रविवार, २० डिसेंबर, २०२०

लिखान


कसे लिहावे बरे? बरं लिखान तसं सोप्पच! थोडे-थोडे शब्द गोळा करावेत. कशाला काय जोडायचे याची मनातच करावी मांडणी. आणि सर-सर सारे ओतावेत शब्द कागदावर. ओतण्याची पण एक कला आहे. ज्याला जमली त्यालाच माहिती की ती जादू कशी घडते! 

ओतावेत शब्द कागदावर आणि हळूवार मारावी एक फुंकर अनुभवाची, मग पसरतात ते आपोआपच; जसा पसरतो जमिनीवर ओतलेला पारा! आपोआप, नेमके, अर्थपुर्ण. असे जमले प्रकरण की कशाला त्यांना हलवायचे? जे आहे ते तसेच ठेवायचे आणि दुरून थोडे बारकाईने बघायचे. 

वाटतं मग, अरे हा एक शब्द फारच अवखळ, पसरलाय कागदभर, तर हा दुसरा अगदीच लाजाळू. वाटतं, अरे ही काही वाक्यं आगगाडीसारखी लांबडी, तर काही अगदीच झालीत पोरकी! वाटतं असंही की काही जमलं नाही हे चित्र चांगलं, करावा कागदाचा बोळा; तर कधी (क्वचितच बरं का) वाटतं, जमलंय बरं का! 

काही का वाटेना; आताशा मनातलं कागदावर येणं हीच केवढी मोठी प्राप्ती! काही शब्द असावेत खिशात पांढरे-काळे, रंगी-बेरंगी; काही वाक्यं बनवावीत लहान-मोठी, सुरेख नि वेढब. कोऱ्या कागदावरती चित्र मात्र रेखाटताना मनाशीच जुळवावं एक गाणं, आणि एक ललित जन्माला घालावं तान्हं. 

पंकज । २० डिसेंबर २०२०