अंधाराचं चित्र कुणी काढलंय का कधी? मला पहायचंय ते. अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने? भविष्यातला अंधार, अंधारातलं भविष्य की भूतकाळ अंधाराचा अमर्याद गोळा बनून भविष्याकडे झेपावणारा! ओसाड अंधार, नि:शब्द अंधार, कोरडा अंधार, रखरखीत अंधार, क्रूर अंधार, निर्दय अंधार…कुजका अंधार. आयुष्य हरवलेली लोकं ल्यालेला अंधार!
अजून कसं असू शकतं हे चित्र? विज्ञान या प्रश्नाची लाखो उत्तरे शोधेल खरे…पण दृष्टीला बरे दिसेल ते चित्र खरे म्हणणारे सामान्य-जन आम्ही! आम्ही ते अंधाराचे चित्र पाहू; खरेच जाणकार असू तर म्हणू Brightness थोडा वाढवायला हवा…काहीच स्पष्ट दिसत नाहीये…ना काळ, ना चित्र, ना त्यातली लोकं, जनावरं, वस्तू आणि इतर जे काही रेखाटलंय ते!! यावरून आम्ही असे conclusion काढू की, कलाकाराला अंधार ही कल्पनाच मुळात स्पष्ट नसेल बहुधा…जर तसे नसते, तर अस्पष्ट असे चित्र त्याने घडवले नसते…किंवा मग सहज कल्पनेची बीजं पेरून कलाकार वेल कधी येईल या अपेक्षेने बसला असेल!!
मग या चित्राला काय गुण द्यावेत? द्यावेत की नाही? ‘अंधार’ नावाचं चित्र…गुण दिले काय किंवा नाही दिले काय, एवढा काय मोठा फरक पडणार आहे? गुणांच्या दृष्टीनेही अंधारच सगळा!
थोडे नीट निरखून पहाल, तर ते चित्र स्प्ष्ट होईल, मित्रांनो! त्या चित्रात अंधार ल्यालेली, अंधार गिळलेली लोकं दिसतील. त्यांचे रडवेले, उदास चेहरे दिसतील…स्पष्ट नाही होणार हे सर्व…मात्र ओठ, नाक, डोळ्यांवरून चेहऱ्यावरची उदासी मैलोऩ्मैल पसरलेली दिसेल! पाणी-पाणी करत आडवी झालेली अजाण बालके दिसतील…पाण्यासाठी काहीही करायला तयार असणाऱ्या त्यांच्या ओठ सुजलेल्या नागड्या आया दिसतील…रडणाऱ्या त्या अंधारात, लंगडणाऱ्या तरसांचं हसू ऐकू येईल! पाण्यानं सुकून मरू लागलेल्या एखाद्या बच्च्याचा पाय गिधाडांच्या गर्दीतून दिसू लागेल. पाण्याच्या थेंबासाठी पोटात चाकू भोसकणारे दोन तरूण रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात दिसतील! अंधारात चाचपडणारी एखादी म्हातारी दिसेल नि तिचं इमानदार कुत्रं तिच्या पाठीमागे शेपूट हलवत उभं दिसेल! ती नेहमीची ओळखीची गल्ली भयाण दिसेल, रक्ताच्या गटारी दुथडी भरून वाहत असलेल्या दिसतील; एखादा संशोधक रक्तातून पाणी वेगळं करून वापरण्याच्या प्रयोगासाठी त्या गटारींतून रक्त भरून नेताना दिसेल…ओंजळभरून रक्त पिणारेही कित्येक लोक दिसतील!
दररोजचा ओळखीचा वाटणारा अंधार इतका भयाण होऊन समोर उभा ठाकेल याचं भविष्यही वर्तू न शकलेला तो कलाकारही, हा काळोख पाहून, त्या विचारांनीच दडपून चित्राच्या शेवटी शांत मेलेला दिसेल…अगदी शांत, अजिबात गोंधळ न करता, हातातला कॅनवास, हाताशी प्रामाणिकपणे पकडून…चित्रावर त्याची कुठेच सही दिसणार नाही…स्वत:च शव चित्रावर झोपवलं, यापेक्षा काय अधिक काय हवं, चित्राचे अधिकार बाळगायला…म्हणूनच मी विचारतोय, अंधाराचं चित्र कुणी काढलंय का या चित्रकाराव्यतिरिक्त? मला पहायचंय ते, अंधार कसा रेखाटला असेल त्या कलाकाराने?? २६.०४.१०