शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०१६

Rucksack

सामानाचा पसारा पाहून वाटलं की हे सारं आहे त्या जागेत-जगात मावणारं नाहीये! हे असं मला नेहमीच वाटतं. त्याची मजा अशीय की, जे-जे मावणारं ते-ते भरायला किंवा वेड्यासारखं कोंबायला नेहमीच परत-परत नविन जागा-जगं शोधावी लागतात. हे खेळण्यासारखे आसपास पडलेले (पण अतिमहागडे) DSLR कॅमेरे, त्यांच्या सतत डोक्यावर पदर बाळगणाऱ्या नाजूक पण करारी लेन्सेस, एक ती मागच्या दहाएक वर्षांपासून गर्लफ़्रेंडपेक्षाही जवळ वाटणारी-असणारी दुर्बिण, थोरामोठ्यांनी लिहीलेली पक्षी-साप-बेडकं-चतुर यांवरची पुस्तकं, एक इवलाली पण अति-महत्त्वाची फिल्ड डायरी, एक कुठूनही उचलेलं पेन, फिल्ड डायरी इतकाच अतिमहत्त्वाचा लॅपटॉप आणि स्लिपींग बॅग! एवढा पसारा to start with. म्हणजे हा पसारा by default आमच्या पाठीवर सदैव असणारच. हे ओझं कधीच वाटलं नाही. पाठीला या गोष्टींची सवय झालीय असंही म्हणता येत नाही. पण वर लिहीलेल्या गोष्टी पाठीवर उचलाव्या लागतात, ही भावनाच शरीराला कधी झाली नाही! बरंच फिरलो. चांदोलीमधे पाठीवर जवळपास वीस-पंचवीस किलो घेऊन या जगातल्या ९९.९९९९९९९९९९% लोकांनी पाहिले नसतील असे सुंदर सुंदर काळ्या कातळाचे सडे (Lateritic plateaus) पाहून आलो. त्या सड्यांवरती मुजोर उधळणारे कातळासारखेच उनाड गवे (Gaur) पाहिले, रात्री तिथेच बसलेले रातवे (Nightjar) पाहिले. कोयना धरण्याच्या पाणी फुगवट्याशेजारीच बहरलेल्या जंगलात रात्री घालवल्या. त्यावेळीही ती रक-सॅक पाठीवर होती. एका रात्री गर्द जंगलाता ज्या तुटक्या-फुटक्या झोपडीत झोपलो तिथेच बिबट्या गुरगुरला. करवतीसारखा आवाज सोडत तो काही वेळ माझा नि जंगलाचा जीव चिरत बसला. ऐकू आला पण बिलंदर नाही दिसला. हळूच कुठूनसा निघूनही गेला. माझ्या पुण्याच्या बेडरूममधे असं कुणी येऊन बसलं असतं तर मी नक्कीच त्याला करवतीने कापला असता, बिबट्या तसा शेळपटच निघाला! त्यापुर्वीही अंदमानाच्या जंगलात एक नागराज (King Cobra) आरामात माझ्या रक-सॅकवर पहुडून होता. त्यावेळीही हीच होती. ती समुद्राच्या पाण्यात कित्येकदा भिजली, पण नाही कुजली. मला वाटलं कुठेतरी कशीतरी फाटेल. फाटली तर थोडी-थोडी उसवेल. उसवली की तिच्यावरचं प्रेम माझं थोडं कमी की कसं होईल. प्रेम जसं जसं कमी होईल, तशी ती अधिकाधिक निर्जीव होत जाईल. बिचारी अशी दूर-दूर होत जाईल की मग तिचं ओझं होऊन जाईल. पाठ कुरकुरेल, मणके दुखू लागतील. खांदे तक्रार सुरू करतील नि मानेचे स्नायू आखडून जातील. अशावेळी कोण मदतीला येईल


अंदमानातली जंगलं तुडवली, रक तुटली नाही!

Thank god! अजून हे झाले नव्हते, पण आता घडले. ते कधी-कधी ना घडणारच होते म्हणा, पण या गोष्टींचा कधी एवढा खोल विचार नव्हता केला. बऱ्याचदा होतंही असंच, काही गोष्टी विचार करण्यासारख्या कधी वाटतंच नाहीत आणि घडल्या की मेंदू चक्रावून जातो. माझी रक-सॅक माझ्यासाठी निर्जीव नव्हती झाली, पण तिचं आयुष्य संपत आलं होतं खरं. तिचे बंद झिजले होते, अंदमानात तिला उंदरांनी कुरतडलं होतं थोडं (म्हणूनच नागराज आलेला). तिच्यावर मीच अनन्वित अत्याचार केले होते आजवर, पण ती मुक्याने सारं सहन करत राहिली. मी अवाच्या सवा सामान तिच्या कोंबत राहिलो. माझं जग, माझं जग म्हणत. ती सतत माझं जग तिच्यात सामावत राहिली नि मग आतल्या वजनाने-ताणाने आधीच उसवलेल्या ठिकाणी फाटत गेली. जोपर्यंत मागच्या ट्रिपमधे एक पुस्तक अतिभरलेल्या रक-सॅकमधनं धब्बकन खाली पडलं नाही, तोवर हे जाणवलं नाही मला. ते तसं पडलं तसं माझ्यासारख्याच अनेकांनी या अन्यायावर निषेध नोंदवले. मलाही ते जाणवलं. आपली आपली म्हणत तिला सतत consider करत आलो. तिच्यावर किती भार टाकला हे लक्षात आलं नाही. माझी रक-सॅक फार भारी, म्हणून या सर्व गोष्टींवर डोळेझाक करत आलो.

