तुझ्या
गंधाळलेल्या शब्दांची पाखरे,
आज कोवळ्या ऊन्हात तारेवर बसलेली.
काही
जुनी, कधी पाहिलेली आणि चारेक नवी दिसली.
काळी-पिवळी-निळी-हिरवी-लाल-गुलाबी
गुबगुबीत-झोपाळलेली-स्वप्नाळलेली-टकमक
चिवचिवाटांत
त्यांच्या, मनाचा गुंता, जुना-नवासा!
त्यातलीच
उडाली काही, घरटं बांधायला पसार झाली.
काही
आपसूकच आली जवळ, चोचीत चोच
घालू लागली.
काही
उरली शून्यात, मग माझ्याकडे पाहत राहिली.
काय
करावे उरलेल्यांचे, कोवळ्या ऊन्हात चकाकला प्रश्न.
दगड
मारावा, उडवून लावावे, की दाणे टाकावे; बोलवावे इथे?
कसलं
काय करतेस वेडे, उघडला मनाचा पिंजरा नि गेले आत सारे!
-
पंकज (२६ डिसेंबर २०१७)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा