बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

कोफ्ताकरी


    खरवड-खरवड, मनाची तडफड! नाही, नाही…तडफड म्हणण्याइतकंही काही घडत नाहीये आजकाल. नांगरानं जमीन द्गड-माती-ढेकळं-गांडूळ-साप-विंचू-अंकूरांसकट खरवडत न्यावी, अशी सगळी खरवड. नांगर एकदा फिरल्यानंतर अंगावरून सारी वस्त्रं काढून घेतल्यासारखी उद्ध्वस्त जमीन नि सुन्नसा आवाज…यात तडफड कुठली? पडझड सगळी. क्षणात राहत्या झोपडीवरून बुलडोझर फिरवावा इतकं सहज सोप्पं ते मनाचं वागणं. विव्हळायला त्राणच उरले नाहीत, मित्रा! गाणं नाही, कल्पना नाही, चित्र नाही, काही घडेल याची शक्यताही नाही! अडकल्यासारखी भावना आहे ही! वर्षानुवर्षे बध्दकोष्टता झालेल्या पीडिताचं दु:ख, सहज-सुलभ जगणाऱ्यांना काय? हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही! उदाहरण काहीही असू शकतं!! पोटातच अडकलेल्या बाळाचं दु:ख कोणाला कळणार? वेदना दोहोंनाही! मातेलाही नि बाळालाही…चूक कुणाची?
      काय माहिती?!! परिस्थितीची? असावी. असावी एखांदवेळेस! परिस्थिती ही काळाचं फ़ंक्शन! म्हणजे काळच जबाबदार म्हणायचा! मला तशीपण या काळानं पुर्वी कित्येकदा अद्दल घडवलीय, वेगवेगळ्या फ्रंट्सवर! त्यावर तर एक पुस्तकच तयार होईल! पण आळस…लिहीणार कोण? जाऊ देत!
      विषय असा होता की तडफड व्हायला काहीतरी असावं लागतं मुळात. आत असलेल्या कल्पनांना ओरडण्याचं त्राणच नसलं तर त्यांना हुडकणार कसं? ढिगाऱ्यातून बाहेर काढणार कसं? याचं एक छानसं उत्तर! काही घडलंच नाही, असं समजायचं! यालाच बहुधा मन:शांती म्हणत असावेत! यावर हाच एक उपाय आहे. कोफ्ताकरी करणे नि खाणे. ज्या गोष्टींत जीव अडकलाय त्यांना कोफ्ते समजून त्यांचा फडशा पाडणे! ढासळणे ही एक कलाय…ती ज्यांना जमत नाही, ते बेघर होतात, आत्महत्या करतात; पण ज्यांना जमते, ते जग विणतात! व्वा, काय लिहीलंय…काय माहिती का लिहीलंय मी हे!! बहुधा, ढासळण्याची सुरूवात झालीय कुठेतरी…   
पंकज २५.०८.१०

