मंगळवार, २७ मे, २०१४

बेटाळ



जोराचा वारा आला तसा मी घरात येऊन कोपऱ्यात जाऊन बसलो. खिडक्या धडा-धडा हलू लागल्या नि समोरच्या झोपड-पट़्ट्यांमधले पत्रे फाड-फाड उडू लागले. कागद़्याच्या होड़्या बनवून वाऱ्यावर सोडाव्यात असं वाटलं. वाटलं की खिडकीच्या चौकटीतून त्या एकट्याच रडणाऱ्या कुत्र्यावर नेम धरून दगड फेकावा. समोरचं कारण नसताना उभं असलेलं निलगिरीचं झाडं पाठीत काड़्कन मोडून कुत्र्यासारखं पडावं. चौकात उगाच जगत असलेलं एक तीन पायांचं गाढव या वाऱ्याच्या भरात मरून पडावं. सगळाच घन कचरा वाऱ्याने उचलून दूर कुठेतरी नेऊन टाकावा किंवा गिळंकृत करून टाकावा. पाऊस आला की तुंबणारी गटारं नि रस्त्यांवरून बिनकामाची तोंड वर करून फिरणारी माणसं; एकजात प्रायव्हेट क्लासेसला जाणारी पोरं आणि तासनतास मोबाईलवर अडकून पडलेली शरीरं; भिकाऱ्यासारखं रस्त्यावर खात रस्त्यावरतीच प्लास्टीकचे ढीग टाकणारी मानव-जमात. एकसाथ सगळाच कचरा न्यावा त्यानं नि ओतावा जिथं कमीय तिथे. पाच-सहा वर्षांतून तरी एकदा केला पाहिजे निसर्गाने हा कार्यक्रम. मग वारा अचानकच थांबला नि पाऊस सुरू झाला. जोराचा लागला. पहिल्यांदा मातीचा सुगंध आला नि बाहेर पळत जाऊन रस्त्याकडेचं थोडं ओलं माळ जाऊन चाटण्याची अनिवार इच्छा झाली. उगाच मोठा झालो नाहीतर माती खाता आली असती. रडणारं कुत्रं भिजू लागलं म्हणून आडोश्याला जाऊन गप्प बसलं. निलगिरीचं झाड जिराफ़ाच्या मानेसारखं इकडून-तिकडून हलत राहिलं. रस्ते मोकळे होऊ लागले नि माणसं आडोश्याला जाऊन उभी राहिली. केर एका बाजूला केल्यासारखी. किती तो घन कचरा? शरीरांचा-मनांचा-आत्म्यांचा-आठवणींचा-विचारांचा-लिखानाचा नि त्यावरच्या मीमांसेचा-चित्रांचा-गाण्याचा-शब्दांचा! म्हटलं मरू दे, हे असं चार ओळी लिहून मनासारखं कधी घडत नाही. ते तसं लिहीणं सुरू केल्यापासून संपेपर्यंत आपल्याला काय म्हणायचं होतं, तेही नीटसं कळत नाही. आपल्याला जो अर्थ अभिप्रेत असतो, तो इतरांना कळतोच असं नाही आणि त्यांना जो कळतो, तो बहुधा आपल्या गावीही नसावा! कागदावर, आहेत चोरलेले मार्कर्स जवळ म्हणून, मारत बसलो रेघा नि वाटलं आपण अंदमानातल्या इंटरव्हिव आय-लॅण्डवरती जाऊ. त्याची रूपरेषा काढली, नि हवी नको ती ठिकाणं काढत राहिलो. समुद्राच्या पाण्याने आतवर मुसंडी मारलीय असं दाखवू, दोन छोटी-छानशी तळी दाखवू, एक सुंदरसा ओढा दाखवू, मानवी वस्ती दाखवू नि काय-काय. जेव्हा चित्र संपलं तेव्हा ते अगदीच माझ्यासारखं दिसू लागलं. मी शप्पथ सांगतो, मी असं ठरवून नाही बनवलं. अगदीच कचरा…एखादं रोगट तोंड असाव्ं असं काहीसं. चिडचिड झाली नि वाऱ्याने खिडकीतून आलेला कचरा झाडूने साफ करत राहिलो. बराचसा कचरापेटीत टाकला, थोडा बाजूला सारला. झाडू ठेवला. थोडा वेळ ते चित्र पाहिलं. काय असेल माझ्या मनात हे येण्यापुर्वी नि हे असं येताना? काय असेल त्या रडणाऱ्या कुत्र्याचं दु:ख नि त्या निलगिरीच्या अस्तित्वाचा अर्थ? का ते मोबाईलवर लटकलेले आत्मे अजूनही श्वास घेत आडोश्याला उभेत? का मी सतत बेटाळ होत चाललोय या माणसांच्या गर्दीत? उठलो, बाजूला सारलेल्या कचऱ्यात दोन रबर-बॅण्ड्स, यू-पिना नि एक पेन्सिल पडलेली. ते उचललं-झटकलं नि त्यांनाही त्यांच्या-त्यांच्या परिचयाच्या गर्दीत सोडून दिलं निवांत.
पंकज कोपर्डे
२७ मे २०१४   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: