सुर्य
कलत आलेला. आकाश सोनेरीसर होण्याच्या प्रयत्नात गुंग. दूरदूरपर्यंत
निर्मनुष्य समुद्रकिनारा. येणारे-जाणारे
फक्त वारे. अस्पष्टसा समुद्री पक्ष्यांचा आवाज. वाऱ्यासकट
नागासारखी पळणारी वाळू. कोरडी – ओलसर – कोरडी - दाट ओलसर वाळू नि तिच्यात
मऊसर उमटत जाणारी चार पावले. दोन पुढे-पुढे
पळणारी राकट, भद्दड, अवाढव्य
नि असंतुलित. आणि दोन त्या पुढे-पुढे
पळणाऱ्या पावलांच्या मागे-मागे धावणारी चिमणी नि नाजूक. कुठे आलो काहीच पत्ता नसताना अचानक ती चिमणी पावले थांबतात काय आणि दूर तिकडे समुद्रात कुठल्याशा हालचालींना टिपतात काय नि ‘डॉल्फिन-डॉल्फिन’
म्हणत नाचतात काय! सगळाच अनपेक्षित कारभार. तिने
म्हणताच मी ही (हिसकावून) तिच्या
हातातली दुर्बिण घेत निरखतो. “अगं येडे! डॉल्फिन्स
आहेत ते!”
“मग तेच तर सांगत होते तुला!” ती पुन्हा
सांगते.
मग
यापुढे सुर्य कितवर खाली आला याचं भान राहत नाही. आम्ही दोघे दूरवर दिसणाऱ्या पक्ष्यांच्या ठिपक्यांकडे पाहत पाहत जवळपास एक किलोमीटर
पुढे सरकतो. किती असावेत हे पक्षी? शंभर-दोनशे. नाही! त्याहून जास्त. असतील जवळपास पाच हजार! पाच
हजार सिगल्स एकत्र! डेंजर आहे हे!
सुर्य
मग कलतो नि आम्ही दोघेही माकडचेष्टा करत ती एकुलती एक बाईक कुठे ठेवली ते शोधत जवळपास दोनेक किलोमीटर्सचा समुद्र-किनारा तुडवतो. त्या
तीनेक किलोमीटर्सच्या पट्ट्यात आजही तुम्ही गेलात तर तुम्हाला आमच्या दोघांची उनाड पावले नक्कीच सापडतील. फक्त तो कोणता
पट्टा, हे आता लक्षात नाही बुवा!
मग
बाईक सापडते नि गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या एका निमुळत्या गल्लीतून बाहेर पडता-पडता एक घरकोंबडी
जिवाच्या आकांताने आमच्या बाईकपुढे पळत राहते. सहज गम्मत म्हणून म्हणतो, “काय
मुर्ख पक्षी आहे!”
अंधार
व्हायला अजून थोडा वेळ बाकी असतो. “मग कोणत्या
रस्त्याने जायचं सांग, सखे?”
ती कुठेतरी बोट करते, मी कुठेतरी
निघतो. उंचच उंच नारळाची झाडं, मधूनच मोठ्याने येणारी समुद्राची गाज,
मध्येच ती कानाशी गुणगुणत असलेलं गाणं, मध्येच मनात चालू असलेलं गाणं, मध्येच
मोठ्याल्या गाड्यांचे अप्पर्स, आणि मध्येच ही सुंदरशी
बाईक ट्रिप संपायला उरलेला इतकुसाच वेळ याचं मिश्रण कुठेतरी वेगळीकडेच पोहचवू पाहतं. त्या मिश्रणाच्या जाळ्यातून मनाची माशी सोडवायला आम्ही दोघेही फारसे उत्सुक नसतो; पण
पैसे कमवण्यासाठी घेतलेल्या ‘जॉब’
नावाच्या महामानवाच्या आमच्यासारख्या गुलामांसाठी ते मिश्रण घातक असतं. मनाची माशीच काय, गाढव, हत्ती, डायनासोरस
सुद्धा लीलया बाहेर काढण्याची हातोटी (किंवा सिध्दी) मागच्या
काही वर्षात प्राप्त केलेली असते. द्रुष्टचक्रात अडकलेली माणसं आपण.
पैसे कमवावेत आणि प्रवासावर उडवावेत. पुन्हा पुढच्या प्रवासासाठी पैसे कमवावेत, जमवावेत.
प्रवास संपत आला की परत आंबट तोंड नि लांबट चेहरा करून ‘ऑफिस’ नावाच्या शाळेत कामाच्या पाट्या टाकाव्यात. हे सगळं
घडत राहतं नि आम्ही दोघेही थोडंसं त्या मिश्रणात अडकूनच बसतो. दोन नाहीतर पाच मिनीटं किंवा जास्तीत जास्त तासभर…
आमच्या
या छोट्याशा बाईक ट्रिपची सुरूवात होते पुण्यापासून. साधी सोपी ट्रिप करावी. ती
म्हणते, “बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको”.
मी म्हणतो, “चिपळूणहून मार्लेश्वरकडे जाऊ.
रस्ता फार भारी नाही, पण चांदोली
अभयारण्याला लागून जातो. मागच्यावेळी मी घाटात
चार ढोल (जंगली कुत्रे) पाहिलेली,
शिवाय त्या शंकराच्या मंदिरात साप असतात आणि तिथे धबधबापण (म्हणजे
चतुरपण बघायला मिळतील!) आहे.”
पुढे काही कारणास्तव आम्ही मार्लेश्वरकडे जात नाही, पण पुढचा
प्रवास निवांत नि सुंदर होतो. खरं तर कोयना-चांदोलीमधे काही वर्षे काम केल्यामुळे या जंगलांच्या आठवणी कधी-मधी स्वप्नात डोकावत असतात माझ्या, म्हणून
मला थोडी ओढ.
वाशिष्टी धरण बघून मी पुन्हा-पुन्हा स्वत:ला विचारतो – “हे इतकंच?!”
|
दुसऱ्या
दिवशी सकाळी मार्लेश्वराकडे जाण्याऐवजी आम्ही हेदवीच्या दिशेने कूच करतो. काय तो सुंदर
रस्ता! बाईक चालवण्यासाठी एकदम योग्य. अगदी तुरळक वाहतूक. हिवाळ्याचे
दिवस आणि ते दोन सुंदर रंग – आकाशाचा निळा नि गवताचा
पिवळा. आम्हीही रमत गमत जात राहतो. मधे कुठे गवताचं रान दिसतं तिथे निवांत झोपून फोटो काढतो. एक
मोठ्ठा तलाव दिसतो, त्यात मगरी असतात, शिवाय
एका वीजेच्या खांबावर तिरंदाज (Oriental Darter) बसलेला दिसतो. मधे दोन
(Oriental Honey Buzzard) दिसतात
तर त्यांचा मागोवा घेत जातो. आणि मधे एक शांत
सुंदर झरा दिसतो. गाडी आपोआप थांबते नि पावले
त्या नितळ पाण्याकडे वळतात. कुठून जन्मला माहिती नाही, पण
त्या स्वच्छ झऱ्याकडे नि आजूबाजूच्या दाट झाडीकडे पाहून वाटत की आज एक ना एक तरी सुंदर टाचणी (Damselfly) दिसणारच!
पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ (endemic) टाचणी. मी दुर्बिण घेऊन झऱ्याकाठी जातो. “कोण-कोण आहे बरं? हात वरती करा!”
“मलबारी परी (Malabar Torrent Dart) की कुर्गची
कुडी (Coorg Bambootail) आहे?” तेवढ्यात दोन भरजरी निळ्या टाचण्या उडत-उडत एका वाळक्या काडीवर येऊन बसतात. मी दुर्बिणीतून
बघताच, हसतात. पिवळ्या पाठीच्या निळ्या राण्या (Yellow-striped Blue Dart). “हो! हो!
तुम्हीपण!” हो! हो!
यापण पश्चिम घाटातल्या प्रदेशनिष्ठ जाती. काय ते गुण
गावेत आपल्या पश्चिम घाटाचे. एवढ्या दूरवर आलो आणि यांचे दर्शन झाले म्हणजे मार्लेश्वरला शंकराचं दर्शन घ्यायला किंवा हेदवीला गणपती मंदिरात जाण्याची काही गरज नाही. मी
इकडे टाचण्यांबरोबर गप्पा मारत असतो तर तिकडे ती आजूबाजूला कुठे साप नाही ना, प्राणी नाही ना याची
खात्री करत असते.