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

whoever wins, looses


शेजारील चित्र पहा…पहा, शांतपणे हातातील सर्व कामे बाजूला सारून पहा. त्या फोटोमधील एक ऩ एक गोष्ट व्यवस्थित पहा. डोळे मिटून क्षणभरच थांबा नि आता विचार करा. जो काही विचार डोक्यात येईल, तो इथे मांडा (comments मधे). काहीही असू दे मग…काय वाईट, काय खरं, काय खोटं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बऱ्याचदा अनुभव नि ज्ञान (माहिती) या दोन गोष्टींवरच अवलंबून असते. असू देत; त्याचं कुणाला काय? काय वाटतंय ते लिहा…
रेल्वे-स्टेशनावर या मॅगझिनवर नजर पडली नि ते बॅगेत टाकलं. प्रवासभरात वाचून काढलं. कित्येकांनी त्याचं फ़्रंट कव्हर पाहून ते चाळलही. किती ते कुतूहल? एकानं विचारलं, “काय झालं या बिबळ्याचं पुढे?” think n’ imagine. पुढे मी काय बोलू? हे समोर दिसतंय ते कायंय? म्हणजे हे असं फ्रंट-पेज पाहून सहज तोंडातून शब्द फुटतात…what the hell! मी सुमारे अर्धा तास भर ते एकच पेज पाहत बसलो. हे असं एकटंच चित्र सतत पाहत राहताना कित्तीतरी गोष्टींवर विचार करत बसलो. हा फोटो फक्त report किंवा news फोटो नाहीये…तो Human-animal conflict चा representative फोटो म्हणून बघा. कायंय त्यात? डार्ट लागलेला एक पुर्ण वाढ झालेला बिबट ज्याच्यावर सुमारे पन्नास एक लोक तरी तुटून पडलेत. धूळ, बिबटाच्या पेकाटात लागण्याच्या उद्देशात फेकलेली एक अधांतरी वीट, प्लास्टीक किंवा तत्सम कचरा, बिबटाच्या पाठीमागे २-३ दंडुकाधारी हिरो (सर्वांच्या पायातल्या चपला बघून त्यांचा socio-economic status थोडाफार लक्षात येईल) आणि अजून कित्तीतरी चेहरे (बघे). फोटोच्या सेंट्रल पॉईंटच्या थोडंसं वर एक plain tiger butterfly, बिचारं एकटंच रस्ता क्रॉस करतंय; त्याला आजूबाजूला काय घडतंय याचा काहीही बोध होत नसणार; त्याच्याच पाठीमागे तसंच एक दुसरं उडण्याच्या तयारीत…
बिबट…वेदना, अजून काय म्हणू शकतो आपण? बिबटाची कातडी अशी फिसकारल्या सारखी नसते कधी; त्रास आणखीन काय? मानेत घुसलेला डार्ट…काय म्हणजे काय सुरू कायंय? Okay, काही लोक म्हणतील तुला, तिथे cozy-cozy जागेत बसून प्राण्यांच्या वेदनेवर लिहायला काय जातंय? हा फारच महत्त्वाचा प्रश्नय खरा! म्हणूनच मी म्हटलं, अनुभव नि ज्ञान या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात ते! बिबटाच्या खाली शीर्षक आहे: India’s Leopard Problem: Is this cat vanishing faster than the tiger?
कुणाला माहिती? कुणी कधी बिबटाला प्राधान्य दिलाय भारतात. वाघांना आत्ताशी कुठं भाव द्यायला लागलेत लोक…अभी और वक्त है, जब बिबट भी १४११ बचेंगे, तब देखा जायेगा!!
Follow:


सोमवार, २ ऑगस्ट, २०१०

hands and patches

                चित्रकलेच्या क्षेत्रात  ठसा उमटावा असं कैक दिवसांपासून मनात होतं. ते आज प्रत्यक्षात उतरलं. माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना पडदे नाहीत; आणि इमारतीचा हा भाग चक्क सुर्यप्रकाशात न्हाऊन निघतो!! तसा मी अंधारात राहणारा प्राणी. या प्रकाशाचा त्रास व्हायचा. मग एके दिवशी ठरवलं की यावर काहीतरी उपाय करावा. पहिला विचार आला तो म्हणजे पुणे टाईम्स मधल्या सेमी-नूड्ज आतल्या बाजूस तोंड करून प्रकाशाचा रस्ता रोकावा. हा आपला टिपीकल बॅचलरी विचार तसा; पण मी राहतो ते घरंय, रूम नाही; याचं मला चांगलंच भान आहे. शिवाय माझ्या या कलाकृतीचे माझ्या घरी फार विपरित परिणाम होतील याचीही जाण होतीच. मग काय करावं? म्हटलं, छानसा रंगीत कागद आणून डकवावा; कुठला फिल्टर? केशरी, हिरवा, निळा?? विचार करत बसलो…

                लॅपटॉपवर गाणी सुरूच होती; त्याच दरम्यान “कट्यार काळजात घुसली” मधली काही गाणी सुरू झाली. बस्स…ती सुरू झाली नि माझी विचार करण्याची पद्धतही पुर्णपणे बदलली. हुरूप आला. कुठल्या-कुठल्या म्युझिअम्स मधे लाल-निळ्या रंगाचे शिशे पाहिलेले आठवले. छंद मकरंद झाला! मग काय? काचच रंगवायला घेतली. अगोदर निळसर बॉर्डर आखू वाटली. तसं केलं. मनात मकरंदासारख्या कल्पना गोंधळ घालत होत्या. बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की, कुठेतरी ठसे उमटवावेतच! शिवाजी महाराजांनी जसा सिंधुदुर्गात उमटवलाय तसा!!
 निदान मी माझ्या घरात तरी उमटवू शकतो; आमचं कर्तुत्वही तसं चार भिंतींएवढंच ओ! मग म्हटलं तसं! ठसे उमटवले नि उरलेला भाग समर्पक नि उपलब्ध रंगांनी रंगवला. लांबून पाहिल्यावर प्रकाशही थोड्या निवल्यासारखा वाटला. अंधारल्या जीवाला अजून एक अंधारली खोली मिळण्याचा आनंद झाला!