शनिवार, १७ जून, २०१७

Identity Crisis

मग मी शांत चित्ताने विचार करायचा असं ठरवतो. ‘कोण आपण? कसे आपण?’ प्रश्न फार साधे सोपे, पण उत्तरं शोधणं किती कठीण. कुठून सुरूवात करायची तेच कळेनासं होतं. एकेक प्रश्न सोडवणं योग्य म्हणून पहिला प्रश्न पहिल्यांदा – ‘कोण आपण?’ या प्रश्नात ‘आपण’ हे आदरार्थी एकवचन आहे, हे ध्यानात येऊ दे म्हणजे अजूनच सोप्पं.

‘कोण आपण?’

साहजिक येणारं उत्तर म्हणजे – पंकज कोपर्डॆ. मग मनाला लाज वाटते नि वाटतं की एवढा कोता विचार?

पुढचं लगेचंच येणार उत्तर म्हणजे – मनुष्य. मग मनात अजून थोडी शंकेची पाल चुकचुकते.
त्यापुढे वाटतं – नुस्तं मनुष्य नाही, तर मनुष्य-प्राणी. मग वाटू लागतं की हे इथे काही संपत नाही. का स्वत:ला मानवानेच तयार केलेली जात-व्यवस्था लावायची?

थोडा वेळ विचार केल्यावर वाटतं की ‘जीवजंतू’ म्हणावं की ‘सजीव’ म्हणावं, मग निर्जीवांना जीव नाही ही सुद्धा एक कल्पना, म्हणून ते ही बरोबर नाही. या अंतराळात फिरणाऱ्या अनंत भागांपैकी एक भाग. मग पुढे वाटतं की ही व्याख्या साऱ्यांनाच लागू होते की. डुक्कर, गाढव, जीवाणू, विषाणू सर्वांनाच. मग मी नि ते वेगळे कसे? ‘कोण आपण?’


समजतं की या प्रश्नाला अनंत थर आहेत. कोणत्या थरात शिरल्यावर मनाला बरं वाटेल त्यावर लक्ष केंद्रित केलं तरच पुढच्या प्रश्नाचं सोयिस्कर उत्तर शोधता येईल. या विचारासरशी मन पहिला थरावरच समाधान मानतं. बरं, ‘कोण आपण?’ तर पंकज कोपर्डे. मग कशावरून आम्हीच पंकज कोपर्डे? मग स्वत:भोवतीची वलयं जाणवू लागतात. मी तोच कारण तो लिहीतो नि मी पण लिहीतोय; त्याची एक वेगळीच शैली आहे लिहण्याची, माझीही तीच आहे; तो पक्षी-निरीक्षक आहे, मी ही आहे; तो असा आहे, मी ही तसा आहे; त्याच्याकडे हे आहे, माझ्याकडेही तेच आहे; त्याचे विचार-वागणं-बोलणं सगळं माझ्यासारखंच आहे; तो नि मी आम्ही वेगळे नाही आहोत…फोटो बघता का? की अंगठ्याचा निशाणा? पेक्षा जनुकीय चाचणीच सांगेल सगळं. मग मेंदू म्हणतो एका काल्पनिक नावाबरोबर जनुकीय चाचणी कशी काय शक्य आहे बाळा? मग शासकीय कागदपत्रं आहेत माझ्याकडे – आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड अजून काय हवं. मग मेंदू म्हणतो पण तुला पंकज कोपर्डे होण्याचं एवढं आकर्षण का आहे? तू तर शाहरूख खानसुद्धा होऊ शकतोस किंवा दिया मिर्झाही होऊ शकतोस! कल्लोळ माजतो तसा तो प्रश्न कुठेतरी लुप्त पावतो. मग पुढचा दुसरा प्रश्न – ‘कसे आपण?’

पहिला प्रश्न सोडवण्यासाठी जो पसारा मांडला त्यातल्याच ओळी या उत्तरासाठी हमखास वापरल्या जाणार. पण इतरांना आपण कसे वाटतो? याचा विचार प्रबळ होऊ लागतो. इतरांना आपण कसे वाटतो हे खरंच सांगणं किती अवघड आहे. कसेही वाटत असू! त्यांच्या-त्यांच्या कुवतीप्रमाणे आपल्याला पारखत असतील लोक. असतील तर असतील, पण मग आपल्याला स्वत:ला आपल्या आयुष्याबद्दल काय वाटतंय? चांगलं की वाईट की काहीच नाही? हे सुद्धा काळाप्रमाणे बदलणार, पण तरीही. ठीक वाटतंय किंवा काहीच नाही किंवा काय माहिती. कधी असा विचार केलाच नाही. असं असेल तर मग त्या दुसऱ्या प्रश्नाच्या पण ठिकऱ्या उडाल्या.

मग आता, प्रश्न सुटले की गुंता उरला तसाच? असेल, नसेल, कुणाला काय; गायीच्या शेणात भरलाऩ पाय; घरी गेल्यावर कावेल माय!  
- पंकज कोपर्डे (कोण?)

१७ जून २०१७

सोमवार, २९ मे, २०१७

पिंगळवेळ

घुबडम्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर भितीची छटा उमटलेली दिसते. ‘घुबडहा विषयच तसा आहे. घुबडाच्या रात्रींचर स्वभावामुळे घुबडाविषयी आपल्यांत गैरसमजुती फार आहेत. शिवाय आपण मिडियामधे उदाहरणार्थ चित्रपटांमधे घुबडांचे चित्रीकरण हे भितीदायक सिनेमांमधे केल्याचे सतत पाहतोच

Barn Owl - Photo by Varun Vaze
खरे तर घुबड हे नैसर्गिक उत्क्रांतीचे एक उत्तम उदाहरण आहे. मोठे डोळे, गोल-पसरट तोंड, आणि आवाज करता उडण्याची क्षमता ही घुबडाची काही ठळक वैशिष्ट्ये. अजून एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल कदाचित ती म्हणजे घुबड मान २७० अंशामधे वळवू शकते. अशी ही मान आपण जर वळवायला गेलो तर त्याचे शरीरावर दुष्परिणाम काय होतील हे सांगायलाच नको, पण मग घुबडाला हे कसे शक्य होते बरं? याचं उत्तर ऐकल्यावर तुम्हाला खरंच खात्री पटेल निसर्गाच्या किमयेची! घुबड हे एके ठिकाणी बसून भक्ष्यावर पाळत ठेवून असते. भक्ष्य नजरेच्या टप्प्यात रहावे म्हणून घुबड फक्त मान वळवून भक्ष्यावर लक्ष ठेवते. अशा जीवघेण्या कोनात मान वळवणे इतर प्राण्यांना शक्य होत नाही, कारण असे केल्यास हाडं तुटण्याची भिती तर असतेच पण मुख्यत्वे रक्तवाहिन्या फुटण्याची शक्यता असते. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमधून घुबडाच्या शरीरात अशी सोय आहे की मान वळवताना रक्तवाहिन्या फुटणार नाहीत. घुबडाच्या मान वळवण्याने ज्या-ज्या वेळी महत्त्वाच्या रक्तवाहिन्या बंद होतात, तेव्हा काही राखीव रक्तवाहिन्या रक्त पुरवठा करत राहतात. शिवाय घुबडांना मानेत मनुष्यापेक्षा जास्त मणके आणि छोटी हाडे असल्यामुळे ही मान वळवण्याची प्रक्रिया त्यांना सोपी जाते. त्यामुळे आपल्याला जरी शक्य नसले तरी घुबडांना ही मान वळवण्याची कला आता चांगलीच अवगत झाली आहे.

Indian Scops Owl - Photo by Sudhir Garg
तसे पाहता घुबडांना वेगवेगळ्या संस्कृतींमधे मोलाचे स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे हा पक्षी एवढा भितीदायक कसा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. घुबडाचा आकार आणि चेहरा हा इतर पक्ष्यांपेक्षा वेगळा असल्यामुळेही घुबडाविषयीच्या अंधश्रद्धांवर आपला लगेच विश्वास बसत असेल; पण खरे पाहता इतर कोणत्याही पक्ष्यासारखा घुबड हा एक सर्वसाधारण पक्षी आहे. हिंदू संस्कृतीमधे घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते, असे असताना हा एवढा सुंदर पक्षी भयानक कसा काय असू शकतो? पुरातन ग्रीक संस्कृतीमधे अथिना नावाची एक देवी होती. ही देवी जगाच्या उद्धारासाठी, भरभराटीसाठी काम करत होती. या देवीचा आवडता पक्षी कोणता असेल बरं? अथिनाचा आवडता पक्षी, जो तिच्या सर्व मुर्त्यांमधे नि चित्रांमधे आढळून येतो तो म्हणजे हिमालयात नि युरोपात आढळून येणारे लिटल आऊल. ‘अथिनाचे भक्त या युरोपिअन पिंगळ्यालाचअथिनामानतात
पिंगळा हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल. पहाटे जो येतो दारात नि भरभराटीचे वरदान देतो, देवाचे नामस्मरण करत तो सुद्धापिंगळाआणि तुमच्या घराशेजारच्या आंब्यावर, वडावर किंवा पिंपळावर बसून किच्अ किच्अ किच अशा आवाजात ओरडतं ते स्पॉटेड आऊलेट म्हणजेहीपिंगळा. घुबडांशी जर आपली पुरातन काळापासून एवढी घट़ट ओळख आहे तर मग त्यांची भिती वाटण्याचे काहीच कारण नाही. त्यांच्याविषयी अंधश्रद्धा बाळगण्याचेही काही कारण नाही.

Jungle Owlet - Photo by Aman Gujar
निसर्गामधील अन्नसाखळीमधे घुबड मोलाचे काम करते. घुबड उंदीर, सरीसृप, किडे-कीटक इत्यादी प्राणी खाते. प्रत्येक शेतामधे तुम्हाला एकतरी पिंगळ्याची (स्पॉटेड आऊलेट), जंगली पिंगळ्याची (जंगल आऊलेट) किंवा गव्हाणी घुबडाची (बार्न आऊल) जोडी सापडणारच. जिथे शेत तिथे उंदीर, म्हणजेच घुबडाचे खाद्य.

जगभरात जवळपास २०० जातींची घुबडे सापडतात. भारतात ३३ जातींची घुबडे आढळून येतात. पैकी जवळपास १६ जाती आकाराने कावळा किंवा त्याहून मोठ्या आकाराच्या आहेत आणि राहिलेल्या त्याहून छोट्या आकाराच्या. मजेशीर गोष्ट अशी की सर्वच घुबड समाज रात्री कार्यरत नसतो. मध्य-भारतात आढळणारा रान पिंगळा (फॉरेस्ट आऊलेट) हा बऱ्याचदा सकाळी भक्ष्य मिळवताना आढळून आलेला आहे. रान पिंगळा हे प्रदेशनिष्ठ घुबड असून ते फक्त मध्य-भारत आणि पश्चिम घाटाच्या उत्तरेला आढळून येते. रान पिंगळ्याची गोष्ट फार न्यारी आहे. १८७२ साली जगविख्यात ऍलन ह्युम या पक्षी-संशोधकाने रान पिंगळ्याचा शोध लावला. १८७८ सालापर्यंत रान पिंगळ्याची काही निरीक्षणं संशोधकांनी घेतली, मात्र १८७८ सालानंतर पुढची ११३ वर्षे रान पिंगळा कुठेच आढळून आला नाही. या बाबीची नोंद घेताना काही संशोधकांना वाटले की रान पिंगळा नामशेष झाला की काय; पण १९९७ साली जगविख्यात पक्षी-संशोधक पामेला रासमुसेन आणि बेन किंग यांनी नंदुरबार जिल्ह्यात रान पिंगळा पाहिला. तेव्हापासून आजवर बऱ्याच भारतीय संशोधकांनी मध्य भारतातल्या अगणित ठिकाणी सर्वेक्षण करून रान पिंगळ्याच्या सद्यपरिस्थितीवर् प्रकाश टाकला आहे.

