रविवार, २६ जून, २०१६

नोराह

त्या संध्याकाळी वस्तीगृहातली ती निळी भिंत जांभळसर होऊ घातलेली. सात-साडेसात वाजत असतील. हिवाळा. मनूरच्या पसरलेल्या हातावर कविता मान रेलून पहुडलेली. तिचे केस मोकळे नि त्यांची मनं आतुरलेली. मनूरने कविताचे केस नकळत हुंगले नि तिचा गंध मनात भरून घेतला. त्या खोलीत प्रकाशाने येऊ नये म्हणून मनूरने विशेष काळजी घेतली होती. एक तो लॅपटॉप गात होता नि त्याच्या धूसर प्रकाशात ती खोली उजळून निघालेली. मनूरने नकळत हळूच त्याचे ओठ कविताच्या गालांजवळ नेले. तेव्हा मी नोराहला भेटलो. ती फार उंच नव्हती. फार गोरी नाही, सावळीशी. तिने केस मोकळे सोडले होते. तिच्या डाव्या हातात एक लाकडी बांगडी होती. कपाळावर एक छोटीशी टिकली नि कानांत फुलपाखरं अडकवलेली. ती त्या खोलीच्या दारात चौकटीला टेकून उभी होती. तिचं लक्ष मनूर नि कवितावर नव्हतंच. ती त्या खोलीच्या जांभळसर होत चाललेल्या भिंतीकडे पाहत होती. त्या खोलीत एक हवाहवासा वाटणारा गंध पसरत होता. त्या गंधाने मनाला शहारे सुटत होते. नोराह काही वेळ त्या भिंतीकडे पाहत राहिली. हळूच तिने हाताने खोलीतला तो गंध ढवळला. तो अधीकच गाढ झाला. कविताने डोळे बंद केले नि ओठांना मनूरच्या ओठांजवळ नेले. सगळं आपसूक घडत राहिलं. नोराह मग त्या खोलीत काही वेळ घुटमळत राहिली. तिने पडदा थोडा बाजूला सारून रस्त्यावर खेळणाऱ्या, चिरकणाऱ्या मुलांकडे एकवार पाहिलं. किती तो आवाज. तिनं पडदा नीटनेटका करताच आवाज गायब. तिने वरच्या हळूवार डोलणाऱ्या पंख्याकडे पाहिलं. तिनं दरवाज्याकडे पाहिलं नि मनूर-कविताकडे पाहिलं. तिनं माझ्याकडे पाहिलं. मी गंध पाहत राहिलो नि ती दार ओढून निघून गेली.

नोराहला मी त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं. ती पुण्यातच होती फिरत. एकदा टिळक रोडवर दिसली, एकदा कॉलेजमधे आणि कित्येकदा माझ्या चाकणमधल्या घराजवळ. पुण्यात मी ख्रिश्चन मुली जास्त पाहिलेल्याच नव्हत्या, त्यामुळे तिचं ते वागणं-चालणं, तिचा वेश सारंच काही माझ्यासाठी नवं होतं. ती माझ्यापेक्षा वयाने मोठी असणारच, पण त्याहून मला भिती होती ती माझ्याहून बुद़्धीने मोठी असण्याची. बहुधा दहाएक वर्षांचं अंतर असावं. मी कधी तिचा शोध घेतला नाही, पण ती दिसत राहिली सतत इथे-तिथे. बहुधा ती इथली नसावीच. बाहेरून कित्येक लोकं शिकायला पुण्याला येतात, तशीच असावी एखादी. माझ्या घराजवळ कुठलं कॉलेज नाही, त्यामुळे तिचं आसपास असणं थोडं विक्षीप्त वाटायचं मला. ती त्यादिवशी त्या मुलांच्या वस्तीगृहात कशी आणि का आली याचा त्यानंतर कधीच पत्ता लागला नाही. मनूर माझा मित्र, पण त्यानं मला कित्येकदा सांगितलं की त्यादिवशी त्याच्या रूमचा दरवाजा आतून लॉक्ट होता. मलाही आतलं कसं दिसलं याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं नि दु:खही. स्वत:च्या एवढ्या वैयक्तिक गोष्टींमधे कुणाला कशाला इतरांना involve करायला आवडेल? पण मला माहिती नाही हे कसं घडलं. मी वस्तीगृहाबाहेर उभा होतो नि जे पाहिलं ते मला मनूरच्या रूमच्या खिडकीतून दिसलं होतं. अगदी सगळंच. मनूर-कविता, नोराह, ती जांभळसर भिंत, त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या गंधाचे ढग, खिडकीवरचा पडदा, तिची बांगडी-टिकली-केस-डोळे. निळसर डोळे. मनूर म्हटला एकतर तू प्रेमात पडलाहेस किंवा तुला सायकिआट्रिस्टकडे जाण्याची गरज आहे. थोड्या खोलात गेल्यावर कळलं की नोराह नावाची कविताची एक मैत्रिण आहे खरी. ख्रिश्चन, पण टिकली लावते. सावळी, भुऱ्या रंगाच्या डोळ्यांची. शांत-शांत असते. कविताला मला इतर गोष्टी सांगण्याची छाती झाली नाही, नि तो विषय तिथेच संपला. 

