रविवार, २ मे, २०१०

गडगडाट

   दुपारीच गडगडू लागलं. झोपेतून उठलो; तसं आभाळ सोनेरी झालं होतं. गार वारा वाहत होता; झाडं त्यावर डोलत होती. मी खिडकीत उभा राहून एकटक तो सोहळा पाहत राहिलो…कुठेतरी पाऊस झाला होता नक्की. कुठे? इथेही झाला असेल. ओलेपणाचा एक विलक्षण गंध सर्वत्र भरून उरला होता. सुटसुटीत वाऱ्यावर डुलणारं पिवळं गवत; कुठेतरी काड्या-काड्या एकत्र बांधल्यासारखं वाटत होतं. डुलत होतं. मी डोळे चोळले. खिडकीतच अडकवलेल्या आरशात डोळे खोलवर पाहून घेतले. नुकताच एका असंबध्द स्वप्नातून उठलो होतो. खराच जागा झालोय ना; हे तपासून घेतलं. वातावरण छानच जमलं होतं. अशा वातावरणात ऐकलेली गाणी किंवा केलेली कुठलीही गोष्ट मनात आतवर कुठेतरी उमटत जाते…वातावरणच इतकं गडद असतं. हलकं, सहज वाऱ्यावर उडून जाईल असं काहीसं उरत नाही; सर्व काही बरसलेल्या थेंबांमुळे जडावलेलं नि विसावलेलं…
   मी खिडकी पुर्ण उघडून टेबल-खुर्चीवर बसलो. समोर लॅपटॉप. त्याला जवळ खेचून, स्क्रीन पुरेशी वाकवून मी माझं पुर्वीचं एक ललित त्यात टाईप करू लागलो…ते पुर्वीचं ललित आतमधे भिनू लागलं अक्षरश:! वाक्या-वाक्याचा अर्थ भिडू लागला हृद्याला! अशा गोष्टी सहसा होत नाहीत. एकदा लिखान झालं की, कागदावर साकारलेली कल्पना लेखकासाठी नवी रहात नाही. ती तशी जुनीही होत नाही; कारण एक कल्पना मांडताना तिचे इतर अब्जावधी भाऊ-बंध आपसूकच डोकावू लागलेले असतात. मग हे सगळं असं असताना, ते माझं पुर्वीचं लिखान माझं मलाच आतवर भिडू लागलं; याचं नवल वाटतं मला! त्यात मी भरही टाकली; याचंही आश्चर्य वाटलं. एकदा लिहीलं की संपलं; अशी माझी सवय; मग ते परिच्छेदापुरतं असू देत, नाहीतर मग लांबलचक वीसेक पानी कथा असू देत. ते जेवढं सुचलं – जसं सुचलं – तसं ते तितकंच – तेवढंच. जास्त नाही – कमी नाही. आता माझी ही सवय कितपत चूक – बरोबर हा वादाचाच मुद्दा आहे तसा; पण एक मात्र नक्की, एकदा का मी पानांवर शाई फरफटली की नंतर घडणाऱ्या चित्रात विचार करूनही मला मोठा असा काही बदल घडवता येत नाही. उगीच बारीक-सारीक वाक्यं, संवाद टाकू शकतो तेवढेच! पण या ललित लेखनात मी टाकलेली भर अगदी आपसूक, अल्लदपणे, कुठेही ताळतंत्र न सोडता हळूवार पडली. कुठेच आवाज झाला नाही. रूईच्या बिया जशा शांतपणे उडत उडत वारा थांबेल तिथे उतरतात ना; तशी!
हे बरंच झालं. संध्याकाळचे पाच वाजलेले. पावसाचा काही पत्ता नाही. वाटलं, कॅफेटेरियात जाऊन वाट बघत बसू; कधी येतोय त्याची. तसा कॅफेटेरियात गेलो. ललित लेखांची वही घेऊनच गेलो बरोबर. कॉफीच्या घोटागणिक एकेक लेख मी स्वत:शीच वाचत् राहिलो. लिखानाला एक अनोखा गंध असतो, चव असते, आवाज असतो. कित्तीतरी वर्णनं आजूबाजूच्या परिसराची असतात; पण हे गुपित केवळ लेखकालाच माहिती असतं. वाचणारे सगळेच, स्वत:च्याच कल्पनाशक्तीने त्या-त्या वर्णनांची स्थळे निर्माण करतात! या माझ्या लेखांमधे आयुष्यात डोकावणाऱ्या कित्येक व्यक्तींच्या गड्डद आठवणी आहेत; मी खरंच हे पुर्वी इतक्या बारकाईनं पुन:पुन्हा वाचलं नव्हतं!
   कॉफी संपली. सव्वासहा वाजून गेले. पाऊस आला नाही. मग म्हटलं, आता पुन्हा लॅपटॉपसमोर ठाण मांडावी नि उरलेलं टाईपिंग करत बसावं. रूमवर परतून ते काम तेवढं सुरू केलं…मी टाईपिंगमधे एवढा गुंग झालो की अंधार कधी झाला कळलंच नाही…लख़लख प्रकाश आणि मग प्रचंड गडगडाट, असाच सगळा खेळ सुरू झाला. हे सगळं भयावह नव्हतं वाटतं, ते सगळं हवंहवंसं वाटू लागलं होतं मला. माझ्या कामाला या वातावरणामुळे गती मिळाली; म्हणून असेल कदाचित. पावसात थोडाफार भिजत रात्रीचं जेवणही करून आलो नि पुन्हा लिहीत बसलो.
   कसलं हे पावसाचं वेड? रात्रीचे दोन वाजताहेत…मी खिडकीपाशी उभाय. हा अंधार नि ते वातावरण फिक्कट होऊ नये, असंच वाटतंय…डोळ्यांसमोरून झुडूपांत शिरलेला वाघ जोपर्यंत पुर्णत: नजरेआड होत नाही; तोपर्यंत त्याला अप्रूपाने पाहत रहावं…असं वाटतंय. पाऊस थांबलाय. अंधारात दूरवर एकट्याच उभ्या असलेल्या स्ट्रीट-लॅम्पच्या प्रकाशात पावसाची काहीच हालचाल दिसत नाहीये…गार वारा वाहतोय…पावसाने कित्तीतरी आवाजांना जन्म दिलाय, आजूबाजूला ‘हे सगळं वातावरण साठवून ठेवता आलं पाहिजे; म्हणजे हवं तेव्हा वापरता येईल’ असा एक स्वार्थी विचार जन्माला आलाय आणि प्रबळ होत चाललाय…
२.०५.२०१०