शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

फांदीवरचे निवांत पक्षी उठले ,
आकाशात काळे ठिपके.
ढगाळ गर्दीत धक्काबुक्क्की
हरवले काळे ठिपके...

‘ती’ ही सखी गेली,
रात्री, तू ही निघ बिगीबिगी...
तोडत रहा दोघी मनसोक्त
उरले-सुरले माझे लचके!

बुधवार, ७ एप्रिल, २०१०

चिंगीच्या पुढ्यात...

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! हलत नाही, चालत नाही…शीss बाई, काहीच करत नाही! तळ्याकाठी बसलाय एक हत्तोबा, कोठारभर जेवण करून झालाय त्याचा पोटोबा! हलत नाही, चालत नाही…शीss बंबच आहे मुळी! तळ्यात पोहताहेत बदकांची पिल्लं, कुणी काळं-कुणी गोरं, गोल गोल चकरा मारतात, एकमेकांना येऊन धडकतात…तोच-तोच खेळ पुन्हा पुन्हा खेळतात, त्याशिवाय काही नाही..शीss बाई, कसली मॅड आहेत, झालं! तळ्याचं पाणी निळंशार, त्यातली बेडकं हिरवीगार, चिंगीकडे पाहून करतात डराव-डराव, पण याव्यतिरिक्त त्यांच्याकडे शब्दच नाहीत! चिंगी बघते ती निळी फुले, आकाशाचे तुकडे कापून झाडावर लावलेले, नि असा येतो गार वारा…शीss बाई पुढे काही होत नाही…
चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा वाघोबा, गुहेत असतो झोपलेला, घोरतो फार, खुर्रर्र, खुर्रर्र, गुरगुरतो मात्र कुठला?? चिंगी असते बिचकून त्याला, आईने सांगितलंय उठवू नको त्याला, उठला की तो डरकाळी फोडेल नि क्षणात तुला गट्टम करेल! चिंगी असते बिचकून त्याला, पण जायचंय एकदा भेटायला त्याला…त्याचा काय तो रंग, काय ती शेपूट, कसले डोळेsss, कसले काssन, कसले दाssत…नि कसले पाssय!! चिंगीच्या स्वप्नात वाघोबाला मन! मनातून वाघोबा चिंगीचा आजोबा! “ये ना, ये ना” म्हणतो नि दाढी खाजवत बसतो, कुणी त्याच्याकडे जात नाही; लडदू हत्ती बोलत नाही, नि ढिम्म मुंगी हलत नाही…निळी फुलं वाऱ्यावर डोलतात, तळ्याचं पाणी थरथरतं, तळ्यातलं आभाळ वर-खाली होतं, बदकाची पिल्लं नुसत्या चकरा मारत राहतात…

चिंगीच्या स्वप्नात तळ्याकाठचा गाव, गावतल्या माळात हरणांची जोडी, जोडीच्यामधे हरिणीचं पिल्लू, आईला बिलगतं, गवत खातं, नाक फेंदारतं…बस्स! इतकंच करतं!! शीss, बाकी काहीच नाही…गवताची पाती हिरवीगार, भरल्या उन्हात चमकतात फार…उनही पडतं ते सोनसळी, भाजत नाही, चटका नाही, असलं कसलं बाई हे!! शीss, काही मज्जाच नाही…

चिंगीच्या घरात कित्ती आक्रोड खातात लोकं, इतके चविष्ट नि मोठ्ठे की एक खातानाच भरतं पोट तिचं…शीss बाई, मग काही मजाच नाही! चिंगीच्या आयुष्यात एक वडाचं झाड, वडाच्या ढोलीत तिच्या घराचा थाट, झोपायला कॉट नि जेवायला ताट!!

चिंगीच्या पुढ्यात तळ्याकाठची मुंगी! चावी दिली की कुई कुई करते, चावी बंद् की मग हलत नाही, चालत नाही…शीss बाई, माझ्याशी कुणी खेळतच नाही!!

शुक्रवार, २ एप्रिल, २०१०

सुरूवात

उध्दवस्त घर. मोजकेच श्वास उरलेले. पहिल्या पावसाने मात्र धुळीत काही अंकुर फुललेले. पाचही भिंती ढासळल्या; चारही दिशांनी घर नागडे. उत्तरेकडली एक भिंत तेवढी अर्धी-मुर्धी उभी. गुलाबीसर रंग फिकटसा; त्यावर पहिल्या पावसाचा फवारा. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूधारा गुलाबी गालांवरून अंकुरांकडे चाललेल्या. त्या भिंतीचं नाव “सखी”…कारण आजूबाजूस कुणीच नसताना ती एकटीच माझ्यासाठी उरलेली! सखीच्या मनावर एक गडद केशरी हाताचा तळवा. माझं नि प्रियेचं लग्न झालं; त्यादिवशीचा उमटलेला…पहिल्या पावसाने अजूनही त्याचा रंग नाही ढळलेला.

या गावात आता कुणीच राहत नाही. बोलायला, लिहायला, वाचायला, गायला, जगायला माणसं नाहीत. रात्री लांडगे फिरतात…वाघाची कमजोर डरकाळी येते ऐकू…माझ्या शेकोटीशेजारी मी रग घेतो अंगावर ओढून! जिवंत असूनही मेल्यासारखा झोपतो. आता तर हे सोंग, सोंग उरलंच नाहीये!


इथे आलो तेव्हा होतं तरी काय? जंगल…बाकी काही नाही. मग मी एक वीट आणली…मनात जिद्द होती; अंगात बळ होतं; सोबत “ती”ही होती! घर वसवलं-रंगवलं! घरासारखं घर केलं. माझं पाहून इतरही आले. चला, गावच वसवू म्हटले. “हो” ला “हो” केलं आणि टुमदार गावही वसवलं…त्याचं काही दिवसांपुर्वीच पाणी-पाणी झालं! दुष्काळ पडला…युध्द झालं…नको-नको ते घडलं! असंच मरण येण्यापेक्षा; लोकांनी स्वत:च स्वत:ला संपवलं. मी सांगत राहिलो – “वारा थांबेल वहायचा कधीतरी; जरी आज झोंबतोय अंगाला! वादळ येईल अशी भिती का बाळगताहात; भित्र्यांनो! सूर्यही थंड होईल…जळून नष्ट करेल सगळं, हा विचारच का मुळात! मित्रांनो, बासरी वाजवा ना…गाणं गा…कविता म्हणा…घाबरू नका मात्र!” मात्र कुणीच ऐकलं नाही.

सारेच मेले. “ती” ही गेली. तेवढी एकच भिंत नि तेवढा हात सोडून गेली. उरलेल्या धान्याचे मी अंकूर घडवलेत…त्यातून उगवेल अजून धान्य; मग मोठीमोठी शेतं होतील तयार! घर बांधू लागेन परत…सुरूवात केलीय तशी मी…ही गुलाबी फिकट भिंत नि हा हाताचा ठसा…हे काय! सुरूवात केलीय मी!

बुधवार, २४ मार्च, २०१०

नीलमोहोर


रणरण उन्हात सुर्य कपाळावर आला की एक फुलपाखरू बाहेर पडतं....इतका वेळ ते नील-मोहरातच दडून बसलेलं असतं...ते कसंय माहितीय? जांभळसर हिरवं, गुलाबीसर निळं! मी मख्खासारखा म्हशीवर बसून म्हैस जाईल तिथं हिंडत राहतो; डोळ्यासमोरचा तो नील-मोहोर आणि त्याच्या मखमली जांभळ्या सड्यावरून तिची नाजूक गुलाबी पाऊले हळूवार पडू लागली की माझ्या मनात फुलणारा गुलमोहोर; हे दोघेही कधीकाळी पुन्हा विभक्त न होण्यासाठीच जन्माला आलेत असा प्रश्न मला पडतो. म्हैस मात्र तेवढ्यात उन्हाची काहिली शमविण्यासाठी आरामात चिखलात घुसते; तिच्या पाठीवरचा मी ही आपसूक...

मंगळवार, २३ मार्च, २०१०

Network


शक्य आहे ही वेदना;  ती जाणवणे आणि भोगणे; दोन्ही अशक्य! आज अचानक मला या गोष्टीचा साक्षात्कार झाला; तसं पुर्वीही बऱ्याचवेळा वाटून गेले; पण बोध झाला नाही! आज बोध झाला. एवढ्या मोठ्या जगात हा मी इतकुसा! जग काय घेऊन बसलात? ब्रम्हांड! ब्रम्हांडात मी इतकुसा! जगातल्या सर्वात शक्तिमान भिंगातून पाहिलं तरी दिसणार नाही; इतकुसा! आणि माझं जग! माझ्या जगाचं काय? माझं ते इवलुसं जग… “आम्ही दोघे, आमचे दोघे; आई-वडिल, मामा-मावशी, भाऊ-बहिण आणि इतर. माझी नोकरीची जागा. माझं घर. माझं वाहन. माझे कपडे-कपाट-बॅंक-क्लिनीक-मित्र-मैत्रिणी-favourite hotel- outingची ठिकाणं-काय-काय नि काय-काय? जन्मल्यापासून हे जाळं मी विणत राहिलो; लोकांशी भेटलो की, वाढवत राहिलो…माझ्या ओळखीच्या सर्वच लोकांची अशी स्वतंत्र जाळी; अशी शेकडो-हजारो-करोडो-अब्जावधी-परार्ध आणि जास्तच जाळी…या सर्व जंजाळाच केद्र-बिंदू “मी”!!

