चित्रकलेच्या क्षेत्रात ठसा उमटावा असं कैक दिवसांपासून मनात होतं. ते आज प्रत्यक्षात उतरलं. माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना पडदे नाहीत; आणि इमारतीचा हा भाग चक्क सुर्यप्रकाशात न्हाऊन निघतो!! तसा मी अंधारात राहणारा प्राणी. या प्रकाशाचा त्रास व्हायचा. मग एके दिवशी ठरवलं की यावर काहीतरी उपाय करावा. पहिला विचार आला तो म्हणजे पुणे टाईम्स मधल्या सेमी-नूड्ज आतल्या बाजूस तोंड करून प्रकाशाचा रस्ता रोकावा. हा आपला टिपीकल बॅचलरी विचार तसा; पण मी राहतो ते घरंय, रूम नाही; याचं मला चांगलंच भान आहे. शिवाय माझ्या या कलाकृतीचे माझ्या घरी फार विपरित परिणाम होतील याचीही जाण होतीच. मग काय करावं? म्हटलं, छानसा रंगीत कागद आणून डकवावा; कुठला फिल्टर? केशरी, हिरवा, निळा?? विचार करत बसलो…
लॅपटॉपवर गाणी सुरूच होती; त्याच दरम्यान “कट्यार काळजात घुसली” मधली काही गाणी सुरू झाली. बस्स…ती सुरू झाली नि माझी विचार करण्याची पद्धतही पुर्णपणे बदलली. हुरूप आला. कुठल्या-कुठल्या म्युझिअम्स मधे लाल-निळ्या रंगाचे शिशे पाहिलेले आठवले. छंद मकरंद झाला! मग काय? काचच रंगवायला घेतली. अगोदर निळसर बॉर्डर आखू वाटली. तसं केलं. मनात मकरंदासारख्या कल्पना गोंधळ घालत होत्या. बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की, कुठेतरी ठसे उमटवावेतच! शिवाजी महाराजांनी जसा सिंधुदुर्गात उमटवलाय तसा!!
निदान मी माझ्या घरात तरी उमटवू शकतो; आमचं कर्तुत्वही तसं चार भिंतींएवढंच ओ! मग म्हटलं तसं! ठसे उमटवले नि उरलेला भाग समर्पक नि उपलब्ध रंगांनी रंगवला. लांबून पाहिल्यावर प्रकाशही थोड्या निवल्यासारखा वाटला. अंधारल्या जीवाला अजून एक अंधारली खोली मिळण्याचा आनंद झाला!
३ टिप्पण्या:
khupch sundar...
bhaarI .... tyaa seminude zak maratil yachyasamor ...
@ vijay: ha ha!
टिप्पणी पोस्ट करा