हे सगळं एखादं वर्षं चाललं. ती इथे-तिथे दिसत राहिली. एके दिवशी मी मुद्दामूनच तिच्या मागे-मागे रस्ता कापत चाललो. वाटलं हा नक्कीच योगायोग नसावा. काहीतरी असणार. मी जवळपास तिचा दोन-तीन किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. संध्याकाळ होत चाललेली नि ती न थकता गल्ल्या-गल्ल्यांतून एकटीच भटकत चाललेली. काहीतरी गुणगुणत. तिनं तिच्या पोटऱ्या अर्धवट झाकल्या जातील एवढा लांबसर काळा झगा घातलेला. तिच्या पायांत पैंजण होते. त्या पैजणांवर जेव्हा डोळे खिळले तेव्हा क्षणभरातच ती त्या गल्लीतून गेली की काय असं वाटलं. मी आजूबाजूला पाहिलं, असंख्य लोक. आवाज. कर्णकर्कश. उन्हाळा. तुळशीबागेत एका क्षणात मी हरवून गेलो. नोराह त्या गंधासारखी भासली. जांभळसर आभाळ एक लक्षात राहिलेलं. नोराहमधे असं काही होतं की जे मी कधीही विसरू शकणार नाही. ती त्या गंधासारखी होती. हातात न येणारी, पण सतत भासणारी. तिच्या मागे-मागे फिरण्याचं वय नव्ह्तं माझं. आता कामाचं, जबाबदारीचं नि कर्तव्याचं आयुष्य जगत चाललेलो मी. असं गल्ल्या-गल्ल्यांत भटकणं परवडणारं नव्हतं.  

नोराह प्रकरणाला कित्येक वर्षं झाली. कामानिमित्त मी अंदमानात दाखल झालो. एके दिवशी मायाबंदरच्या मेन रोडवर फिरताना एक व्यक्ती दिसली. पांढरे केस, कपाळावर टिकली. काळा पायघोळ झगा. तिच्या हातात एक बास्केट होती नि ती रस्त्याकडेला बसलेल्या म्हाताऱ्याकडून भाजी विकत घेत होती. ती तिच्या गुडघ्यात वाकून बसली होती. तिचे ते पांढरे केस सोडले तर ती एखाद़्या बारा वर्षांच्या मुलीसारखी दिसली मला. ती नोराह होती की दुसरं कुणी माहिती नाही. पुण्यातून अंदमान? एवढ्या लांब कशी येऊ शकेल ही? एवढ्या वर्षांनी? एकटीच? मला वाटलं की हे बरंच झालं. इथे आपल्याला कुणी ओळखतही नाही. तिला जाऊन सरळ विचारावंच की काय सुरूय हे? मी तिच्या जवळ जाऊन म्हाताऱ्याला विचारलं, “प्याज कैसा दिआ?” तिला एवढ्या जवळून पाहिलं नव्हतं नि एकदा खात्रीपण करून घ्यायची होती की ही तीच आहे ते. तिचे डोळे निळसर होते, भुरे नाहीत. लेन्सेस? असतीलही. मी घसा खाकरला.
“Hey, this may be weird…but I believe that I have seen you sometime back in Pune. I guess some ten odd years back. You are Norah, right?”

