बुधवार, २५ ऑगस्ट, २०१०

कोफ्ताकरी


    खरवड-खरवड, मनाची तडफड! नाही, नाही…तडफड म्हणण्याइतकंही काही घडत नाहीये आजकाल. नांगरानं जमीन द्गड-माती-ढेकळं-गांडूळ-साप-विंचू-अंकूरांसकट खरवडत न्यावी, अशी सगळी खरवड. नांगर एकदा फिरल्यानंतर अंगावरून सारी वस्त्रं काढून घेतल्यासारखी उद्ध्वस्त जमीन नि सुन्नसा आवाज…यात तडफड कुठली? पडझड सगळी. क्षणात राहत्या झोपडीवरून बुलडोझर फिरवावा इतकं सहज सोप्पं ते मनाचं वागणं. विव्हळायला त्राणच उरले नाहीत, मित्रा! गाणं नाही, कल्पना नाही, चित्र नाही, काही घडेल याची शक्यताही नाही! अडकल्यासारखी भावना आहे ही! वर्षानुवर्षे बध्दकोष्टता झालेल्या पीडिताचं दु:ख, सहज-सुलभ जगणाऱ्यांना काय? हसण्यासारखी गोष्ट नाहीये ही! उदाहरण काहीही असू शकतं!! पोटातच अडकलेल्या बाळाचं दु:ख कोणाला कळणार? वेदना दोहोंनाही! मातेलाही नि बाळालाही…चूक कुणाची?
      काय माहिती?!! परिस्थितीची? असावी. असावी एखांदवेळेस! परिस्थिती ही काळाचं फ़ंक्शन! म्हणजे काळच जबाबदार म्हणायचा! मला तशीपण या काळानं पुर्वी कित्येकदा अद्दल घडवलीय, वेगवेगळ्या फ्रंट्सवर! त्यावर तर एक पुस्तकच तयार होईल! पण आळस…लिहीणार कोण? जाऊ देत!
      विषय असा होता की तडफड व्हायला काहीतरी असावं लागतं मुळात. आत असलेल्या कल्पनांना ओरडण्याचं त्राणच नसलं तर त्यांना हुडकणार कसं? ढिगाऱ्यातून बाहेर काढणार कसं? याचं एक छानसं उत्तर! काही घडलंच नाही, असं समजायचं! यालाच बहुधा मन:शांती म्हणत असावेत! यावर हाच एक उपाय आहे. कोफ्ताकरी करणे नि खाणे. ज्या गोष्टींत जीव अडकलाय त्यांना कोफ्ते समजून त्यांचा फडशा पाडणे! ढासळणे ही एक कलाय…ती ज्यांना जमत नाही, ते बेघर होतात, आत्महत्या करतात; पण ज्यांना जमते, ते जग विणतात! व्वा, काय लिहीलंय…काय माहिती का लिहीलंय मी हे!! बहुधा, ढासळण्याची सुरूवात झालीय कुठेतरी…   
पंकज २५.०८.१०

1 टिप्पणी:

Trupti Pawar म्हणाले...

chan aahe "कोफ्ताकरी " karun baghanar...मनाची तडफड! kami karnya sathi.....