रविवार, २ फेब्रुवारी, २०१४


रवी
छातीत थोडी धडधड अजून जिवंतशी वाटते. सतत कालची रात्र आठवते...काहीच आठवत नाही...चष्म्याच्या काळ्या फ़्रेमवरच्या विस्तीर्ण वांझोट्या कपाळावरती पसरलेले घर्मबिंदू तेवढे आठवतात. तेव्हा ती आली होती, मीच स्वेच्छेने नदीत उडी मारली होती नि गटांगळ्या खात छाती मागे-पुढे होत होती. पोट मागच्या दोन-चार वर्षांपेक्षा जास्त वाढलंय माझं आणि म्हणावं तसं काही खासही गोड घडलेलं नाहीये. इतकं आणि एवढंच मी माझ्या कामाव्यतिरिक्त बोलू शकलो तिला. छंदाचं रूपांतर कामात झालं की तसं माणसाकडे पोरी पटवण्याएवढं भांडवल उरत नाही बहूधा. घरचे सगळेच नि बाहेरचेही सतत सांगत राहतात की एवढा स्पेसिफ़िक इंटरेस्ट नसवा माणसाचा...पण छंद तो छंद, त्याला कुठला घालणार बांध म्हणा. माझ्या कामाव्यतिरिक्त माझा छंद म्हणजे लिखान...पण ते ही मराठीमधलं. आणि अशा कितीशा पोरी मराठी लेखकांना भाळणाऱ्या? त्या ज्या कॉलेजात नाटकांत रमून लेखकाच्या गळ्यात पडायच्या त्या एकतर दर सहा महिन्यांनी वेगळ्याच नटाबरोबर बागेत चरत बसायच्या किंवा मग एकच मोठ्ठं पॅकेज गळ्यात अडकवून नऊ महिने रजेवर जायच्या. फारच उत्साही काही एक-दोन दिवस फक्त...इस्पेशिअली जेव्हा त्यांना लेखक हा एक माणूस आहे याचा साक्षात्कार व्हायचा! पण माझ्यातला लेखक सतत रडकं काहीतरी लिहून स्वत:च डिप्रेस झाला होता आणि तो तिच्यामुळे खाड़्कन जागाही झाला. ती तितकीच नाजूक आणि त्याच त्या गणेशवेलीसारखी लपेटून घेत चालल्यासारखी. रस्त्यावरून घरी येताना एका खड़्ड्यात जोरात आदळलो तसा कपाळामागचा मेंदू थोडा हलल्यासारखा झाला. म्हटला, “का बरे तुझा तो लेखक असा धारातिर्थी पडलेला?” आणि मग पाऊस सुरू झाला; त्यात रस्ता दिसेनासा झाला; हेल्मेटच्या काचेवरती वाफ़ांचा पडदा झाला. वर्षं सरत गेली तसे शब्द परत गेले; पानगळीचे दिवस उलटूनही पाऊस आला नाही; कवितांच्या झाडांवरती फुले फुलली नाहीत; घोंगावणारे सारे शब्द गेले माघारी मधाविना; खरडून खरडून काही केल्या एक वाक्य घडले नाही. सोप्याच होत्या गोष्टी किती, वेळच लागत गेला...तो एक धारातिर्थी आणि दुष्काळात जीव सांडत चाललेला.
मला वाटलं मी एक नाटक लिहावं आणि घुसून जावं कलेत आतवर. उगाच हात मारल्यासारखे करावेत नि पोहोल्यासारखं वाटून घ्यावं मस्त! तेच नाटक उभं करावं आणि नुस्तं तेच करत बसावं. मग परत ते दिवस आल्यासारखे वाटतील का? सहा महिने...दोन दिवस किंवा सतत आयुष्यभर! नाटक लिहावं, कलेत घुसावं, घुसळून आणि प्रेम करावं. मी हसताना मला वाटलेलं पडला एक दात...खालच्या बत्तिशीमधला डावीकडून सातवा! उजव्या हाताच्या दोन बोटांनी कपाळावरचा नि नाकावरचा घाम पुसण्यात वेळ गेला. तेव्हा ती शांतपणे कितीतरी वेळ माझ्या एकाच उत्तराची वाट पाहत थांबलेली...“आणखीन काय नविन?” मी मुर्खासारखा संशोधनाबद्दल बरळत राहिलो नि त्याहून हाईट म्हणजे वाघांचे पट़्टे किती असतात वेगवेगळे, हात लावता भासे गुबगुबीत नि कोवळे! मी मधेच टाईल्सकडे पाहिलं तर त्यात फक्त पोटाचा घेर दिसला, तेव्हा कुठे छाती वर काढली...तेव्हा कुठे तिचा पुढचा एक दात दुसऱ्यावर चढलेला दिसला...बिलगून बसलेला.
तो एक पडदा हेल्मेटच्या काचेवरचा उडून गेला भुर्र्कन नि उलगडलं सारं रहस्य. एक पाऊस काय आला, ती फुलं फुललेली-डोलणारी...नि एक दिसला वेडा, ते शब्द पकडत निघालेला...दूर मेघाळलेल्या दरीकडे. पण प्रॉब्लेम आहे साला मला. आता हे सहा महिने की दोन दिवस की सतत आयुष्यभर?

पंकज कोपर्डे (२०-०७-२०१३)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: