावर जग किती सुंदर सुरूय. चंद्रकोर बघताना तुझ्या डोळ्यांची चंद्रकोर आठवते-मी दूर जाताना, मी पाहिलंय तिला. तिला आजचा विरह नाही सहन होत-पण अजब आहे, ती दिसतेच मुळात सुंदर. ती दिसते तेव्हा तिला माहिती नसावं कदाचित की बोलून-लिहून जितकं प्रगट करता येत नाही तितकं प्रेम ती नुस्त्या एका चंद्रकोरीने उधळते. आणि चंद्रकोर पुढे जाऊन पौर्णिमा निर्माण करते, तेव्हा चंद्र उरतो एकटा नि चांदण्या हरवतात. हे दिसतं सगळं आपल्याला. विरह आहे, म्हणून प्रेम आहे. प्रेम आहे-म्हणून विरह सहन नाही होत. विरह सहन नाही होत, म्हणून चंद्रकोर तयार होते.”

प्रियकर उठला नि दाराकडे निघाला. खोलीभर तेव्हा अंधार गडद झालेला नि चंद्रकोर एक आभाळात नि दोन खोलीत, केशरीसर कडा लेवून अवतरलेल्या…
पंकज कोपर्डे

२ नोव्हेंबर २०१४