उध्दवस्त घर. मोजकेच श्वास उरलेले. पहिल्या पावसाने मात्र धुळीत काही अंकुर फुललेले. पाचही भिंती ढासळल्या; चारही दिशांनी घर नागडे. उत्तरेकडली एक भिंत तेवढी अर्धी-मुर्धी उभी. गुलाबीसर रंग फिकटसा; त्यावर पहिल्या पावसाचा फवारा. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूधारा गुलाबी गालांवरून अंकुरांकडे चाललेल्या. त्या भिंतीचं नाव “सखी”…कारण आजूबाजूस कुणीच नसताना ती एकटीच माझ्यासाठी उरलेली! सखीच्या मनावर एक गडद केशरी हाताचा तळवा. माझं नि प्रियेचं लग्न झालं; त्यादिवशीचा उमटलेला…पहिल्या पावसाने अजूनही त्याचा रंग नाही ढळलेला.
या गावात आता कुणीच राहत नाही. बोलायला, लिहायला, वाचायला, गायला, जगायला माणसं नाहीत. रात्री लांडगे फिरतात…वाघाची कमजोर डरकाळी येते ऐकू…माझ्या शेकोटीशेजारी मी रग घेतो अंगावर ओढून! जिवंत असूनही मेल्यासारखा झोपतो. आता तर हे सोंग, सोंग उरलंच नाहीये!
इथे आलो तेव्हा होतं तरी काय? जंगल…बाकी काही नाही. मग मी एक वीट आणली…मनात जिद्द होती; अंगात बळ होतं; सोबत “ती”ही होती! घर वसवलं-रंगवलं! घरासारखं घर केलं. माझं पाहून इतरही आले. चला, गावच वसवू म्हटले. “हो” ला “हो” केलं आणि टुमदार गावही वसवलं…त्याचं काही दिवसांपुर्वीच पाणी-पाणी झालं! दुष्काळ पडला…युध्द झालं…नको-नको ते घडलं! असंच मरण येण्यापेक्षा; लोकांनी स्वत:च स्वत:ला संपवलं. मी सांगत राहिलो – “वारा थांबेल वहायचा कधीतरी; जरी आज झोंबतोय अंगाला! वादळ येईल अशी भिती का बाळगताहात; भित्र्यांनो! सूर्यही थंड होईल…जळून नष्ट करेल सगळं, हा विचारच का मुळात! मित्रांनो, बासरी वाजवा ना…गाणं गा…कविता म्हणा…घाबरू नका मात्र!” मात्र कुणीच ऐकलं नाही.
सारेच मेले. “ती” ही गेली. तेवढी एकच भिंत नि तेवढा हात सोडून गेली. उरलेल्या धान्याचे मी अंकूर घडवलेत…त्यातून उगवेल अजून धान्य; मग मोठीमोठी शेतं होतील तयार! घर बांधू लागेन परत…सुरूवात केलीय तशी मी…ही गुलाबी फिकट भिंत नि हा हाताचा ठसा…हे काय! सुरूवात केलीय मी!
1 टिप्पणी:
"ही गुलाबी फिकट भिंत नि हा हाताचा ठसा…हे काय! सुरूवात केलीय मी!"
फारच सुंदर....
आणि खरं आहे...अंत आहे म्हणून सुरुवात टाळता नाही येत. तोच तर जीवनधर्म आहे!
टिप्पणी पोस्ट करा