रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

सुमात्री गेंडा नामशेष का झाला?

प्रश्न वरवर सोप्पा वाटतो, पण याची उत्तरं स्थळ-काळानुसार बदलत गेलीहेत. या एका प्रश्नाभोवती, मला वाटतं, अख्खं जग रूंजी घालत असणार आहे…होतं…आणि असेल. प्रश्न फक्त सुमात्री गेंड्याचा नाहीये, एका प्राण्याचा नाहीये, उत्क्रांतीतून लाखो वर्षे पृथ्वीतलावर जगलेल्या घटनेचा नाहीये…प्रश्न श्वर-नश्वराचा आहे. काय उरतं नि कसं उरतं याचा आहे. ज्यांच्याकडे जगाला समणारी भाषा नाही, त्या प्राण्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती नि त्यांचं जग या साऱ्यांना माणसाने लावलेला अर्थ ते-ते प्राणी गेल्यावर उरणार. या सुमात्री गेंड्याला फार पुर्वीपासूनच स्वत:चा आवाज नव्हता. या जातीने कधी इतरांकडे मान वर करून पाहिलं नाही. सकाळ ते संध्याकाळ ते चरत राहिले, चिखलाळलेल्या प्रदेशांत लोळत राहिले. ती त्यांच्यासाठी घाण कधीच नव्हती. ते त्यांचं आयुष्य होतं. या त्यांच्या आयुष्यात कित्येक शतकं फरक कधी पडलेला नव्हता. ते अगदीच शांत मनाने चरत-जगत होते. ते चालायचे नि फिरायचे. जिथे चारा नि चिखल तिथे ते जायचे. त्यांनी समुद्र पार केले नाहीत, त्यांना त्याची कधी आवश्यकता भासली नाही. त्यांना कधी कुणाचं भय नव्हतं, कारण त्यांना वाटायचं की सारे आपल्यासारखेच असतील. शांत-समजूतदार. साऱ्यांनाच चारा आवडत असणार, कोण कशाला त्याला आग लावेल? साऱ्यांनाच चिखल आवडत असणार, कोण कशाला त्यावर ईमारती उभारायला येणार? त्यांना वाटत होतं की आपली कातडी, आपली शिंगं…कोणाला कशाला हवी असणार? पण सुमात्री गेंडे अगदीच मुर्खासारखे अनभिञ राहिले नि सरतेशेवटी जातीपुरतेही नाही उरले.

सुमात्री गेंडे काय किंवा भारतीय चित्ता काय किंवा Laughing Owl (हसरी घुबडं!) काय किंवा तो दुर्बल-असहाय डोडो काय किंवा PassengerPigeon (प्रवासी कबूतर!) काय किंवा अंदमानातल्या, अमेरिकेतल्या, ऒस्ट्रेलियातल्या नामशेष जमाती काय…सारे एकाच माळेचे मणी. आले नि गेले, कुणाला काय पत्ता. हे सारे लोक, इतर बलाढ्य ‘संस्कृतीं’समोर टिकाव धरू शकले नाहीत. इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीनंतरही सुमात्री गेंडा स्वत:च्या अंगावर बुलेट प्रुफ् कवच धारण करू शकला नाही की चारा-चिखलाचा नाद सोडू शकला नाही. तो बिचारा मरणारच होता, नामशेष होणारच होता. कुणाला कधी त्याची गरज भासली नाही किंवा त्याने कधी असे दाखवलेही नाही की जगाला त्याची गरज भासू शकते. आजूबाजूला आता स्वकीय उरलेले नाहीत हे पाहून तो बिचारा दु:खात डुंबलेला असेल. आपली भाषा समजणारं आजूबाजूला कुणी नाही हे पाहून त्या गेंड्याला जगण्यात स्वारस्य उरलेलं नसेल. तो त्याचं घर सोडून कायमचा निघून जाणार म्हटल्यावर, नैसर्गिक परिसंस्थेमधे किती मोठी पोकळी निर्माण होईल याचाही त्याला किंवा इतरांना अंदाज आला नसावा. त्याला तसं पण या साऱ्या गोष्टींमधे कधीच रस नव्हता म्हणा. चिखल नि चाऱ्यापुढे त्याला काहीच गोड नाही लागलं.


सुमात्री गेंडा हातातून जातोय म्हटल्यावर संशोधकांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी जंगली गेंड्यांना प्राणी-संग्रहालयात हलवले. तिथे त्यांना ‘better life’ दिली. योग्य ते अन्न, पाणी, हवा तसा निवडक चिखल नि छानछौकं तापमान नि आर्द्रता. काही गेंड्यांना अमेरिकेत हलवलं, काहींना ब्रिटनमधे. या गेंडयांनी त्यांच्या आयुष्यात असा प्रवास कधी केलाही नसेल. गेंड्यांनी या ‘better life’ मधेही प्रजनन नाकारलं. त्यांची संख्या वाढली नाही. हे सारेच गेंडे (दु:खी) मनाने अनंतात विलीन झाले. त्यावेळी कुणी साधू हजारो गाढवांच्यासमोर प्रवचन देत राहिला, “जे येणार ते जाणार. जे जाणार ते परत येणार. त्यांची स्वरूपं बदलेली असतील, पण कण तेच राहणार. भावना तीच राहणार”. मग हे सगळं होणारंच आहे, तर जगण्याचा खटाटोप का? सुमात्री गेंडा फक्त जगण्यासाठी जगला असेल का? येणार ते जाणार म्हणून वाट बघत थांबला असेल का? येणार ते जाणार यामधे कित्येक वर्षांचं अंतर आहे. ही वर्षं सुमात्री गेंड्याला आनंददायी नसतील का वाटली? प्राणी-संग्रहालयात एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसली असेल उरलेली त्यांची प्रजा नि त्यांच्या भाषेत म्हणत असतील, उत्कांतीचं हे पर्व संपलं. असं वाटतंय की सुमात्रात आपणच शेवटचे उरलेलो आणि ते ही आत्ता कळतंय. ते सारे पुढच्या काही वर्षांतच गेले. संशोधक हळहळले, त्यांना वाटलं आपण अपयशी ठरलो. आपण त्यांना वाचवू शकलो नाही. संशोधक म्हणाले, ते गेले कारण आपण त्यांना त्यांचा योग्य अधिवास देऊ शकलो नाही. In short, आपण त्यांना त्यांची स्वत:ची दुनिया देऊ शकलो नाही. त्यांना `better life’ नको होती, त्यांना त्यांची स्वत:ची दुनिया हवी होती. त्यांना वाटलंही असेल की आपली मुलं या प्राणी-संग्रहालयात वाढवण्यापेक्षा आपण नामशेष झालेलोच बरे! ते जे काही असेल, सुमात्री गेंडा, जगण्याच्या स्पर्धेत टिकला नाही नि स्वत:चा आवाज इतरांपेक्षा वाढवू शकलेला नाही. त्याची जागा बदलली, त्याचं घर तोडलं, त्याची भाषा खुंटली नि चिखल-चारा हरवला. चिखलात बुडालेल्या सुमात्री गेंड्याला चिखलातच सोडलं असतं तर बरं झालं असतं बहुधा…     
पंकज

९ नोव्हेंबर २०१५
More about sumatran rhinos - http://news.nationalgeographic.com/2015/09/150930-sumatran-rhino-extinction-indonesia-animals-conservation/

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

दगडाळलेला काळ, त्या काळातला गाळ

प्रत्येक कलाकार हा त्याच्या विश्वात जगत असतो. तिथे त्याचं राज्य असतं. त्याची लोकं, त्याची माती, त्याचे प्राणी नि त्याच्या कल्पनांची घरं वसलेली असतात. त्याच्या भूतकाळाचा गाळ त्या राज्याचा मातीखाली अधून-मधून पसरत असतो. मातीवरची घरं मजबूत असतात नि घरांमधली पात्रं खरी असतात, पण त्या सर्वांना वेदनांचा एक शांत आधार असतो. वेदना या दु:खदच असतील असं कुणी ठरवलंय का? मी तरी नाही. वेदना या शब्दातच यातना, त्रास भरलेला आहे असं लोक म्हणतात, ती एक ठसठसणारी जखम असल्यासारखी भासते काहींना…पण काही वेदना या उलट आनंददायी असतात. आठवतं का कधी काळी सुजलेल्या बोटावर टिचकी मारली की उठणारी कळ किंवा फुटलेल्या ओठांना दातांनी दाबताच जागणारी नाजूक कळ नकोनकोशी पण फार हवीहवीशी वाटलेली? आठवतच असणार. वेदनाच ती. ती जिथून उमटली तिथंच मिटली, तर कशी काय त्रासदायक? ती उमटताना क्षणभंगुर का होईना, आनंद देऊन गेली, की का होईल त्रासदायक?

असाच एक माणूस होता. तो दररोज सकाळी आवरून कामावर जायचा. दिवसभर ईमाने-इतबारे काम करून थकून संध्याकाळी घरी यायचा. त्याचं हे आयुष्य कितीतरी वर्षांपासून चाललेलं. मग एके दिवशी त्याला वाटलं की आजूबाजूचं जग तुटत चाललंय-फुटत चाललंय; पण तो त्याचं काम करत राहिला. त्यानं आजूबाजूला ओरडणारी लोकं पाहिली नि तुटणाऱ्या भिंती पाहिल्या. त्यानं मोडलेली माणसं पाहिली नि रक्ताळलेले रस्ते पाहिले. त्याला भिती वाटली, पण तो काम करत राहिला. त्यानं माणसांमधे राक्षसं पाहिली नि फुटलेले हंडे पाहिले; त्यानं कापलेली जनावरं पाहिली नि चाबकानं फोडलेल्या पाठी पाहिल्या; त्यानं मेलेली फुलपाखरं पाहिली नि जगाचा ऱ्हास होताना पाहिला. तो दररोज कामावरून घरी आला की घाबरा-घुबरा व्हायचा. त्याला घाम सुटायचा. त्याच्या मनाला यातना व्हायच्या नि तो त्यांना दाबून स्वत: जिवंत असल्याची खात्री करून घ्यायचा. तो म्हणायचा, काय रे देवा, हे काय सुरूय? तो म्हणायचा, कधी हे थांबणार? कधी ती सुंदर गावं, लोक, पाणवडे, नद्या नि तलाव, रस्ते होणार? तो रहायचा त्या तळ्याकाठी रान माजलेलं. त्या माजलेल्या रानात होती तेव्हाही जंगली श्वापदं. त्यानं विचार केला की माणसांपेक्षा हे रान बरं. जंगलात एकांतात मनाशी गुजगोष्टी होतील. त्यानं एके दिवशी संध्याकाळी त्या रानात प्रवेश केला. थोडं भित-भितच तो आत शिरला. त्याला वाटलं, जर इथेही असतील माणसं तर परत फिरलेलंच बरं. पण त्याला रानात कुणी भेटलं नाही. डोक्यावरून पोपट उडत गेले नि संध्याकाळ झाली तसे काजवे उडू लागले. तो दोन्ही पाय मुडपून, कमरेत घेऊन, अंधारलेल्या आकाशाकडे बघत राहिला. झाडांच्या पानांच्या पसाऱ्यातून एक-दोन चांदण्या तो पाहत राहिला. अंधार गोठू लागला तशी थंडी वाढली. एक घुबड त्याच्या डोक्यावरच्या फांदीवर येऊन बसलं. ते थोडं घुमलं नि चांदण्यांकडं पाहत राहिलं. माणसाला मोकळं वाटू लागलं.


मग तो पुढच्या दिवशी परत त्याच जंगलात आला, संध्याकाळी. नि असा तो तिथे दररोज येत राहिला. तो वीस वर्षे येत राहिला. ते एकुलतं घुबड दरम्यान वारलं, पण त्याची पिल्लं कौतुकाने माणसाचं काम बघत बसू लागली. तो माणूस पहिल्यांदा माती घेऊन आला, मग दगडं घेऊन, मग भिंतींचे तुकडे घेऊन, बांगड्यांचे तुकडे घेऊन आला. पण तो मातीच्याही अगोदर मनात ठसठसणारी वेदना घेऊन आला. तो त्या जागी आशा घेऊन आला. आशा…तुटलेल्या गोष्टी जोडण्याची. त्यानं सुरूवात केली, मोडलेली माणसं जोडण्याची नि तुटलेली घरं उभारण्याची. त्यानं तळ्याकाठी धबधबा उभारला. त्यानं त्याच्या स्वप्नातलं, पण आता तुटलेलं गाव तिथं वसवलं. त्यानं प्राणी आणले…वन्य आणि पाळीव. त्यानं लोकं उभारली…शीख, हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन. त्यानं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. त्यांना त्याने पाय मुडपून बसायला सांगितलं. आभाळाकडे बघत. त्यानं त्यांना सांगितलं की पृथ्वीच्या थोडं वर जिथे आभाळाकडे नजर जाते, तिथे स्वप्नांचा प्रवास सुरू होतो. ढगांना वेगवेगळे आकार फुटतात नि कल्पनांना धुमारे. तो माणूस त्याचं राज्य बनवून निघून गेला, त्याची प्रजा उरली आता. मी पाहिलंय त्यांना नेकचंदच्या स्वप्नांत बुडालेलं. ती सारीच रात्री चांदण्याकडे पाहत राहतात आणि एक घुबड येऊन बसतं रात्री त्यांना साथ द़्यायला.  
पंकज

५ नोव्हेंबर २०१५

Nek Chand - http://nekchand.com/about-nek-chand-2