पाखरानं कसं भिरभिरायचं, फिरायचं, मजेत उंडारायचं नि मनात आलं तर कुठल्याशा फांदीवर क्षणभर विसावायचं...मग परत भिरभिरायचं! पण एकदा किनई गंमतच झाली, चिंगीच्या बागेत धावपळ झाली! हत्तीणबाईच्या पोटात मळमळ झाली! आता मळमळ म्हणजे सोप्पी का ती? हत्तीण बाईंचं पोट लागलं की ओरडू आणि दुर्वा दिल्या, नारळं दिली; तरी काही शांतच होईना मुळी! मग आता उपाय काय यावर? चिंगी लागली विचार करू…गेली घुबड आजोबांकडे म्हटली, “चहत्तीणताईंच्या चोपोटात चुदुखूच चालागलंय चाफार! चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा कुठले ऐकायला? ऐकायला उठायला नको झोपेतून. आणि उठले तरी कानांतले वॉकमनचे गोळे काढणार कोण? चिंगी बघत बसली घुबड आजोबांकडे. घुबड आजोबा हलले नाहीत की डुलले नाहीत, मुळात काहीच काही बोलले नाहीत! “छे! असले कसले हो आजोबा तुम्ही?” चिंगीच्या मनात हा विचार आला खरा, पण करणार काय? हत्तीणबाई तर गडाबडा लोळू लागल्या नि नंतर-नंतर तर जोरजोरात चित्कारू लागल्या; हत्तीदादाची पंचाईतच किनई! त्या नकट्या नाकांच्या वटवाघळांनी तर बिबट्या-फुकट्या पोलीसांनाच आणलं नि F.I.R. फाईल केला झोपमोड केली म्हणून हत्तीदादांच्या विरोधात! आता मात्र चिंगी चिडली. घुबड आजोबांच्या कानांतले बोळे काढून त्यात ती जोरात किंचाळली. घुबड आजोबा खडबडून जागे झाले नि घाबरून दुसऱ्याच झाडावर जाऊन बसले; मान इकडं-तिकडं फिरवत डुलक्या घेऊ लागले. तेवढ्यात चिंगीनं आजोबांना सगळा प्रकार सांगितला… “चाकाय चुउपाय चकरावा?” घुबड आजोबा पण पडले संभ्रमात. असे कधी पुर्वी घडलेच नाही!
घुबड आजोबांनीही समोर घडणारा प्रकार पाहिला. हत्तीणबाईंची जीभ बघितली, कान तपासले, नाडी तपासली…पण काही थांग नाही. पोट तर भरधाव धावणाऱ्या मोटारसायकलीसारखं आवाज करत होतं. घुबड आजोबा पण घाबरले, त्यांनी त्यांच्या खापरपणजोबांनाही consult केलं आणि मग येऊन म्हटले, “उपाय आहे यावर एक. पण तो तोड मिळणं अवघडंय!”
चिंगी म्हटली, “चांसांगा, चपटकन चासांगाना!”
आजोबा म्हटले, “शोधा असे पाखरू, जे रूसलंय फार, आणि का कुणास ठाऊक विसरून गेलंय उडणं-फिरणं; अगदीच शांतही नाही, त्रागा करत बसलंय गप्पगार! त्या पाखराच्या नाकावर एक लाल टिकली रागाची, त्या टिकलीनेच शांत होईल भूक हत्तीणबाईंची!”
चाआता चुकुठे चिमिळेल चेते चापाखरू चीकी चाकाय चोहोणार चुपुढे?
(अशाच एका चिंगीला)
;-)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा