गळ
आपण
ठरवतो त्या सर्व गोष्टी
आणि
सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा गोंधळ!
दिवसांमागून
दिवसांचा रेटा
जीव
घट्ट धरून बसलेला एकच एक गळ!
असे
किती गळ असतात प्रत्येक दिवसात
काही
क्षणांचे, तासांचे, आयुष्यभराचे!
एकेक
गळातून सुटका करत-करत
पुढच्या
गळांमधे मेंदूचे गर अडकवायचे!
खिडकीबाहेर
पक्षी चिवचिवतात, डोंगर खुणवतात
निराश
चप्पलीचे जोड, केविलवाणे जमिनीवर
विमान
उडतं एखादं-दुसरं आकाशात
दररोज
विमानातली
लोकं बोटं दाखवून हसतात या गळांवर!
कि-बोर्डच्या पाठीवरच्या जखमा ओळखल्यात कुणी?
दगडाळलेल्या
बोटांच्या, ठेचलेल्या ह्रुद्याच्या संवेदना
मेंदूचे
बधीर पडलेले भाग, मनात गोठलेले
शब्द
अर्धवट
कविता नि कोऱ्या पानांच्या भावना?
डोंगरातून
वाहणाऱ्या नदीला भविष्य असते का?
नदीत
आनंदात जगणाऱ्या माशांना असते का?
वनस्पतींच्या
तुकड्यांवर बसलेल्या चतुरांना?
या सर्वांमागे धावणाऱ्या माणसांना…असते का?
घरी
परतणाऱ्या कावळ्यांना उद्याची भ्रांत नसते
वाहणाऱ्या
जीवघेण्या वादळाला पक्ष्यांची पर्वा नसते!
आपण
आपलं भविष्य बघत, पाय जपून
ठेवतो
तरी
पडतो चिखलात, खड़्ड्यात नि ठेच लागते
पडतो
तसे गळाला अडकलेले मेंदूचे गर ताणतात
त्रास
होतो, सुटका नसते; विमानं आकाशात उडतात
गाणी
गुणगुणत मग मलमपट्टी करतो आपण
आपल्याच
जखमांना, आपलेच लेप, आपणच बनवलेले
हे असं दररोज घडत असताना, तू इथं नसताना
तो एकच गळ, ज्यावर भाळलाय
जीव, बघताना
जीवाच्या
जखमांना प्रेमाचा गुलाबीसर रंग दिसतो
त्या
एका गळावर हा जखमी प्रवास चालत राहतो!
- पंकज (पुणे, २६ ऑक्टोबर २०१७)