ती बहुतेक पहिल्यांदा दचकली, सावरली पण बुचकाळ्यात पडली. तिचे डोळे थोडे बारीक, मग संशयी, मग निवांत झाले. काय माहिती, पण बहुतेक त्यांचे रंगही त्या-त्या वेळी बदलले. तिच्या कानांतली फुलपाखरं पंखांची सावकाश हालचाल करताहेत का काय असा मला भास झाला. मायाबंदर त्सुनामीमधे गडप झालंय…काळोख पसरलाय…पाण्याचा घनगर्द आवाज कानांत साठून राहिलाय…आभाळ निळसर मग जांभळ मग गुलाबीसर होत चाललंय…एक फार ओळखीचं, मन शांत करणारं गाणं फार दूरवरून ऐकू येतंय; त्याच्या जवळ जाऊ वाटतंय…एक नाव चांद्ण्यांच्या लाटांवर स्वार झालीय नि एक चंद्र गालांवर दोन्ही हात ठेवून त्या नावेला पहात बसलाय. एवढ्या जाळ्यात मी एकटाच कोरडा आहे. माझ्या आजूबाजूचं एक मीटरचं वर्तुळ पुर्णपणे कोरडं आहे. मी जमिन पाहतोय नि ती मऊसर आहे. पायांतल्या चपलांचा पत्ता नाही. तिने तिच्या निळसर डोळ्यांनी म्हटलं –
“Yeah. My name is Norah. Nice to meet you mister…”
“Pankaj.”
“Pankaj. हो, मी होते पुण्यात. दहा वर्षांपुर्वी? बहुतेक. कविता सांगायची तुझ्याबद़्दल. तूच ना तो?”
“अं…नाही, बहुतेक तो मनूर असेल.”
“Oh yeah, yeah. मनूर…मनूर. Sorry, I forgot. बहुतेक आपण भेटलेलो नाहीये.”
“हं…नाही भेटलेलोय, पण मी तुला पाहिलंय कित्येकदा.”
“आह…मला तर असं हजारो-लाखो लोकांनी पाहिलं असेल! How does that…”
“त्यादिवशी तू उभी होतीस ना त्या दारात? कविता-मनूर…”
“कोणता दरवाजा?”
“त्यादिवशी ते गाणं ऐकत पडले होते दोघंच. तू त्या खोलीत येऊन खिडकीवरचा पडदा सारलास…नि परत त्यादिवशी मी तुझा पाठलाग करत होतो, तू बराच वेळ चाललीस नि गायब झालीस. तो गंध…तो जांभळा रंग…”
“पंकज तुला काहीतरी गैरसमज झालाय. त्या दोघांच्या मधे मी कशाला जाईन? And I don’t remember any of this…”

