गुरुवार, १३ मार्च, २०१४

मोरपंखी


तिच्या-माझ्या आठवणी, कपाट उघडलं की अंगावर पडतात. मी अगदीच त्यांत गुदमरून जातो. मरून जातो. तिच्या कुर्त्या, तिचा वास. नदीकाठी वाळूवर उमटलेली तिची नाजूक पावले आणि जांभळं होत चाललेलं आभाळ…रातव्याचा एकसंध-निर्दोष आवाज नि तिनं माझा धरलेला हात…दूरवर डोंगरावर वणवा पेटलेला नि थंडीचे दिवस त्यात. तिच्या आठवणी वेचून कुणीतरी डोंगरभर पसरून ठेवलेल्या दिसतात. मी झटक्यात कपाट बंद करतो नि दीर्घ श्वास घेतो. जिवंत उरलो आणि जगत राहिलो…या दोन गोष्टींत किती अंतर? किर्रर्र जंगलात थंडगार ओढ्यात पाय सोडून बसलेलो आम्ही…
मी माझ्या खोलीत अस्वलासारखा फिरतो. जागा बदलून झाल्या, मित्र-परिवार वाढवला; पण मनाचा पिंजरा तुटला नाही. महिन्यातून एखाद दिवशी मी आपसूकच टेकडीवर तिच्याबरोबर बसलेला असतो किंवा ती ऐकत असते नि मी तिला गोष्ट सांगत असतो. सांगता सांगता संपून जाते नि ती हळूच तिचं डोकं माझ्या खांद़्यावर टेकवते. मी दूर क्षितीजाकडे पाहत राहतो. प्रेमाची जाणीव होण्यासारखा आनंदी क्षण नसावा जगात. मी ज्या विश्वासाने ओढ्यात पाय सोडलेले, तितक्याच विश्वासाने तिने डोकं टेकवलेलं माझ्या खांद़्यावर. आता जे होईल ते होईल. तू आहेस ना…
त्या कपाटात तिला आणलेली एक मोरपंखी साडी आहे. सुंदर रंगाची. सोन्याच्या तारांनी मढवलेली. त्याही इतक्या नाजूक की कळणारही नाहीत. मी तिला म्हटलेलं की हे सोनं आहे असं समज आणि ती ’हो’ म्हटली होती. मी तिला म्हटलेलं की ’माझं तुझ्यावर प्रेम आहे’ आणि ती ’हो’ म्हटलेली. कपाट पुन्हा-पुन्हा उघडू वाटतं नि सतत त्या पसाऱ्यात गुदमरून जाऊ वाटतं. मी बहुधा ओढा होऊ शकलो नाही. ओढ्यासारखी निरागसता आणि वडीलधारेपणा एकवटवू शकलो नाही. त्या पसाऱ्यात मला आज अचानक हव्या त्याच गोष्टी सापडतात नि वाटतं जे खरंखुरं होतं ते मी जग मी पाहिलंच नाही की काय? ती मोरपंखी साडी, सोन्याच्या तारांनी मढवलेली, ती नव्हतीच कधी तशी सोन्याची…पण फक्त गोष्टीपुरती. किती माझ्या आवडीच्याच गोष्टी त्या पसाऱ्यात सापडतात मला, कितीदाही तो उपसला ढिगारा! ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि माझी होती ती फक्त. ती निळी रात्र, जेव्हा अंधार होता सभोवती नि ओठांची झालेली भेठ. ती निळी रात्र, जेव्हा मला घट़्ट धरून ती झोपली होती नि निरखत होतो मी तिला! वाटतं मी उगाचंच तिला ओढत राहिलो नि ती ही माझ्यासोबत चालत राहिली अनवाणी…रस्ताभर उमटलेली लाल पावलं रक्ताची कधी मी, वळूनही पाहिली नाहीत! वाटतं मी माझ्याच बनवल्या संकल्पना, नि एकामागोमाग एक दरवाजे उघडत किती आतवर घेऊन गेलो तिला कुणास ठाऊक! परत येण्याचा रस्ताच ती विसरून गेली. भुलभुलैय्या. स्वत:चंच आभाळ इतकं विणत गेलो की तिला स्वत्वाचा विसर पडला. इतकं प्रेम केलं की तिचा जीव कंटाळला! आता आठवणीसुद्धा आहेत त्या माझ्यापुरत्याच असाव्यात. त्या आठवणी जशा कपाटात आहेत, तशा त्या कुणाच्याच नसतील. त्यांचे संदर्भ कुणालाच नसतील नि मी त्यांना ज्या आपुलकीने पाहतो, तसं कुणी पाहिलंय त्यांना? जीव असलेली माणसं कितेक फिरतात आजकाल आजूबाजूला, पण वाटत नाही कुणाला हाताला धरून घेऊन जावं त्या भुलभुलैयात आणि स्वत:च विसरून जावं स्वत:ला. त्या आठवणींत एक मोरपंखी साडीही आहे सोन्याच्या तारांनी मढवलेली. ती खरंच आहे सोन्याची, पण तिला नाही समजली! एकेक तार त्या साडीतली मी विकतोय आता मदिरेसाठी.
पंकज कोपर्डे
१३ मार्च २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: