मग मी शांत चित्ताने
विचार करायचा असं ठरवतो. ‘कोण आपण? कसे आपण?’ प्रश्न फार साधे सोपे, पण उत्तरं
शोधणं किती कठीण. कुठून सुरूवात करायची तेच कळेनासं होतं. एकेक प्रश्न सोडवणं योग्य
म्हणून पहिला प्रश्न पहिल्यांदा – ‘कोण आपण?’ या प्रश्नात ‘आपण’ हे आदरार्थी एकवचन
आहे, हे ध्यानात येऊ दे म्हणजे अजूनच सोप्पं.
‘कोण आपण?’
साहजिक येणारं उत्तर
म्हणजे – पंकज कोपर्डॆ. मग मनाला लाज वाटते नि वाटतं की एवढा कोता विचार?
पुढचं लगेचंच येणार
उत्तर म्हणजे – मनुष्य. मग मनात अजून थोडी शंकेची पाल चुकचुकते.
त्यापुढे वाटतं – नुस्तं
मनुष्य नाही, तर मनुष्य-प्राणी. मग वाटू लागतं की हे इथे काही संपत नाही. का स्वत:ला
मानवानेच तयार केलेली जात-व्यवस्था लावायची?
थोडा वेळ विचार केल्यावर
वाटतं की ‘जीवजंतू’ म्हणावं की ‘सजीव’ म्हणावं, मग निर्जीवांना जीव नाही ही सुद्धा
एक कल्पना, म्हणून ते ही बरोबर नाही. या अंतराळात फिरणाऱ्या अनंत भागांपैकी एक भाग.
मग पुढे वाटतं की ही व्याख्या साऱ्यांनाच लागू होते की. डुक्कर, गाढव, जीवाणू, विषाणू
सर्वांनाच. मग मी नि ते वेगळे कसे? ‘कोण आपण?’
समजतं की या प्रश्नाला अनंत थर आहेत. कोणत्या थरात शिरल्यावर मनाला बरं वाटेल त्यावर लक्ष केंद्रित केलं तरच पुढच्या प्रश्नाचं सोयिस्कर उत्तर शोधता येईल. या विचारासरशी मन पहिला थरावरच समाधान मानतं. बरं, ‘कोण आपण?’ तर पंकज कोपर्डे. मग कशावरून आम्हीच पंकज कोपर्डे? मग स्वत:भोवतीची वलयं जाणवू लागतात. मी तोच कारण तो लिहीतो नि मी पण लिहीतोय; त्याची एक वेगळीच शैली आहे लिहण्याची, माझीही तीच आहे; तो पक्षी-निरीक्षक आहे, मी ही आहे; तो असा आहे, मी ही तसा आहे; त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडेही तेच आहे; त्याचे विचार-वागणं-बोलणं सगळं माझ्यासारखंच आहे; तो नि मी आम्ही वेगळे नाही आहोत…फोटो बघता का? की अंगठ्याचा निशाणा? पेक्षा जनुकीय चाचणीच सांगेल सगळं. मग मेंदू म्हणतो एका काल्पनिक नावाबरोबर जनुकीय चाचणी कशी काय शक्य आहे बाळा? मग शासकीय कागदपत्रं आहेत माझ्याकडे – आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड अजून काय हवं. मग मेंदू म्हणतो पण तुला पंकज कोपर्डे होण्याचं एवढं आकर्षण का आहे? तू तर शाहरूख खानसुद्धा होऊ शकतोस किंवा दिया मिर्झाही होऊ शकतोस! कल्लोळ माजतो तसा तो प्रश्न कुठेतरी लुप्त पावतो. मग पुढचा दुसरा प्रश्न – ‘कसे आपण?’
पहिला प्रश्न सोडवण्यासाठी
जो पसारा मांडला त्यातल्याच ओळी या उत्तरासाठी हमखास वापरल्या जाणार. पण इतरांना आपण
कसे वाटतो? याचा विचार प्रबळ होऊ लागतो. इतरांना आपण कसे वाटतो हे खरंच सांगणं किती
अवघड आहे. कसेही वाटत असू! त्यांच्या-त्यांच्या कुवतीप्रमाणे आपल्याला पारखत असतील
लोक. असतील तर असतील, पण मग आपल्याला स्वत:ला आपल्या आयुष्याबद्दल काय वाटतंय? चांगलं
की वाईट की काहीच नाही? हे सुद्धा काळाप्रमाणे बदलणार, पण तरीही. ठीक वाटतंय किंवा
काहीच नाही किंवा काय माहिती. कधी असा विचार केलाच नाही. असं असेल तर मग त्या दुसऱ्या
प्रश्नाच्या पण ठिकऱ्या उडाल्या.
मग आता, प्रश्न सुटले
की गुंता उरला तसाच? असेल, नसेल, कुणाला काय; गायीच्या शेणात भरलाऩ पाय; घरी गेल्यावर
कावेल माय!
- पंकज कोपर्डे
(कोण?)
१७ जून २०१७
1 टिप्पणी:
Nice one..
टिप्पणी पोस्ट करा