तेव्हाही असंच काहीसं झालं. तो गंध, एक गाणं दूरवर चाललेलं नि जांभळसर आभाळ. क्षणात वाटलेलं की मायाबंदरच्या पुढच्या वळणावर स्वारगेट येईल आणि माझ्या राहत्या खोलीच्या भिंतीपलीकडे मनूर-कविता एकत्र बसलेले असतील. डोकं दुखू लागलं तसं मी माझ्या मायाबंदरच्या खोलीवर परतलो. मनूरला फोन लावला. त्याला सांगितलं नोराहबद़्दल. त्यानं सांगितलं की नोराह ही साधी-सुधी मुलगी नाहीये. ती तांत्रिक-विद़्या शिकलीय. तिला लोकांना भुरळ पाडता येते, वेड लावता येतं. काही लोकांनी तर तिच्या मागं लागून आत्महत्यापण केल्यात. तिचं बालपण फार विकृत होतं. तिच्या लहानपणापासूनच तिला या असल्या गोष्टींचा फार नाद. तिच्या घरी वाढवलेल्या गुलाबांवर ती तिचे प्रयोग करायची. त्या असंख्य गुलाबांच्या अगणित आत्मा तिच्या भोवतीच फिरत असतात म्हणे. तिला एक विशिष्ट गंध आहे. तुला जाणवलं का असं काही? मी ‘नाही’ सांगताच तो पुढे सांगू लागला. बरं झालं. ज्यांना त्या गंधाचा लळा लागतो त्यांना ती दिसत राहते. भेटत राहते असं म्हणतात. कविताची रूममेट होती ती! मी ज्यावेळी या गोष्टी ऐकल्या तेव्हा मला फार भिती वाटलेली यार! कविता या सर्वातून सहीसलामत सुटली. अजून एक गोष्ट…तिनं तिच्या कुठल्याशा प्रयोगात बऱ्याचशा शब्दांना, स्वरांना नि वाद़्यांना जीव दिला. ती चालू-बोलू लागली, पण जशी ती जगली तशीच पटापट ती मेली. त्यांचे आत्मे तिच्या भोवतीच असतात म्हणे. जी व्यक्ती तिचा तो गंध जाणते, ज्याला ते एक गाणंसं ऐकू येतं नि ज्याला तिची दृष्टी दिसते, त्या व्यक्तीवर नोराह पुर्णपणे आरूढ झालेली असते. मग तिच्यापासून सुटका नाही. तुला आठवतोय का तो विवेक नि मानस? त्यांना तिनं असंच गिळंकृत केलंय. तू या भानगडींत नको पडूस. हनुमान चालिसा वाच नाहीतर राम-रक्षा. नाहीतर बायबल वाच रे बाबा!

मनूरशी बोलल्यावर मी बराच वेळ बेडवर पडून राहिलो. पंखा हळूवार फिरत राहिला. खोलीबाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज क्षीण होत गेला नि एकच ओळखीचं गाणं खोलीभर झालं. आभाळ निळसर होत गेलं. गंध गडद होत गेला. नोराहची छाया दाराला टेकून उभी असलेली दिसली. डोळे मिटू लागले. मन शांत होत गेलं. पेशी-पेशींपर्यंत तिचा गंध पसरत गेला. तिने माझ्या गालांवरून हात फिरवला. गालांवर ओठ टेकवले. अचानक भरून आलेल्या थंडीत गालाचा तेवढाच भाग ऊबदार वाटला. तिच्या कानांतली फुलपाखरं खोलीभर उडू लागली. निळसर, पिवळ्या ठिपक्यांची. ती खोलीच्या पडद़्याजवळ गेली. तिने तो बाजूला सारला नि बाहेर पाहिलं. मग तो नीटनेटका करून ती बेडवर माझ्या शेजारी येऊन पडली. वरचा पंखा गडप झालेला. तिथे रात्र नि चांदण्यांत हरवलेली एक नाव दिसत होती.

खाड़्कन आवाज आला नि खिडकी जोरात आपटली. मी दचकून उडी मारली. मनूरने रागाने माझ्याकडे बघत खिडकी बंद केली. त्याला प्रकाश अजिबातच नको होता त्याच्या खोलीत. कविता असताना तर नाहीच नाही. मी पुण्यात होतो, वस्तीगृहाबाहेर. मनूरने पडदा झटक्यात ओढला. काय झालं? नोराह? अंदमान? काळी जादू? मला काहीच कळेनासं झालं. मी पुन्हा वर पाहिलं. मनूरच्या खिडकीतला पडदा कुणीतरी तात्पुरता बाजूला सारला होता नि गंधांचे ढगच्या ढग माझ्या बाजूने येत होते. सुरूवात झाली होती.
                                                                                                                                                                                                                                            पंकज कोपर्डे
२१ मे २०१६
abstract art (sketch) accessed from <https://in.pinterest.com/jlcondel/art-class-abstract-faces/> on 26 June 2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: