बुधवार, ७ एप्रिल, २०१०

चिंगीच्या पुढ्यात...

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! हलत नाही, चालत नाही…शीss बाई, काहीच करत नाही! तळ्याकाठी बसलाय एक हत्तोबा, कोठारभर जेवण करून झालाय त्याचा पोटोबा! हलत नाही, चालत नाही…शीss बंबच आहे मुळी! तळ्यात पोहताहेत बदकांची पिल्लं, कुणी काळं-कुणी गोरं, गोल गोल चकरा मारतात, एकमेकांना येऊन धडकतात…तोच-तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात, त्याशिवाय काही नाही..शीss बाई, कसली मॅड आहेत, झालं! तळ्याचं पाणी निळंशार, त्यातली बेडकं हिरवीगार, चिंगीकडे पाहून करतात डराव-डराव, पण याव्यतिरिक्त त्यांच्याकडे शब्दच नाहीत! चिंगी बघते ती निळी फुले, आकाशाचे तुकडे कापून झाडावर लावलेले, नि असा येतो गार वारा…शीss बाई पुढे काही होत नाही…
चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा वाघोबा, गुहेत असतो झोपलेला, घोरतो फार, खुर्रर्र, खुर्रर्र, गुरगुरतो मात्र कुठला?? चिंगी असते बिचकून त्याला, आईने सांगितलंय उठवू नको त्याला, उठला की तो डरकाळी फोडेल नि क्षणात तुला गट्टम करेल! चिंगी असते बिचकून त्याला, पण जायचंय एकदा भेटायला त्याला…त्याचा काय तो रंग, काय ती शेपूट, कसले डोळेsss, कसले काssन, कसले दाssत…नि कसले पाssय!! चिंगीच्या स्वप्नात वाघोबाला मन! मनातून वाघोबा चिंगीचा आजोबा! “ये ना, ये ना” म्हणतो नि दाढी खाजवत बसतो, कुणी त्याच्याकडे जात नाही; लडदू हत्ती बोलत नाही, नि ढिम्म मुंगी हलत नाही…निळी फुलं वाऱ्यावर डोलतात, तळ्याचं पाणी थरथरतं, तळ्यातलं आभाळ वर-खाली होतं, बदकाची पिल्लं नुसत्या चकरा मारत राहतात…

चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा गाव, गावतल्या माळात हरणांची जोडी, जोडीच्यामधे हरिणीचं पिल्लू, आईला बिलगतं, गवत खातं, नाक फेंदारतं…बस्स! इतकंच करतं!! शीss, बाकी काहीच नाही…गवताची पाती हिरवीगार, भरल्या उन्हात चमकतात फार…उनही पडतं ते सोनसळी, भाजत नाही, चटका नाही, असलं कसलं बाई हे!! शीss, काही मज्जाच नाही…

चिंगीच्या घरात कित्ती आक्रोड खातात लोकं, इतके चविष्ट नि मोठ्ठे की एक खातानाच भरतं पोट तिचं…शीss बाई, मग काही मजाच नाही! चिंगीच्या आयुष्यात एक वडाचं झाड, वडाच्या ढोलीत तिच्या घराचा थाट, झोपायला कॉट नि जेवायला ताट!!

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! चावी दिली की कुई कुई करते, चावी बंद् की मग हलत नाही, चालत नाही…शीss बाई, माझ्याशी कुणी खेळतच नाही!!

२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

पंकज, छान वाटलं हे बालबोल[बालगीतसारखं].मला अतिशय आवडलं.माझा”शब्दकळा”लेख वाचून पहा.
http://mr.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95/

Pankaj म्हणाले...

धन्यवाद! आपण दिलेली लिंक व्यवस्थित उमटलेली नाही; तरी कृपया ती परत द्यावी.