Forest Owlet - Photo by Aman Gujar
पश्चिम घाटाच्या दृष्टीने घुबडांवर काम करणे अत्यावश्यक आहे. सिंधुदुर्ग आणि इतर पश्चिम घाटात घुबडांच्या वेगवेगळ्या जातींसाठीचा अधिवास उपल्ब्ध आहे. रात्री फक्त घुबडेच बाहेर पडत नाहीत, तर रातवे (नाईट जार) आणि बेडूक तोंड्या (सिलोन फ्रॉगमाऊथ) ही बाहेर पडतात. बेडूक तोंड्यासारखा पक्षी बघण्यासाठी भाग्य तर लागतेच पण त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे सदाहरित वनांचे आच्छादन असणे फार गरजेचे आहे. रान पिंगळ्यासाठी सागाचे वन हवे तर जंगली पिंगळ्यासाठी सदाहरित आणि आर्द्र पानगळीचे वन हवे. मासेमार घुबड (ब्राऊन फिश आउल) पहायचे असेल तर जंगलातील ओढे नि नद्या स्वच्छ नि प्रदुषण विरहित ह्व्यात. हे आणि असे सर्वच पक्षी आज अधिवास हरवल्यामुळे धोक्यात आलेले आहेत. सततची वन-कटाई, मोठ्या प्रमाणावर नामशेष होणारा घुबडांचा अधिवास आणि मानवी कृत्यांमुळे दुषित होत चाललेले गोड्या पाण्याचे स्त्रोत घुबडांच्या नाशाला कारणीभूत आहेत.

Brown Hawk Owl - Photo by Dhruv Phadke
घुबडे नसतील तर उंदरांची आणि शेतीची नासधुस करणाऱ्या कीटकांची संख्या तर वाढेलच पण घुबडांमुळे नैसर्गिक परिसंस्थेला मिळणारे पौष्टिक घटक मिळणे बंद होईल. यावरती घुबड आजच्या परिंसंस्थेत नसतील तर त्याचे दुरगामी परिणाम काय असतील हे सांगणे कठीण असले तरी त्यांच्या नसण्याने परिसंस्थेचे आरोग्य दिवसेंदिवस खराबच होत जाईल, हे सांगणे कठिण नाही.

घुबडांच्या आवाजात आणि त्यांच्या उडण्यात जी नजाकत आहे ती शब्दांत सांगणे कठीण असले तरी जेव्हा तुम्ही ती अनुभवाल तेव्हा तुम्हाला घुबडांविषयी अजूनच आत्मीयता वाटू लागेल. जंगल आणि पाणी संवर्धन केले तरच घुबडांचे संवर्धन शक्य आहे. ही केवळ घुबडांची नाही, पण आपल्या सर्वांचीच ती गरज आहे. ‘अथिनाआणिलक्ष्मीच्या वाहनास वाचवण्याची मोठी जबाबदारीपिंगळाआपल्यावर सोपवून गेला आहे! 

पश्चिम घाटात आढळून येणारी काही घुबडे
. गव्हाणी घुबड (Barn Owl)
. गवती घुबड (Eastern Grass Owl)
. कंठेरी शिंगळा घुबड (Indian Scops Owl)
. प्राच्य शिंगळा घुबड (Oriental Scops Owl)
. जंगली पिंगळा (Jungle Owlet)
. पिंगळा / ठिपकेवाला पिंगळा (Spotted Owlet)
. रान पिंगळा (Forest Owlet)
. हुमा घुबड (Eurasian Eagle-Owl)
. वन हुमा घुबड (Spot-bellied Eagle-Owl)
१०. मासेमार घुबड (Brown Fish-Owl)
११. चट्टेरी वन घुबड (Mottled Wood-Owl)
१२. बहिरी घुबड (Brown Hawk-Owl)

पश्चिम घाटात आढळून येणारे इतर रात्रींचर पक्षी
. बेडूक तोंड्या (Ceylon Frogmouth)
. रान रातवा (Jungle Nightjar)
. जर्डनचा रातवा (Jerdon’s Nightjar)
. फ्रॅंकलीनचा रातवा (Savanna/Franklin’s Nightjar)

. सामान्य रातवा (Indian Little Nightjar)

Reproduced from and extended version of 
Page 01, Date - 30 May 2017