दोन निळ्या टाचण्या उडत-उडत एका वाळक्या काडीवर येऊन बसतात…दुर्बिणीतून बघताच, हसतात.
|
मग
आम्ही हेदवीला पोहोचतो. आम्ही बामणघळ बघतो, अनुभवतो.
तिथून आम्ही हेदवीच्या काताळावर येतो आणि तिथल्या भन्नाट वाऱ्यात स्वत:त हरवून
जातो. ऊन थोडंसं लागल्यावर आम्ही वेळणेश्वराच्या किनाऱ्याला पोहोचतो. तिथल्या दिसता क्षणीच प्रेमात पडायला लावणाऱ्या रिसॉर्ट्मधे आमचं बस्तान मांडतो. दिवसभराचा
प्रवास, पण खोलीसमोर समुद्र! डोळे थोडे खालावलेले, पण
खोलीसमोर समुद्र! अशावेळी आमच्यासारख्या गुलामांनी काय करावे? तेच
करावे जे सारे करतात. संध्याकाळी आम्ही समुद्रात खेळतो नि रात्री
सुरमईचं जेवण करून त्या शांत किनारी एका चटईवर आकाश बघत पडतो. वाट्तं ही शांत
वेळ अशी कुणालाही साध्य होत नाही. त्याच्यासाठी झगडावं लागतं. आम्ही
दोघेही मग कधी न सुचलेल्या गप्पा मारत बसतो. तेवढ्यात आमच्या शेजारच्या खोलीवर राहणारं एक फिरंगी
जोडपं किनाऱ्यावर येतं. काही न बोलता
ती मुलगी भराभर कपडे उतरवून (मोजके अंगावर राखून मात्र) दूर
कुठेतरी समुद्रात शिरते. काळ्या समुद्रात ती गोरी
असल्यामुळे कुठेतरी वर-खाली होताना तेवढी दिसते. मग
आम्ही दोघेही विचार करतो की आपण असं करायचं का? पण रंगात
आम्ही मार खातो!
वेळणेश्वर
सोडून दुसऱ्या दिवशी आम्ही गुहागरला पोहोचतो आणि मग कितीतरी कुठल्या-कुठल्या गल्ल्या फिरून त्या डॉल्फिन्सच्या किनाऱ्यावर अवतरतो. हळूहळू
जाणवतं की या मिश्रणात आमच्यासारखेच अनेक जीव-जंतू अडकून पडलेत. निसर्गाचं,
समुद्राचं, जंगलांचं नि रस्त्यांचं आकर्षण हे कमी होणाऱ्यातलं नाही. मनाचा ठिय्या करून मी हिला
म्हणतो, “सोडायचे आता सगळे मोह. तडक पहाटे उठायचं नि पुण्याला
निघायचं. कुठे थांबायचं नाही.” ती बिचारी
निमूट “हो” म्हणते.
पहाटे
अंधारातच चाचपडत गाडी काढतो, तीवर बॅग कच्चून बांधतो. निघतो. गुहागर गावाबाहेर पडताच अंधार गडदसा वाटू लागतो. गाडीचा प्रकाश अगदीच मलूल वाटतो. तेवढ्यात
एक खोकड (Jackal) रस्ता ओलांडताना गाडीसमोरच येते. दोन-पाच सेकंद आमची नजरानजर होते नि मग पुढचा रस्ता अजूनच खुणावू लागतो. एका लांबड्या रस्त्याला किती वाटा, फाटे…काय असेल या फाट्यांवरती? कसे कळणार? गेल्याशिवाय
कळणार नाही. मिश्रणातली मनाची माशी उडून बाहेर येण्याऐवजी डॉल्फिन्ससारखी आत आत
गेल्याचे पुण्याला पोहोचल्यावर जाणवते. मग ती
म्हणते, “ही वाट दूर जाते, माघारी न फिरते.”