शनिवार, १५ मार्च, २०१४

एकांत


एकाचा अंत. किनाऱ्यावर चालणारे असंख्य पाय नि त्यातही वेगळीच उमटलेली एक ओळ. तिला तुडवून गेलेले कित्येक गोरे-काळे तळवे नि आजूबाजूला पसरलेली वाळू. त्यात रांगणारे खेकडे. चिखल चाळणारे नि किडे खाणारे. मला आता रस नाही. वाट एकटी नि माणूस एकटा. गाठ पडली तरी नकोय नि गाठ पडलेली पण नकोय. छातीत खोलवर घुसलेला सुरा अगदी आतून पाठीपर्यंत टेकलेला. त्यावर आता रक्तवाहिन्यांचं किती जंजाळ पसरलंय, देवच जाणे. पडक्या-उघड्या देवळांवर वेली चढतात न जंगलात. आणि जगतात ना. जगतात ना…निवांत का कसं ते!
खरं तर एकांतात मजा आहे की कसं, ते कळत नाही, मैत्रिणी.
एक तो समुद्र एकटा नि उगाच अवास्तव वाढलेला. एक ते आभाळ एकटं नि उगाच अवास्तव वाढलेलं. मग आपणही वाढवावा आपला विस्तार…की कसं? सगळं जगच घ्यावं व्यापून नि ठरवावं की हेच अखंड…मग कुठून येतील वाटा नि कुठल्या पडतील गाठी? उदाहरणच द़्यायचं झालं तर वेळेकडं पहावं. तो एक माणूस समुद्र नि आकाशापलीकडचा. थोर. अखंड, अथांग नि पसरत चाललेला अगणित. त्याचे तुकडे वाटतात लोक, आयुष्यांसाठी, आयुष्यांतून. नि मग बसतात उगाच रडत किंवा हसत. एकांताला गहिरा अर्थ आहे. मी ज्या-ज्यावेळी समुद्राकडे पाहतो, तेव्हा मनात लाटा सुरू होतात. येतात-जातात, माती घेऊन जातात, कचरा घेऊन येतात. मनाचं क्षरण सुरू होतं नि समुद्राला मी शरण येतो. हे आपसूकच घडतं. मी कधी एकांतात रमेन का? स्वत:ला तेवढा अवाढव्य बनवू शकेन का? नाही वाटत…पण करावं वाटतं. जो हे करू शकेल तो जग जिंकला. स्वत:ला इतकं मोठं करावं की जग व्यापून घ्यावं. माझा फुगा कितपत फुगेल, नाही माहिती. फुगला जास्त तर फुटेल याची भिती मात्र जास्तंय.
मला जिवांचा संग हवाय, निर्जीव वस्तूंचा हवाय नि माझ्या मनाचा हवाय. जीव कसा जोडू मी दुसऱ्या जिवाबरोबर? प्रश्न अवघडंय पण आहे! गाठी मारून सोडल्या तर त्रास…सोडताना तुटल्या तर अजून त्रास. माझी वाट कुणी तुडवली तर त्रास, नाही तुडवली तर अजून त्रास! निर्जीव वस्तूंचा संग हवा तेवढा उपभोगता येईल; पण मनाचं काय? तेच नसलं तर कसचं काय?
डोळे मिटून घ्यावेत नि विलीन व्हावं अंधारात. मी प्रयत्न केला फार, पण जमलं नाही कधीच. देवळं शोधली, प्रसन्न गाभारे शोधले, ध्यान-धारणेची स्थळं शोधली नि उरलो अख्खा मी. पाच फुट सहा इंच. नुसतं सांगून उपयोग नाही, मनाला वाटलं, पाहिजे एकांत. स्वत:वरतीच विश्वास नाही, तर पसरणार कसा मी आभाळभर नि होणार एकसंध!
हिशोब आहे माझ्याकडे वेळेच्या तुकड्यांचा, नि मिळालेलं प्रेम मी जपून ठेवलंय बंद एका लिफाफ्यात. वाटतं ते उडून जाऊ नये, घाबरतो मी. जीवच गुंतून बसलाय त्यात की सुटणार नाही, झालंच तर तुटेल ती गाठ. आणि अशा कित्येक गाठी गच्च बांधून ठेवल्यात मी वस्तूंशी, माणसांशी नि स्वत:शी. कशी मिळेल मुक्ती? कसा मिळेल एकांत?
मी तुडवल्यात कित्तीतरी वाटा नि उघडल्यात कित्येक समाध्या. जगावं मी ही बहुधा इतर जगतात तसं…जगण्यासाठी.
वेळेला नमस्कार.
पंकज कोपर्डे
८ सप्टेंबर २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: