मायाबंदरच्या गावात फिरताना कुठल्यातरी ओळखीच्या गावात फिरल्यासारखं वाटतं. छोटंसं गाव. गरजेचं सर्व काही मिळतं इथे. रोटी, कपडा, मकान इतक्याच गरजा आहेत ना? नाही नाही! एवढंच कसं? Mobile range, internet access हवा मगच research होणार ना!! मायाबंदरच्या जेट़्टीचं नाव आहे जर्मन जेट़्टी. जपानी लोकांच्या खुणा अजून आहेत इथे. परवाच लहान लहान मुलांना खड़्डा खोदताना जपानी लोखंडाचा बॉंब सापडला! मला या गावात फिरायला आवडतं. गावाच्या दोन्ही बाजूच्या समुद्रानं गावाला बरोबर कोंडीत पकडलंय, हे romantic नाहीये का?
दोन दिवसांपासून आम्ही सगळे इथेच आहोत. पुढे कुठे कुठे नि का जायचंय मला कल्पना नाही. दिवसभर आम्ही project मधल्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटतो नि परत तळावर येऊन कामं करत बसतो. तो Rest house मागचा समुद्र बघून मी हावऱ्यासारखा फोटो काढत बसतो त्याचे दररोज. घर दुरवणारी हीच गोष्ट सकाळच्या उन्हात स्वर्गाहून छान भासते, हेच काय ते दु:खंय मला!
आम्ही चौघं आहोत. मी, लला (माझा कलिग), राजन (SACON मधला अजून एक SRF) नि शिरीष. चालीस एक नि इंटरव्हूव आयलॅंडवरचे swiftlet camps होतील काही दिवसांतच. Rest house मधल्या Nature Information Centre मधे मी अंदमानचा नकाशा कितीतरी वेळा सतत डोळ्याखालून घालतो, मला काहीच लक्षात राहत नाही त्यातलं. मी कुठे आहे ते दिसतं, कळतं…पण त्या नकाशात फक्त अंदमान नि निकोबार आहे…माझा उरलेला भारत कुठंय?? मी वीतभर तरी अंतर मोजलं असतं महाराष्ट्रापासून माझ्या राहण्याच्या जागेपर्यंत!
दिवसभर काम करून भरपेट जेवण करून आम्ही चौघे रात्री जर्मन जेट़्टीपर्यंत चालत येतो. छान वारा वाहतो. शिरीष त्याच्या Ph.D. च्या आठवणी सांगतो, project मधल्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. एक scientist म्हणून माणसानं कसं जगावं? या प्रश्नाचं उत्तर मला सुटत नाही. जेट्टी मधे पोलीस दलाच्या मोटार बोटी असतात. तुरळक लोक असतात. शांत समुद्र असतो; मधेच माशांच्या आवाजामुळे हलणारं, डचमळणारं पाणी असतं. माझी रात्र किती गुंडाळली जाते, कल्पना नाही…ती गुंडाळत जाते नि मी चुरगळत राहतो आतल्या-आत. सुंदर गोष्टी एकट्यानं पहायचा शाप लागलाय का मला?
समुद्रावरच्या रात्रीला कोण येतं जातं याचा पत्ता असतो का?