जाळ्यांचा कुठला बिंदू कुठे खपेल आणि कुठे वाढेल? याचा काय थांग! आणि असे जर झाले; तर माझे केंद्र ढळणार तर नाही ना…याचा तरी काय थांग!!

रविवार, १० जानेवारी, २०१०

चार थेंब


अंगावरून झुळझुळतं रेशीम हळूवार ओढत न्यावं आणि भुर्र…भुर्र…करत ते वाऱ्यावर असंच सहज, फुंकर मारत पसरून द्यावं…पुन्हा ते उडून जातंय म्हणून आधाशी डोळ्यांनी, हुरहुरल्या मनाने दूर जाईपर्यंत पाहत रहावं…पाहत रहावं…

काही दिवस जातात असेच, दररोज सकाळी दात घासत असल्यासारखे…ठरवल्यासारखे…आणि मग संगणकासमोर बसून कंटाळलेला जीव म्हणतो, “चल काड्या करू…” स्वत:च ठरवलेल्या स्वत:च्याच परिघात एक सहज फेरी मारू! तो कुठेतरी गडावर किंवा जवळपासच्या गर्दीने किचडलेल्या चौपाटीवर जीव रमवण्याची साधनं शोधत फिरतो…दिवस संपतो, तसा तोही internet वरल्या web album मधे photos post करून झोपी जातो…पुढे आठवडाभर त्याचे तसलेच सगळे संगणकाभोवती वायरींसारखे गुंडाळले गेलेले मित्र… “अरे वा! भारी! मस्त! कुठे गेला होतास? Nice…” वगैरे वगैरे comments टाकून मोकळे होतात…तो ही थोडा खुश होतो, स्वत:च्याच नादात थोडावेळ रम-माण होतो! आणि मग परत ते दात घासण्याचं रूटीन वगैरे.

“हवा थोडी वाहते गं गोड…संथ चालतात आणि ढग…कधी-मधी पिसाळल्यासारखे आणि कधी अगदीच डंबांसारखे माठ होऊन उघडे-बंब…हिरवाई अशी नटून रूसून बसलेल्या अगदीच तुझ्यासारखी…आणि तू अगदीच काळ्याभोर कोसळायला पुरेपूर तय्यार माझ्यासारखी!” असली रचना कुठून जन्माला येते, ते त्या लिहीणाऱ्या हातांना माहिती की संगणकाभोवती गुंडाळलेल्या मनाला माहिती…कुणास ठाऊक?

काही दिवस असेच जातात, संगणकाभोवती गुंडाळल्यासारखे, चष्म्याच्या काचेवर उठणाऱ्या क्लिष्ट रंगांसारखे आणि चष्म्याआड अडकलेल्या थकलेल्या, भागलेल्या, खोबणीत लपून बसलेल्या डोळ्यांसारखे! तेही ठरवलेल्या थिअटरात एखाद्या वीकेण्ड्ला खपतात!!

आकाशात चार थेंब दाटून येतात यार, आज-काल…पाऊस काही पडत नाही; ठरवलं आहे बरंच काही, मनाप्रमाणे होत नाही! जपून-जपून वापरले तरी थोड्या दिवसांचं सोबती…चार थेंब संपत आले आणि मनाचं मनाला मनच सांगत नाही! घुटमळतं, घोटाळतं, पदर पकडून हट़्टही करतं…जिच्याकडे हट़्ट करतं, तिच्याकडेच दाणा नाही. माठात उरलेले चार थेंब अशेच संपतात, काही-काही दिवसांनी…त्याची आई कधीतरी नसतानाही रडून आणि दिवसापाठी साठलेले थेंब एकाग्रतेने गोळा करून माठात ठेवते भरून…मुलाला कसलाच पत्ता नाही!

आयुष्य चाललंय कुठे…संगणकाला चिकटलेल्या मनाला कसलीच सुतराम कल्पना नाही!

गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९

…आणि त्याचदिवशी नंतर



…आणि त्याचदिवशी नंतर मग तो रस्त्यावरून चालत होता. एका पावलासारखंच दुसरं पाऊल; एका श्वासासारखाच दुसराही. शांत-संथ. अंगाला-डोळ्यांना त्रास देणारा रात्रीचा झगमगाट; गाड्यांचे हॉर्न्स आणि आनंदात असणाऱ्या लोकांचं हसणं-खिदळणं…सारं-सारं वैतागाचं होतं. त्यानं चालता-चालताच हाताची घडीही घातली आणि धाग्यावर धागा विणत जावं; तसा एकटेपणाचा दोरा; त्याच्या पायातून सगळं जग हळूहळू विणत चालला होता!
बाकडं दिसलं; म्हणून तो थांबला. आकाशातला चंद्र पाहून ओठांची शिवण उसवून तो हसला. डोळे दुखेस्तोवर त्यानं चंद्राकडे पाहिलं. आकाशात एकच चंद्रय; म्हणून त्याचं अप्रूप! तिच्यासाठी त्याने काढलेले चंद्राचे फोटोज़! काळी रात्र…पिवळ्या पवित्र दुधात बुडवलेला चंद्र आणि त्या दुधाचे चंद्राच्या आजू-बाजूला उडालेले शिंतोडे! रात्र-रात्र जागला तो; छान फोटो मिळवण्यासाठी…मनासारखं काहीच मिळालं नाही!
त्यानं आडव्या रस्त्यावर वाहणाऱ्या, तुंबणाऱ्या, चिडणाऱ्या गर्दीकडे पाहिलं…गर्दीतल्या लोकांना दु:खच होत नाही; असं त्याला वाटलं! चालायचं-थांबायचं-चिडायचं-ओरडायचं आणि जास्तच त्रास झाला; तर चेंगरून मरायचं! त्याला गर्दीत तिचा सुटलेला हात आठवला…कावरे-बावरे डोळे; त्याला शोधणारे डोळे…तसा तोही कावरा-बावराच झाला होता आणि मग मागून येऊन तिनंच त्याचा हात पकडलेलाची आठवला त्याला!
प्रत्येक ठिकाणी, ओळखीच्या जागी; आठवणींची भूतं-भुतांची बाळं-बाळांची खेळणी, सगळं-सगळं, नुसतंच! झाडा-झाडावर त्रास उलटा टांगलेला! कॅंटीनमधल्या प्रत्येक टेबलावर आठवणींचा चहा सांडलेला; इथं…या टेबलावर एकदा मी तिच्या नकळतच हात स्पर्शिला तिचा; आणि इथं…इथं बसून आम्ही सौर-उर्जेबद़्द्ल बोललो होतो…तो तिकडं जरा-तो-मळकट-कळकट-पाय चिरलेला टेबलंय ना; तिथे बसून आम्ही arrange-marriage बद़्दलही बोललो होतो! आणि त्याचदिवशी नंतर मग तो; त्याच अंधारलेल्या-मळकट-कळकट-पाय चिरलेल्या टेबलावर बसलेला होता आणि गोडवा उतरलेला चहा त्याचा गरमपणा मरून गेला तरी ओठांना लावत नव्हता!
दररोजचा कॅंटीनवाल्यानं पुस्तकाची पानं उघडावी, तशी एक स्माईल दिली; मोजक्याच शब्दात आणि त्याला ’ती कुठंय?’ असं विचारलं. “ती देवाघरी गेली!” असं काहीसं तो बडबडला; स्वत:चे पैसे भरून कॅंटीनमधून बाहेर पडला; थोडीशी फडफड करून वीजही मरून गेली; डोळ्यांना त्रास देणारा सारा प्रकाश; शांत झाला एकदम. डोक्य़ावरचा चंद्र मग अजूनच ठळक वाटू लागला.
काळंभोर आकाश, सुटलेला संथ गार वारा, फिकट पिवळा चंद्र आणि त्यानंच रंगवलेलं थोडंसं केशरी अंगण…रस्त्यावरती तो एकटा आणि गळ्यात एक अवजड कॅमेरा…चंद्र अगदी तिला हवा तसाच!
…आणि त्याचदिवशी नंतर मग कॅमेऱ्यातल्या चंद्राकडे पाहत तो आभाळभर रडला होता.