चांभार म्हणाला, सोप्पंय. टिप मारतो, टाईट करतो. शंभर रूपयांत नव्यासारखी करून देतो. त्याला म्हटलं विचार करून सांगतो. खरं त्यात काय एवढं विचार करण्यासारखं? सहज-सोप्पा उपाय. मग असं वाटलं की टिपेने या जखमा निघतील का भरून? ही हात-शिलाईची. चांभार तिचा तो original रूबाब कुठच्या कुठे घालवेल. तिच्यावर अजून अन्याय करण्यापेक्षा तिला छानपैकी घडी करून कपाटात ठेवून द्यावं नि अगदी अशीच एक हातशिलाईची याच कंपनीची अजून एक रक-सॅक घ्यावी, असा एक विचार मेंदूत सुरू होऊन मनात प्रवेशता झाला. हिच्याबद्दल जसा विचार आला, तसाच मग कॅमेरा, लेन्सेस, दुर्बिण, लॅपटॉप यांबद्दलही झाला. स्वत्वाची, खासकरून स्वत:च्या अर्थस्थितीची जाणीव झाली, त्यासरशी तो साधासा विचार क्षणात गायब झाला. पैशाने काय सगळंच खरेदी करता येईल, पण तो एक जीव जडलेला असतो आपला आपल्या गोष्टींवर त्याची ती किंमत पैशात मोजता येत नाही आणि विकतही घेता येत नाही. दोनेक दिवस मन हिंदोळयावर होतंहिलाच दुरूस्त करून वापरू की नविन घेऊ! जसजशी पुढ़च्या ट्रिपची वेळ जवळ आली तसा नविन रक-सॅक घ्यायचा विचार पक्का झाला.
      
हक्काच्या घरापासून शंभर मैलांवर सोडलेलं कुत्रं कसं वासावर घर शोधून काढतं, तसा पुण्याच्या कचऱ्यासारख्या गर्दीतून वाट काढत पाच वर्षांपुर्वी जिथनं रक-सॅक घेतली होती तिथे आपोआप, without navigation, पोहोचलो. दुकानाचा विस्तार वाढला होता. दुकानात रक-सॅकशिवाय अजून बरेच products दिसत होते. पाहून छान वाटलं. दुकानदाराला सांगितलं, ‘ओळखलं का मला? पावसात आलेलो पाच वर्षांपुर्वी! तुम्ही बसलेला माडीवर नि दुकानात आलेलं पाणी!’ त्यानं काही ओळखलं नाही, पण व्यापारी हास्य केलं. माझी नजर भिरभिरली दुकानभर. त्याला विचारलं मी, ८५ लिटर्सअमूक-अमूक ब्रॅण्डअमूक-अमूक मेडनेव्ही ब्ल्यू कलर. त्यानं सांगितलं की तो product बंद झालाय! आम्ही तसल्या बॅगा बनवत नाही आता. त्यांना जास्त डिमाण्ड नव्हती. फॅन्सी कमी साईझच्या बॅगा जास्त चालतात आजकाल. थोडक्यात त्यानं सांगितलं की तुम्ही भलतेच वेगळे आहात साहेब. तुमच्या आवडीची ती एक बॅग मिळाली असेल तुम्हाला एखांदवेळेस, पण आजकाल पाठीवर एवढं ओझं घेऊन जंगलात फिरणारे (जंगलात काय उपयोगाचा फॅन्सी कलर!) सोबर नेव्ही ब्ल्यू कलरवाले लोकांची प्रजात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आता हातातली ती जुनी बॅग गेली तर ठीकंय, पण ही धोक्याची सूचना आहे. नजिकच्या काळात तुम्हीही त्या रक-सॅकसारखे होणार आहात. Market value गंडवते हो बऱ्याच जणांना!

राग आला. त्या दुकानातून बाहेर पडलो. चार दुकानं फिरलो. एका जागी शिरलो तर मनात भरणारी दिसली सॅक. म्हटलं, चला घेऊयात नि मग तसाच असलेलं सगळं सामान कोंबून तिला गाठ मारली. खांद़्यावर टाकली तशी पाठ तिरकी-तारकी झाली नि झटक्यात ताठ झाली. म्हटलं हा सगळा सवयीचा मामला आहे. कोण कुठे नामशेष होत नाही. डोक्यावर हॅट, गळ्यात दुर्बिण नि कमरेला लोंबकळणारा ४०० ते १००० एम एम लेन्स चा कॅमेरा, पाठीवर रक-सॅक नि पायांत हंटर शूज; ही प्रजात नामशेष होण्यातली नाही!

तर रक घेतली. पाठीवर टाकली. कानांत गाणी घातली नि शीळ घालत बाईकवरून घराकडे निघालो. पाऊस आला, त्यावेळी छाती-पोट-डोकं भिजलं; पाठ भिजली नाही मात्र. रक मनात भरलीच होती पुर्वी, आता अजूनच जवळची वाटू लागली. प्रत्येक वस्तू नि माणसाचंही माझ्या रकसारखंच आहे! मनात भरणारी कित्येक; पण उतरून तिथंच राहणारी मोजकीच! आता मात्र मी माझ्या रकच्या प्रेमात पडलोय. साथीदार मिळाला मनासारखा की मग पुढचा प्रवास घडणारच आहे भारी.
परवाच मला कळलं की, मी घेतलेली रक ब्रॅण्डेड नसून डुप्लीकेट आहे! असावी; असेल..मला काही फरक पडत नाही! जर माझ्या रकबद्दल कुणी काही अपशब्द काढला तर मात्र मग त्याला/तिला काही दात गमवावे लागणार आहेत..जपून!!  
पंकज कोपर्डे

(pankajkoparde.weebly.com)
First appeared in Rangdeep Diwali 2016 - mmny.org

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: